‘मानवी जीवनात काळाला पुष्कळ महत्त्व आहे. ‘काळगती ओळखून जीवनातील प्रत्येक कृती करत स्वतःची (व्यष्टी) आणि पुढच्या टप्प्यात समाजाची (समष्टी) उन्नती करण्यासाठी प्रयत्न करणे’, हे मनुष्य जीवनाचे खरे ध्येय आहे. हिंदु धर्मात पूर्वीच्या काळी हेच शिक्षण गुरुगृही राहून अध्ययन करतांना मुलांना दिले जात होते. काळ ओळखता येण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया भक्कम असावा लागतो. पूर्वीचे लोक साधना करणारे असल्यामुळे ते आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम आणि द्रष्टे होते. ते काळ ओळखून जीवनातील प्रत्येक कृती करणारे होते. त्यांच्या द्रष्टेपणाची उदाहरणे इंडोनेशियात ठिकठिकाणी पहायला मिळतात. यांपैकीच एक उदाहरण म्हणजे इंडोनेशियातील मंदिरे होत. या मंदिरांची रचना आणि त्यांची संकल्पना पहातांना लक्षात येते की, लक्षावधी वर्षांपूर्वी या ठिकाणी हिंदूंचे साम्राज्य आणि संस्कृती होती. येथे झालेल्या ज्वालामुखींचा उद्रेक आणि भूकंप यांमुळे येथील बर्याच मंदिरांची हानी होऊन मनुष्यवस्ती अन्यत्र विस्थापित झाली. कालांतराने झालेले राजनैतिक पालट आणि अन्य पंथियांची आक्रमणे यांमुळे येथे अजून हानी झाली.
१. मंदिरांची नावे देवतांना संबोधून ठेवली जाणे
इंडोनेशियातील प्रंबनन मंदिर हे एके काळी जगातील सर्वांत उंच शिखर असलेले मंदिर होते. प्रंबनन हा ‘परब्रह्मन’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. यावरून मंदिरांची नावेसुद्धा देवतांना संबोधून ठेवली असल्याचे लक्षात येते. कित्येक शतके ज्वालामुखीच्या राखेखाली दबलेली राहूनसुद्धा येथील अनेक मंदिरे आजसुद्धा त्यांच्या अद्वितीयत्वाची जाणीव करून देतात.
२. मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर बसवलेले काळाचे मुख हे
मंदिरांची रचना करणार्या वास्तूविशारदांच्या द्रष्टेपणाचे उदाहरण असणे
या मंदिरांचे बांधकाम करतांना त्यांच्या प्रवेशद्वारांवर काळाचे मुख बसवण्यात आलेले दिसते. (वरील छायाचित्र पहा.) मंदिरांची रचना करणार्या वास्तूविशारदांनी (architects नी) त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याद्वारे काळाचा पडदा सारून ‘पुढील काळ हा विनाशाचा असणार आहे’, हे जाणले होते. त्यामुळे त्यांनी काळाला ओळखून आणि काळाच्या साक्षीनेच या मंदिरांची निर्मिती विशिष्ट पद्धतीने केल्याचे कळले. काळाच्या साक्षीने मंदिरांची रचना केल्यामुळे आज कित्येक शतके उलटूनसुद्धा ही सर्व मंदिरे दिमाखात उभी आहेत. त्यांच्या सौंदर्याचे दर्शन घेतांना डोळ्यांचे पारणे फिटते, तर वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात.
३. घर्षणशक्तीच्या आधारावर एकमेकांमध्ये दगड अडकवून केलेले
मंदिरांचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि त्यामागचा वास्तूविशारदांचा व्यापक दृष्टीकोन
वास्तूविशारदांनी मंदिरांची बांधणी एखाद्या जुळणी कोड्याप्रमाणे केलेली आढळते. मंदिरांचे अगदी शिखरापर्यंतचे बांधकाम करतांना मोठमोठे दगड केवळ एकमेकांवर होणार्या घर्षणशक्तीच्या आधारावर एकमेकांमध्ये अडकवले आहेत. दोन दगडांमध्ये चुना, सिमेंट यांसारखे कोणत्याही प्रकारचे चिकटवणारे मिश्रण वापरलेले नाही. अशा प्रकारचे बांधकाम करण्यामागे २ कारणे समजली.
अ. मंदिरात प्रतिष्ठापित देवतेच्या मूर्तीची सातत्याने पूजा-अर्चा करून मूर्तीत त्या देवतेचे तत्त्व जागृत झालेले असते. मूर्ती भग्न झाल्यास हे तत्त्व वातावरणात विरून जाते आणि त्या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापून पुन्हा त्याच भक्तीभावाने पूजा-अर्चा करून देवतेचे तत्त्व जागृत करावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी आणि ‘दुर्दैवाने मंदिराला भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे काही इजा झालीच, तरी त्याचे दगड आतील देवतेच्या मूर्तीवर पडून ती भग्न होण्यापासून वाचावी’, यासाठी मंदिराची रचना करतांनाच ती चांगल्या आणि यथायोग्य पद्धतीने केल्याचे दिसून येते.
आ. एखादे मंदिर कोसळले, तरी त्याच्या दगडांचा नीट अभ्यास करून मंदिराची उभारणी पुन्हा करता येऊ शकते, हे विशेष आहे.
अशा प्रकारे केवळ घर्षणशक्तीच्या आधारावर कित्येक शतके उभी असलेली ही मंदिरे पाहून कृतज्ञतेने आपले हात आपोआपच जोडले जातात. याच्या उलट आजची बांधकामे पाहिल्यास ती काही वर्षेसुद्धा टिकत नाहीत. इतकेच नव्हे, तर दुर्दैवाने एखादी वास्तू कोसळलीच, तर ती पूर्णपणे भुईसपाट होते. तिची उभारणी होती तशी करता येत नाही. कुठे इतका बारकाईने विचार करणारे आपले पूर्वज, तर कुठे आजची स्थिती ! यांची तुलना करणेसुद्धा महान भारतीय संस्कृतीला काळिमा लावण्यासारखे आहे.
अशा प्रकारे सर्वांगीण विचार करणार्या आपल्या महान हिंदु संस्कृतीविषयी आपण सर्वांनी अभिमान बाळगून त्याच्या रक्षणासाठी कटीबद्ध होणे आवश्यक आहे. ही कटीबद्धता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !’
– श्री. सत्यकाम कणगलेकर, सीम रीप, कंबोडिया.