१. आत्म्याची भाषा
‘आत्मा प्रकाशभाषा आणि नादभाषा यांच्या माध्यमातून जगाशी अन् परमात्म्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आत्म्यातून प्रक्षेपित होणार्या प्रकाशकिरणांमुळे जिवाला विविध देवतांची दर्शने होतात. आत्म्यातून व्यक्त होणार्या नादकंपनांमुळे जिवाला विविध प्रकारचे सात्त्विक नाद ऐकू येतात.
२. पंचमहाभूतांच्या मीलनाने नादाची निर्मिती होणे
आत्मा स्वत:ला व्यक्त करतांना मनाला प्रभावित करतो. मनातील ऊर्जा देहातील सूक्ष्म अग्नी प्रज्वलित करते. देहात प्रज्वलित झालेला सूक्ष्म अग्नी ब्रह्मग्रंथींमध्ये वास करणार्या सूक्ष्म वायूला स्पर्श करतो. पृथ्वीतत्त्वमय असणार्या मूलाधारात स्थित असणारा हा सूक्ष्म वायू ऊर्ध्वदिशेने मार्गक्रमण करून टप्प्याटप्प्याने कुंडलिनीमार्गांतील स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार या चक्रांपर्यंत पोहोचतो अन् तो मुखावाटे व्यक्त होतो. आत्म्याचे कंप मुखातील नादाद्वारे प्रगट होतात. नादलहरींचा स्पर्श मनोमय आपतत्त्वात्मक लहरींना होऊन त्यांच्यात हालचाल निर्माण होते आणि मनात विविध तरंग उमटतात. मनात उठणार्या या तरंगांना आपण भाव किंवा भावना म्हणतो. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या मीलनाने नादाची निर्मिती होते. भारतीय शास्त्रीय संगीतातील स्वप्तस्वरांच्या माध्यमातून आत्म्याचा दैवी प्रकाश आणि दैवी नाद सगुणातून प्रगट किंवा व्यक्त होतात.
३. भारतीय शास्त्रीय संगीत
अ. व्याख्या
मन सात्त्विक अवस्थेत असतांना मुखावाटे किंवा वाद्य वाजवल्याने प्रगट होणारा नाद सात्त्विक असतो. या सात्त्विक नादालाच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, असे संबोधले जाते.
आ. वैशिष्ट्ये
१. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना, म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना आहे.
२. संगीत म्हणजे आत्म्याचा आवाज ऐकणे आणि भगवंताशी अनुसंधान जोडणे.
३. भारतीय शास्त्रीय संगीतातून चांगली शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती जिवाला येते.
४. संगीतातील सप्तस्वरांची निर्मिती
अ. पंचमुखी शिवाने दिलेेल्या ज्ञानाच्या उपदेशातून वेदांची आणि उच्चारलेल्या नादांतील
चढ-उतार यांच्यातून भारतीय शास्त्रीय संगीताचे मूलाधार असणार्या सप्तस्वरांची उत्पत्ती होणे
पौराणिक कथेनुसार पंचमुखी शिवाच्या पंचाननरूपातून सप्तस्वरांची उत्पत्ती झाली. पंचमुखी शिवाने जो आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश केला त्यांतून वेदांची निर्मिती झाली आणि शिवाने उच्चारलेल्या नादांतील चढ-उतारांतून सप्तस्वरांची निर्मिती झाली. हेच सप्तस्वर भारतीय शास्त्रीय संगीताचे मूलाधार आहेत.
(या कथेची माहिती ज्ञानातून मिळालेली आहे. काळाच्या ओघात ही पुराणातील कथा लुप्त झालेली आहे.’ – कु. मधुरा भोसले)
आ. सप्तस्वरांच्या निर्मितीची प्रक्रिया
अनाहत नादातून श्रुतींची निर्मिती झाली. त्यानंतर सामवेदाची निर्मिती झाली आणि त्यातून सप्तस्वरांची निर्मिती झाली. सप्तस्वरांतून प्राचीन भारतीय शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली. शिवाने उच्चारलेल्या शब्दांतून भारतीय शास्त्रीय संगीतातील मूलतत्त्व असणार्या सप्तस्वरांची निर्मिती झाली आहे. सप्तस्वरांचा जनक नटराज शिवशंकर आहे.
५. संगीतातील विविध राग
अ. संगीतातील रागांची निर्मिती
५ अ १. राग
ध्वनीच्या विशिष्ट रचनेला स्वरवर्णादी क्रियेने (विशिष्ट स्वर समूहाने) रंगकत्व येते. अशा ध्वनीमालिकेला ‘राग’ म्हणतात. स्वरांतून विशिष्ट सूक्ष्म शक्तीची निर्मिती होऊन त्यांतून सूक्ष्म रंग प्रगट होतात. यालाच ‘स्वरांतून रंगकत्व निर्माण होणे’, असे म्हणतात.
५ अ २. रागांतील स्वरांचा उच्चारानुसार रागांचे विविध प्रकार निर्माण होणे
सप्तस्वरांचा उच्चार विशिष्ट पद्धतीने, उदा. तीव्र, मध्यम किंवा कोमल केल्यावर विशिष्ट रागाची निर्मिती होते.
५ अ ३. रागांमधील स्वरांची संख्या
काही रागांमध्ये असणार्या स्वरांची संख्या ७ किंवा त्याहून अल्प असते. स्वरांची संख्या अल्पाधिक केल्यावरही विविध रागांची निर्मिती होते, उदा. राग मालकंस आणि राग दुर्गा यांमध्ये ५ स्वर असतात, राग भैरव, मारवा, सोहनी, पुरीया ललीत, अडाणा इ. रागांमध्ये ६ स्वर आहेत, तर राग यमनमध्ये ७ स्वर आहेत.
५ अ ४. पूर्णराग आणि स्वल्पराग
ज्या रागांमध्ये सात स्वर असतात त्यांना ‘पूर्णराग’ म्हणतात. काही रागांमध्ये पाच किंवा त्याहून अल्प स्वर असतात. यांना ‘स्वल्पराग’ असे म्हणतात. ‘पूर्णराग आणि स्वल्पराग’, ही रागांना आध्यात्मिक परिभाषेतून दिलेली संज्ञा आहे.
आ. संगीतातील रागांची वैशिष्ट्ये
१. प्रत्येक रागाला स्वत:चे वेगळे व्यक्तीमत्त्व आहे.
२. प्रत्येक रागातून विविध प्रकारच्या भाव आणि भावना व्यक्त होतात.
३. संगीतातील विविध रागांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे.
४. संगीतातील राग हे निसर्गातील पंचतत्त्व, दिनचक्र आणि ऋतुचक्र यांच्याशी निगडित आहेत.
५. रागांचा संबंध मानवी मनाच्या विविध दशांशी आणि अवस्थांशी असतो.
६. प्रत्येक रागातून विशिष्ट प्रकारची शक्ती प्रक्षेपित होते.
७. प्रत्येक रागाचा सूक्ष्म रंग निराळा आहे.
८. रागांचा संबंध अध्यात्मशास्त्राशी आहे. विविध राग विविध देवतांशी संबंधित आहेत.
९. संगीतातील नाद किंवा सप्तस्वर हे शरिरातील पंचप्राणांशी संबंधित आहेत.
१०. भारतीय शास्त्रीय संगीतातील राग सात्त्विक असल्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले आहे.
इ. संगीतातील रागांचे विविध प्रकार
सर्व रागांचा संबंध एकमेकांशी असतो. या संबंधाला मानवीरूप देऊन त्यांचे विभाजन ‘पुरुष राग, स्त्रीराग आणि पुत्र राग’ या प्रमुख तीन गटांमध्ये केले आहे. रागांना देव मानून त्यांची कुटुंबे निश्चित केलेली आहेत. संगीतातील प्रमुख ६ राग हे पुरुषवाचक असून, रागिण्या या रागांच्या पत्नी असून उपराग हे रागांचे पुत्र मानले आहेत. या प्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीतात एकूण ८४ रागरागिण्या आहेत.
५ इ १. पुरुष राग (प्रमुख राग)
भैरव, मालकंस, हिंदोल, दीपक, श्रीराग आणि मेघराग हे ६ प्रमुख किंवा पुरुष राग आहेत.
५ इ २. स्त्रीराग (रागिण्या)
प्रत्येक रागाला ५ पत्नींप्रमाणे ३० रागिण्या आहेत.
५ इ ३. पुत्रराग (उपराग)
प्रत्येक रागाला ८ पुत्रांप्रमाणे ४८ उपराग आहेत.’