२२.४.२०१८ या दिवशी ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी देहत्याग केला. सनातनच्या साधिका प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रवचनांमधून श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करणे
‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.
२. ‘अभ्यासोनि प्रकटावे…’ ही समर्थ रामदासस्वामींची शिकवण तंतोतंत आचरणात आणणे
दैनिक सनातन प्रभातसाठी एखाद्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया, तर कधी आशीर्वचनपर संदेश घेण्याचा योग आला, तेव्हा मला त्यांचा एक गुण शिकायला मिळाला. तो म्हणजे प्रतिक्रिया देण्याविषयी विचारल्यावर पू. काकांनी क्वचितच त्याच क्षणी प्रतिक्रिया सांगितली. ते नेहमी म्हणायचे, ‘‘मी चिंतन करतो आणि ५ मिनिटांनी भ्रमणभाष करतो.’’ वास्तविक त्यांचा गाढा अभ्यास आणि व्यासंग पहाता ‘ते कुठल्याही विषयावर तात्काळ भाष्य करू शकतील’, अशी त्यांची क्षमता होती; पण ‘अभ्यासोनि प्रकटावे…’ ही समर्थ रामदासस्वामींची शिकवण इतरांना शिकवण्यासाठी ‘चिंतन करून सांगतो’, असे ते म्हणायचे’, असे मला वाटले.
३. इतरांना प्रोत्साहन देणे
एकदा मी दैनिकात ‘शरद पवार आणि ब्राह्मणद्वेष’ या विषयावर एक लेख लिहिला होता. तो लेख वाचून पू. काकांनी भ्रमणभाष करून माझे कौतुक केले. ‘तू छान लिहिले आहेस. समर्थांचा तुला आशीर्वाद आहे’, असे ते म्हणाले. वास्तविक लेख लिहिण्यासाठीचा अभ्यास, वाचन आणि लेखन यांमध्ये मी पुष्कळच न्यून पडते; पण पू. काका मला नेहमीच प्रोत्साहन देत असत. समाजात काही प्रसंग घडल्यावर त्याविषयीही लिखाण करून दैनिकात पाठवण्यास ते मला सांगत.
४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होणे
सनातनचे गुरुपौर्णिमा उत्सव आणि हिंदु जनजागृती समितीच्या पत्रकार परिषदा, मोर्चे, आंदोलने यांमध्येही पू. काका उत्साहाने सहभागी व्हायचे. त्या वेळी ते त्यांची परखड भूमिकाही मांडायचे.
५. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे
कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी श्री. समीर गायकवाड यांना आणि दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाली. तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांमधून पुष्कळ मोठ्या प्रमाणात सनातनची अपकीर्ती केली जात होती. पू. काका मात्र सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. वास्तविक सनातनला बळीचा बकरा बनवण्यासाठीच सनातनच्या निरपराध साधकांना दोन्ही प्रकरणांत विनाकारण गोवण्यात आले होते. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे या माध्यमांतून ‘मीडिया ट्रायल’ घेऊन दोन्ही साधकांना दोषी ठरवून अनेक वृत्तवाहिन्या मोकळ्या झाल्या होत्या. त्यामुळे ‘समाजाची दिशाभूल होऊन प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे’, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. त्याच वेळी पू. सुनील चिंचोलकर यांची या प्रकरणाविषयी दैनिक सनातन प्रभातसाठी प्रतिक्रिया घेण्याविषयी मी त्यांना संपर्क केला. अन्य काही मान्यवरांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही जणांनी बिचकून आणि मोघम प्रतिक्रिया दिली. पू. काकांंनी मात्र सनातनच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहून ‘सनातनचे साधक निर्दोषपणे बाहेर पडतील’, अशा आशयाची एक आश्वासक प्रतिक्रिया दिली. त्या वेळी त्यांच्या मनात कुठलाच किंतु आला नाही.
त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांना सनातनविषयी असलेला ठाम विश्वास आणि श्रद्धाच जाणवत होती. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा ‘अधिकार’ जाणवायचा. पू. काकांची प्रतिक्रिया ऐकली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
६. व्याख्यानात सनातनच्या साधिकेने केलेल्या कवितेचे उदाहरण देऊन
‘भक्ती कशी करायची ?’, ते सनातनच्या साधकांकडून शिकावे’, असे सांगणे
पू. काकांची रामकृष्ण मठात व्याख्यानमाला होती. त्याच दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सनातनच्या एका साधिकेने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच माझे माता, पिता, बंधू… आहेत’, अशा आशयाची केलेली कविता छापून आली होती. पू. काकांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये ती कविता आणि साधिका यांचे उदाहरण देऊन ‘भक्ती कशी करायची ?’, ते सनातनच्या साधकांकडून शिकावे’, असे सांगितले.
७. ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा ।’, या उत्कट भावाने
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ मस्तकी धरणारे पू. चिंचोलकर !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांच्या मनात उत्कट भाव होता. त्यांनी गुरुदेवांवर समर्थ रामदासस्वामी यांच्या रचनांवर आधारित एक भावकविताही केली होती. त्यांच्या हस्ते जेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले, तेव्हा त्यांनी त्या ग्रंथाच्या निर्मितीचे भरभरून कौतुक केले. ‘मी प्रकाशनाच्या क्षेत्रात एवढी वर्षे आहे; पण इतका सुंदर ग्रंथ मी आजतागायत पाहिला नाही.’ असे म्हणून त्यांनी त्या ग्रंथाला नमस्कार केला. ग्रंथ दोन्ही हातांनी उचलून डोक्यावर ठेवून ते म्हणाले,
‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा कि बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी ॥
पू. काकांच्या निवासस्थानीच त्या ग्रंथांचे प्रकाशन झाले. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी खोलीतील रचनेच्या दृष्टीने साधकांनी थोड्याफार सूचना केल्या. तेव्हा छायाचित्र चांगले येण्यासाठी त्यांनी साधकांना मोकळीक दिली होती.
पू. चिंचोलकरकाकांच्या चरणी कृतज्ञता !’
– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे (मे २०१८)