परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान !
अनेक संघटनांच्या सहभागाने हिंदू ऐक्याच्या आविष्काराचे दर्शन !
पुणे, २१ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचे प्रथम उद्गाते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २० मे या दिवशी पुणे आणि धुळे शहरांत, तसेच मुंबई उपनगरांतून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. हिंदु राष्ट्राची संकल्पना सुस्पष्ट करणारे, व्यक्तिगत जीवनात हिंदुत्व आचरणात आणायला शिकवणारे, गुरुकृपायोगाच्या साधनामार्गावर चालणार्यांना मोक्षाच्या दिशेने घेऊन जाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे खर्या अर्थाने राष्ट्रगुरु आणि मोक्षगुरु आहेत. त्यांच्या स्मरणात, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या जयघोषात, बाह्म आणि क्षात्र तेजाने भारलेल्या वातावरणात आणि साधकांच्या अपूर्व उत्साहात काढण्यात आलेल्या या लक्षवेधी दिंड्या चैतन्याची उधळण करणार्या आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणार्या ठरल्या ! ‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ’ असा जयघोष करत हिंदू म्हणून एकवटलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांनी या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला.
…अशी झाली दिंडी !
पुणे
हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन आणि आळंदी येथील माधव चैतन्य महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीच्या आधी हिंदु जनजागृती समितीचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी भिकारदास मारुतिला नारळ वाढवला. त्यानंतर श्री. कृष्णाजी पाटील यांनी श्री भवानी माता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे भावपूर्ण पूजन केले. सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचीही वंदनीय उपस्थिती होती. ‘सनातन प्रभात’च्या वाचक असलेल्या पाच सुवासिनींनी त्यानंतर धर्मध्वज आणि दोन्ही पालख्यांतील प्रतिमा यांचे औक्षण केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी दिंडीचा उद्देश सांगितला. त्यानंतर समितीचे श्री. श्रेयस गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली खड्या आवाजात म्हणून शिवरायांना मानवंदना दिली. उपस्थितांनीही ‘हर हर महादेव’च्या गजरात वातावरणात वीरश्री निर्माण केली. क्षात्रतेजाने युक्त झालेल्या वातावरणात मग समितीचे श्री. इंद्रजित वाडकर यांनी तीन वेळा शंखनाद केला. त्याच वेळी ध्वनीवर्धकावरून ‘यदा यदा हि धर्मस्य…’ हा श्लोक लावण्यात आला. ब्राह्म आणि क्षात्र तेज यांच्या बळावर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, असा संदेशच जणू या सर्व सोहळ्यातून मिळाला आणि दिंडी मार्गस्थ झाली !
मुंबई
विविध संघटना, संप्रदाय, स्थानिक मंडळे १ सहस्र ३५० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू या दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
शंखनादाने दिंडीला प्रारंभ झाला. धारावी येथील श्रीराम गणेश मित्र मंडळाचे श्री. कांतीभाई पटेल यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. दिंडीत सहभागी असलेल्या मुंबईचे ग्रामदैवत श्री मुंबादेवीच्या पालखीची सौ. सुप्रिया पाटील यांनी दिंडीतील ओटी भरली, तर श्री. कांतीभाई पटेल यांनी देवीचे पूजन केले. हिंद सायकल गणेशोत्सव मंडळाचे श्री. संघटन शर्मा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे पूजन केले. चिंचपोकळी बाजारपेठेतील धर्मप्रेमी महिलांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. दिंडी संत भालचंद्र महाराज मैदानावर आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. मैदानावर मान्यवरांची वीरश्रीयुक्त भाषणे झाली. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी दिंडीचे सूत्रसंचालन केले, तर प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिंडीसाठी साहाय्य करणार्यांचे आभार व्यक्त केले. यानंतर दिंडीचा समारोप झाला. दिंडीच्या मार्गात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धुळे
धुळे येथे धर्मध्वजाचे पूजन प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. भिकन आप्पा वराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीमध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक मंडळे, संप्रदाय यांसह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. या दिंडीमध्ये आई एकवीरादेवी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिंडीमध्ये विविध सामाजिक, देशभक्त आणि धार्मिक संघटना यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते ‘एक हिंदू’ म्हणून ३०० जण सहभागी झाले होते. सद्गुरु नंदकुमार जाधव यांची या दिंडीत वंदनीय उपस्थिती लाभली !
योग विद्या धाम, धुळे यांनी संपूर्ण दिंडीत योग प्रात्यक्षिके सादर केली. योग वेदान्त सेवा समितीच्या वतीने एक चित्ररथ दिंडीत सहभागी करण्यात आला.
दिंडीचे स्वागत आणि पुष्पवृष्टी !
पुणे
मार्गावरील मुख्य चौकांमध्ये दिंडीचे स्वागत, तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. बाजीराव रस्त्यावर श्री. कमलाकर पाटणकर आणि त्यांच्या परिवाराकडून दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शनिपार चौकात शुभकामना एंटरप्रायजेसचे मालक श्री. शरद गंजीवाले आणि सौ. कल्पना गंजीवाले यांनी, लक्ष्मी रस्त्यावर वालीशा दुकानाचे मालक आणि प्रखर धर्माभिमानी श्री. तुषारशेठ ग्रोगरी, ब्रेझन ग्रोगरी आणि नेब्युल ग्रोगरी, पुढच्या चौकात जोगेश्वर सिल्क अॅण्ड सारीज्चे श्री. चंद्रकात पासकंठी, कलाक्षेत्रम्चे श्री. सागर पासकंठी यांनी पालखी आणि धर्मध्वज यांचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. टिळक चौकात सुतारवाडी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. ऋषीकेश कुलकर्णी, श्री. गुरुदास आणि श्री. भास्कर जाधव यांनी दिंडीवर पुष्पवृष्टी केली.
मुंबई
रंगारी बदक चाळ येथील रहिवाशी श्री. राहुल आणि सौ. रुचिता पांगे अन् श्री. समीर आणि सौ. संगीता पांगे या दाम्पत्यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. लालबाग मार्केट पोलीस चौकी येथे सनातन प्रभातचे वाचक श्री. मधुकर आणि सौ. माधवी आंबेकर तसेच श्री. नारायण आणि सौ. लक्ष्मी कुर्हे या दाम्पत्यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. स्थानिकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.
धुळे
मार्गात पावनपुत्र व्यायाम शाळेच्या वतीने दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
दिंडीची वैशिष्ट्यपूर्ण रचना
या दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ, रणरागिणी, बालपथक सर्वांचीच पारंपरिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक वेशातील बालपथकाने जणू हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांनुसार आचरण करण्याचेच आवाहन केले आणि आचारधर्माचे फलक हातात घेऊन हिंदू संस्कृतीचा परिचय करून दिला. क्रांतीकारकांच्या वेशातील बालवीर ‘काळानुसार आता प्रथम क्षात्रसाधनाच करणे आवश्यक आहे’, असेच जणू सांगत होते.
दिंडीच्या प्रारंभी शौर्यजागरण करणारी लाठी-काठी, दंडसाखळी अशी स्वरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याला दोन मशालींचीही साथ होती. त्यानंतर धर्मध्वज, पुणे येथे श्री भवानी मातेची, मुंबईत मुंब्रादेवी तर धुळे येथे एकवीरा देवीची पालखी, तसेच परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची पालखी, चारचाकी गाडीवर मेघडंबरीमध्ये ठेवलेली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची प्रतिमा दिंडीच्या प्रारंभी होत्या. ‘केवळ मानसिक स्तरावर हिंदुत्वाचे कार्य करून चालणार नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी भगवंताचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे’, हे यातून जाणवत होते. मध्ये उभे राहून पाहिल्यास या दिंड्यांचे ना आरंभ दिसत होते ना शेवट ! आगामी काळात अवतरणारे हिंदु राष्ट्रही असेच अमर्याद, व्यापक असेल, याचीच जणू ते साक्ष होते. आपत्काळात तारून नेणारे प्रथमोपचार पथकही दिंडीत सहभागी झाले होते.
उपस्थित मान्यवर !
पुणे
अखिल राजस्थानी महासंघाचे मुख्य सचिव श्री. जयसिंह राजपुरोहित, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. मयुरेश अरगडे, माजी स्वीकृत नगरसेवक श्री. राजेश शिंदे, भोर-शिरवळ-खंडाळा येथील श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी, शिवसेनेचे श्री. मनेश जगदाळे, अधिवक्ता भूपेंद्र गोसावी, कासुर्डी आणि उंड्री येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी.
मुंबई
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई कार्यवाह श्री. बळवंत दळवी, श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे प्रमुख श्री. प्रभाकर भोसले, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू रावकर, अधिवक्ता नवीन चौमल, करावे गाव भजनी मंडळाचे श्री. आकाश तांडेल, भाजपचे श्री. संदीप सिंह, शिवसेनेचे श्री. गिरीश गुप्ता यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी दिंडीत सहभागी झाले होते.
या व्यतिरिक्त शिवसेना, तसेच श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी), हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान, पद्मनाभ शिष्य संप्रदाय, सात आसरा स्पोर्ट क्लब, श्रीराम मंदिर (धारावी), वारकरी संप्रदाय, योग वेदांत समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धुळे
ह.भ.प. वासुदेव महाराज आर्विकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. भिकन आप्पा वराडे, भाजपचे श्री. राजू महाराज, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके, श्री. प्रवीण अग्रवाल, श्री. नाना जोशी, योग वेदान्त सेवा समितीचे श्री. कमलेशकुमार साहू, रेलन क्लॉथ स्टोअर्सचे मालक श्री. प्रवीण रेलन, श्री. पंकज धात्रक, एम्.एच्.टी.व्ही.चे श्री. राजू भावसार, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. विजयभाऊ सोनार, विश्व हिंदू परिषदेचे श्री. योगेश गोसावी, बजरंग दलाचे श्री. गुलाब माळी, श्री. संदीप चौधरी, श्री. विशाल विसपुते
या व्यतिरिक्त गायत्री परिवार, वारकरी सांप्रदाय, संत सावता माळी ग्रुप, श्रीकृष्ण मंडळ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघटनांचे कार्यकर्ते, तसेच सामाजिक कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष प्रतिसाद
पुणे
१. येथे श्री. शरद गंजीवाले यांनी सपत्नीक भवानी मातेच्या आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पालखीचे अतिशय भावपूर्ण पूजन केले. त्यांच्या दुकानात गर्दी असून ते दुकानातील महिला कर्मचार्यांना दिंडीच्या स्वागतासाठी घेऊन आले होते.
२. एक गृहस्थ त्यांच्या पत्नीला खास प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी घेऊन आले. धनकवडी येथील मारुती खाणेकर हे स्वतःहून उत्स्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले. दिंडीत सहभागी होऊन पुष्कळ चांगले वाटले, असे त्यांनी सांगितले.
३. दिंडीच्या प्रारंभी लाठीकाठी-दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके पाहून ‘सिलंबम पुणे’ या मर्दानी खेळ शिकवणार्या क्लासचे शिक्षक श्री. आदित्य केंजळे हे स्वयंस्फूर्तीने प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनीही काही प्रात्यक्षिके करून दाखवली.
मुंबई
मुंबई येथे घोषणा ऐकून एक फळविक्रेते श्री. लालूप्रसाद गुप्ता हे स्वतः घोषणा देऊ लागले.
दिंडीच्या पुढे ‘एल्सीडी’वर दाखवण्यात येत असलेली हिंदु धर्मजागृती सभेविषयी ध्वनीचित्रफीत लोक थांबून पहात होते.
मुंबई येथे चिंचपोकळी येथील शिवसैनिक श्री. अनंत जाधव यांनी, तसेच लालबाग येथील वास्तव ग्रुप, विलास मित्र मंडळाने निरपेक्ष भावनेने हिंदू एकता दिंडीसाठी सहकार्य केले.
पुणे आणि मुंबई पोलिसांनीही केले दिंडीचे कौतुक !
पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलिसांनी दिंडी पुष्कळ चांगली आणि शिस्तबद्ध असल्यामुळे आमच्यावर वाहतुकीचा ताण आला नाही, असे सांगितले. दिंडीच शिस्तबद्ध स्वरूप पाहून दिंडीचे कौतुक केले.
चैतन्याची उधळण आणि समृद्ध भारतीय
संस्कृतीचे दर्शन घडवणारी मुंबई, पुणे आणि धुळे येथील दिंडी !
पुणे
तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या आणि टाळ वाजवणार्या महिलांचे पथक आनंदाने नाच करत पुढे सरकत होते. त्यानंतर होते पुणे वेदपाठशाळेतील वेदाध्यायन करणार्या ३० विद्यार्थ्यांचे पथक ! संतश्री आसारामजी बापू संप्रदायाचे साधकही दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीचे विशेष आकर्षण ठरले, ते पारंपरिक वेश परिधान केलेल्या, भगव्या साड्या नेसलेल्या रणरागिणींचे पथक ! आगामी काळात महिलांना आता झाशीच्या राणी लक्ष्मीबाईप्रमाणे रणरागिणींचीच भूमिका निभवावी लागणार आहे, असा संदेश यातून मिळत होता. त्यानंतर डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांचे पथक, प्रथमोपचार पथक, लेझीम पथक, महिला पथक आणि पुरुष पथक सहभागी झाले होते. दिंडीमध्ये लक्षणीय संख्येने सहभागी झालेल्या महिला पथकातून नारीशक्तीचे दर्शन घडले.
फेरीच्या प्रारंभीपासून शेवटपर्यंत त्यांनी सहभागी साधकांना प्रोत्साहन देत त्यांच्या चैतन्यमय अस्तित्त्वाने वातावरण भावमय केले. लक्ष्मी रस्त्यावर एका चौकात फेरीत सहभागी टाळकरी साधिकांच्यासह सद्गुरु (कु.) स्वाती खाडये त्यांनीही फेर धरला.
क्रांतीकार्याचे आवाहन करणारी बालसाधकांची नाटिका
दिंडीच्या समारोपप्रसंगी क्रांतीकारकांच्या वेशातील बालसाधकांनी नाटिका सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालसाधकांनी नाटिका सादर करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध होण्याचे आवाहन केले.
मुंबई
१. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग !
दिंडीमध्ये शिस्तबद्धरित्या सहभागी झालेले श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी आणि पू. भिडेगुरुजी यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापनेच्या संकल्पाची माहिती देणारा साकारलेला ‘रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासनाचा चित्ररथ’ हा दिंडीचे आकर्षण ठरला.
२. हिंदूमध्ये क्षात्रवृत्ती जागृत करणारी मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके !
धारकर्यांनी दिंडीमध्ये मर्दानी खेळ सादर केले. दिंडीमध्ये दुर्गाशक्ती पथक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी दांडपट्टा, दंडसाखळी, लाठीकाठी, कराटे यांची प्रात्याक्षिके सादर केली. त्यामुळे नागरिकांमध्ये वीरश्री निर्माण झाली. दिंडीमध्ये रणरागिणी शाखेच्या महिलांनी हाती तलवार आणि काठी घेऊन संचलन केले.
धुळे
१. समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील मुलांनी लाठी आणि दंडासाखळीची प्रात्यक्षिक दाखवली. ही प्रात्यक्षिके बघून लोकांमधील शौर्य जागृत झाले.
२. गुरुखेम भारती बाबा दानपट्टा प्रसारक मंडळचे श्री. माणिक राव पावनकर (वय ८४ वर्षे) यांनी तरुणांनाही लाजवेल अशी दांडपट्टा प्रात्यक्षिके दाखवली. तसेच त्याचे सहकारी शैलेश पावनकर, राजुमणी मद्रासी, प्रशांत धापटे यांनी लाठी युद्ध आणि लाठीचे प्रकार दाखवले.
क्षणचित्रे
नारायणस्वरूप दिंडीचे आगमन !…आणि नागरिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद !
१. हिंदू एकता दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लोक दिंडी थांबून पहात होते.
२. उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन हिंदु राष्ट्राला समर्थन देत होते,
३. अनेक जणांनी दिंडीची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढून घेतली आणि त्याचे चित्रीकरणही केले.
४. अनेक जणांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पालखीला भावपूर्ण नमस्कार केला.
५. पुणे येथे दिंडी पाहून समाजातील एका व्यक्तीने रस्त्यावरच डोके टेकवून नमस्कार केला.
६. दिंडी पाहिल्यावर नागरिकांच्या तोंडवळ्यावरील भाव पालटत होते, त्यांना आनंद उत्साह आणि वाटत होता, हे लक्षात येत होते.
७. या प्रसंगी ‘गोरक्षण’ या विषयावरील स्मरणिका, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक, तसेच सनातन-निर्मित ग्रंथ यांचेही वितरण करण्यात येत होते. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
८. भगवे ध्वज, फलक, स्वरक्षण प्रात्यक्षिके आणि उत्स्फूर्त घोषणा यामुळे वातावरण हिंदुत्वातील क्षात्रतेजाने उत्साहवर्धक झाले होते.
९. हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार पथकाने आपत्कालीन स्थितीत करावयाच्या प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके दिंडीत सादर केली.
१०. मुंबईत दिंडीमध्ये पाणी आणि सरबत यांचे वाटप होऊनही त्यांचे रिकामे ग्लास किंवा बाटली कोठेही आढळली नाही.
फेसबूकच्या माध्यमातून सहस्रो लोकांनी घेतला दिंडीचा लाभ !
दिंडीचे फेसबूकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत होते. त्यामुळे सहस्रो लोकांपर्यंत विषय पोहोचला !
पुणे
येथे ३३ सहस्र जणांपर्यंत दिंडीचा विषय पोहोचला. ९ सहस्र ३०० हून अधिक जणांनी दिंडी ‘लाईव्ह’ पाहिली. ५६६ जणांनी हे प्रक्षेपण इतरांना पहाण्यासाठी ‘शेअर’ केले. ३११ जणांनी दिंडी आवडल्याचे सांगितले, तर २१९ जणांनी याविषयी मत नोंदवले.
मुंबई
येथे २० सहस्र ८३७ लोकांपर्यंत दिंडीची माहिती पोहोचली. ५ सहस्र ४३ लोकांनी दिंडीचे थेट प्रक्षेपण पहिले. २१० लोकांनी ती आवडली (लाईक) असल्याचा शेरा दिला. २७९ जणांनी ती अन्यांना पाठवली (शेअर केली).
दिंडी पाहून नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
मुंबई
१. समाजाला हिंदु धर्माचे संस्कार कळण्यासाठी अशी दिंडी आवश्यक आहे. यातून सरकारला हिंदू ऐक्याची जाणीव झाली पाहिजे. – श्री. कांतीभाई पटेल आणि श्री. आनंद वालावलकर, श्रीराम गणेश मित्र मंडळ, धाराव
२. हिंदुत्वाला वेळ दिला नाही, तर येणारी पिढी आपणाला कधीच क्षमा करणार नाही. यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवे. – श्री. श्यामाप्रसाद दास, विश्वस्त, हरे राम हरे कृष्ण मंदिर, बेलापूर
धुळे
१. हिंदूंना आपल्या परंपरांचा बोध होऊन हिंदू संघटित होण्यास साहाय्य होईल. – श्री. के. ए. भडांगे
सांगता सभेतील मान्यवरांची उद्बोधक भाषणे !
धुळे
येथे सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुंबई
वर्ष २०२३ साली हिंदु राष्ट्र येणारच…! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
एकमेकांसह बंधुभावाने रहाण्याची शिकवण केवळ हिंदु धर्म देतो. चराचरात भगवंत पहाण्याची शिकवण केवळ हिंदु धर्म देतो. याचा अर्थ हिंदूंना निर्बल समजू नका. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली साधना वाढवणे आवश्यक आहे.
हिंदूंनो, सुवर्णसिंहासनाला आर्थिक योगदान द्या ! – नीरज भोसले, धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
पू. भिडेगुरुजी यांनी ४ जुलै २०१७ या दिवशी सुवर्ण सिंहासनाचा संकल्प केला आहे. लवकरच ते लालबाग येथे येणार आहेत. ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी अधिकाधिक हिंदूंनी आर्थिक योगदान द्यावे.
हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सर्वांनी संघटित व्हावे ! – ब्रीजेश शुक्ल, प्रखंड सहसंयोजक, बजरंगदल
बळाच्या सामर्थ्याने आपल्या मागण्या मान्य करण्यास आपण शासनाला भाग पाडू शकतो. हिंदूंच्या प्रत्येक मागणीमध्ये सामान्यांचे हित व्हावे, प्रत्येकाला समाधानाने जगता यावे, हाच उद्देश असतो याची जाण शासनालाही आहे.
पुणे
विश्वभरात हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – जयसिंह राजपुरोहित, मुख्य सचिव, राजस्थानी महासंघ
आज हिंदू एकता दिंडीतून प्रेरणा घेऊन संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करून डॉ. आठवले यांचे स्वप्न साकार करूया ! कार्यासाठी शक्ती मिळावी, अशी प्रार्थना !
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनीही मार्गदर्शन केले.
मुंबई/पुणे/धुळे, २० मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. उत्स्फूर्तपणे दिल्या जाणार्या घोषणा आणि धर्मप्रेमींचे भव्य संघटन यांमुळे सर्वांमध्येच वीरश्री जागृत झाली होती. परिधान केलेली सात्त्विक वेशभूषा, तसेच हिंदूसंघटनाविषयी सर्वांच्या मनामध्ये असणारा भाव यांमुळे वातावरण चैतन्यदायी झाले होते. दिंडीत अनेक मान्यवरांची ओजस्वी भाषणेही झाली. तिन्ही ठिकाणी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात पार पडलेली ‘हिंदू एकता दिंडी’ केवळ शोभायात्रा न रहाता हिंदु राष्ट्राचा जागर करणारी चेतनाफेरीच झाली.
मुंबईतील दिंडी लालबाग येथील भारतमाता चौक ते चिंचपोकळी येथील संत भालचंद्र महाराज मैदान या मार्गावरून काढण्यात आली. पुणे येथे भिकारदास मारुति मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धुळ्यात प्रकाश टॉकीज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ झाला.
धुळे
मुंबई
कळंबोली आणि शिरढोण येथे शौर्य जागरण शिबिरे
कळंबोली – येथे झालेल्या शौर्य जागरण शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सनातन संस्थेच्या श्रीमती जयश्री भालेराव यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार मांडले.
क्षणचित्रे
१. धर्मप्रेमी श्री. संजय उलवेकर आणि श्री. विनोद पाटील यांनी स्थळ, ध्वनीक्षेपक यंत्रणा, बैठका विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
२. धर्मप्रेमी श्री. संजय उलवेकर यांनी शेवटी प्रतिज्ञा घेतली.
३. धर्मशिक्षणवर्गाची वार आणि वेळ निश्चित करण्यात आली. सौ. सुषमा उलवेकर यांनी गावातील तरुण मुली शिबिरात येण्यासाठी स्वतःहून प्रसार केला.
शिरढोण – आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेण्यासाठी येथील हनुमान मंदिरात शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. आल्हाद माळगावकर यांनी शिबिराचा उद्देश आणि आवश्यकता यांविषयी मार्गदर्शन केले, तर सौ. मोहिनी मांढरे यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता विशद केली. येथेही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
शिबीर यशस्वी होण्यासाठी शिरढोण येथील धर्मप्रेमी सर्वश्री दीपक पवार, सुभाष वाकडीकर, सतीश घरत आणि महादेव माळी काका यांचे सहकार्य लाभले.
ससेवाडी (भोर) येथील श्री विठ्ठल मंदिराची स्वच्छता
ससेवाडी (भोर, जिल्हा पुणे), २० मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत येथील विठ्ठल मंदिराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील ७ महिला आणि ८ लहान मुले सहभागी झाली होती. वडगावशेरी येथील दत्तमंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.
सिंदगव्हाण (नंदुरबार) येथे हिंदु राष्ट्रजागृती सभा !
नंदुरबार, २० मे (वार्ता.) – येथे १७ मे या दिवशी हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ९० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून सभेला प्रारंभ झाला. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या विषयावर समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार’ या विषयावर सनातन संस्थेचे डॉ. सतिश बागुल यांनी मार्गदर्शन केले. मंदिर विश्वस्तांनी ध्वनीक्षेपण, विद्युत व्यवस्था, आसंदी, पटल यांची व्यवस्था केली, तर काही धर्मप्रेमींनी पाणी व्यवस्था केली. सभेला सर्वश्री शरदचंद्र पाटील, अजय पाटील, विलास पाटील, जयेश पाटील, विपुल पाटील, हिरालाल पाटील, वैभव पाटील, जयेश क्षीरसागर, सुमित परदेशी, आकाश गावीत, राहुल सैंदाने, मयूर चौधरी, भावना कदम यांचे सहकार्य लाभले.
सांताक्रूझ आणि ऐरोली येथे मंदिर स्वच्छता अभियान !
मुंबई – सांताक्रूझ येथील श्री सिद्धीविनायक मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी, वाचक आणि साधक यांनी केली. ऐरोली गावातील श्री हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मशिक्षणवर्गातील महिला, बालसाधक आणि हितचिंतक यांनी मिळून केली. या वेळी उपस्थितांना आनंद जाणवला. एका हितचिंतकाने सर्वांसाठी चहाची व्यवस्था केली.
जोगेश्वरी आणि नेरूळ (नवी मुंबई) येथे श्री गणेशाला साकडे
श्यामनगर, जोगेश्वरी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये श्री गणपतीला साकडे घालण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी, साधक आणि मंदिराचे विश्वस्त सहभागी झाले होते, तर नेरूळ येथील श्री गणेश मंदिरातही गणपतीला साकडे घालण्यात आले. या वेळी इस्कॉन संप्रदायाचे साधक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, वारकरी आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
शासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायदा, हे प्रभावी माध्यम ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
पिंपरी, २० मे (वार्ता.) – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने लोकशाहीचा स्वीकार केला; पण आज खर्या अर्थाने देशात लोकशाही आहे का ? देशात भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार यांनी परिसीमा गाठली आहे. या व्यवस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या लालूप्रसाद यादव यांना २१ वर्षांनी कारावासाची शिक्षा होते, तर दुसरे एक न्यायालय भ्रमणभाष चोरी करणार्या एका चोराला त्वरित शिक्षा सुनावते. गुन्हेगारांना कायदा आणि शिक्षा यांची भीती राहिली नाही. या परिस्थितीत शासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायदा हे प्रभावी माध्यम आहे; त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे, असे मत हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत १६ मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी माहिती अधिकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
अधिवक्ता सांगोलकर यांनी ‘माहिती अधिकाराचा अर्ज करतांना कोणती काळजी घ्यायची, हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा’, याची सविस्तर माहिती सांगितली. ‘अभ्यासपूर्वक माहिती मागवली, तर शासकीय कर्मचार्यांवर धाक बसतो आणि ते त्वरित माहिती देतात’, असेही अधिवक्ता सांगोलकर यांनी सांगितले. ‘या शिबिरातून उपयुक्त माहिती मिळाली’, असे मनोगत सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केले.
नगर येथे हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम !
नगर – येथे विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी श्रमिकनगर सावेडी येथील श्री बालाजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली, तसेच श्री बालाजीच्या चरणी साकडे घालण्यात आले. यासह तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन, रेणुकामाता मंदिर सावेडी, दत्तात्रेय मंदिर भिंगार आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, नगर या ठिकाणीही साकडे घालण्यात आले. यानंतर खळेवाडी भिंगार आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे प्रवचन घेण्यात आले.