मुसलमान, ख्रिस्ती इत्यादींना आपापल्या पंथाची वैशिष्ट्ये सांगता येतात. बहुसंख्य हिंदूंना हिंदु धर्म याविषयी पाच मिनिटेही बोलता येत नाही कि हिंदू धर्माची वैशिष्ट्ये सांगता येत नाहीत. हिंदूंना धर्माची वैशिष्ट्ये ठाऊक नसली, तर धर्माभिमानही निर्माण होऊ शकत नाही. धर्माभिमान नसल्याने धर्माचे रक्षण करण्यासाठीही हिंदू सिद्ध नसतात. हिंदूंनो, हे अज्ञान दूर करण्यासाठी हिंदु धर्माचे पुढील सिद्धांत लक्षात ठेवा.
१. अनेक देव
परमेश्वर जरी एक असला, तरी प्रत्येकातील पंचमहाभूतांचे घटक, त्रिगुणांचे प्रमाण, संचित आणि प्रारब्ध कर्मे, लिंगदेहातील घटकांचे प्रमाण इत्यादी निरनिराळे असल्याने प्रत्येकाने कोणत्या देवतेची (देव किंवा देवी) उपासना केली की, तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, हे निरनिराळे आहे. त्यामुळे हिंदू धर्मात बर्याच देवता आहेत. प्राणिमात्रांतच काय तर निर्जीव गोष्टींतही परमेश्वराचे अस्तित्व असल्यामुळे हिंदू धर्मात देवतांची संख्या पुष्कळ तेहेतीस कोटी आहे. आवश्यक त्या देवतेची उपासना केल्याने साधकाची उन्नती लवकर होऊ शकते, हे केवळ हिंदू धर्मातच साध्य होऊ शकते.
२. हिंदू धर्मातील ऋणकल्पना
प्रत्येकाला चार ऋणे असतात.
१. देवताऋण : आपल्याला निर्माण करणार्या ईश्वराचे ऋण म्हणजे देवताऋण.
२. ऋषीऋण : प्राचीन ऋषींनी ज्ञान-विज्ञान निर्माण करणार्या ऋषींचे ऋण म्हणजे ऋषीऋण.
३. पितृऋण : आपल्याला जन्म देणार्या पितरांचे ऋण म्हणजे पितृऋण.
४. समाजऋण : आपल्या संबंधात आलेल्या प्रत्येकाने गुप्त किंवा उघड स्वरूपात आपल्याला काहीतरी दिलेलेच असते. ते म्हणजे समाजऋण.
प्रत्येक मनुष्याला ही चार ऋणे फेडावीच लागतात. केवळ हिंदु धर्मातच हे सांगितलेले आहे.
३. हिंदू धर्मातील आश्रमकल्पना
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांपैकी केवळ गृहस्थाश्रमात व्यक्ती घरी रहात असे. इतर तीन आश्रमांत ती घरापासून दूर रहात असल्याने मायेच्या बंधनापासून दूर रहाण्याचे शिक्षण प्रत्येक व्यक्तीलाच मिळत असे. त्यामुळेच इतर धर्मीय राजे मृत्यूपर्यंत राज्य सोडू शकत नाहीत, तर हिंदु राजे राजपुत्र वयात आल्यावर त्याला सिंहासनावर बसवून स्वतः वानप्रस्थाश्रमात अरण्यात जाऊन रहात. असा त्याग केवळ हिंदु धर्मच शिकवतो.
४. हिंदू धर्मातील पुरुषार्थकल्पना
पुरुषार्थ चार आहेत –
१. धर्म (शुद्ध आचरण),
२. अर्थ (चांगल्या मार्गाने द्रव्य संपादन करणे),
३. काम (शारीरिक आणि मानसिक सुखप्राप्ती)
४. मोक्ष
या चारपैकी धर्माने वागून अर्थ म्हणजे अर्थ (धन) प्राप्ती आणि कामनापूर्ती करावी, असे हिंदु धर्म सांगतो. पाश्चात्त्य देशांत धर्म आणि मोक्ष हे पुरुषार्थ ठाऊकच नाहीत. त्यांना केवळ अर्थ (कसेही करून द्रव्य संपादन करणे) आणि काम (कसेही करून कामवासना पूर्ण करणे) एवढेच ठाऊक आहे. खेदाची गोष्ट अशी की, हिंदू त्यांचे पुरुषार्थ विसरून पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून त्यांच्याप्रमाणे नरकाची वाटचाल करत आहेत.
५. अधर्माचरणींना प्रतिबंध (दंड)
‘धर्माचरण करणार्या लोकांनी अधर्माचरण करणार्या लोकांना प्रतिबंध करावा. याचे कारण असे की, इतरांच्या अधर्माचरणाने आपल्याला तर दुःख होईलच; पण परिणामी त्या अधर्माचरणी मनुष्यालाही दुःखच भोगावे लागेल. अधर्माचरणाचा प्रतिबंध न केल्यास त्याच्या अधर्माचरणाचे पाप अंशतः आपल्याही माथी येईल.
हा प्रतिबंध शक्य तर सामोपचाराने (सामाने) करावा; पण सामोपचार निरुपयोगी ठरत असल्यास शिक्षाही (दंडही) करावी. अधार्मिक माणसाला दंड करणे, म्हणजे हिंसा नव्हे. हिंसा याचा अर्थ दुःख असा न घेता अहित असा घेतला पाहिजे. अधार्मिकाला दंड करण्यात ‘त्याला दुःख देणे’, हा हेतू नसतो, तर त्याचे अहित टळावे, त्याला धर्माचरणाचे उच्च सुख प्राप्त व्हावे, हाच असतो.
हिंदूंनी या सिद्धांताकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हिंदूंची स्थिती सध्या अगदी केविलवाणी झाली आहे. ती पालटण्यासाठी अधर्माचरणींविरुद्ध कृती करणे, ही साधनाच आहे.
६. मूर्तीपूजा
सामान्य मनुष्याला अमूर्त, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे कठीण जाते; म्हणून मूर्तीपूजा करतात. सगुणोपासना न करता एकदम निर्गुणाची उपासना करणे, म्हणजे पहिलीतल्या मुलाने एकदम पदवी परीक्षेचा अभ्यास करणे ! हे टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने निर्गुणाकडे जाण्यासाठीच सगुणोपासना सांगितली आहे. असे टप्प्याटप्प्याने जात असल्याने हिंदु धर्मात सर्वोच्च आध्यात्मिक पातळीचे ऋषी आणि संत निर्माण झाले. त्यांनी सर्वोच्च पातळीचे ज्ञान जगाला दिले आणि देत आहेत.
७. अनेक प्रकारच्या साधना
ईश्वरप्राप्तीचे साधनामार्ग अनेक आहेत.
अ. अनेक देवतांच्या उपासना : प्रत्येक व्यक्तीची पात्रता भिन्न भिन्न असते; म्हणून हिंदु धर्माने इतर पंथांप्रमाणे कोणताही एकच एक मार्ग आणि कोणत्याही एकाच देवाची उपासना सांगितली नाही.
आ. विविध योगमार्ग : कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग, शक्तीपातयोग, असे विविध मार्ग सांगितले आहेत.
इ. व्यक्तीनुसार बदलणारा साधनामार्ग : प्रत्येक रोगावर निरनिराळे औषध असते, तसे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हे केवळ हिंदु धर्मातच आहे; म्हणून हिंदु धर्मानुसार साधना करून सर्वोच्च पातळी न्यूनतम वेळेत गाठता येते.
८. पुनर्जन्म
मृत्यूनंतर जीवन आहे, ते सुखावह करण्यासाठी काय करायला हवे, पुनर्जन्म आहे इत्यादी सर्व माहिती केवळ हिंदु धर्मात आणि तीही सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितली आहे. इतर पंथांना त्याचा सुगावा अजूनही लागलेला नाही. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे, म्हणजे पूर्वजन्मातील कर्माला अनुसरून या जन्मात सुखदुःख भोगतो. या जन्मात केलेल्या पाप-पुण्याचे फळ पुढील जन्मात मिळते, असा कर्मसिद्धान्त आहे. हे केवळ हिंदु धर्मच शिकवतो.
९. सदेह मुक्ती
देहात असतांनाही एखादी व्यक्ती परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकते, याची प्रचीती देणारे अत्युच्च पातळीचे कित्येक ऋषीमुनी, साधू, संत, महात्मे केवळ हिंदु धर्मात होऊन गेले आहेत आणि आजही आहेत.
छान