१. ११ व्या शतकातील यशोधरपुराचे राजे उदयादित्यवर्मन
(दुसरे) हे शिवभक्त असल्याने यांनी शिवमंदिर, म्हणजेच बापून मंदिर बांधणे
अंकोर थाम परिसरातील बॅयान मंदिरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला पिरॅमिडच्या आकारात असलेले, तसेच आता भग्न झालेले एक मोठे मंदिर दिसते. यालाच बापून मंदिर, असे म्हटले जाते. ११ व्या शतकातील यशोधरपुराचे राजे उदयादित्यवर्मन (दुसरे) हे शिवभक्त होते. त्यामुळे त्यांनी शिवमंदिर बांधले. कदाचित् त्या वेळी हे मंदिर यशोधरपुराचे मुख्य मंदिर असेल, असे म्हटले जाते. (छायाचित्र पहा.)
२. बापून मंदिराच्या चारही दिशांना ४ गोपुरे असून त्यांच्या भिंतींवर रामायण
आणि महाभारत यांमधील विविध प्रसंगांची दृश्ये कोरलेली असणे, मंदिराच्या बाहेर
हत्तींना बांधण्यासाठी निर्माण केलेल्या वास्तूच्या भिंतींवरही अनेक सुंदर शिल्पे कोरलेली असणे
या मंदिराच्या चारही दिशांना ४ गोपुरे आहेत. ४ गोपुरांच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत यांतील विविध प्रसंगांची दृश्ये कोरलेली आढळतात. त्यामध्ये पश्चिम गोपुराच्या भिंतीवर भगवान शिव अर्जुनाला पाशुपतास्त्र देतांनाचे दृश्य कोरलेले आहे. उत्तर गोपुराच्या भिंतीवर राम-रावण युद्ध आणि वानर-असुर युद्ध, ही दृश्ये कोरलेली आहेत. पूर्व गोपुराच्या भिंतीवर रावण वधानंतर अयोध्येला परत येतांना प्रभु श्रीराम, सीतेची अग्निपरीक्षा, कुरुक्षेत्रातील कौरव-पांडव यांच्यातील युद्ध, महाभारतातील युद्धात शरशय्येवर असलेले पितामह भीष्म, अशी अनेक दृश्ये कोरलेली आहेत. दक्षिण गोपुराच्या भिंतीवर श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित त्याच्या विविध लीला कोरलेल्या आहेत. त्यात कंसासमवेत झालेले युद्ध आणि त्याचा वध, तसेच कालियामर्दन आदींचा समावेश आहे.
बापून मंदिराच्या बाहेर तत्कालीन खमेर राजांनी हत्तींना बांधण्यासाठी एक मोठी वास्तू बांधली होती. या वास्तूच्या भिंतींवरही अनेक शिल्पे कोरलेली आहेत. यांत नागलोक आणि तेथील देवता यांच्या सुंदर शिल्पांचा समावेश आहे.
– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया