अंकोर वाट : राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने कंबोडिया येथे बांधलेले हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर !

हिंदूंचा गौरवशाली ठेवा असलेले अंकोर वाट मंदिर !
मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले शिव-ब्रह्म ग्रंथालय’

मंदिराच्या उजव्या बाजूला असलेले शिव-विष्णु ग्रंथालय’

 

१. हिंदु राजा यशोवर्मन याने स्थापलेल्या अंकोर नगरी’चे
नाव यशोधरपुरा’ असणे, पुढे त्याच वंशातील राजा सूर्यवर्मन (दुसरा)
याने नगरीच्या मध्यभागी भव्य असे भगवान श्रीविष्णुचे परमविष्णुलोक’ मंदिर बांधणे

हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर हिंदुबहुल भारतात नसून ते कंबोडियात आहे. त्या मंदिराचे नाव आहे अंकोर वाट !’ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी २५ मार्च या दिवशी आम्ही सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांच्या समवेत कंबोडियाची राजधानी नोम फेन येथून विमानाने उत्तर कंबोडिया येथे असलेल्या सीम रीप’ शहरात पोहोचलो. सीम रीप शहरापासून ६ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. मंदिर आणि त्याचा परिसर बघण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो.

९ व्या शतकातील हिंदु राजा यशोवर्मन याने स्थापलेली ही अंकोर नगरी’ असून त्या काळी तिचे नाव यशोधरपुरा’, असे होते. पुढे त्याच वंशातील राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने या नगरीच्या मध्यभागी भव्य असे भगवान श्रीविष्णूचे मंदिर बांधले. (छायाचित्र क्रमांक १ पहा) त्या मंदिराचे मूळ नाव होते परमविष्णुलोक !’ आता त्याचे नाव स्थानिक भाषेत अंकोर वाट’ आहे. अंकोर’ म्हणजे नगर’ आणि वाट’ म्हणजे वाटिका.’ हे मंदिर नगराच्या मध्यभागी असल्यामुळे हे नाव पडले असावे. त्या वेळी हिंदु राजांचा असा भाव होता की, हे मंदिर म्हणजे विष्णुलोक’ आहे आणि राजा म्हणजे श्रीविष्णूचा दास आहे. तो प्रजेचे पालन-पोषण करतो.’ याशिवाय प्रजेचाही असा भाव असे की, राजा म्हणजे विष्णुस्वरूप’ आहे.’

 

२. अंकोर वाट’ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यभागी
अष्टभुजा श्रीविष्णुची मूर्ती, डावीकडे श्री ब्रह्मदेव आणि उजवीकडे भगवान शिवाची मूर्ती असणे

अंकोर वाट मंदिर परिसराचा एकूण विस्तार ४०२ एकर इतका प्रचंड आहे. मंदिर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले असून २० फूट खोल खंदक आहेत. मंदिराच्या पश्‍चिमेकडील खंदकावरून निर्माण केलेल्या एका मोठ्या पुलावरून २०० मीटर चालून गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यभागी श्रीविष्णुची अष्टभूजा मूर्ती, डावीकडे श्री ब्रह्मदेवाची आणि उजवीकडे भगवान शिवाची मूर्ती आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे २ मोठी द्वारे आहेत. त्यांना हत्तीद्वार’ म्हणतात. या द्वारांतून हत्ती नेले जात.

 

३. मंदिराच्या परिसरात शिव-ब्रह्म ग्रंथालय’ आणि शिव-विष्णु
ग्रंथालय’ असणे, त्या काळी ग्रंथालयांमध्ये भक्तांसाठी वेद, वेदांशी
संबंधित ग्रंथ आणि उपासनेशी संबंधित पुस्तके अभ्यासासाठी ठेवलेली असणे

मुख्य प्रवेशद्वारापासून आणखी १०० मीटर पुढे चालत गेल्यावर डावीकडे १ आणि उजवीकडे १, अशी २ ग्रंथालये आहेत. डावीकडच्या ग्रंथालयाला शिव-ब्रह्म ग्रंथालय’, तर उजवीकडच्या ग्रंथालयाला शिव-विष्णु ग्रंथालय’, असे म्हटले जाते. त्या काळी या दोन्ही ग्रंथालयांमध्ये भक्तांसाठी वेद, वेदांशी संबंधित इतर ग्रंथ आणि मंदिरातील उपासनेशी संबंधित पुस्तके अभ्यासासाठी ठेवली जात. थोडक्यात हे स्थान म्हणजे एक वेदपाठशाळा आणि गुरुकुलच होते. (छायाचित्र क्रमांक २ आणि ३ पहाणे)

 

‘अंकोर वाट’ मंदिर आणि गर्भगृह, तसेच त्याच्या परिसरातील शिल्पे यांची वैशिष्ट्ये !

अंकोर वाट मंदिराची भव्यता दर्शवणारे रेखाचित्र ! या रेखाचित्रातून मंदिराच्या परिसराची व्याप्ती आपल्या लक्षात येते !

४. मंदिराच्या चारही प्रांगणांच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली असणे

मंदिराच्या परिसरात असलेल्या ग्रंथालयापासून पुढे २०० मीटर चालत गेल्यावर मुख्य मंदिर लागते. हे मंदिराचे पश्‍चिम द्वार आहे. येथे मंदिराचा पहिला प्राकार (प्रांगण) चालू होतो. प्राकाराच्या चारही बाजूंना ४ प्रांगणे आहेत. या चारही प्रांगणांच्या भिंती आणि ४ कोपरे, तसेच ४ दिशांना असलेल्या ४ प्रवेशद्वारांच्या भिंती यांवर देवतांची अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमधील देवतांच्या अलंकारांचे कोरीवकाम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात विविध प्रकारच्या केशरचनाही पहावयास मिळतात. प्रवेशद्वारांवर वेगवेगळ्या फुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार, तसेच गर्भगृह यांच्या पायर्‍या नेहमीप्रमाणे तिरक्या नसून उभ्या आहेत. ‘त्या वेळचे लोक प्रतिदिन मंदिरात जाऊन पूजा कशी करत असतील ?’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) ‘मंदिर बांधण्यासाठी लाखो मोठे दगड वापरण्यात आले आहेत. हे सर्व दगड तेथून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या महेंद्र पर्वतावरून नदीच्या मार्गे आणले असावेत’, असे आमच्या ‘गाईड’ने सांगितले.

गर्भगृहामध्ये जाण्यासाठी असलेल्या पूर्वीच्या पायर्‍या ! या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या उभ्या स्वरूपाच्या आहेत !

५. ‘अंकोर वाट’ मंदिराच्या चार बाजू आणि त्यांवर कोरलेली शिल्पे

अ. दक्षिण-पूर्व (आग्नेय) कोपरा : येथील शिल्पांमध्ये समुद्रमंथनाचा देखावा, यम शिक्षा करतांना, तसेच स्वर्ग आणि नरक येथील दृश्ये यांचा समावेश आहे.

आ. मंदिरातील दक्षिण-पश्‍चिम (नैऋत्य) कोपरा : येथे अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात भगवान श्रीकृष्णाच्या लीला, प्रभु श्रीराम वालीचा वध करतांनाचा प्रसंग, रावण कैलास पर्वत उचलतांनाचा प्रसंग, समुद्रमंथनाचा देखावा, प्रभु श्रीराम मारीच राक्षसाचा पाठलाग करतांनाचे दृश्य, दक्षिणामूर्तीच्या रुपात असलेल्या भगवान शिवाचे शिल्प, गोवर्धन पर्वत उचलतांना श्रीकृष्ण, कामदेवाचा वध करतांना भगवान शिव, ध्यानस्थ झालेले भगवान शिव, वैकुंठलोकात भगवान श्रीविष्णु अन्य देवतांकडून स्तुती ऐकतांना, अशी अनेक शिल्पे येथे आहेत.

इ. पश्‍चिम-उत्तर (वायव्य) कोपरा : बाणासुरावर विजय मिळवतांना श्रीकृष्ण, तसेच असुरांना युद्धात जिंकतांना श्रीविष्णु, अशी दृश्ये असलेली शिल्पे आहेत.

ई. मंदिरातील उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपरा : सीतेची अग्नीपरीक्षा, रावण वधानंतर प्रभु श्रीराम अयोध्येला परत येतांना, राम, लक्ष्मण आणि विभीषण संभाषण करतांना, हनुमंत श्रीरामाची अंगठी सीतामातेला देतांना, शेषावर झोपलेल्या श्रीविष्णुंकडे समस्या मांडणारे देव, देव आणि असुर यांच्यातील युद्ध, राम आणि लक्ष्मण सुग्रीवाशी बोलतांना, राम आणि लक्ष्मण हे कबंध नावाच्या असुराशी लढतांना, सीता स्वयंवर, असे अनेक शिल्प येथे आहेत.

 

६. ‘अंकोर वाट’ मुख्य मंदिर आणि गर्भगृह.

गर्भगृहात जाण्यासाठी खूप उंचच्या उंच पायर्‍या चढाव्या लागतात ! तेथे जाण्यासाठी आता बांधलेल्या पायर्‍या !

‘अंकोर वाट’ मंदिराच्या दुसर्‍या प्रांगणातून आत वर चढावे लागते. तेव्हा आपण शेवटच्या प्रांगणात पोहोचतो. येथे ५ गोपुरासारखे शिखर असलेले मुख्य मंदिर दिसते. हे ५ शिखर म्हणजे पवित्र मेरू पर्वताची ५ शिखरे आहेत. (आमच्या ‘गाईड’ने आम्हाला सांगितले की, ‘अंकोर वाट’ मुख्य मंदिराची ५ शिखरे, मंदिराच्या चार बाजूला असलेली ४ शिखरे आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे असलेली ३ शिखरे, अशी एकूण १२ शिखरे होतात आणि ती १२ ज्योर्तिलिंगांची प्रतीके आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेली ३ शिखरे आता अस्तित्वात नाहीत.) ही ५ शिखरे असलेल्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह आहे. ५ वे शिखर गर्भगृहाच्या वर आहे. गर्भगृहात जाण्यासाठी खूप उंचच्या उंच पायर्‍या चढाव्या लागतात. (छायाचित्र क्रमांक २ पहा.) गर्भगृहाच्या येथून आपल्याला पश्‍चिम दिशेला ७५० मीटर दूरवर असलेले मुख्य प्रवेशद्वार दिसते. गर्भगृहाच्या येथून मंदिराची भव्यता आणि मंदिर परिसराचा जो प्रचंड विस्तार दिसतो, तो आपण शब्दांत मांडू शकत नाही.

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

Leave a Comment