कंबोडियाच्या राजाचा वैशिष्ट्यपूर्ण राजवाडा
१. कंबोडियाचा राजा नरोदोम सिंहमोनी (राजा नरोत्तम सिंहमुनी) याने फ्रेंच सरकारच्या
साहाय्याने ‘नोम फेन’ नगराला कायमची राजधानी बनवून ४ नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी राजवाडा बांधणे
‘आम्ही २४ मार्च या दिवशी कंबोडियाच्या राजाचा राजवाडा, कंबोडियाचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आणि राष्ट्रीय स्मारक बघायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही सकाळी ८ वाजता राजवाड्याकडे जाण्यास निघालो. १५ व्या शतकापर्यंत कंबोडियाची राजधानी तेथील ‘सीम रिप’ नावाच्या प्रांतात होती. त्या नगरीला आता ‘अंकोर नगरी’ म्हणतात. त्यानंतर तेथील खमेर हिंदु साम्राज्य बौद्ध राष्ट्रांच्या आक्रमणामुळे नष्ट झाले. १६ ते १८ व्या शतकापर्यंत कंबोडियाची राजधानी अनेक वेळा पालटली गेली. शेवटी वर्ष १८६६ मध्ये तेव्हाचा कंबोडियाचा राजा नरोदोम सिंहमोनी (राजा नरोत्तम सिंहमुनी) याने फ्रेंच सरकारच्या साहाय्याने ‘नोम फेन’ नगराला कायमची राजधानी बनवली. ‘नोम फेन’मध्ये जेथे ४ नद्यांचा संगम आहे, त्याच्या काठावर राजवाडा बांधला. तेव्हापासून आतापर्यंत तो राजवाडा कंबोडियाच्या सर्व राजांचे प्रमुख केंद्र बनला आहे. प्रस्तुत राजाला जरी मान असला, तरी कंबोडियाच्या सरकारवर मात्र त्याचे नियंत्रण नाही.
२. राजवाड्याच्या बाहेर अन् आतील बाजूची सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित असणे
राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित आहेत. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करतांना श्रीविष्णु आणि शिव एकत्र असलेल्या ‘हरिहर’ मूर्ती दिसतात. मुख्य राजवाड्यातील पायर्यांच्या दोन्ही कडेला ‘वासुकी’ आणि ‘तक्षक’ या २ नागांच्या मूर्ती तेथे आहेत. (छायाचित्र क्रमांक १ पहा)
‘वासुकी’ नागावर जसे खवले असतात, तसे खवले राजवाड्याच्या छप्पराला चिनी शैलीने बनवले आहेत. राजवाड्याच्या छप्पराला मध्यभागी स्तुपाचा आकार दिला असून त्याला ते ‘सुमेरू पर्वत’ असे म्हणतात. त्या सुमेरूच्या खाली ४ मुख असून ते म्हणजे ‘चतुर्मुख ब्रह्मा’ आहे. (छायाचित्र क्रमांक २ पहा) राजवाड्यात जेथे राजा बसतात, त्या राजदरबाराच्या आतील सर्व भिंतींवर रामायण आणि महाभारत यांतील प्रसंग रंगवलेले आहेत. ‘राजवाडा म्हणजे देवलोक असून त्यात रहाणारा राजा हा श्री महाविष्णूचे प्रतीक आहे’, असे कंबोडियातील लोकांचे मानणे आहे. राजवाड्याच्या बहुतांश खांबांवर विष्णुवाहन ‘गरुड’ आहे. ‘गरुड’ हे विष्णुवाहन असल्यामुळे कंबोडियामध्ये त्याला महत्त्व आहे. (छायाचित्र क्रमांक ३ पहा)
३. राजवाडा परिसरात असलेल्या पगोडाच्या बाजूला नंदी आणि कैलास पर्वत यांचे मंदिर असणे
राजवाड्याच्या परिसरात बौद्ध धर्माशी संबंधित एक बौद्ध मंदिर आहे. त्याला ‘सिल्वर पगोडा’ असे म्हटले जाते; कारण त्याच्या आत ५ सहस्र ३२९ चांदीच्या फरशा बसवल्या आहेत. मंदिराच्या मध्यभागी ६०० वर्षे जुनी पाचूची बुद्धाची मूर्ती आहे. त्याला येथील लोक पवित्र मानतात. राजघराण्याला वेगवेगळ्या देशांनी भेट म्हणून दिलेल्या १ सहस्र ६५० छोट्या-मोठ्या बुद्धाच्या मूर्ती या मंदिरात आहेत. पाचूच्या बुद्धाच्या मूर्तीसमोर ९० किलो सोने आणि २ सहस्र ८६ अमूल्य हिर्यांनी बनवलेली बुद्धाची उभी मूर्ती आहे. खरेतर या पगोडाच्या बाजूला भगवान शिवाचे वाहन नंदी आणि कैलास पर्वत, अशी दोन मंदिरे आहेत. त्यावरून ‘एकेकाळी ‘सिल्वर पगोडा’ हे ‘शिव मंदिर’ असावे’, असे वाटते. आमच्या समवेत असलेल्या मार्गदर्शकाने (‘गाईड’ने) आम्हाला सांगितले की, गेल्या १६० वर्षांमध्ये कंबोडियात ४ सहस्रांहून अधिक ‘पगोड्यां’ची निर्मिती झाली आहे. राजवाड्याला लागूनच असलेल्या ‘सिल्वर पगोड्या’च्या डाव्या बाजूला एक मंडप आहे. त्याच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत यांचे देखावे रंगवलेले आहेत. त्याच परिसरात राजांनी त्यांच्या पूर्वजांच्या अस्थी ठेवलेले स्तूप बांधलेले असून चारही दिशेला ४ स्तूप आहेत. या स्तुपांना ‘राज स्तूप’ असे म्हटले जाते.
४. वस्तू संग्रहालयात राजा, राणी आणि राजगुरु यांनी वापरलेल्या वस्त्रांची वैशिष्ट्ये
राजवाड्याच्या परिसरात असलेल्या एका छोट्या वस्तूसंग्रहालयात राजा, राणी आणि राजगुरु यांनी वापरलेली वस्त्रे ठेवली आहेत. राण्या प्रतिदिन वेगवेगळ्या रंगांचे, म्हणजेच आठवड्याच्या ७ दिवसांप्रमाणे ७ रंगांचे कपडे वापरत. याचप्रमाणे राजाही युद्धाला जातांना पृथ्वी, आप, तेज आणि वायु या तत्त्वांप्रमाणे ४ रंगांचे ठरलेले कपडे वापरत असत. ‘कोणत्या वेळी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे ?’, हे राजगुरु राजाला ज्योतिष शास्त्रानुसार मार्गदर्शन करत असत. राजगुरु शक्यतो पिवळे अथवा पांढरे कपडे परिधान करत.’
– श्री. विनायक शानभाग, ‘नोम फेन’, कंबोडिया