परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘७ मे २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या होणार्‍या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ४ मे या दिवशी ‘नवग्रह शांती’ हा विधी करण्यात आला. हा विधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लाभासाठी नसून समाज आणि राष्ट्र यांच्या कल्याणासाठीच आहे. या विधीच्या यजमानपदी परात्पर गुरु डॉ. आठवले असून उपयजमानपदी सनातनचे साधक श्री. श्रेयस पिसोळकर होते. ४.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या विधीसाठी संकल्प केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या या संकल्पाचा त्यांच्यावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ४.५.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

‘नवग्रह शांती’ यज्ञाचा संकल्प करतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
‘नवग्रह शांती’ यज्ञाची पूर्णाहुती देतांना डावीकडून सौ. वैष्णवी पिसोळकर, श्री. श्रेयस पिसोळकर आणि श्री. अमर जोशी
‘नवग्रह शांती’ यज्ञाच्या ठिकाणी काढलेली रांगोळी, ही मध्यभागी कासव, तसेच शंख, चक्र, गदा आणि कमळे यांमुळे सात्त्विक झाली आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विधीसाठी संकल्प करण्यापूर्वी आणि संकल्प केल्यानंतर त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. उद्देश

साधकांच्या जीवनातील नवग्रहांची बाधा दूर व्हावी  या व्यापक उद्देशाने ४ मे २०१८ या दिवशी ‘नवग्रह शांती’ विधी करण्यात आला.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विधीसाठी संकल्प करण्यापूर्वी आणि नंतरही त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत.

३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ आ १. विधीसाठी संकल्प करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे असणे (स्कॅनरच्या भुजा १८० अंश उघडणे) आणि त्यांनी संकल्प केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. विधीसाठी संकल्प करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्यांच्या संदर्भात ‘यू.टी.एस्.’ उपकरण (स्कॅनरच्या भुजा) पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंश कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती १०.४ मीटर होती. त्यांनी विधीसाठी संकल्प केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ०.४१ मीटर वाढ होऊन ती १०.८१ मीटर झाली. याचा अर्थ विधीसाठी संकल्प केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली.

३ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विधीसाठी संकल्प केल्यानंतर त्यांच्या प्रभावळीत थोडी वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. विधीसाठी संकल्प करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एकूण प्रभावळ १४ मीटर होती. याचा अर्थ ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती. त्यांनी विधीसाठी संकल्प केल्यानंतर त्यांच्या प्रभावळीत ०.७० मीटर वाढ होऊन ती १४.७० मीटर झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

४. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. विधीतील संकल्पाचे महत्त्व

हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.

४ अ १. संतांनी धार्मिक विधीचा संकल्प केल्याने होणारा परिणाम

संतांनी एखाद्या विधीचा संकल्प केल्यावर त्या विधीला दैवी अधिष्ठान तर सहजतेने प्राप्त होतेच; पण यासमवेतच त्या संतांचे आध्यात्मिक बळ त्या विधीसाठी कार्यरत होते. त्यामुळे त्या विधीची फलनिष्पत्ती आणखी वाढते.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि त्यांची एकूण प्रभावळ सामान्य व्यक्तीच्या तुलनेत पुष्कळ अधिक असण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. संकल्प करण्यापूर्वी चाचणीमध्ये त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १०.४० मीटर आणि त्यांची एकूण प्रभावळ १४ मीटर असल्याचे दिसून आले. साधना न करणार्‍या सामान्य व्यक्तीभोवती सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नसते, तसेच तिची एकूण प्रभावळही साधारण १ मीटर असते.

४ इ. धार्मिक विधीसाठी संकल्प केल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ होण्याचे कारण ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र असणे’, हे आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विधीचा संकल्प केल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत थोडी वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. संकल्प करण्याचा विधी फार मोठा नसतो. त्याला १५ ते २० मिनिटेच लागतात. याचा अर्थ ‘या थोड्या कालावधीत संकल्पासारख्या छोट्या विधीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे दैवी स्पंदने आकृष्ट होऊन सदर विधीचा त्यांना लाभ झाला’, असे म्हणता येईल. यातून ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.५.२०१८)

ई-मेल : [email protected]

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यासंदर्भातील दृष्टीकोन

‘२००४ – २००५ या वर्षी सुखसागर, फोंडा येथील आश्रमात असतांना साधकांनी प.पू. डॉक्टरांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारले. त्या वेळी ते साधकांना उद्देशून म्हणाले, ‘‘मी तर अनादी अनंत आहे. ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मृत्यूही नाही, त्याचा कसला वाढदिवस साजरा करता ?’’ – एक साधक

(परात्पर गुरु डॉक्टरांचा असा दृष्टीकोन असूनही ते ईश्‍वरेच्छा म्हणून त्यांचा अमृत महोत्सव सोहळा केवळ साधकांना आनंद देण्यासाठी साजरा करत आहेत. – संपादक)  

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

Leave a Comment