`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही. समाजाची धर्माबद्दलची उदासीनता दूर करण्यासाठी, धर्माचा बुरखा पांघरून समाजात शिरलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी, तसेच समाजाला खरा धर्म समजावून सांगण्यासाठी सनातन कार्यप्रवण झाले आहे.
१. धर्मसत्संग
सध्या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने त्यांना धर्माचरणाचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व कळत नाही. धर्मसत्संगांमधून धर्माचरणाचे महत्त्व, धार्मिक विधी आणि त्यांचे शास्त्र इत्यादी विषयांबद्दल माहिती देण्यात येते. याचबरोबर धर्मपालनामध्ये येणार्या अडचणींविषयी मार्गदर्शन केले जाते. धर्माचरण सुधारण्यासाठी हिंदू कृतीशील व्हावेत, यावर भर देण्यात येतो.
२. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न
भूत, प्रेत, पिशाच इत्यादींविषयी माहिती नसल्याने समाजात अंधश्रद्धांच्या स्वरूपात अज्ञान पसरल्याचे दिसून येते. भोंदू बुवा/बाबा, मांत्रिक आणि भगत हे लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतात. आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी भोंदू बुवा/बाबा वगैरेंकडे न जाता, नामजपाच्या माध्यमातून वाईट शक्तींशी लढून त्यांच्यापासून कायमची मुक्तता कशी करून घ्यावी, हे शिकता यावे, यासाठी संस्था ग्रंथ, ध्वनीचित्रफिती, प्रासंगिक प्रदर्शने इत्यादी माध्यमांतून जनप्रबोधन करते.
३. सार्वजनिक धार्मिक उत्सवांतील गैरप्रकारांविरुद्ध मोहिमा
हल्ली धार्मिक उत्सवांच्या नावाखाली अनेक दुष्प्रवृत्ती सर्रास आढळून येत आहेत, उदा. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी यांसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, उत्सवांतील देवतांच्या मूर्ती शास्त्रविसंगत अशा चित्रविचित्र आकारांत आणि पेहेरावांत करणे, उत्सवांत राष्ट्र अन् धर्म यांच्याशी निगडित कार्यक्रम न ठेवता संस्कृतिहीन असे सिनेमा, वाद्यवृंद यांसारखे कार्यक्रम ठेवणे, मद्यपान करणे इत्यादि गैरप्रकार होत असतात. उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण, सजावटीवर होणारा अनाठायी खर्च या बाबीही चिंतनीय आहेत. या सर्व गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य लोप पावण्याबरोबरच समाजहित अन् राष्ट्रहित यांचीही हानिच होते. असे गैरप्रकार रोखणे आणि उत्सवमंडळांना मार्गदर्शन करणे यांसाठी सनातन जनजागृती मोहिमा राबविते. या मोहिमांतर्गत गैरप्रकार रोखण्यासंबंधीची भित्तीपत्रके लावण्यात येतात. सार्वजनिक उत्सवाच्या मंडळांना विषय समजावून सांगितला जातो. निरनिराळया सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना समस्येचे गांभीर्य सांगून या गैरप्रकारांविरुद्ध कृती करण्यास विनंती करण्यात येते. अशा समस्यांविषयी उद्बोधक ठरणार्या चित्रफीती अन् चित्रतबकड्याही तयार करण्यात येतात आणि त्या ठिकठिकाणी दाखविण्यात येतात.मोहिमांसंबंधी व्यापक जनजागृती करण्यात दैनिक, साप्ताहिक आणि मासिक सनातन प्रभात मोलाची कामगिरी बजावतात.
४. धार्मिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध सनदशीर मार्गाने लढा
धर्म, देव, संत, राष्ट्रपुरुष आणि धर्मग्रंथ यांचे विडंबन करणार्या धर्मविरोधकांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा !
अ. देवतांचे विडंबन करणार्या जाहिराती, उत्पादने, नाटके, चित्रपट इत्यादींचा सनदशीर मार्गाने विरोध करणे
आ. देवतांची चित्रे असलेले फटाके वाजवल्याने होणारी देवतांची विटंबना आणि देवतांची वेशभूषा केल्याने भिकार्यांकडून होणारे देवतांचे विडंबन रोखणे.
५. धर्मविरोधकांच्या विरोधात न्यायालयीन लढे
संत हिंदूंना लाभ होणारी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगतात/ प्रसिद्ध करतात. अशा माहितीची टिंगल-टवाळी करणे आणि त्यावर हिंदूंना संभ्रमित करणारी टीका करणे, अशा गोष्टी धर्मविरोधी लोक करतात. अशांना न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर देणे.
६. मूर्तींचे भंजन आणि मंदिरांचे सरकारीकरण यांविरुद्ध आवाज उठवणे
देवतेची मूर्ती म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतिक. तिचे भंजन ही हिंदुद्वेष्ट्यांनी हेतुपुरस्सर केलेली कृती. तसेच मंदिरांचे सरकारीकरण म्हणजे मंदिरांच्या पावित्र्याची विटंबना, अर्पण पेटीचा गैरवापर आणि हिंदूंची ससेहोलपट. अशा अन्यायांविरुद्ध आवाज उठवणे.
७. हिंदूंची फसवणूक करून त्यांचे धर्मांतर करणार्यांवर सनदशीर मार्गाने अंकूश लावणे
ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या विचाराने झपाटलेले आहेत. गोरगरीब हिंदूंना फसवून आणि आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. हिंदूंना नेस्तनाबूत करण्याच्या षड्यंत्राला ओळखून ते सनदशीर मार्गाने रोखणे.
८. देवळांची सात्त्विकता आणि पावित्र्य टिकवण्यासाठी `मंदिर-स्वच्छता मोहीम’ !
स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी देवतेचे तत्त्व कार्यरत असते. मंदिरांची देखभाल करणारे धर्मशिक्षणाच्या अभावी ही गोष्ट विसरतात. अशा मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली, तर त्याचे लाभ समष्टीला होऊ शकतात.
९. जत्रेच्या वेळी होणारी चेंगराचेंगरी, तसेच
अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी `जत्रा-सुनियोजन मोहीम’ !
जत्रेच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी होते. त्यामध्ये पाकिटमार, महिलांची छेडछाड, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होते. अशा वातावरणात भाविकांना देवतेचे दर्शन निवांतपणे घडवून आणण्यासाठी गर्दीचे नियोजन महत्त्वाचे ठरते.