‘नाम हाचि गुरु । नाम हाचि तारू । नामाविण श्रेष्ठ । दुजे नाही ।।’ अशी नामाची महति आहे. आज अनेक जण नामजप करतात; परंतु अयोग्य नामजपामुळे त्यांना विशेष लाभ होत नाही आणि अखेरीस त्यांचा नामावरील विश्वास उडतो. यासाठी ‘योग्य नामजप कोणता आणि तो कसा करावा’, वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ नामजप कसा करावा इत्यादी माहिती येथे देण्यात आली आहे.
१. नामजपाचे महत्त्व
देवाप्रती भाव, मनाची एकाग्रता, असे नामजपाचे अनेक लाभ आहेत. नामजपासाठी स्थळ, काळ, वेळ असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे आपल्याला ईश्वराशी अखंड अनुसंधान राखणे शक्य होते.
२. नामजप कोणता करावा ?
अ. गुरूंनी दिलेले नाम
‘आपल्या प्रगतीसाठी कोणते नाम घ्यावे’, हे आपल्याला कळत नाही; गुरुच सांगू शकतात. त्यासाठी त्यांनी एखादा नामजप करण्यास सांगितला असल्यास तो करावा. गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो. स्वतःच्या आवडत्या देवाचे नाव घेतांना थोडातरी अहंभाव असतो.
आ. कुलदेवता
नाम देणारे कोणी योग्य गुरु न भेटल्यास आपल्या कुलदेवतेचा, म्हणजे कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा जप करावा.
कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असल्यास कोणता नामजप करावा ?
- लहानपणी आई-वडील असतांना आपण आईकडेच अधिक हट्ट करतो; कारण ती हट्ट लवकर पुरवते. तसेच कुलदेवापेक्षा कुलदेवी लवकर प्रसन्न होते.
- कुलदेवापेक्षा कुलदेवी ही पृथ्वीतत्त्वाशी अधिक संबंधित आहे. तिच्यापासून साधनेला आरंभ केला की कुठलाही त्रास होत नाही.
- ज्यांना केवळ कुलदेव आहे, त्यांनी त्याचा जप करावा, उदा. श्री व्यंकटेश कुलदेव असेल, तर ‘श्री व्यंकटेशाय नमः’ जप करावा.
- परात्पर गुरूंनी दिलेला नामजप आध्यात्मिक उन्नतीसाठी १०० टक्के, कुलदेवीचा ३० टक्के, तर कुलदेवाचा २५ टक्के पूरक असतो.
१. ज्या कुळाचा कुलदेव अथवा कुलदेवी यांचा नामजप आपल्या साधनेला आवश्यक असतो, त्या कुळात आपला जन्म होतो. कुलदेव अथवा कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा नामजप करावा. आई आणि बाबा दोघे जवळ असतांना बाळ आईला हाक मारते. तसेच हे आहे.
२. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी यांच्यातील अल्प असलेले व्हिटॅमिन घ्यायला डॉक्टर सांगतात. त्याचप्रमाणे साधना करणार्यात ज्या देवतेचे तत्त्व अल्प असेल, त्या देवतेचा नामजप करायला संत सांगतात. सांप्रदायिक साधनेत असे नसल्याने साधकांना सांप्रदायिक नामजप सांगण्यात येतो; पण त्यामुळे प्रगती उशिरा होते; कारण व्हिटॅमिन ए, बी, सी, डी यांच्यातील कोणते व्हिटॅमिन अल्प आहे, हे लक्षात न घेता कोणतेतरी दुसरेच व्हिटॅमिन देण्यासारखे हे होते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१७)
कुलदेवतेचा नामजप का आणि कसा करावा यांविषयी जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !
इ. आवडती (इष्ट) देवता
कुलदेवतेचे नाव माहीत नसल्यास आपल्या आवडत्या देवतेचा नामजप करावा. आवडत्या देवतेचा जप पूर्ण झाला की, कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी भेटतात किंवा एखादे संत वा गुरु स्वतः साधकाच्या जीवनात येऊन गुरुमंत्र देतात.
ई. सांप्रदायिक नामजप
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा साधनामार्ग वेगळा आहे. म्हणूनच काही संप्रदायांत एकच नाम सर्वांना दिले जाते, ते योग्य नाही. फार उच्च पातळीच्या संतांनी सर्वांना एकच नाम दिले तर चालते; कारण त्यांच्या संकल्पात तसे सामर्थ्य असते. उदा. श्री गोंदवलेकर महाराजांनी सर्वांना रामनाम घ्यायला सांगितले होते. अशा मोठ्या संतांच्या देहत्यागानंतर संप्रदायाचे म्हणून तेच नाम घ्यायला सांगणे योग्य नाही.
उ. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्ताचा नामजप करा !
हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात.
श्री गुरुदेव दत्ताचा नामजप का आणि कसा करावा यांविषयी जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !
३. नामजप कसा करावा ?
कुलदेवीचा नामजप
देवतेच्या नामाआधी ‘श्री’ लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदैवत गणेश असेल, तर ‘श्री गणेशाय नमः ।’, भवानी असेल तर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ असे म्हणावे. ‘श्री भवान्यै नमः ।’ म्हणणे कठीण आहे, म्हणून देवीच्या नावाला जोडून ‘देव्यै’ असे म्हणावे. चतुर्थीच्या प्रत्ययाचा अर्थ ‘गणपतीला, देवीला (नमस्कार)’ असा होतो. आपली कुलदेवता ज्ञात नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप करावा. हा नामजप केल्याने, आपल्या कुळाशी संबंधीत देवतेच्या स्पंदनांचा लाभ नामजप करणार्याला होतो.
४. नामजपाचे टप्पे
नामजप पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाढवावा.
अ. प्रतिदिवशी न्यूनतम (कमीतकमी) १० मिनिटे नामजप करावा.
आ. काम करत नसतांना करावा.
इ. आंघोळ करणे, स्वयंपाक करणे इत्यादी शारीरिक कामे करतांना करावा.
ई. वर्तमानपत्र वाचणे, दूरदर्शनवरील कार्यक्रम पहाणे यांसारखी विशेष महत्त्वाची नसलेली मानसिक कामे करतांना नामजप करावा.
उ. कार्यालयीन कागदपत्रांचे वाचन इत्यादी महत्त्वाची कामे करतांना करावा.
ऊ. शेवटी दुसर्यांशी बोलतांनाही नामजप करणे शक्य होते.
हे झाले की, अखंड नामजप चालू रहातो.
५. नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती
” जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात.
टप्पा १
१ अ. पंचज्ञानेंद्रिये
१. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. सुगंध असल्यास एकाग्रता व्हायला साहाय्य होते.
२. तोंड : नामजप करतांना काहीही खाऊ नये.
३. डोळे : डोळे बंद केल्यास बाह्य दृष्यांकडे लक्ष जाऊन मन विचलित होत नाही. डोळे उघडे ठेवल्यास लिहिलेला जप मोठ्याने वाचून करावा.
४. त्वचा : मला स्पर्श करू नका, असे इतरांना सांगता येते.
५. कान : बाहेरच्या आवाजांचा त्रास होणार नाही, असे स्थळ किंवा काळ निवडावा.
१ आ. पंचकर्मेंद्रिये
वाणी (वाक्), हात, पाय, गुद, जननेंद्रिय यांतील फक्त जीभ आणि हात-पाय यांचा एकाग्रता होण्यासाठी लाभ करून घेता येतो. गुद आणि जननेंद्रिय यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही.
१. जीभ : लिहिलेला नामजप वाचत वैखरीतून मोठ्याने नामजप करावा. यामुळे कानालाही नामजप ऐकू येत असल्यामुळे मन एकाग्र व्हायला साहाय्य होते.
१ अ. गती : जप जलद गतीने केल्यास मन जपावर केंद्रित होण्यास साहाय्य होते. पुढे मन जपावर केंद्रित होऊ लागले की, टप्प्याटप्प्याने गती कमी करावी. शेवटी श्वासोच्छ्वासाच्या गतीशी जपाची गती जोडावी. त्याहूनही गती कमी झाली, तर चांगलेच आहे.
१ अ. चाल : जपाला चाल हवी, चढ-उतार हवा, उदा. ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ हा जप करतांना एकदा चढ्या पट्टीत, म्हणजे वरच्या स्वरात आणि दुसर्यांदा उतरत्या पट्टीत, म्हणजे खालच्या स्वरात करावा. नंतर असाच चढ्या आणि उतरत्या पट्टीत एक आड एक म्हणावा. त्यामुळे मन एकाग्र व्हायला साहाय्य होते.
२. हात आणि पाय : हालचाल न करता स्थिर बसावे.
टप्पा २
मन
या टप्प्याला जप मनात म्हणायचा असतो. हा जप भावपूर्ण आणि अनाहतचक्रावर पाच बोटांनी न्यास करून केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते. ”
– (प.पू.) डॉ. आठवले (३.५.२०१४)
वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि
सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी
काही जणांना वाटते, वाईट शक्तींचा त्रास नसला, तर नामजप करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वभावदोष रज-तम गुणांमुळे निर्माण होतात. नामजपामुळे सत्त्वगुण वाढतो. तो वाढला की, रज-तम गुण अल्प होऊ लागतात, म्हणजेच साधनेत प्रगती होऊ लागते. याचा अर्थ हा की, वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी आहे. – (प.पू.) डॉ. आठवले (९.१.२०१५)
६. नामस्मरण – सर्वोत्तम साधना
ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि नामजप सहजावस्था म्हणजे अखंड नामजपाने प्राप्त होणारी स्थिती ही सर्वोत्तम साधना होय. ध्यान-धारणा ही मध्यम, तत्त्वचिंतन म्हणजे ज्ञानयोग ही कनिष्ठ आणि मंत्रयोग ही ‘अधमाधमः’ म्हणजे सर्वांत कनिष्ठ प्रतीची साधना होय.’
अनंत अशा परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अखंड म्हणजे २४ घंटे (तास) साधना व्हायला हवी. ज्ञानयोगाप्रमाणे वेद, उपनिषदे यांचा अभ्यास, कर्मयोगाप्रमाणे ध्यान-धारणा, त्राटक, प्राणायाम इत्यादी, भक्तीयोगाप्रमाणे देवपूजा, भजन, कीर्तन २४ घंटे करणे शक्य होत नाही. साधनेतील अखंडत्व फक्त नामस्मरणाने साधता येते, म्हणून ती सर्वोत्तम साधना !
धन्यवाद ह्या अँप मुळे भरपूर प्रश्नांची उत्तरे मिळतात