सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म
विश्वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’
‘महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो भूभाग म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहात होते. ‘ख्रिस्ताब्द ८०२ ते १४२१ या कालावधीत तेथे ‘खमेर’ नावाचे हिंदु साम्राज्य होते’, असे सांगितले जाते. खरे तर कंभोज प्रदेश हे कौंडिण्य ॠषींचे क्षेत्र होते, तसेच कंभोज देश हा ‘नागलोक’ही होता. ‘कंभोजच्या राजाने महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता’, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. ‘नागलोक’ असल्यामुळे हे ‘शिवक्षेत्र’ही आहे. येथील महेंद्र पर्वतावर श्रीविष्णूचे वाहन गरुड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे ‘विष्णुक्षेत्र’देखील आहे.
१. राजा राजेंद्रवर्मन (दुसरा) याने त्याच्या २ मंत्र्यांना
भूमी देणे, त्यानंतर त्या मंत्र्यांनी एक छोटे नगर निर्माण करून त्याच्या मध्यभागी
शिव-पार्वती मंदिर बांधून त्यास ‘त्रिभुवन महेश्वर’, असे नाव देणे आणि हेच ‘बंते सराई’ मंदिर असणे
‘दहाव्या शतकात राजा राजेंद्रवर्मन (दुसरा) हा यशोधरपुरामध्ये राज्य करत असतांना त्याने त्याच्या राजदरबारातील विष्णुकुमार आणि यज्ञवराह या २ मंत्र्यांना एक मोठी भूमी दिली. या दोघांनी त्या ठिकाणी ‘ईश्वरपूर’ नावाचे एक छोटे नगर निर्माण केले. हे नगर म्हणजेच आताचे ‘नोम देई’ गाव. विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्वर’, असे नाव दिले. हे मंदिर म्हणजेच आताचे ‘बंते सराई’ मंदिर ! (छायाचित्र क्रमांक १ पहा.) चिर्याच्या दगडांनी बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे; पण आता ते जीर्ण झाले आहे. तेथील शिलालेखावर ‘या मंदिराचा कलशारोहण २२ एप्रिल ९६७ या दिवशी झाला’, असा उल्लेख आढळतो.
अंकोर वाट ते महेंद्र पर्वत हे अंतर ७० कि.मी. इतके आहे. महेंद्र पर्वताच्या मार्गावर असलेल्या ‘नोम देई’ गावात एकेकाळी अनेक क्षत्रिय महिला रहात होत्या. ‘बंते सराई’ मंदिर म्हणजे त्यांचा किल्ला असावा’, असे स्थानिक लोक मानतात. ‘बंते’ म्हणजे किल्ला आणि ‘सराई’ हा शब्द ‘स्त्री’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. अंकोर परिसरातील शेकडो मंदिरांपैकी हे सर्वांत छोटे मंदिर असून त्यातील शिल्पकला आणि कोरीव काम इतर कुठल्याही मंदिरात बघायला मिळत नाही.
२. शिव-पार्वती मंदिराच्या परिसरात श्रीविष्णु-महालक्ष्मी
मंदिर असल्याचे पुरावे असणे, तसेच या मंदिरांच्या भिंती आणि द्वारे
यांच्यावर रामायणातील आणि देवतांची अनेक सुंदर शिल्पे कोरलेली असणे
शिव-पार्वती मंदिराच्या परिसरात श्रीविष्णु-महालक्ष्मी मंदिर असल्याचे पुरावे आहेत. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सध्या ही दोन्ही मंदिरे भग्नावस्थेत आहेत. या मंदिरांच्या वेगवेगळ्या भिंती आणि द्वारे यांच्यावर अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाली-सुग्रीव युद्ध, हिरण्यकश्यपूचा वध करतांना नृसिंह (छायाचित्रे क्रमांक ३ पहा.), अप्सरा तिलोत्तमा हिला प्राप्त करण्यासाठी एकमेकांशी युद्ध करणारे सुंद-उपसुंद नावाचे असुर, सीतेचे अपहरण करतांना रावण, कैलास पर्वतावर बसलेले भगवान शिव, कैलास पर्वत उचलतांना रावणासुर, खांडववन भक्षण करतांना अग्निदेव आणि त्याला साहाय्य करतांना श्रीकृष्णार्जुन, भगवान शिवावर बाण सोडतांना कामदेव अन् भगवान शिवाने कामदेवाला तिसर्या डोळ्याद्वारे भस्म केल्याचे दृश्य आदी शिल्पांचा समावेश आहे.
३. शिव-पार्वती मंदिरातील वेगवेगळ्या तोरणद्वारांवरसुंदर
कोरीव काम असणे, तसेच शिव-पार्वती मंदिर आणि विष्णु-महालक्ष्मी
मंदिर या मंदिरांच्या तोरणद्वारांवर अनुक्रमे नंदी अन् गरुड यांची शिल्पे कोरलेली असणे
शिव-पार्वती मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या वेगवेगळ्या दिशांना तोरणद्वार असून त्यांवरही अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. (छायाचित्रे क्रमांक २ पहा.) त्यांवर कोरलेली शिल्पे ही विश्वात कुठेही नसतील, इतकी ती विशेष आहेत. शिव-पार्वती मंदिर आणि विष्णु-महालक्ष्मी मंदिर या मंदिरांच्या तोरणद्वारांवर अनुक्रमे नंदी अन् गरुड ही शिल्पेही कोरलेली आहेत.’
– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया
‘भारतापासून ३ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या कंबोडियात पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती, ते आम्हाला जवळून बघण्याचे भाग्य लाभले. यासाठी आम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ