१. बांधकामात सिमेंटचा वापर न करता
विशिष्ट पद्धतीने एकमेकांत कोट्यवधी दगड अडकवून मंदिर उभारणे
‘इंडोनेशियातील योग्यकर्ता या गावातील परब्रह्म मंदिरासाठी कोट्यवधी दगड वापरण्यात आले आहेत. ‘त्या काळी याकरता कोणते तंत्रज्ञान वापरले असेल ?’, ‘एवढ्या मोठ्या संख्येने दगड कुठून आणले असतील ?’, असे प्रश्न उपस्थित होतात. मार्गदर्शकाला (‘गाईड’ला) विचारले असता त्याने सांगितले, ‘‘मागे एक वाहती नदी आहे, तेथून हे दगड वाहून आणले असतील.’’ ‘कोट्यवधी दगड आणणे आणि त्यापासून मंदिर उभे करणे, यावरून तेव्हाचे तंत्रज्ञान किती प्रगल्भ असेल’, हे लक्षात येते. मंदिराचा परिसर पुष्कळ मोठा आहे, तसेच सर्व मंदिरांचा कळस पुष्कळ उंच आहे. विशेष म्हणजे मंदिरांच्या बांधकामात कुठेही सिमेंटचा वापर झालेला दिसत नाही. सगळीकडे ‘इंटरलॉकिंग’ पद्धत आहे. (छायाचित्र क्रमांक १ पहा) दगड एकमेकांमध्ये विशिष्ट प्रकारे अडकवले आहेत. अशा रचनेमुळे मंदिर सात्त्विक दिसते. यावरून ‘आपले पूर्वज किती हुशार होते’, हे यातून लक्षात येते.
२. ‘नैसर्गिक आपत्तीतही मूर्तीची हानी होऊ नये’, अशा प्रकारे केलेली मंदिराची रचना
येथे शिवस्वरूप असलेला आणि जिवंत ज्वालामुखी असलेला ‘मेरापी’ पर्वत आहे. त्यातून सतत राख आणि धूर बाहेर पडत असतो. हा ज्वालामुखी वर्ष १००६ मध्ये जागृत झाला होता. त्या वेळी ‘योग्यकर्ता’ या गावाच्या परिसरात भूकंप झाला. त्यामुळे अनेक लहान लहान मंदिरे पडली. त्यानंतर वर्ष १५६४ मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भूकंप झाला, तेव्हाही या मंदिरांना हादरे बसले होते. त्यानंतर वर्ष २००६ च्या भूकंपात पुन्हा तेथील काही मंदिरे पडली. मार्गदर्शकाने सांगितले की, जेव्हा भूकंपात मंदिराचे शिखर पडले, तेव्हा ते मंदिराच्या गर्भगृहात न पडता दोन्ही बाजूने उन्मळून पडले. त्यामुळे आतील मंदिरातील मूर्तीची कुठल्याही प्रकारे हानी झाली नाही. (छायाचित्र क्रमांक २ पहा) अशा पद्धतीने या मंदिराची रचना केली होती. ‘आपत्काळ आला, तरी देवतेच्या मूर्तीला काही हानी पोहोचू नये’, याची जाणीव त्या वेळच्या लोकांना होती. ‘मंदिर पुन्हा उभारता येते; पण मूर्तीत आलेले देवत्व टिकवणे फार कठीण असते’, एवढा व्यापक विचार येथे केलेला आढळतो.’
३. देवतेच्या वाहनाचेही प्रचंड मोठे मंदिर !
परब्रह्म मंदिर बघतांना देवतेच्या मंदिरासमोर त्या त्या देवतेच्या वाहनाचे मोठे मंदिर, अशी रचना आढळून आली. उदा. विष्णूचे वाहन गरुड, शिवाचे वाहन नंदी, ब्रह्मदेवाचे वाहन हंस यांच्यासाठीही येथे प्रचंड मोठी मंदिरे बांधली आहेत. ‘आपल्या पूर्वजांनी वाहनांनाही देवतेसमान मानले आहे. मुख्य म्हणजे येथील नंदीच्या देवळाच्या बाजूलाही सूर्य आणि चंद्र यांच्या मूर्ती आढळतात. (छायाचित्र ‘अ’ पहा) ‘सूर्य आणि चंद्र असेपर्यंत ही मंदिरे किंवा महत्त्व सार्या विश्वात टिकून रहावे’, अशी त्या मागे तेव्हाच्या लोकांची श्रद्धा होती. केवढी ही विचारांतील विशालता ! आता शिवाच्या मंदिरासमोर एक लहानसा नंदी असतो, इतकी आपली वृत्ती संकुचित झाली आहे.
४. आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून सप्तलोकांप्रमाणे केलेली मंदिराची रचना
मंदिरांची रचना सप्तलोकांप्रमाणे केलेली आहे. खालच्या दगडांचा थर भू, भुवर् आणि स्वर्ग लोक यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर वरच्या वरच्या स्तराला देवता आणि काही ऋषिमुनी यांच्या मूर्ती आहेत. कळस म्हणजे सत्यलोक आहे. स्वर्गलोक दाखवतांना त्यांनी कल्पवृक्ष दाखवले आहेत. त्याच्या खाली त्यांनी किन्नर-किन्नरी, यक्ष, गंधर्व, अप्सरा आदी देवता दाखवल्या आहेत. (छायाचित्र ‘आ’ पहा) कल्पवृक्ष म्हणजे सर्व सुखे देणारा हा वृक्ष. स्वर्गात सर्व सुखे मिळतात, त्याचे प्रतीक म्हणून कल्पवृक्ष दाखवला आहे. ते सुख देणार्या देवता, त्यांचे गण म्हणजे किन्नर-किन्नरी, यक्ष, गंधर्व अशा सर्व मूर्ती कोरलेल्या आहेत. (छायाचित्र ‘ई’ पहा) स्वर्गलोकाचे प्रतीक असलेल्या कल्पवृक्षावर भूलोकाचे प्रतीक म्हणून पशूपक्षी आणि काही माकडे कोरलेली आहेत. (छायाचित्र ‘इ’ पहा) अशाप्रकारे आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून मंदिरांची रचना केलेली आहे.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, इंडोनेशिया.