लक्ष्मीपूजनाचा इतिहास
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
लक्ष्मीपूजन साजरा करण्याची पद्धत
प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व
सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
श्री लक्ष्मी देवीला करावयची प्रार्थना
जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मी देवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे.
माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. तेव्हा तोही भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळविले आणि त्याचा विनियोग कसा केला, त्याच्या पै पै चा हिशोब या जमा-खर्चाच्या वहीत नमूद केला आहे. तो आज तपासणीसाठी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. तू माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभूकार्यासाठीच केला आहे; कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मीदेवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशी आहेस, त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामात कधीही केला नाही.
हे सर्व मला श्री सरस्वतीदेवीने केलेल्या साहाय्यामुळेच शक्य झाले. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही. त्यामुळेच माझे आत्मबल कमी झालेे नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. हा खर्च मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला. (स्मरणाद्वारे) त्याला सहभागी करून घेतले असल्यामुळेच त्याचेही सहकार्य लाभले आहे. माझ्या नजरेस काही चूक आल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या.’
आध्यात्मिक महत्त्व : अशाप्रकारे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे निर्माण होणारा उन्माद त्याच्यात निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता येते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढावयाची रांगोळी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?
अलक्ष्मी निःसारण (सूक्ष्म-चित्र)
१. कृती
‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.
२. महत्त्व
गुण निर्माण केले तरीही दोष नाहीसे झाले तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
लक्ष्मी चंचल आहे, असे म्हणण्याचे कारण
एखाद्या देवतेची उपासना केली की, त्या देवतेचे तत्त्व उपासकाकडे येते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात, उदा.श्री लक्ष्मीची उपासना केली की, धनप्राप्ती होते. उपासना कमी झाली, अहं जागृत झाला की, देवतेचे तत्त्व उपासकाला सोडून जाते. अशाच कारणांमुळे श्री लक्ष्मी उपासकाला सोडून जाते. तेव्हा स्वतःची चूक मान्य न करता व्यक्ती म्हणते, लक्ष्मी चंचल आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे की, लक्ष्मी चंचल असती, तर तिने श्रीविष्णूचे चरण केव्हाच सोडून दिले असते. – (प.पू.) डॉ. आठवले (१४.१०.२००९)
श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे दिली आहे.
प्रत्यक्ष कृती
पूजकाने (यजमानाने) स्वतःला कुंकुम-तिलक लावून घ्यावा.
आचमन
पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे –
श्री केशवाय नमः । श्री नारायणाय नमः । श्री माधवाय नमः ।
या नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे –
श्री गोविन्दाय नमः ।
त्यानंतर पुढील नावे अनुक्रमे उच्चारावी.
श्री विष्णवे नमः । श्री मधुसूदनाय नमः । श्री त्रिविक्रमाय नमः । श्री वामनाय नमः । श्री श्रीधराय नमः । श्री हृषीकेशाय नमः । श्री पद्मनाभाय नमः । श्री दामोदराय नमः । श्री संकर्षणाय नमः । श्री वासुदेवाय नमः । श्री प्रद्युम्नाय नमः । श्री अनिरुद्धाय नमः । श्री पुरुषोत्तमाय नमः । श्री अधोक्षजाय नमः । श्री नारसिंहाय नमः । श्री अच्युताय नमः । श्री जनार्दनाय नमः । श्री उपेन्द्राय नमः । श्री हरये नमः । श्री श्रीकृष्णाय नमः ।
(याप्रमाणे पुन्हा एकदा आचमन करावे म्हणजे द्विराचमन होते. पूजेच्या आरंभी आणि पूजेच्या शेवटी द्विराचमन करावे लागते.)
(हात जोडावेत.)
प्रार्थना
श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । अविघ्नमस्तु ।
देशकालाचा उच्चार करणे
देशकाल
पूजकाने आपल्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावावे आणि पुढील देशकाल म्हणावा.
(31.10.2024)
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, आश्विन मासे, कृष्ण पक्षे, अमायांतिथौ (१८.१७ पर्यंत), शुक्र वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, प्रीति (१०.४१ नंतर आयुष्मान) योगे, नाग करणे, तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, वृषभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीशनैश्चरे, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवं ग्रहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…..l
(1.11.2024)
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, आश्विन मासे, कृष्ण पक्षे, अमायांतिथौ (१८.१७ पर्यंत), शुक्र वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, प्रीति (१०.४१ नंतर आयुष्मान) योगे, नाग करणे, तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, वृषभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीशनैश्चरे, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवं ग्रहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…..l
(महापुरुष भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेत-वराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील आर्यावर्त देशातील (जम्बुद्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्ध अवतारात रामक्षेत्रात) सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक क्रोधी नावाच्या संवत्सरातील (वर्षातील) दक्षिणायनातील शरद ऋतूतील आश्विन मासातील (महिन्यातील) कृष्ण पक्षातील अमावास्येला (टीप २) आयुष्मान योगातील शुभघडीला, म्हणजे वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशा तिथीला)
ज्यांना वरील देशकाल म्हणणे कठीण जात असेल त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा.
तिथिर्विष्णुस्तथा वारं नक्षत्रं विष्णुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।
टीप २ – वरील देशकाल २०२४ ला अनुसरून येथे दिला आहे.
संकल्प
उजव्या हातात अक्षता घ्या आणि पुढील संकल्प म्हणा :
मम आत्मनः परमेश्वर-आज्ञारूप-सकलशास्त्र-श्रुतिस्मृतिपुराणोक्त-फलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रीमहालक्ष्मीप्रीतिद्वारा अलक्ष्मीपरिहारपूर्वकं विपुलश्रीप्राप्ति-सन्मंगल-महैश्वर्य-कुलाभ्युदय-सुखसमृद्ध्यादि-कल्पोक्त-फलसिद्ध्यर्थं लक्ष्मीपूजनं कुबेरपूजनं च करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणं करिष्ये । कलशशंखघंटादीपपूजनं करिष्ये ।
(श्री महालक्ष्मीच्या प्रितीने माझे / आमचे दारिद्र्य परिहार व्हावे व पुष्कळ लक्ष्मीप्राप्ति, मंगल ऐश्वर्य, कुलाची अभिवृद्धि, सुख-समृद्धि आदि फलप्राप्ति व्हावी; म्हणून लक्ष्मीपूजन आणि कुबेरपूजन करतो.)
श्री गणपतिपूजन
(ताम्हणात किंवा पाटावर तांदुळ घेऊन त्यावर विडा आणि नारळ ठेवावा. नारळ ठेवताना नारळाची सोंड पूजकाच्या दिशेने ठेवावी. विडा ठेवताना देठ देवाच्या बाजूला आणि अग्रभाग पूजकाच्या दिशेने ठेवावेत. पुढील मंत्र म्हणून नारळावर गणपतीचे आवाहन करावे व पूजा करावी.)
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
(वळलेली सोंड, विशाल शरीर, कोटी सूर्यांचा प्रकाश असलेल्या हे (गणेश) देवा माझी सर्व कामे नेहमी विघ्नरहित कर.)
ऋद्धिबुद्धिशक्तिसहितमहागणपतये नमो नमः ।
(ऋद्धी, बुद्धी आणि शक्ती सहित महागणपतीला नमस्कार करतो.)
महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि ।
(महागणपतीला सर्वांगांनी आपल्या परिवारासह आपल्या शस्त्रांसहित आणि सर्वशक्तीनिशी येण्याचे आवाहन करतो.)
महागणपतये नमः । ध्यायामि ।
(महागणपतीचे ध्यान करतो.)
महागणपतये नमः । आवाहयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून आवाहन करतो.)
(नारळावर अक्षता वहाव्यात.)
महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून आसनाप्रती अक्षता अर्पण करतो.)
(अक्षता वहाव्यात.)
महागणपतये नमः । चन्दनं समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून गंध अर्पण करतो.)
(नारळाला गंध लावावे.)
ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्राकुङ्कुमं समर्पयामि ।
(ऋद्धिसिद्धींना नमस्कार करून हळद-कुंकू अर्पण करतो.)
(हळद, पिंजर वहावी.)
महागणपतये नमः । पूजार्थे कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून पूजेसाठी सध्या फुलणारी फुले अर्पण करतो.)
(फुले वहावी.)
महागणपतये नमः । दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून दूर्वा अर्पण करतो.)
(दूर्वा वहाव्यात.)
महागणपतये नमः । धूपम् समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून धूप ओवाळतो.)
(उदबत्ती ओवाळावी.)
महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून दिवा समर्पण करतो.)
(निरांजन ओवाळावे.)
महागणपतये नमः । नैवेद्यार्थे पुरतस्थापित-मधुरनैवेद्यं निवेदयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून नैवेद्यासाठी मधुर (गोड) नैवेद्य निवेदन करतो.)
(उजव्या हातात दूर्वा किंवा फूल घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून आपल्या दोन्ही डोळ्यांवर डावा हात ठेवून पुढील मंत्र म्हणत नैवेद्य समर्पण करावा.)
प्राणाय नमः ।
(हे प्राणासाठी अर्पण करत आहे.)
अपानाय नमः ।
(हे अपानासाठी अर्पण करत आहे.)
व्यानाय नमः ।
(हे व्यानासाठी अर्पण करत आहे.)
उदानाय नमः ।
(हे उदानासाठी अर्पण करत आहे.)
समानाय नमः ।
(हे समानासाठी अर्पण करत आहे.)
ब्रह्मणे नमः ।
(हे ब्रह्माला अर्पण करत आहे.)
(ते फूल किंवा दूर्वा नारळावर वहाव्यात.)
टीप : ‘नमः’ च्या जागी ‘स्वाहा’ असेही म्हणू शकतो.
महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
(महागणपतीला नमस्कार करून नैवेद्य अर्पण करतो.)
मध्ये पानीयं समर्पयामि ।
(मध्ये पिण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
उत्तरापोशनं समर्पयामि ।
(आपोशनासाठी पाणी अर्पण करत आहे.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
(हात धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
(तोंड धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।
(हाताला लावण्यासाठी चंदन अर्पण करत आहे.)
मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि ।
(मुखवासासाठी पान-सुपारी अर्पण करत आहे.)
दक्षिणां समर्पयामि ।
(दक्षिणा अर्पण करत आहे.)
(समर्पयामि म्हणतांना हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
अचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ।।
(अचिंत्य, निराकार, निर्गुण, आत्मस्वरूपी, सर्व जगाला आधारभूत अशा ब्रह्माला मी नमस्कार करतो.)
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ।
विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।
(हे गणपती, तुझे अधिष्ठान असता आणि तू प्रसन्न असता माझे कार्य सिद्धीस जावो आणि त्यामध्ये येणार्या संकटांचा नाश होवो.)
अनया पूजया सकलविघ्नेश्वरविघ्नहर्तामहागणपतिः प्रीयताम् ।
(ह्या पूजेने सर्व संकटांचा नाश करणारा महागणपती प्रसन्न होवो.)
(उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.)
श्रीविष्णुस्मरण
हात जोडावे आणि ‘विष्णवे नमो’ असे ९ वेळा म्हणावे व शेवटी ‘विष्णवे नमः’ असे म्हणावे.
कलशपूजा
कलशदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(कलशामध्ये गंध, अक्षता व फूल एकत्रित वहावे.)
घंटापूजा
घंटायै नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(घंटेला गंधाक्षतफूल वहावे.)
दीपपूजा
दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(समईला गंधाक्षतफूल वहावे.)
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।
(या मंत्राने तुळशीपत्र पाण्यात भिजवून पूजासाहित्यावर अणि आपल्या अंगावर पाणी प्रोक्षण करावे.)
(बाह्य शरीराने) स्वच्छ असो वा अस्वच्छ असो, कोणत्याही अवस्थेत असो. जो (मनुष्य) कमलनयन (श्री विष्णूचे) स्मरण करतो तो आतून आणि बाहेरून शुद्ध होतो.
श्री लक्ष्मीकुबेर पूजन आणि श्री लक्ष्मीकुबेराचे ध्यान करावे
ध्यायामि तां महालक्ष्मीं कर्पूरक्षोदपाण्डुराम् ।
शुभ्रवस्त्रपरीधानां मुक्ताभरणभूषिताम् ।।
पङ्कजासनसंस्थानां स्मेराननसरोरुहाम् ।
शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजाम् ।।
पद्मयुग्माभयवरव्यग्रचारुकराम्बुजाम् ।
अभितो गजयुग्मेन सिच्यमानां कराम्बुना ।।
अर्थ : कापूराच्या चूर्णाप्रमाणे शुभ्र वस्त्र नेसलेल्या, मुक्ताभरणांनी विभूषित, कमळामध्ये निवास करणार्या, स्मित मुखारविंद असलेल्या, शरद ऋतूतील चंद्रकलेप्रमाणे सौंदर्य असणार्या, पाणीदार डोळे असणार्या, चतुर्भुज, जिने दोन करकमळामध्ये कमळे आणि दोन हातांनी अभय अन् वरदमुद्रा धारण केल्या आहेत अशा, जिला दोन हत्ती आपल्या शुंडेतील पाण्याने सर्व बाजूंनी अभिषेक घालत आहेत अशा महालक्ष्मीचे मी ध्यान करतो.
टीप :
१. शास्त्रोक्त मंत्रपठण करणे प्रत्येकालाच शक्य नसते. त्यामुळे कोणत्याही पूजकाला सहज पठण करता येईल, अशी ‘नाममंत्रयुक्त पूजा’ पुढे देत आहोत. पूजकाने (पूजा करणार्या व्यक्तीने) प्रत्येक नाममंत्राखाली मूळ शास्त्रोक्त मंत्र न देता त्यांचा केवळ अर्थ दिलेला आहे. अर्थ समजल्यामुळे त्याला भावपूर्ण पूजन करणे सुलभ होईल.
२. ‘आवाहयामि’ आणि ‘समर्पयामि’ हे शब्द उच्चारतांनाच पूजकाने उपचार समर्पित करावा.
आवाहन
महालक्ष्मि समागच्छ पद्मनाभपदादिह ।
पूजामिमां गृहाण त्वं त्वदर्थं देवि संभृताम् ।।
(हे महालक्ष्मी, श्रीविष्णूच्या चरणकमलापासून तू येथे ये आणि तुझ्यासाठी एकत्रित केलेल्या पूजेचा स्वीकार कर.)
उजव्या हातात अक्षता घ्या.
(प्रत्येक वेळी अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ (अंगठा) एकत्र करूनच वहाव्यात.)
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । आवाहयामि ।।
(हात जोडावेत.)
आसन
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
(श्री लक्ष्मीकुबेराच्या चरणी अक्षता वहाव्यात.)
(हे लक्ष्मी, तू कमळामध्ये निवास करतेस तेव्हा माझ्यावर कृपा करण्यासाठी तू या कमळामध्ये निवास कर.)
(पूजेसाठी छायाचित्र असल्यास फुलाने अथवा तुळशीपत्राने पाणी प्रोक्षण करावे. मूर्ती अथवा प्रतिमा असल्यास आपल्यासमोर ताम्हणामध्ये ठेऊन पुढील उपचार समर्पित करावेत.)
पाद्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पाद्यं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : प्रवासाचे सर्व श्रम दूर व्हावे म्हणून गंगोदकाने युक्त नाना मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी पाय धुण्यासाठी देतो.
अर्घ्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । अर्घ्यं समर्पयामि ।।
(डाव्या हाताने पळीभर पाणी भरून घ्या. त्या पाण्यात गंध-फूल अक्षता घाला. उजव्या हाताने पळीतील पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी वहा.)
अर्थ : भक्तावर उपकार करणार्या हे महालक्ष्मी, पापे नष्ट करणार्या आणि पुण्यकारक अशा तीर्थोदकाने केलेले हे अर्घ्य ग्रहण कर.
आचमन
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । आचमनीयं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : हे जगदंबिके कापूर, अगरु यांनी समिश्र असे थंड आणि उत्तम असे पाणी तू आचमन करण्यासाठी ग्रहण कर.
स्नान
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । स्नानं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : हे महालक्ष्मी, कापूर, अगरु यांनी सुवासित असे सर्व तीर्थांतून आणलेले पाणी तू स्नानासाठी ग्रहण कर.
पंचामृत
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पंचामृतस्नानं समर्पयामि। तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।।
(दूध, दही, तूप, मध व साखर एकत्र केलेले देवीच्या चरणी वहावे. त्यानंतर पळीभर शुध्द पाणी घालावे.)
अर्थ : हे देवी, मी दिलेले दूध, दही, तूप, मध व साखर यांनी युक्त असलेले पंचामृत स्नानासाठी ग्रहण कर.
गंधाचे स्नान
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि ।।
(पळीभर पाणी घ्यावे. त्यात गंध घालून ते पाणी देवीच्या चरणी वहावे.)
अर्थ : कापूर, वेलची यांनी युक्त आणि सुगंधित द्रव्यांनी युक्त असे मी दिलेले हे गंधाचे पाणी स्नानासाठी ग्रहण कर.
महाभिषेक
(आपल्या अधिकारानुसार श्रीसूक्त/पुराणोक्त देवीसूक्त यांनी अभिषेक करावा.)
त्यानंतर मूर्ती अथवा प्रतिमा आपल्यासमोर ताम्हणात घेतली असल्यास स्वच्छ धुवून पुसून परत मूळ स्थानी ठेवावी आणि पुढील पूजा करावी.
वस्त्र
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासनिर्मिते वस्त्रे समर्पयामि ।।
(देवीला कापसाचे वस्त्र आणि उपवस्त्र वहावे.)
अर्थ : तंतूच्या सातत्यामुळे तंतूमय असे आणि कलाकुसरीने युक्त, शरीराला अलंकृत करणारे असे हे श्रेष्ठ वस्त्र हे देवी तू परिधान कर.
कंचुकीवस्त्र
श्री लक्ष्म्यै नमः । कंचुकीवस्त्रं समर्पयामि ।।
(उपलब्धतेनुसार साडी, चोळी अर्पण करावी.)
अर्थ : हे विष्णुवल्लभे मोत्यांच्या मण्यांच्या समूहाने युक्त अशी सुखद आणि (अनमोल) अमोल अशी चोळी मी तुला देतो.
गंध
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।।
(गंध लावावे.)
अर्थ : मलय पर्वतावर झालेले, अनेक नागांनी रक्षण केलेले अत्यंत शीतल आणि सुगंधित असे हे चंदन स्वीकार कर.
हळदकुंकू
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।।
(हळदकुंकू वहावे.)
अर्थ : हे ईश्वरी, मी आणले हे ताटंक, हळदीकुंकू, अंजन, सिंदूर आणि आळीता आदी सौभाग्यद्रव्य तुला देतो (याचा स्वीकार कर).
अलंकार
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । अंलकारार्थे नानाभरणभूषणानि समर्पयामि ।।
(उपलब्धतेनुसार सौभाग्यालंकार अर्पण करावे.)
अर्थ : हे देवी, रत्नजडीत कंकणे, बाहूबंध, कटिबंध, कर्णभूषणे, पैंजण, मोत्यांचा हार, मुकुट आदी अलंकार तू धारण कर.
पुष्प
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि तुलसीपत्राणि दुर्वांकुरांश्च समर्पयामि ।।
(फुले, तुळशी, बेल, दूर्वा तसेच उपलब्धतेनुसार पत्री अर्पण करावी.)
अर्थ : हे लक्ष्मी, प्राप्त झालेल्या सुगंधामुळे आनंदित आणि मत्त अशा भ्रमरांच्या समूहामुळे व्यापलेला नंदनवनातील फुलांचा संचय तू घे.
धूप
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । धूपं समर्पयामि ।।
(उदबत्ती ओवाळावी.)
अर्थ : हे देवी, अनेक झाडांच्या रसापासून उत्पन्न झालेल्या सुगंधीत गंधांनी युक्त, जो देव, दैत्य व मानवांनाही आनंदकारक आहे. अशा धूपाला तू ग्रहण कर.
दीप
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । दीपं समर्पयामि ।।
(नीरांजन ओवाळावे.)
अर्थ : सूर्यमंडल, अखंड चंद्रबिंब आणि अग्नि यांच्या तेजाला कारणीभूत असणारा, असा हा दीप मी भक्तीस्तव तुला सादर केला आहे.
(उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळशीचे पान हातातच धरून ठेवावे आणि आपल्या दोन्ही डोळ्यांवर डावा हात ठेवून नैवेद्य दाखवत पुढील मंत्र म्हणत नैवैद्य समर्पण करावा.)
(लवंग, वेलची, साखर घातलेले दूध तसेच लाडू यांचा नैवेद्य दाखवावा.)
नैवेद्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नैवेद्यार्थे एला-लवंग-शर्करादि-मिश्रगोक्षीरलड्डुकादि-नैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः ।
उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।।
(हातातील तुळशी देवीच्या चरणी वहाव्या. नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.)
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नैवेद्यं समर्पयामि ।।
मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
(देवीला गंधफूल वहावे.)
अर्थ : स्वर्ग, पाताळ आणि मृत्यूलोक यांना आधार असणारे धान्य व त्यापासून तयार केलेला सोळा आकारांचा नैवेद्य आपण स्वीकार करावा.
फल
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ।।
(पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते विडा, सुपारी यांवर सोडावे.)
अर्थ : हे देवी, हे फळ मी तुला समर्पण करण्यासाठी ठेवतो, त्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये मला चांगल्या फलांची प्राप्ती होवो. कारण या चराचर त्रैलोक्यामध्ये फळामुळेंच फलप्राप्ती होतांना दिसते म्हणून या फलप्रदानामुळे माझे मनोरथ पूर्ण होवो.
तांबूल
अर्थ : हे देवी, मुखारविंदाचे भूषण असणारा, अनेक गुणांनी युक्त असणारा, ज्याची उत्पत्ति पाताळात झाली, असा माझ्याकडून दिला जाणारा विडा तू ग्रहण कर.
आरती
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । महानीरांजनदीपं समर्पयामि ।।
(देवीची आरती म्हणावी.)
अर्थ : चंद्र, सूर्य, पृथ्वी, वीज,अग्नी यांमध्ये असणारे तेज हे तुझेच आहे. (अशी किती ही तेजे तुझ्यावरून ओवाळून टाकावी.)
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।
(कापूर (कर्पूर) दाखवावा.)
अर्थ : कापूराप्रमाणे गोरा असणार्या, करूण रसाचा अवतार असणार्या, त्रैलोक्याचे सार असणार्या ज्याने नागराजाला आपला कंठहार केला आहे, जो सर्वकाळ हृदय कमलामध्ये निरंतर वास करतो, अशा पार्वतीसहीत असणार्या शंकराला, मी नमस्कार करतो.
नमस्कार
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नमस्कारान् समर्पयामि ।।
(देवीला नमस्कार करावा.)
अर्थ : इंद्रादि देवतांच्या शक्ती असणार्या, त्याचप्रमाणे महादेव, महाविष्णू, ब्रह्मदेवाची शक्ती असणार्या, मंगलरूप असणार्या, सुख करणार्या अशा हे मूळ प्रकृतिरूप असणार्या देवी तुला आम्ही सर्व नम्र होऊन सतत नमस्कार करतो.
प्रदक्षिणा
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । प्रदक्षिणान् समर्पयामि ।।
(स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.)
अर्थ : मी जी जी काही पातके या जन्मात अथवा अन्य जन्मांत केली असतील, ती ती सर्व पातके प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलोपावलीं नष्ट होतात. तूच माझा आश्रय आहेस तुझ्याशिवाय माझा रक्षणकर्ता दुसरा कुणीही नाही; म्हणून हे जगदंबे! करुणभावाने तू माझे रक्षण कर.
मंत्रपुष्पाजंली
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।।
(गंध, फूल व अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना दोन्ही हातांच्या ओंजळीने देवीच्या चरणी वहाव्यात.)
अर्थ : हे लक्ष्मी, विष्णूच्या धर्मपत्नी तू ही पुष्पांजली घे आणि या पूजेचे यथायोग्य फल मला प्राप्त करून दे.
प्रार्थना
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
(हात जोडून देवीची आणि कुबेराची प्रार्थना करावी.)
अर्थ : हे विष्णप्रिये तू वर देणारी आहेस, तुला मी नमस्कार करतो, तुला शरण आलेल्यांना जी गति प्राप्त होते, ती गति तुझी पूजा केल्याने मला प्राप्त होवो. जी देवी लक्ष्मी (तेजाच्या सौंदर्याच्या) रूपाने सर्व भूतांत निवास करते. तिला मी त्रिवार (तीन वेळा) नमस्कार करतो. संपत्तीच्या राशींचा अधिपति असणार्या हे कुबेरा तुला मी नमस्कार करितो. तुझ्या प्रसन्नतेने मला धनधान्य संपत्ती प्राप्त होवो.)
अनेन कृतपूजनेन श्री लक्ष्मीकुबेरौ प्रीयेताम् ।
(असे म्हणून हातात अक्षता घेऊन अन् त्यावर पाणी घालून ताम्हणात सोडावे आणि दोनदा आचमन करावे. )
टीप : दुकानात लक्ष्मीपूजन करताना तिजोरीवर, तुलेवर, हिशोबाच्या वहीवर तसेच अन्य काही उपकरणांवर गंध-फुल, हळद-कुंकू वहातात. त्या प्रथेप्रमाणे करावे. पूजा करताना धोतर-उपरणे किंवा धोतर-अंगरखा घालावा. पँट-शर्टवर पूजा करू नये.
टीप १ – येथे देशकाल लिहितांना संपूर्ण भारत देशाला अनुसरून ‘आर्यावर्तदेशे’ असा उल्लेख केला आहे. ज्यांना ‘जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः …’ अशा प्रकारे स्थानानुसार अचूक देशकाल ठाऊक असेल, त्यांनी त्यानुसार योग्य तो देशकाल म्हणावा.
सूक्ष्म-चित्र : दिवाळीला लक्ष्मीपूजन करणे
दिवाळीविषयीचे लघुपट पहा !
लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?
आश्विन अमावास्येच्या दिवशी केल्या जाणार्या श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. अक्षतांत सर्व देवतांच्या स्वरूपात्मकतेशी, म्हणजेच स्थितीजन्यात्मक स्थितीस्वरूपतेच्या (तारक स्वरूपाच्या) आणि स्थितीजन्यात्मक चालनात्मकतेच्या (मारक स्वरूपाच्या) लहरी ग्रहण करून त्यांना क्रियामय संचारण करण्यासाठी आसन देऊन प्रत्यक्ष स्वक्रियावलयतेची पूर्णात्मकता प्रदान करण्याची सर्वोच्च क्षमता असते; म्हणून सर्व देवतांची पूजा करतांना त्यांना अक्षतांचे आसन दिले जाते. अन्य देवतांच्या तुलनेत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अक्षतांमध्ये ५ टक्के जास्त प्रमाणात आकृष्ट होते; कारण अक्षतांत श्री लक्ष्मीच्या प्रत्यक्ष सगुण गुणात्मक, म्हणजेच संपन्नतेच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते. अक्षतांमध्ये तारक आणि मारक लहरी ग्रहण करून त्यांचे संचारण करण्याची क्षमता असल्याने लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.१०.२००६ सायंकाळी ६.२३)
स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे !
स्वस्तिकात ‘अष्ट’ या अंकाप्रमाणे कार्य करण्याची प्रत्यक्ष निर्गुणजन्यात्मक स्वरूपदर्शकात्मक विपुल बलता असल्यामुळे अनेक वेळा श्री लक्ष्मीचे आसन म्हणून स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्वाच्या स्वकारकतेला जागृत करून सगुणमयी आसनाच्या स्वरूपात कार्य करवून घेण्याची क्षमता असल्यामुळे निर्गुणकतेवर आधारलेले जीव स्वस्तिक काढूनच प्रत्येक उच्च देवताची पूजा करतात. श्री लक्ष्मीचे निर्गुणत्व हे स्वस्तिकासारख्या स्थितीदर्शकात्मक रूपक्रियेच्या क्रियामय सगुणात्मक ऊर्जास्वरूपाचे बल प्रक्षेपण करणारे असल्यामुळे श्री लक्ष्मीला आसन देतांना स्वस्तिकाचा उपयोग केला जातो. – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.१०.२००६ सायंकाळी ६.३३)
खूप छान व विधीवत पुजन सांगितले आहे . आम्हाला याचा निश्चितच आध्यात्मिक व भावाच्या स्तरावर लाभ होईल.
Very helpful
नमस्कार
या पूजविधीचे पुस्तक किंवा ऑडिओ उपलब्ध आहे का?
नमस्कार,
सध्या तरी याचा ऑडिओ किंवा पुस्तक उपलब्ध नाही.
nice information
खूपच छान माहिती दिली आहे.हे बघून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पूजा करून आनंद आणि समाधान नक्कीच मिळेल.पूजा विधीचे ग्रंथ आहे का?
नमस्कार कांचन जी
आपल्याला लेखात दिल्याप्रमाणे भावपूर्ण पूजा करून देवीची कृपा संपादन करता येऊ दे अशी देवीच्या चरणी प्रार्थना.
सनातन द्वारे प्रकाशित पूजासंबंधी शास्त्रीय माहितीचे ग्रंथ पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-science-behind-religious-acts/
आपली
सनातन संस्था
khupcha Sundar mahiti ahe, dhanyawad.
खुप छान माहिती आहे