पुणे – परखड वाणीतील प्रवचनांमधून हिंदूंमधील धर्मचेतना जागवणारे, धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर (वय ६७ वर्षे) यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. साधारण गेले ३ आठवडे मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. समर्थ रामदासस्वामी यांचे निस्सीम भक्त असलेले पू. सुनीलजी चिंचोलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ‘समर्थ’ भारताच्या निर्मितीसाठी समर्पित केले. सनातन परिवाराशीही त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातू आणि नात असा परिवार आहे. सनातन परिवार पू. चिंचोलकर यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
पू. चिंचोलकर देशभर, तसेच विदेशातही प्रवचनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन करायचे. त्यांची आतापर्यंत सहस्रो प्रवचने झाली असून राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या त्यांच्या परखड भूमिकांमुळे धर्मद्रोही संघटनांचा त्यांना कडवा विरोधही झाला. प्रसंगी जीवघेणे प्रसंगही त्यांच्यावर ओढवले; पण त्यांनी न डगमगता आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेत तसूभरही पालट न करता त्यांचे कार्य निर्भीडपणे चालू ठेवले.
‘दासबोधाचे मानसशास्त्र’, ‘दासबोधातील भक्तीयोग’, ‘दासबोधातील ज्ञानयोग’, ‘दासबोधातील कर्मयोग’, ‘मनाच्या श्लोकातून मनःशांती’, ‘समर्थ रामदासांचे व्यवस्थापन’, ‘संस्कारांचे मोती’, ‘मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद’, ‘श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण’ आदी अनेक ग्रंथांचे त्यांनी लिखाण केले.
पू. चिंचोलकर यांच्या साधनाप्रवासातून प्रेरणा घेऊन राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांना परतवून लावण्यासाठी अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहाणे, हीच त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
ब्राह्म आणि क्षात्र तेजांचा संगम असलेल्या
पू. चिंचोलकरकाकांच्या चरणी सनातन परिवार कृतज्ञताभावाने नतमस्तक आहे !
त्यांनी ३ वर्षे वालचंदनगर येथे शिक्षकाची नोकरी केली. वर्ष १९७७ ते १९८८ या काळात ते सज्जनगडावर ‘समर्थ सेवा मंडळा’चे व्यवस्थापक आणि ‘सज्जनगड’ मासिकाचे संपादक म्हणून सेवारत होते. त्यांनी रामदासस्वामी संस्थानचे सल्लागार आणि समर्थ व्यासपिठाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आजपर्यंत त्यांची ४५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘संस्काराचे मोती’ या पुस्तकाच्या २० आवृत्त्या निघाल्या. ‘मनाच्या श्लोकातून मन:शांती’ या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘सर्वोत्कृष्ट’ ग्रंथ म्हणून त्यांना ‘मामासाहेब दांडेकर’ पुरस्कार मिळाला. ‘चिंता करितो विश्वाची’ या पुस्तकास पुणे विद्यापिठाचा ‘सर्वोत्कृष्ट चरित्रग्रंथ’ म्हणून ‘स्वामी स्वरूपानंद पुरस्कार’ मिळाला. त्यांना रामदासस्वामी संस्थानचा ‘समर्थ रामदास’ पुरस्कार, समर्थ व्यासपिठाचा ‘शिवसमर्थ’ पुरस्कार मिळाला. आतापर्यंत त्यांनी देश-विदेशात १३ सहस्रांहून अधिक प्रवचने घेतली आहेत. आतापर्यंत त्यांनी ४० ते ४५ कीर्तनकार आणि प्रवचनकार घडवले.
‘सनातन संस्थे’च्या पाठीशी ठामपणे उभे राहून हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे पू. सुनील चिंचोलकर !
सनातन परिवाराशी पू. सुनील चिंचोलकर यांचा विशेष स्नेह होता. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या उपक्रमांनाही त्यांचे आशीर्वाद अन् मार्गदर्शन असायचे. संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ असो अथवा ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या द्रावणातश्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा प्रसार करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय असो, पू. चिंचोलकरकाकांचा नेहमीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची आंदोलने, पत्रकार परिषदा यांमध्ये सक्रीय सहभाग असायचा. दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी प्रांतीय हिंदू अधिवेशने, हिंदु धर्मजागृती सभा, गुरुपौर्णिमा महोत्सव यांना उपस्थित राहून ते मार्गदर्शन करायचे. गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्येही त्यांचा सहभाग होता. काही कालावधीपूर्वी धुळे येथे झालेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनातही त्यांनी मार्गदर्शन केले होते.
पू. चिंचोलकर यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सनातनवर जेव्हा काँग्रेसी षड्यंत्रामुळे बंदीची टांगती तलवार होती, सनातनच्या साधकांना कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि बॉम्बस्फोटाच्या खटल्यात गोवण्यात आले होते आणि सनातनविषयी कलुषित वातावरण निर्माण केले होते, तेव्हा ‘सनातन’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साधकांना आश्वस्त करणार्या संतांपैकी ते एक होते.
काही मासांपूर्वी त्यांच्या हस्ते ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या चरित्रग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यांनी लिहिलेले, तसेच अन्य राष्ट्र आणि धर्म विषयक ५०० ग्रंथ त्यांनी सनातन संस्थेला अर्पण केले होते. त्यांच्या प्रवचनांमधूनही ते राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी जागृती करून हिंदु राष्ट्राचा विषय मांडत असत. पुण्यातील साधकांना पू. चिंचोलकर यांचा विशेष आधार होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली, तरी पू. चिंचोलकर यांनी दिलेली निर्भीडतेची शिकवण, धर्मकार्य करण्यासाठी अखंड सेवारत रहाण्याची प्रेरणा ती पोकळी भरून काढील. पू. चिंचोलकर यांनी स्थूलदेहाचा त्याग केला असला, तरी त्यांची ज्ञानशक्ती आणि चैतन्य ग्रहण करता येऊन हिंदु राष्ट्ररूपी समर्थ भारताचे निर्माण करण्यासाठी कृतीशील रहाण्याची शक्ती मिळो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !
पू. चिंचोलकर यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव !
पू. चिंचोलकर यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव आणि मनात अपार श्रद्धा होती. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे समर्थ रामदासस्वामी यांचे अवतार असून ईश्वरी प्रेरणेने ते धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. सनातनचे आश्रम म्हणजे तीर्थक्षेत्रच आहेत’, असा त्यांचा भाव असे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक हेच हिंदु राष्ट्राची स्थापना करतील’, असे ते म्हणायचे.
समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्याप्रमाणे भाव आणि क्षात्रवृत्ती ठेवून राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करत रहाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पू. सुनील चिंचोलकर यांनी समर्थ रामदासस्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेवत हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी अविरत कार्य केले. त्यांच्यामध्ये क्षात्रवृत्ती आणि भाव यांचा अपूर्व संगम होता. ते त्यांच्या व्याख्यानांतून राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांच्यावर परखड शब्दांत कोरडे ओढत. हिंदूंना संघटित करण्यासाठी त्यांनी निःस्वार्थी वृत्तीने केलेल्या कार्यामुळे सनातनच्या साधकांनाही सतत प्रेरणा मिळाली. पू. चिंचोलकर यांनी सनातनच्या साधकांवर भरभरून प्रेम केले आणि सनातनच्या राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्याला संपूर्ण सहकार्य केले. सनातन प्रभात नियतकालिकांमधून त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेल्या अभ्यासपूर्ण लिखाणामुळे साधक अन् हिंदुत्वनिष्ठ यांनाही कार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळाली.
पू. चिंचोलकर यांच्याशी माझी २-३ वेळा भेट होऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. त्या वेळी त्यांच्यातील साधेपणा, नम्रता, लीनता, इतरांचा आदर करणे आदी गुणांसह त्यांचा राष्ट्र आणि धर्म यांविषयी असलेला गाढा अभ्यास अन् समर्थांवर असलेली श्रद्धा-निष्ठा अनुभवता आली.
पू. सुनील चिंचोलकर यांच्याप्रमाणे भाव आणि क्षात्रवृत्ती ठेवून सर्वांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी सतत कार्य करत रहाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले