कुठे चौकाचौकांत हिंदु धर्मातील प्रतिकांची स्मारके उभारणारे मुसलमान राष्ट्र असलेल्या इंडोनेशियातील शासनकर्ते, तर कुठे स्वतःच्या संस्कृतीचे जतन करण्यास असमर्थ ठरलेले स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे भारतीय शासनकर्ते !
‘हा लेख वाचून लक्षात येईल की, भारतातील एकही राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी स्वातंत्र्यापासूनच्या ७० वर्षांच्या काळात हिंदु धर्मातील प्रतिकांची स्मारके उभारण्याचा विचारही केला नाही. आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरच हे होईल. यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील व्हा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात. याचे दृश्यस्वरूप येथील विविध शहरांमध्ये महत्त्वाच्या चौकांत किंवा इमारतींमध्ये पौराणिक कलाकृतींंच्या स्वरूपात पहायला मिळते.
१. मुसलमानबहुल जकार्ता शहरात राष्ट्रीय
स्मारकासमोरील चौकात श्रीकृष्णार्जुन रथाची कलाकृती असणे
जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाची मोठी कलाकृती पहायला मिळते.
२. हिंदूबहुल बाली द्वीपावर रहदारीच्या चौकांत
दिसून येणारी महाभारतातील प्रसंगांची भव्य स्मारके !
बाली हे हिंदूबहुल द्वीप आहे. येथे रहदारीच्या चौकांमध्ये घटोत्कच आणि कर्ण यांच्यातील युद्ध, भीमाची मोठी प्रतिमा, प्रभु श्रीरामाच्या नेतृत्वाखाली सेतूबंधन करणारी वानरसेना (पहा छायाचित्र क्र. ३), गरुडावर आरूढ असलेले श्रीविष्णु (पहा छायाचित्र क्र. १), श्रीकृष्ण त्याच्या सवंगड्यांसह खेळतांना (पहा छायाचित्र क्र. ४), नकुल-सहदेव इत्यादींच्या मोठ्या मूर्ती आणि प्रसंग दर्शवणार्या कलाकृती बनवलेल्या आहेत. येथे श्री गणपतीला ‘रक्षण करणारा देव’ मानतात. त्यामुळे त्याला द्वारपाल म्हणून बाहेर स्थापन केले जाते (पहा छायाचित्र क्र. २).
३. प्रत्येक इमारतीच्या समोर देवतांसाठी पीठ सिद्ध केलेले असणे
प्रत्येक इमारतीच्या बाहेर देवतांसाठी एक पीठ (देवतांसाठी बनवलेली आसंदी) केलेले असते. घरात बनवलेल्या अन्नाचा काही भाग या पिठावर देवतेला नैवेद्यस्वरूप अर्पण केला जातो. घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर पूर्वजांसाठी घास ठेवण्याचीसुद्धा येथे प्रथा आहे.
४. पर्यटकांसाठी सादर केल्या जाणार्या
लोककलांमध्येही महाभारत आणि रामायण यांतील प्रसंगांचा समावेश !
येथे पर्यटकांसाठी सादर केल्या जाणार्या लोककलेच्या नृत्यांमध्येही पौराणिक कथांचा समावेश असतो. रामायण किंवा महाभारत यांतील प्रसंग नृत्य नाटिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर केले जातात. अवास्तव प्रसंग, प्रेमकहाण्या, इतिहास किंवा पुराणातील प्रसंगांचे स्वतःला वाटेल, त्या स्वरूपात सादरीकरण इत्यादी प्रकार घडतांना दिसत नाहीत. काळाच्या ओघात आणि पर्यटनामुळे यामध्येही विकृती येत असली, तरी रामायण आणि महाभारत यांतील प्रसंग येथील लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. त्यांनी ते जिवंत ठेवले आहेत.
५. हिंदु संस्कृतीचे उगमस्थान असलेल्या भारतात धार्मिक कलाकृतींऐवजी
भ्रष्ट राजकारणी आणि परकीय आक्रमक यांचे होणारे खेदजनक उदात्तीकरण !
इंडोनेशियातील लोकांनी त्यांच्या परीने हिंदु संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे पहाता हे सर्व भारतामध्ये होणे अपेक्षित आहे; परंतु भारतात जन्मलेल्या हिंदु संस्कृतीचे जतन भारतातच होत नाही. भारतामध्ये रस्त्यांना आणि चौकांना देशावर आक्रमणे करून लुटणार्या मोगलांची आणि भ्रष्ट राजकारण्यांची नावे, तर रस्त्यांवर विविध राजकारणी, तसेच देशाची फाळणी होण्यास कारणीभूत असणार्यांच्या प्रतिमा लावल्या आहेत. भारतात रामायण आणि महाभारत घडल्याचे प्रत्यक्ष प्रमाण असूनदेखील ‘हे घडलेच नव्हते’, ‘प्रथा-परंपरा या सगळ्या अंधश्रद्धा आहेत’ इत्यादी भाषा केली जाते. ‘अशांचे पुतळे उभारून देशातील नागरिकांमध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये दैवी गुणांचा विकास कसा होणार ? त्यांच्यामधील क्षात्रवृत्ती कशी जागृत होणार ? धार्मिकता, धर्माविषयी आपुलकी आणि श्रद्धा कशी निर्माण होणार ?’, याचा विचार करणे आवश्यक आहे.
६. समाजाची वृत्ती सात्त्विक ठेवण्यासाठी सात्त्विक विचार समोर ठेवणे आवश्यक !
प्रत्येक कृतीच्या मागे ती करण्याचा विचार असतो आणि विचाराच्या मागे वृत्ती असते. आपण जे पहातो, त्यातूनच आपली वृत्ती बनत असते. आपल्यासमोर सात्त्विक, क्षात्रवृत्ती वाढवणारी दृश्ये असतील, तर पहाणार्यांची वृत्तीसुद्धा तशीच बनण्यास साहाय्य होईल. त्यामुळे पौराणिक देखावे, राष्ट्रपुरुष उदा. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे वीर योद्धा, तसेच भीम, अर्जुन, अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण अशा प्रतिमा असल्यास पहाणार्याच्या मनात सातत्याने तेच विचार रहातील आणि त्याचे चिंतन होईल. असे घडल्यामुळे समाज धर्माविषयी जागृत आणि शिक्षित होईल. समाजामध्ये धर्म जाणून घेऊन तो आचरणात आणण्याची इच्छा निर्माण होईल आणि पर्यायाने राष्ट्र सशक्त होईल. असे घडेल, तेव्हाच भारतीय नागरिकांसाठी खर्या अर्थाने चांगले दिवस असतील !’
– श्री. सत्यकाम कणगलेकर, बाली, इंडोनेशिया.