राष्ट्रप्रेम म्हणजेच धर्मप्रेम’ हे सत्य जाणलेला विरळा क्रांतीकारक दामोदर हरि चापेकर !

क्रांतीकारक दामोदर हरि चापेकर यांच्या बलीदानदिना निमित्ताने…

 

१. काही दिवसांनी फाशी होणार असूनही निर्भयपणे लिहिलेले आत्मवृत्त

क्रांतीकारक दामोदर हरि चापेकर यांनी लिहिलेले आत्मवृत्त म्हणजे ‘हत्या करण्यास चापेकर का आणि कसे प्रवृत्त झाले’, याची वस्तूस्थिती लिहिण्यास त्यांना सांगण्यात आले. येरवडा कारागृहात असतांना त्यांनी ८ ऑक्टोबर १८९७ या दिवशी ते पूर्ण केले. मोडी लिपीत असणारे हे आत्मवृत्त अनेक वर्षे येरवाडा जेलमध्ये पडून होते. हे आत्मवृत्त एकूण मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एक तर एका निधड्या छातीच्या क्रांतीकारकाचे मोकळे ढाकळे आत्मवृत्त आहे. ते स्वतः क्रांतीकारक कसे होत गेले, त्याचे क्रमवार वर्णन चापेकरांनी त्यात केले आहे. विशेष म्हणजे ‘काही दिवसांनंतर स्वतःला फाशी होणार आहे’, हे ठाऊक असतांनाही ते सर्वकाही निर्भयपणे सांगत जातात.

 

२. वयाच्या पंधराव्या वर्षी मनात रुजलेले क्रांतीकार्याचे बीज

वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच (तेव्हा धाकटा भाऊ बारा वर्षांचा होता.) त्यांच्या मनात इंग्रजांविषयीची प्रचंड चीड निर्माण झाली होती. एवढेच नाही, तर एका रेल्वे प्रवासात ‘इंग्रजांचा सूड उगवला पाहिजे’, ही भावनाही त्यांच्या मनात उद्भवते. त्यांचे वडील हरि चापेकर हे मोठे नामांकित हरिदास ! त्यांना कीर्तनासाठी दूरदूरवरून बोलावणे येई. हे दोघे बंधू त्यांचे साथीदार म्हणून काम करत असत. एकदा रायपूरकडे जात असतांना घनदाट जंगल पाहून या दोन्ही बंधूंच्या मनात असा विचार येतो की, काही पराक्रम करून लपावयास ही जागा चांगली आहे. बस्स, हाच त्यांच्या मनात उद्भवलेला क्रांतीकार्याचा अंकुर. तो पुढे आयुष्यभर विकसित होत जातो आणि रँडसाहेबाचा बळी घेतो !

 

३. राष्ट्रकार्य करण्याच्या चापेकर बंधूंच्या दिशा

‘एकदा ध्येय ठरले की, त्यासाठी शारीरिक बळ कमावणे आणि हालअपेष्टांना सामोरे जाणे गृहीत आहे’, हे लक्षात घेऊन हे दोन्ही भाऊ व्यायाम, सूर्यनमस्कार आणि मैलोन्मैल चालण्याचा अन् धावण्याचा सराव करत असत. प्रवासात बैलगाडीत न बसता ते चालायचे. शरीर बलदंड पाहिजे आणि हालअपेष्टांना सामोरे जाण्याचे बळ मिळवणे, या दृष्टीने ते सर्व करतात. इंग्रजांच्या आणि इंग्रजी सत्तेच्या विरोधात काम करत रहाणे ही त्यांची कामाची एक दिशा ! दुसरी दिशा म्हणजे समाजसुधारणेला त्यांचा प्रचंड विरोध होता. समाजसुधारकांना सळो कि पळो करून सोडणे ही त्यांच्या कामाची दुसरी दिशा आहे. त्यातूनच ‘सुधारक’ या वर्तमानपत्राचे एक संपादक पटवर्धन आणि सुधारक कुलकर्णी यांच्यावर त्यांनी जबर आक्रमण केले. त्यांना धमकीचे पत्र लिहिले.

 

४. धर्मातील सुधारणांना योग्य विरोध

राष्ट्रप्रेम म्हणजे ‘सामाजिक सुधारणांना विरोध’ हे सूत्र त्यांच्या लेखनातून स्पष्ट होत जाते. स्वराष्ट्रप्रेम आणि स्वधर्मप्रेम या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच; किंबहुना त्या एकच आहेत, हे ते ध्वनित करत जातात. मग ‘आमच्या धर्मातील ज्या चालीरिती आहेत, त्या कशा का असेनात, आम्हाला प्रिय आहेत. त्यात सुधारणा करण्याची काहीच आवश्यकता नाही’, असे ते सांगतात. किंबहुना ‘अशी भूमिका घेणे म्हणजेच राष्ट्रहिताची भूमिका’, असेही त्यांचे मत होते.’

(साभार : नागनाथ कोत्तापल्ले, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २५.२.२०१८)

Leave a Comment