१. इंडोनेशियामध्ये ठिकठिकाणी लोकांनी सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेणे
इंडोनेशियामध्ये ९ मार्च २०१८ या दिवशी आम्ही सद्गुरु काकूंसमवेत जकार्ता येथील राष्ट्रीय स्मारक ‘मोनास’ येथे गेलो. त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी सहस्त्रोंच्या संख्येने लोक येतात. त्या वेळी आम्ही तिकीट घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभे होतो. जवळच असलेल्या काही मुली काकूंकडे येऊन म्हणायला लागल्या, ‘आम्हाला तुमच्यासमवेत एक छायाचित्र काढायचे आहे.’ सद्गुरु काकूंनी ‘हो’ म्हटल्यावर त्यांनी छायाचित्र काढले. काही वेळानंतर आणखी एक गट आला. त्या दिवसानंतर आम्ही इंडोनेशियात जेथे जेथे जाऊ, तेथे तेथे अनेक लोक येऊन सद्गुरु काकूंसमवेत उभे राहून आपले छायाचित्र काढून घ्यायचे.
२. बोरोबुदुर येथे लहान मुलांनी सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या वहीवर आपले नाव लिहिण्यास सांगणे
बोरोबुदुर या ठिकाणी मंदिराचे चित्रीकरण करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्या वेळी शाळेतील मुलांचा एक मोठा गट आला. त्या गटात लहान मुले होती. त्यांच्याकडे भ्रमणभाष नव्हता. त्यांच्या गटातील मोठ्या मुलांनी आपापल्या भ्रमणभाषने छायाचित्रे काढली. त्या सर्व लहान मुलांनी आपले वही आणि पेन काढले अन् सद्गुरु काकूंना त्यांच्या वहीवर आपले नाव लिहायला सांगितले.
३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या ‘राणी’ सारख्या दिसतात, असे एका महिला ‘गाईड’ने सांगणे
‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.
प.पू. गुरुदेव, सद्गुरु काकूंकडून प्रक्षेपित चैतन्य हेच त्यांचे खरे अलंकार आहेत, हे वरील प्रसंगांतून शिकायला मिळाले. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक चैतन्य हेच महत्त्वाचे आहे, हे तुम्ही शिकवले, यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. विनायक शानभाग, योग्यकर्ता, इंडोनेशिया. (१३.३.२०१८)
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासमवेत असल्याची अनुभूती
देव आपल्याला देईलच’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आधीच सांगणे
‘ज्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ भारतातून इंडोनेशियाला जायला निघाल्या होत्या, त्या वेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या साड्यांना आणि अलंकारांना (कानातल्या कुडींना), ‘या साड्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर यांचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होऊ दे, तसेच यातून धर्मप्रसारही होऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यांनी त्या विषयी आम्हा साधकांना विमान प्रवासात सांगितले होते. या वेळी सद्गुरु काकू आम्हाला म्हणाल्या होत्या की, साड्यांच्या माध्यमांतूनही परात्पर गुरु डॉक्टर आपल्यासमवेत असणार आहेत. देव आपल्याला याची अनुभूतीही देईलच !’
– श्री. विनायक शानभाग, योग्यकर्ता, इंडोनेशिया. (१३.३.२०१८)