‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती, अपेक्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारी हानी आणि अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय !

श्री. अशोक लिमकर

 

१. ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याख्या आणि त्याचे स्वरूप

१ अ. व्याख्या

‘माझ्या मनाला अनुकूल अशी कृती इतरांनी करायला हवी’, असा विचार मनात येणे, म्हणजे अपेक्षा करणे.

१ आ. स्वरूप

‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात. स्वतःकडून अपेक्षा करतांना मनात स्वतःविषयीच्या प्रतिक्रिया उमटलेल्या असतात. दुसर्‍याकडून अपेक्षा करतांना ‘माझ्या मनात जे विचार आणि कल्पना आहेत, त्याप्रमाणे घडावे’, असे वाटत असते. त्या वेळी इतरांच्या स्थितीचा आणि अडचणींचा विचार होत नाही. ‘ज्या गोष्टीची किंवा कृतीची अपेक्षा आपण करतो, त्याचा सर्वांगीण अभ्यासही आपल्याकडून होत नाही.

 

२. अपेक्षांचे प्रमाण अधिक असण्याची कारणे

अ. ज्याच्या मनात विकल्प किंवा नकारात्मक विचार अधिक येतात, त्याच्या मनात अपेक्षा अधिक असतात. ज्याच्यात तीव्र अहं आहे, त्याच्यात अन्य स्वभावदोषांसह ‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलूही तीव्र असतो. त्याच्यावर रज-तमाचे आवरण इतके घट्ट असते की, वारंवार चुकांची जाणीव करून देऊनही त्याला त्यांची जाणीव होत नाही.

आ. अपेक्षेचे विचार येण्यास स्वतःच्या आवडी-निवडींचा भाग कारणीभूत असतो. ‘मला आवडते, तशी कृती किंवा विचार समोरच्या व्यक्तीने करावा आणि ‘मला जे आवडत नाही, ती कृती करू नये’, असा त्यामागे हेतू असतो.

इ. कुटुंबातील, नेहमी सहवासात असणार्‍या, तसेच जवळच्या व्यक्ती यांच्याकडून अपेक्षांचे प्रमाण अधिक असते. इतरांकडून अपेक्षांचे प्रमाण अल्प असते किंवा नसतेही.

ई. एकमेकांमधील देवाण-घेवाण हिशोब अधिक असल्यास, उदा. पती-पत्नी, आई-मुलगा या नात्यांत अपेक्षांचे प्रमाण अधिक असते.

उ. कार्यालयातील अधिकारी व्यक्तींना कर्मचार्‍यांकडून काम करून घेण्याविषयी पुष्कळ अपेक्षा असतात, तर ‘कार्यालयात अधिक काम करावे लागू नये’, अशी कर्मचार्‍यांची अपेक्षा असते.

 

३. अपेक्षांची पूर्ती न झाल्याने व्यक्तीवर होणारे परिणाम

अ. घरात पती-पत्नी एकमेकांकडून अपेक्षा करतात. त्यांची पूर्तता नेहमीच होणे शक्य नसते. त्यामुळे पतीला किंवा पत्नीला राग येतो. त्या रागाचे कधी प्रकटीकरण होते, तर कधी ती व्यक्ती आतल्या आत धुमसत रहाते. त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता असते.

आ. एकमेकांविषयी पूर्वग्रह निर्माण होऊन मनमोकळेपणाने बोलणे होत नाही. त्यामुळे दुरावा निर्माण होऊन एकमेकांविषयी नकारात्मक विचार येतात. ‘एकमेकांपासून दूर राहिल्यास बरे’, असे विचार येऊ लागतात. केवळ प्रतिमा जपण्यासाठी कृती केल्या जातात.

इ. ‘समोरच्या व्यक्तीने अपेक्षांची पूर्ती का केली नाही ?’, या विचारांच्या मागे धावण्यात मनाची ऊर्जा आणि वेळ यांचा अपव्यय होतो. यामुळे दुःख होते आणि मनात विचारांचा गोंधळ चालू होतो.

ई. अयोग्य अपेक्षा केल्यास समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रतिक्रिया उमटून दोघांच्याही साधनेची हानी होते.

 

४. अपेक्षा का केली जाते ?

अ. मनात स्वतः किंवा अन्य व्यक्ती यांच्याविषयी काही आदर्श, कल्पना, तसेच पूर्वजन्मीचे संस्कार यांच्या आधारे एक विशिष्ट चौकट किंवा प्रतिमा बनलेली असते. त्यामुळे मनात ‘त्याला अनुरूप अशा सर्व गोष्टी घडाव्यात’, अशी सुप्त इच्छा असते. त्या विचारांच्या आधारे इतरांना तसे करण्यास आणि वागण्यास सुचवले जाते. असे सुचवणे, म्हणजेच ‘अपेक्षा करणे’ होय.

आ. अपेक्षा व्यक्त होऊन संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचल्यास त्याविषयी कृती करण्यासाठी ती व्यक्ती विचार करते. जर अपेक्षा संबंधितांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर त्यांची पूर्ती न होऊन अशा अपेक्षांची संख्या वाढत जाते. अशा अपेक्षांची मनात गर्दी होऊन त्यात मनाची पुष्कळ ऊर्जा आणि वेळ वाया जातो.

इ. चित्तावर ‘अपेक्षा’ करण्याचा पूर्वसंस्कार दृढ असल्यास अपेक्षा करण्याचे प्रमाण अधिक असते.

ई. ‘माझ्याकडे सत्ता आणि अधिकार आहे’, ‘मी इतरांपेक्षा कुणीतरी वेगळा आहे’ इत्यादी अहंचे पैलू ज्याच्यात अधिक, तितकी तो इतरांकडून अधिक अपेक्षा करतो.

उ. देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होईपर्यंत संबधितांकडून अपेक्षा करण्याचा भाग अधिक असतो.

ऊ. एखाद्या प्रसंगात स्वतःला काही करायची इच्छा नसल्यास ‘इतरांनी काहीतरी करावे’, असा विचार प्रबळ होऊन इतरांकडून अपेक्षा केल्या जातात.

ए. प्रतिमा जपण्याचे विचार जेवढे अधिक, तेवढ्या स्वतःकडून अपेक्षा करण्याचे प्रमाण अधिक असते.

ऐ. ‘अनोळखी किंवा ज्या व्यक्तीशी नवीन ओळख झाली आहे, अशांकडून अपेक्षा करण्याचा भाग न्यून असतो.

ओ. आळशी मनुष्य ‘इतरांनी मला साहाय्य करावे’, अशा प्रकारे अधिक अपेक्षा करतो.

औ. परिस्थिती स्वीकारता न आल्यास किंवा अडचणी समजून न घेतल्यास अपेक्षा करण्याचे प्रमाण वाढते.

 

५. स्थळ, काळ आणि व्यक्ती यांना
अनुसरून साधकांकडून केल्या जाणार्‍या अपेक्षांची उदाहरणे

५ अ. सेवेचे ठिकाण

१. सर्व साधक आणि सहकारी यांनी सेवेच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीविषयी पूर्वकल्पना द्यावी. तसे त्यांनी फलकावर लिहून जावे.

२. त्यांनी वेळेचा अपव्यय टाळून सेवेची फलनिष्पत्ती वाढवावी.

३. साधकांनी एकमेकांशी मिळून मिसळून रहावे.

४. सहसाधकाने सेवेत साहाय्य करावे. स्वतःच्या अनुपस्थितीत ‘अन्य साधकांनी प्रलंबित सेवा पूर्ण करावी.

५. ‘एखाद्या सेवेतील सर्व बारकावे मला ठाऊक आहेत. त्यामुळे सहसाधकांनी मला सेवेतील अडचणी आणि नियोजन यांविषयी विचारावे. मी सर्वांत मोठा असल्याने सर्वांनी मला मान द्यावा’, असा विचार येणे.

६. मला शारीरिक कष्टाची सेवा सांगू नये.

७. उत्तरदायी साधकाने तत्परतेने निर्णय द्यावा आणि माझ्या अडचणी सोडवाव्यात.

८. ‘पूर्वनियोजन न करता एखादी गोष्ट तातडीने करायची आहे’, असे साधकांनी सांगू नये.

९. सेवा सांगतांना साधकाने मला त्या पाठीमागचा उद्देश आणि मनाची विचारप्रक्रियाही सांगावी.

१०. एखादी सेवा करण्याच्या संदर्भात साधकाने मला माध्यम न बनवता संबंधित साधकाला थेट सांगावे.

११. साधकांच्या वेळेचा विचार करून त्यांच्या सेवेचे नियोजन करावे.

५ आ. निवासस्थान

१. खोलीतील साधकांनी एकमेकांशी अनौपचारिकपणे बोलावे. सहसाधकांच्या चुका वेळच्या वेळी प्रेमाने सांगाव्यात.

२. सहसाधकाला अडचण असल्यास साहाय्य करावे. रुग्णाईत साधकाची काळजी घ्यावी.

३. खोलीतील साधकांनी आवरण्याचे आणि झोपण्याचे नियोजन करावे.

४. ‘साधक झोपले असल्यास त्यांची झोपमोड होणार नाही’, याची काळजी घ्यावी.

५ इ. आश्रम

१. आश्रम व्यवस्थापनातील आणि अन्य साधकांनी माझी येता-जाता विचारपूस करावी. मी घरी जाऊन आल्यावर माझी विचारपूस करावी.

२. सेवांचे नियोजन करतांना माझी शारीरिक क्षमता आणि वय यांचा विचार करावा.

३. ‘दिसेल ते कर्तव्य’ यानुसार कुठे काही अयोग्य, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ दिसत असल्यास माझ्यासह सर्वांनी ते तत्परतेने दुरुस्त करावे.

४. ‘कार्यपद्धतीचे पालन करणे’, हे सूत्र विभाग, खोली, आश्रम आणि अन्य ठिकाणी प्रत्येक क्षणी साधकांनी कृतीत आणावे.

५ ई. कुटुंबीय

‘भावनाशीलता’ अधिक असल्यास कुटुंबियांकडून अधिक अपेक्षा असतात.

१. कुटुंबियांनी वरचेवर माझी विचारपूस करावी. मी घरी गेल्यावर मला वेळ द्यावा. माझ्याशी बोलावे.

२. घरी होणारे विशेष कार्यक्रम, प्रसंग आणि घटना यांविषयी मला सांगावे.

३. कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी साधना करावी. व्यवहारातील किंवा मायेतील गोष्टी बोलण्यापेक्षा त्यांनी साधनेविषयी बोलावे.

४. मी घरी आल्यावर तेथे अधिक काळ रहाण्यासाठी आग्रह करू नये.

 

६. साधकांकडून अपेक्षा

अ. महत्त्वाची सेवा चालू असतांना साधकांनी घरी जाऊ नये. घरी जातांना हातातील सेवा पूर्ण करून अन्य सेवांचे हस्तांतरण करावे.

आ. सहसाधकाने वेळेत निरोप द्यावा. त्याने वेळेत नियोजन आणि कृती करावी. त्याने आयत्या वेळी कृती करायला सांगू नये.

इ. एखाद्या साधकाने ‘अमुक सेवा करतो’, असे सांगितले आणि काही कारणाने ती सेवा करणे त्याला शक्य होणार नसेल, तर त्याने तसे कळवावे.

ई. साधकाला पाठवलेली धारिका/वस्तू मिळाल्याचे त्याने कळवावे.

उ. साधकांनी ‘मिस्ड कॉल’ किंवा लघुसंदेश यांना त्वरित प्रतिसाद द्यावा.

ऊ. मी एखादी सेवा किंवा कृती चांगली केल्यास इतरांनी माझे कौतुक करावे, मला चांगले म्हणावे.

 

७. अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय

अपेक्षांची पूर्ती न झाल्यास नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते. समोरच्या व्यक्तविषयी पूर्वग्रह निर्माण होतो. ‘अमुक व्यक्ती अशीच आहे, तशीच आहे’, असे विचार मनावर बिंबले जातात. ‘खरेतर मनुष्याच्या स्थितीत क्षणोक्षणी पालट होत असतो’, हे लक्षात घेऊन संवाद साधायला हवा. कर्तृत्ववान मनुष्य साहाय्याची अपेक्षा न करता स्वतःच कृती करून फलनिष्पत्ती वाढवतो. साहजिकच तो इतरांकडून अपेक्षा करण्याचे टाळतो. अपेक्षा न्यून करण्यासाठी पुढील प्रयत्न करून पहावेत.

७ अ. मनाच्या स्तरावर

१. ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर स्वयंसूचना दिल्याने अपेक्षा न्यून होतात.

२. पूर्ण न झालेल्या अपेक्षांचा मनाच्या स्तरावर आढावा घेऊन अवाजवी अपेक्षा, ज्यांची पूर्ती होणार नाही अशा अपेक्षा, तसेच ज्यापासून काही लाभ होणार नाही, अशा अपेक्षा करणे सोडून देणे आणि त्यांची नामोनिशाणी मनाच्या पटलावरून पुसून टाकणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. क्षारयुक्त पाणी जसे अकार्यक्षम असते, तसे अपेक्षायुक्त मन अकार्यक्षम असते. ‘अपेक्षा करणे टाळल्यास मनाच्या ऊर्जेची पुष्कळ बचत होईल’, याची मनाला जाणीव करून दिल्यास अपेक्षा करण्याचे प्रमाण उणावेल. अशा रितीने मनाची स्वच्छता प्रतिदिन केली पाहिजे.

३. साधकांची मने एकमेकांशी जुळल्यास एकमेकांकडून अपेक्षा करण्याचा भाग न्यून होतो. ‘छोट्या छोट्या कृती इतरांनी कराव्यात’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘या कृती मलाच करायच्या आहेत’, अशी स्वयंसूचना द्यावी.

४. ‘एखादी कृती करण्याइतपत माझी शारीरिक क्षमता चांगली असतांना मी ‘प्रकृतीला कुरवाळत बसणे’ टाळायला हवे’, याची मनाला सातत्याने जाणीव करून दिल्यास छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून रहाणे किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करणे न्यून होते.

५. ‘प्रत्येकाची साधना आणि कृती त्याच्या प्रकृतीनुसार होत असतांना मी त्याच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे’, याची मनाला सतत जाणीव करून देणे

६. प्रेमभाव असल्यास अपेक्षा करण्याचे प्रमाण न्यून असते. यामुळे एकमेकांची विचारपूस करून प्रेमभाव वाढवायला हवा. अहं अल्प असलेल्या साधकात प्रेमभाव अधिक असल्याने तो अपेक्षा करण्याऐवजी ‘मी इतरांसाठी काय करू शकतो ?’, असा विचार करतो.

७. पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘दुसर्‍याने आपल्याला समजून घ्यावे, यापेक्षा आपण दुसर्‍याला समजून घ्यायला हवे’, असा दृष्टीकोन ठेवल्यास अपेक्षा करण्याचा भाग न्यून होतो.

८. ‘इतरांच्या ठिकाणी स्वतः आहोत’, असा विचार करणे

९. समोरच्या व्यक्तीने ‘काय करावे किंवा काय करू नये’, असा विचार करतांना ‘त्या व्यक्तीवर माझी साधना अवलंबून नाही’, याची जाणीव ठेवणे

१०. स्वीकारण्याची वृत्ती वाढवणे. ‘देव परिस्थिती निर्माण करून ती स्वीकारून मला स्थिर रहाण्याची संधी देत आहे’, असा विचार करणे

११. वास्तव परिस्थितीचा अभ्यास करणे, नकारात्मकता अल्प करून सकारात्मकता वाढवणे, ‘स्व’ला विसरणे, तसेच आसक्ती न्यून करणे, यांसाठी प्रयत्न वाढवावेत.

१२. नम्रता, नियोजनक्षमता, शिकण्याची वृत्ती असणे, तत्त्वनिष्ठता, निरपेक्ष वृत्ती आदी गुण अंगी बाणवल्यावर अपेक्षांचे प्रमाण न्यून होऊ लागते.

१३. ‘आपले वागणे योग्य नसल्यास इतरांकडून साहाय्याची अपेक्षा करण्यास आपण अपात्र आहोत’, याची जाणीव होऊन अपेक्षा करण्याचे प्रमाण न्यून होते.

१४. मनुष्य साक्षीभावाच्या टप्प्याला गेल्यावर त्याला कुठल्याच गोष्टीविषयी काहीच वाटत नाही.

७ आ. आध्यात्मिक स्तरावर

१. व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा केल्या जात नाहीत.

२. प्रार्थना आणि कृतज्ञता यांची संख्यात्मक वाढ झाल्यावर अपेक्षांचे प्रमाण उणावते.

३. साधक दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करायला शिकल्यास, तसेच प्रत्येक कृती साधना म्हणून करू लागल्यास अपेक्षा न्यून होतात.

४. धर्माचरण करणार्‍या व्यक्तीत देवाप्रती श्रद्धा अधिक असल्याने अपेक्षा अल्प असतात.

५. मोकळेपणाने बोलणे आणि अंतर्मुखता या गुणांची वृद्धी झाल्यावर अपेक्षा करणे न्यून होते. ‘स्वतःचे कुठे चुकते ?’, याचे चिंतन वाढवल्यास अपेक्षा करणे उणावते.

६. दैनिक सनातन प्रभातमधील साधनेविषयीची सूत्रे जो दैनंदिन कृतीत आणतो, म्हणजे जीवनाचे पूर्ण अध्यात्मीकरण करतो, त्याच्यातील ‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू न्यून होतो.

७. ‘एखाद्या प्रसंगात मला काय अपेक्षित आहे’, असा विचार करण्यापेक्षा ‘देवाला काय अपेक्षित आहे ?’, असा विचार करावा.

८. भावजागृतीचे प्रयत्न वाढवल्यावर मायेतील गोष्टींत माणसाचे मन गुंतून रहात नाही आणि भक्तीभाव निर्माण होतो. भक्ताच्या पाठीशी देव असतो. मग त्या भक्ताला कुणाकडूनही अपेक्षा कराव्या लागत नाहीत; कारण त्याच्या अपेक्षांची पूर्ती देव आधीच करतो. त्यामुळे भक्तांना कसलीच चिंता किंवा ताणतणाव यांना सामोरे जावे लागत नाही.

९. ‘देव सतत समवेत आहे आणि देवच सर्व करतो’, असा ज्याचा भाव असतो, तो कधीही अपेक्षा करत नाही.

१०. आर्ततेने देवाचा धावा करणार्‍या व्यक्तीच्या सर्व आवश्यकता देव पूर्ण करतो. सतत देवाच्या अनुसंधानात रहाणार्‍या व्यक्तीला इतरांकडून अपेक्षा करण्याची आवश्यकता भासत नाही.

११. ‘जे होते, ते माझ्या भल्यासाठीच होत आहे’, असा भाव असणार्‍याच्या मनात अपेक्षा नसतात.

१२. प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सर्वत्र भगवंताचे आत्मचैतन्य कार्यरत आहे’, असा भाव ठेवल्यास साधकाच्या मनात समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करण्याचा विचार येत नाही.

१३. ज्या व्यक्तीला ईश्‍वरप्राप्तीची तळमळ अधिक आहे, त्याच्या सर्व आवश्यकता देव पूर्ण करतो.

१४. देवाला आपल्या मनातील प्रत्येक विचार कळतो. तो आपली इच्छापूर्ती करण्यास आतुर असतो. आपण शरणागत भावाने आपले स्वभावदोष आणि अहं नष्ट करण्यासाठी आर्ततेने प्रार्थना केल्यास ‘अपेक्षा करणे’ हा स्वभावदोषही न्यून झाल्याचे लक्षात येते.

‘हे गुरुदेवा, आपल्या संकल्पानुसार आपण ही सूत्रे माझ्याकडून लिहून घेतलीत. ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्यातील ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूसह अन्य स्वभावदोषही नष्ट होऊ देत’, अशी शरणागत भावाने आपल्या चरणी प्रार्थना करत आहे.’

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

‘काही वेळा अपेक्षांचे स्वरूप योग्य असते, उदा. सर्व साधक आणि सहकारी यांनी सेवेच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीविषयी पूर्वकल्पना द्यावी. असे असले तरी त्याप्रमाणे न झाल्यास स्वतःच्या मनात प्रतिक्रिया उमटणे अथवा पूर्वग्रह निर्माण होणे आदी नकारात्मक परिणाम होतात. या अनुषंगाने ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूच्या अंतर्गत प्रयत्न करता येतील.

यासारख्या अन्यही प्रसंगांत समष्टी स्तरावर निर्माण होणारी असुविधा टाळण्यासाठी संबंधित साधकाला साहाय्य म्हणून हे सूत्र योग्य पद्धतीने सांगता येईल.’ – संकलक

Leave a Comment