‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने
वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने केलेली चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यात एक दिवस रवाळ कण आपोआप निर्माण झालेले आढळले. काही संतांकडेही, तसेच संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांकडे विभूती आपोआप निर्माण होते, उदा. एका संतांच्या भक्तांकडील विभूती, दुसर्या संतांकडील भस्म आणि तिसर्या संतांकडील विभूती. ‘आपोआप निर्माण झालेले रवाळ कण आणि आपोआप निर्माण झालेल्या विभूती किंवा भस्म यांच्यामध्ये नेमके काय घटक असतात ?’, हे जाणून घेण्याचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ठरवले. तसेच तुलनेसाठी आपोआप न आलेली, म्हणजे मानवनिर्मित एक विभूती चाचणीसाठी घ्यायचे ठरवले. नाडीपट्टीद्वारे भविष्य सांगणारे उपायांसाठी पांढरे भस्म देतात. हे मानवनिर्मित भस्म आहे. अगस्ती नाडीपट्टीद्वारे भविष्य सांगणार्यांनी दिलेले भस्म चाचणीसाठी घेण्यात आले. अशा एकूण ५ घटकांची चाचणी करण्यात आली.
१. चाचणीसाठी घेतलेल्या घटकांची माहिती
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या हवाबंद डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण
ज्या हवाबंद डब्यात (‘हॉट-पॉट’मध्ये) रवाळ कण निर्माण झाले, त्या डब्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेवण वाढण्यात येत होते. जेवण वाढणार्या साधिकेने त्या डब्याचा उपयोग वर्ष २००९ पर्यंत ३ – ४ वर्षे केला होता आणि नंतर काही कारणाने तो डबा उपयोगात आणायचे थांबवले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी तो डबा उपयोगात आणला असल्याने त्यानंतर तो संग्रही ठेवण्यात आला. नंतर पुढे ४ वर्षे कधीही न उघडलेला तो डबा मार्च २०१३ मध्ये काही कारणाने उघडला असता त्यामध्ये चहाचे २ चमचे भरतील एवढे रवाळ कण जमा झालेले दिसले. बारीक रव्यासारखे हे कण फिकट पिवळसर रंगाचे आहेत.
१ आ. अगस्ती नाडीपट्टीद्वारे भविष्य सांगणार्यांनी दिलेले भस्म
नाडीपट्टी-वाचकाकडे नाडीपट्टीवर लिहिलेले स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी गेल्यास त्यामध्ये व्यक्तीला त्रासांच्या निवारणार्थ पूजाविधीद्वारे उपायही सांगितले जातात. हे पूजाविधी नाडीपट्टीच्या तमिळनाडूमधील मुख्य केंद्रात नाडीपट्टीवाचक स्वतः करतात आणि त्या पूजेचा प्रसाद पाठवतात. त्यामध्ये हे भस्म दिलेले असते. हे भस्म गायीच्या शेण्या भट्टीत भाजून त्यापासून तयार करतात.
१ इ. एका संतांच्या भक्तांकडील विभूती
एका संतांच्या काही भक्तांकडे असलेल्या त्या संतांच्या छायाचित्रातून विभूती आपोआप निर्माण होते आणि तिचा छायाचित्राखाली ढिग जमा होतो. चाचणीसाठी घेतलेली विभूती ही यातील आहे.
१ ई. दुसर्या संतांकडील भस्म
दुसर्या संतांकडे भस्म आपोआप प्रकट होते.
१ उ. तिसर्या संतांकडील विभूती
‘तिसरे संत जेव्हा उपासनेला बसतात, तेव्हा त्यांच्यासमोर देवतांच्या वातावरणाचे घनीकरण होऊन भक्तांना देण्यासाठी आवश्यक तेवढी विभूती जमा होते’, अशी तिची महती आहे. या विभूतीमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने ती जवळ बाळगली किंवा कपाळाला लावली की, त्यातून आध्यात्मिक उपाय होतात.
२. चाचणीतील घटकांच्या ‘एनर्जी डिस्पर्सिव्ह स्पेक्ट्रोस्कोपी’
(EDS) या पद्धतीद्वारे केलेल्या रासायनिक पृथक्करणाचा अहवाल
वरील ५ घटकांचे रासायनिक पृथक्करण करण्यासाठी ते घटक आय.आय.टी. (IIT) मुंबई येथे ‘एनर्जी डिस्पर्सिव्ह स्पेक्ट्रोस्कोपी’ (EDS) या पद्धतीद्वारे चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले. या चाचणीमध्ये प्रत्येक घटकामध्ये असलेली मूलद्रव्ये आणि त्यांची आण्विक टक्केवारी (At %) पुढीलप्रमाणे आली.
३. रासायनिक पृथक्करणाच्या अहवालाचे विवेचन
वरील सारणीमध्ये ‘प्रत्येक घटकामध्ये अधातू (नॉनमेटल्स) आणि धातू (मेटल्स) कोणते आणि त्यांचे एकूण प्रमाण किती ?’ हे कळते. या सारणीवरून पुढील गोष्टी निदर्शनास येतात.
३ अ. अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांमध्ये धातूंचे एकूण प्रमाण २४ ते ३१ टक्के असणे, तर तिसर्या संतांकडील विभूती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण यांच्यामध्ये धातूंचे एकूण प्रमाण अगदी नगण्य (०.१ ते ०.३ टक्के) असणे
या सारणीवरून लक्षात येते की, अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांमध्ये अधातूंचे एकूण प्रमाण अनुक्रमे ६९.६७ टक्के, ७२.११ टक्के आणि ७५.२४ टक्के आहे. या तुलनेत तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण यांच्यामध्ये अधातूंचे एकूण प्रमाण पुष्कळ अधिक असून ते अनुक्रमे ९९.७२ टक्के आणि ९९.८२ टक्के आहे. अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांमध्ये धातूंचे एकूण प्रमाण अनुक्रमे ३०.३३ टक्के, २७.८९ टक्के आणि २४.७६ टक्के आहे. या तुलनेत तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण यांच्यामध्ये धातूंचे एकूण प्रमाण अगदी नगण्य, म्हणजे अनुक्रमे ०.२८ टक्के आणि ०.१८ टक्के आहे. यावरून लक्षात येते की, तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण हे अधातूंचे बनलेले आहेत.
३ आ. तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण हे सेंद्रिय पदार्थ (ऑर्गॅनिक मॅटर) असणे, तर अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती अन् दुसर्या संतांकडील भस्म हे निरिंद्रिय पदार्थ (इनऑर्गॅनिक मॅटर) आणि सेंद्रिय पदार्थ यांचे मिश्रण असणे
कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेल्या पदार्थांना ‘सेंद्रिय पदार्थ (ऑर्गॅनिक मॅटर)’ म्हणतात. सेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही अधातू मूलद्रव्येही आढळून येतात. अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांमध्ये कार्बन हे मूलद्रव्य असले, तरी त्यांच्यामध्ये धातूंचे प्रमाण पुष्कळ असल्याने त्यांना ‘निरिंद्रिय पदार्थ (इनऑर्गॅनिक मॅटर) आणि सेंद्रिय पदार्थ यांचे मिश्रण’ म्हणता येईल. तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही मूलद्रव्ये असून धातूंचे एकूण प्रमाण अगदी नगण्य असल्याने त्यांना ‘सेंद्रिय पदार्थ’ म्हणता येईल.
३ इ. अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांच्या तुलनेत तिसर्या संतांकडील विभूती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण हे अधिक सात्त्विक असणे
सेंद्रिय पदार्थांना ‘नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ’ही म्हणतात; कारण ते नैसर्गिक वातावरणात आढळतात. ते सजीव सृष्टीमध्ये असतात, तर निरिंद्रिय पदार्थ सृष्टीतील निर्जीव वस्तूंमध्ये असतात. निरिंद्रिय पदार्थ जड आहेत. त्यामुळे ते सेंद्रिय पदार्थांच्या तुलनेत अल्प सात्त्विक आहेत. अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म या तिन्ही घटकांमध्ये सेंद्रिय पदार्थ अन् निरिंद्रिय पदार्थ यांचे मिश्रण आहे, तर तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण, हे दोन्ही जवळ जवळ पूर्णतः (९९.८ टक्के) सेंद्रिय पदार्थ आहेत. त्यामुळे तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण, हे अधिक सात्त्विक आहेत. हेच ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करून करण्यात आलेल्या चाचणीतील मोजणीच्या नोंदींवरून दिसून आले. या मोजणीच्या नोंदी पुढील सारणीत दिल्या आहेत. त्यांमध्ये तिसर्या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी अगस्ती नाडीपट्टीकडून मिळालेले भस्म, एका संतांकडील विभूती आणि दुसर्या संतांकडील भस्म यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळींपेक्षा अधिक आहे. घटकांच्या एकूण प्रभावळींच्या संदर्भातही हेच दिसून आले.
३ ई. तिसर्या संतांकडील विभूतीमधील सात्त्विकतेपेक्षा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमधील सात्त्विकता अधिक असण्याचे कारण
तिसर्या संतांकडील विभूतीमधील सेंद्रिय पदार्थाची टक्केवारी (९९.७२ टक्के) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमधील सेंद्रिय पदार्थाच्या टक्केवारीशी (९९.८२ टक्के) साधारण मिळतीजुळती आहे. असे असले, तरीही ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदींवरून हे लक्षात येते की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ तिसर्या संतांकडील विभूतीमधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीपेक्षा अधिक आहे. (‘३ इ’ या सूत्रातील सारणी पहा.) तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांच्या एकूण प्रभावळीच्या संदर्भातही आहे. याचे कारण म्हणजे त्या घटकांत असलेल्या मूलद्रव्यांचे प्रमाण आणि त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य, हे होय. काही मूलद्रव्ये आध्यात्मिक स्तरावर कार्य करतात; कारण ती पंचतत्त्वांशी संबंधित असतात. मूलद्रव्ये आणि त्यांच्याशी संबंधित पंचतत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.
हायड्रोजन हे मूलद्रव्य पृथ्वीतत्त्व असणारे कार्बन मूलद्रव्य आणि तेजतत्त्व असणारे ऑक्सिजन मूलद्रव्य यांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करते. सेंद्रिय पदार्थांतील कार्बन या मूलद्रव्यामध्ये पृथ्वीतत्त्व असल्याने ते सेंद्रिय पदार्थांचा पाया आहे. पृथ्वीतत्त्वामुळे आपोआप निर्माण झालेल्या पदार्थाच्या घनीकरणाची प्रक्रिया घडली. पृथ्वीतत्त्वापेक्षा तेजतत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तराचे आणि तेजतत्त्वापेक्षा वायुतत्त्व आणखी उच्च स्तराचे आहे. आरंभी दिलेल्या घटकांतील मूलद्रव्यांच्या प्रमाणाच्या सारणीवरून लक्षात येईल की, तिसर्या संतांकडील विभूतीमध्ये वायुतत्त्व असलेल्या नायट्रोजनचे प्रमाण ०.०८ टक्के आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमध्ये वायुतत्त्व असलेल्या नायट्रोजनचे प्रमाण ४.२१ टक्के, म्हणजे तुलनेत पुष्कळ अधिक आहे. चाचणीतील अन्य तिन्ही विभूतींमध्ये वायुतत्त्वरूपी नायट्रोजनचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच रवाळ कणांची एकूण प्रभावळ चाचणीमध्ये सर्वाधिक आहे.
३ उ. तिसर्या संतांकडील विभूती तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत असणे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण वायुतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत असणे
घटकातील मूलद्रव्यांच्या चाचणीवरून लक्षात येते की, तिसर्या संतांकडील विभूतीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण २२.७८ टक्के आहे आणि या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कणांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण ६.४८ टक्के आहे; पण रवाळ कणांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, तिसर्या संतांकडील विभूती तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या डब्यातील रवाळ कण वायुतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत आहेत.
३ ऊ. प्रत्येक संतांकडील विभूतीचे कार्य ईश्वरनियोजित असल्याने त्या कार्यासाठी आवश्यक तेवढीच शक्ती त्या विभूतीत येण्यासाठी तिच्यातील मूलद्रव्यांचे प्रमाण त्याप्रमाणे आवश्यक तेच असणे; म्हणून ‘एका संतांकडील विभूती श्रेष्ठ आणि दुसर्या संतांकडील विभूती कनिष्ठ’, असे काही नसणे
चाचणीतील घटकांच्या या रासायनिक पृथक्करणावरून कोणी असे मत करून घेऊ शकतो की, या संतांची विभूती श्रेष्ठ आणि या संतांची विभूती कनिष्ठ; पण तसे नाही. याचे कारण म्हणजे संत हे भगवंताचे सगुण रूप असतात. ईश्वरच त्यांच्या माध्यमातून कार्यरत असतो. त्या त्या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती ही विशिष्ट उद्देशाने निर्माण झालेली असते, उदा. एखादी विभूती भक्तांच्या सकाम इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोगी असेल, एखादी विभूती शारीरिक त्रास दूर करण्यासाठी उपयोगी असेल, तर एखादी विभूती साधना चांगली होण्यासाठी लाभदायक असेल इत्यादी. ईश्वराने त्या त्या विभूतीत कार्यानुरूप तेवढी तेवढी शक्ती निर्माण केलेली असते. ईश्वर काटकसरी असल्याने आवश्यक तेवढीच शक्ती कार्यासाठी उपयोगात आणत असतो. त्यामुळे प्रत्येक संतांकडील विभूतीत आवश्यक ती गुणवैशिष्ट्ये येण्यासाठी तिच्यातील मूलद्रव्यांचे प्रमाण त्याप्रमाणे आवश्यक ते आहे.’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.३.२०१८)
ई-मेल : [email protected]