‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?

१. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा !

प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच
नाही ना ! केवळ ईश्‍वरातच एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदात रहाणे, हा ईश्‍वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते पाहूया.

२. स्वभावदोष-निर्मूलन सारणी (तक्ता) भरा !

२. अ. स्वतःच्या चुका शोधा !

आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत वेळोवेळी लिहायच्या असतात. प्रथम चुका म्हणजे काय, ते समजून घेऊया. काही वेळा आपल्याकडून एखाद्याचा अपमान होईल अशासारखे चुकीचे बोलले जाते किंवा निरर्थक हट्ट करण्यासारखी एखादी अयोग्य कृती होते. या जशा चुका आहेत, तसेच मनात अयोग्य विचार, प्रतिक्रिया किंवा भावना निर्माण होणे, यासुद्धा चुकाच आहेत, उदा. दुसर्‍याविषयी मनात द्वेषाची भावना निर्माण होणे. या सर्व चुका कशा शोधायच्या, हे आता पाहूया.

२. आ. स्वतःच्या चुका शोधायची स्वतःला सवय लावा !

आपण जर दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्‍चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्या बर्‍याच चुका स्वतःच्याच लक्षात येतात.

२. इ. ‘चुकीमध्ये स्वतःचा किती सहभाग होता’, असा संकुचित विचार करू नका !

कधी कधी चूक स्वीकारली जाते; परंतु ती स्वीकारतांना ‘चुकीमध्ये माझा अत्यल्प सहभाग होता’, असा विचार काही मुलांकडून केला जातो. मुलांनो, असा विचार करणेही आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने हानीकारकच ठरते. झालेल्या चुकीमध्ये स्वतःचा थोडासा जरी सहभाग असला, तरी त्याचे पूर्ण दायित्व (जबाबदारी) घेऊन चूक स्वीकारावी. यासंदर्भात चि. यशराज याच्या आईने अनुभवलेला एक प्रसंग पाहूया.

२. र्इ. स्वतःच्या चुका कळण्यासाठी दुसर्‍यांचे साहाय्य घ्या !

कधी कधी काही चुका आपल्या स्वतःच्या लक्षात येत नाहीत. अशा चुका लक्षात आणून देण्यास आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-परिवार इत्यादींना सांगून ठेवावे.

२. उ. इतरांनी लक्षात आणून दिलेली चूक प्रथम मान्य करावी

कधी कधी दुसर्‍या कोणी एखादी चूक सांगितल्यावर आपण चूक मान्य करत नाही. तसेच ‘ही चूक मी केली नाही, तर ताईने (किंवा दादाने)
केली’, असे सांगून स्वतःची चूक दुसर्‍यावर ढकलतात. यामुळे त्यांच्यात बहिर्मुखता (दुसर्‍यांमध्ये किंवा परिस्थितीत दोष बघण्याची वृत्ती) निर्माण होऊन त्यांचीच हानी होते. चूक मान्य न केल्याने ज्या दोषामुळे चूक झालेली असते, तो दोष घालवण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. याउलट इतरांनी सांगितलेली चूक अंतर्मुख होऊन (स्वतः कुठे न्यून पडलो, याकडे लक्ष देण्याची वृत्ती) मान्य करणार्‍या मुलांकडून ‘ती चूक का आणि कशी झाली’, याचा अभ्यास होतो. त्यामुळे त्यांच्याकडून सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न होऊन त्यांचे स्वभावदोष लवकर दूर होतात.
यासाठी कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता, ती चूक स्वीकारावी.

२. ऊ. दुसर्‍याच्या चूक सांगण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता चूक स्वीकारावी

काही वेळा कोणीतरी तुमची चूक सांगते; पण तिचा स्वर चढलेला (रागाचा) असतो. खरे तर तुमच्याकडून चूक झाली आहे, हे तुम्हाला मनातल्या मनात मान्य असते; परंतु  त्यांची सांगण्याची पद्धत तुम्हाला न आवडल्याने तुम्ही त्यांनी सांगितलेली चूक स्वीकारत नाही. मात्र
तुम्ही असे करणे योग्य नाही. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता तिने सांगितलेली चूक स्वीकारावी.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `स्वभावदोष-निर्मूलन : खंड २’

Leave a Comment