स्वयंसूचना कशी बनवावी ?

स्वयंसूचना म्हणजे काय ?

स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.

प्रत्येक अयोग्य विचार, भावना किंवा अयोग्य कृती (वर्तन या सदराखाली) ही स्वभावदोषांमुळे असते. स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रत्येक चुकीच्या वर्तनाबद्दल स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला सूचना देणे आवश्यक असते.

 

उपचारांच्या विविध पद्धती

प्रक्रियेसाठी आपल्यातील स्वभावदोषांपैकी प्राधान्यक्रमानुसार तीन स्वभावदोष निवडल्यानंतर त्या स्वभावदोषांच्या संदर्भात नेमकी कशा प्रकारे सूचना द्यायची, हे ठरवण्यासाठी उपचारांची विशिष्ट पद्धत निश्‍चित करणे आवश्यक असते. स्वयंसूचना तयार करण्यासाठी पुढील महत्त्वाच्या उपचारपद्धती वापरतात.

 

अ. स्वतःच्या स्वभावदोषांमुळे निर्माण होणारे ताण दूर करण्याच्या पद्धती

अ १. अयोग्य कृतीची जाणीव व तीवर ताबा तत्त्व

या पद्धतीनुसार दिलेल्या पुढील सूचनेच्या वाक्यरचनेमुळे अयोग्य विचार, भावना व अयोग्य कृती यांची व्यक्तीला जाणीव होते व त्यांच्यावर ताबा मिळवणे तिला शक्य होते – स्वभावदोषांमुळे जेव्हा माझ्या मनात चुकीचे विचार किंवा भावना येतील किंवा माझ्याकडून चुकीची कृती होत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होऊन ते थांबवता येतील.

या पद्धतीचा वापर करून पुढील स्वभावदोष व अयोग्य कृती दूर करता येतात – एकाग्रता नसणे, मनोराज्यात रमणे, उतावळेपणा, धांदरटपणा, आळशीपणा, अव्यवस्थितपणा, वक्तशीरपणा नसणे, अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, स्वार्थीपणा, निर्णयक्षमतेचा अभाव, रूढीप्रियिता, भ्रष्ट असणे, नीतीने न वागणे, विश्‍वासार्ह नसणे, संशयीपणा, गर्विष्ठपणा, घमेंडखोरपणा, अतीमहत्त्वाकांक्षी असणे, अतीव्यवस्थितपणा वगैरे. सिगारेट ओढणे, दारू पिणे इत्यादी व्यसने; नखे कुरतडण्यासारख्या सवयी; तोतरे बोलणे; आठ वर्षे वयानंतरही अंथरुणात लघवी करणे इत्यादी सर्व अयोग्य कृती होत.

या पद्धतीचा वापर करून सूचना देण्याचे उदाहरण पुढे दिले आहे

स्वभावदोष : विसराळूपणा

प्रसंग : विसराळूपणामुळे कु. सुमन यांना दररोज रात्री झोपण्यापूर्वी दूध तापवण्याचा विसर पडत असे. त्यामुळे सकाळी दूध नासत असे.

स्वयंसूचना

टप्पा १ : जेव्हा मी रात्री स्वयंपाकघरातील आवराआवर करून तेथून बाहेर पडीन, तेव्हा दररोज मी दूध तापवण्यास विसरत असल्यामुळे दुसर्‍या दिवशी दूध नासत असल्याची मला जाणीव होईल व मी लगेचच दूध तापवीन.

टप्पा २ : जेव्हा मी रात्री स्वयंपाकघरातील आवराआवर पूर्ण करीन, तेव्हा तेथून बाहेर पडण्यापूर्वीच मला दूध तापवण्याची आठवण होईल व मी दूध तापवूनच स्वयंपाकघरातून बाहेर पडीन.

या पद्धतीचा वापर करतांना अयोग्य कृती झाल्याची जाणीव ज्या टप्प्याला होते, त्याच्या पुढील टप्प्याची स्वयंसूचना द्यावी. त्यासाठी पुढील टप्पे लक्षात घ्यावेत.

टप्पा १ : अयोग्य कृती घडल्यानंतर स्वतःला जाणीव व्हावी, यासाठी स्वयंसूचना देणे

टप्पा २ : अयोग्य कृती घडत असतांना स्वतःला जाणीव होऊन अयोग्य कृती टाळता यावी किंवा तिच्यावर नियंत्रण मिळवता यावे किंवा योग्य कृती व्हावी, यासाठी स्वयंसूचना देणे

टप्पा ३ : अयोग्य कृती घडण्यापूर्वी स्वतःला जाणीव होऊन योग्य कृती करता यावी, यासाठी स्वयंसूचना देणे

टप्पा ४ : योग्य कृती होण्यासाठी स्वयंसूचना देणे

आठ दिवस नियमितपणे स्वयंसूचनेची अभ्याससत्रे केल्यानंतर प्रक्रियेतील प्रगतीचा आढावा घ्यावा. स्वभावदोषात सुधारणा झाल्याचे आढळल्यास त्यावरून पुढील टप्प्याची स्वयंसूचना द्यावी.

 

अ २. योग्य प्रतिक्रिया

प्रत्येक प्रसंगात व्यक्तीकडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होते किंवा तिच्या मनात उमटते. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे येतात, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे येतात. सतत काही महिने स्वयंसूचना दिल्यामुळे अयोग्य प्रतिक्रियेच्या ऐवजी योग्य प्रतिक्रिया येत राहिली, तर चित्तावर दोषाच्या जागी गुणाचा संस्कार निर्माण होऊन स्वभावात सकारात्मक बदल होतो. एक-दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकणार्‍या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रियाच यावी, यासाठी ही पद्धत वापरतात.

व्यक्तीमत्त्वातील पुढील स्वभावदोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो – दुसर्‍यांवर टीका करणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, पश्‍चात्ताप न होणे, हट्टीपणा, संशयीपणा वगैरे. या पद्धतीचा वापर करून सूचना देण्याचे उदाहरण पुढे दिले आहे.

स्वभावदोष : अवाजवी अपेक्षा असणे

प्रसंग : कु. जान्हवी यांना लेखा-विभागात सेवा करतांना काही समस्या येत होत्या. त्या सोडवण्याकरता त्यांनी विभागसेवकांकडे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. त्या वेळी आता मला वेळ नाही, नंतर आपण याविषयी सविस्तर बोलूया, असे विभागसेवकांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यानंतर कु. जान्हवी यांना वाईट वाटले. त्यांच्या मनात प्रतिक्रिया आली, विभागसेवक माझ्याकडे लक्षच देत नाहीत. त्यांना माझ्या समस्या सोडवण्यासाठी वेळच नसतो.

अभ्यास : वरील प्रसंगातून कु. जान्हवी यांच्यात अवाजवी अपेक्षा असणे, भावनाशीलता व दुसर्‍यांचा विचार नसणे, हे तीन स्वभावदोष असल्याचे लक्षात येते. अवाजवी अपेक्षा करणे हा स्वभावदोष दूर करण्यासाठी कु. जान्हवी यांनी पुढीलमाणे स्वयंसूचना द्यावी.

स्वयंसूचना : विभागात सेवा करतांना मला येणार्‍या समस्या सोडवण्यास चर्चा करण्यासाठी विभागसेवकांकडे वेळ मागितल्यानंतर आता मला वेळ नाही, नंतर आपण याविषयी सविस्तर बोलूया, असे जेव्हा विभागसेवक मला सांगतील, तेव्हा सध्या त्यांच्याकडे महत्त्वाची व तातडीची दुसरी सेवा असेल, ती पूर्ण केल्यानंतर ते नक्कीच माझी समस्या सोडवतील, असा विचार करून चर्चा करण्यास तुम्हाला कोणती वेळ सोयीची आहे, असे मी त्यांना शांतपणे व नम्रपणे विचारीन.

 

अ ३. प्रसंगाचा सराव करणे

या पद्धतीत आपण कठीण प्रसंगाला यशस्वीरीत्या तोंड देत आहोत, असे व्यक्ती नामजप करून कल्पिते. त्यामुळे मनात त्या प्रसंगाला तोंड द्यायची, एक प्रकारे तालीम किंवा सराव होत असल्याने प्रत्यक्ष प्रसंगाला सामोरे जातांना व्यक्तीच्या मनावर ताण येत नाही. एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणार्‍या प्रसंगातील अयोग्य प्रतिक्रिया टाळण्यासाठी ही पद्धत वापरतात, उदा. बसमधून प्रवास करणे, परीक्षेची काळजी, समारंभाला जाणे यांसारख्या प्रसंगांमध्ये मनावर ताण येणे वगैरे.

व्यक्तीमत्त्वातील पुढील स्वभावदोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो – चिकाटी नसणे, पुढाकार न घेणे, गप्प बसणे, आत्मविश्‍वासाचा अभाव, पडते घेणे, न्यूनगंड वगैरे. एखाद्या प्रसंगात मला अमुक एक कृती करणे जमत नाही किंवा जमेल कि नाही, असा नकारात्मक संस्कार दूर करण्यासाठी ही पद्धत वापरतात. या पद्धतीचा वापर करून स्वतःला सूचना कशी द्यायची, याचे उदाहरण पुढे दिले आहे.

स्वभावदोष : भित्रेपणा

प्रसंग : विभागसेवकाने सौ. कांचन यांना सत्संग घेण्यास सांगितले. त्या वेळी एवढ्या साधकांसमोर मला कसे बोलता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मनात उमटली. त्यामुळे मी सत्संग घेऊ शकणार नाही, असे सौ. कांचन यांनी विभागसेवकांना सांगितले.

स्वयंसूचना

१. विभागसेवक मला सत्संग घेण्यास सांगत आहेत.

२. सत्संगसेवकाकडून सत्संग घेण्याची पद्धती मी समजावून घेत आहे.

३. सत्संगात घ्यावयाचे मुद्दे थोडक्यात एका कागदावर लिहून त्या मुद्यांचा मी अभ्यास करत आहे.

४. अभ्यासलेले मुद्दे मोठ्या आवाजात इतरांना समजावून सांगण्याचा मी सराव करत आहे.

५. सत्संगापूर्वी मी शांतपणे सत्संगात घ्यावयाच्या मुद्यांचे पुन्हा एकदा वाचन करत आहे. ते सर्व मुद्दे मला क्रमवार आठवत आहेत.

६. सत्संगाला सुरुवात करण्यापूर्वी मी उपास्यदेवतेला शरणागतीपूर्वक तळमळीने व भावपूर्ण प्रार्थना करत आहे.

७. सत्संगाला सुरुवात झाल्यानंतर मी सर्व मुद्दे शांतपणे व क्रमाक्रमाने समर्पक उदाहरणांसह मांडत आहे.

८. सत्संग संपल्यानंतर मी उपास्यदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

९. सत्संग संपल्यानंतर मला जाणीव झाली की, सत्संग घेतांनाचा संपूर्ण वेळ मी निर्भीडपणे बोलू शकले; म्हणून मला आनंद झाला.

बर्‍याचदा एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वीच तेथे गेल्यानंतर कसे बोलायचे, वागायचे किंवा काय कृती करायची, हे आपण ठरवत असतो. हे नियोजन म्हणजे प्रसंगाचा सराव होऊ शकतो का, असा प्रश्‍न काहींना पडतो. याचे उत्तर म्हणजे या दोहोंत फरक आहे. पहिला प्रयत्न बाह्यमनाच्या पातळीला असतो, तर दुसरा प्रयत्न (प्रसंगाचा सराव), हा अंतर्मनाच्या (चित्ताच्या) पातळीला असतो.

 

आ. परिस्थितीमुळे, उदा. इतरांचे स्वभावदोष, इतरांची वाईट
परिस्थिती इत्यादींमुळे निर्माण होणारे ताण दूर करण्याच्या पद्धती

आ १. इतरांचे स्वभावदोष दूर करून किंवा त्यांची
वाईट परिस्थिती बदलून आपल्या मनावरील ताण कमी करणे शक्य असणे

मुले, आपल्या हाताखाली काम करणारे वगैरे व्यक्तींच्या बाबतीत त्यांचे स्वभावदोष बदलणे शक्य असते. अशा व्यक्तींना स्वभावदोषांबद्दल पुनःपुन्हा सांगणे, पुनःपुन्हा शिक्षा करणे वगैरे कृती म्हणजे त्यांच्यातील स्वभावदोष दूर करण्याचे मार्ग होय. या उपचारपद्धतीचा वापर करून स्वयंसूचना तयार करण्याचे उदाहरण पुढे दिले आहे.

स्वभावदोष : भावनाशीलता

प्रसंग : चि. निखील साने इयत्ता सहावीत शिकत होता. तो नेहमी मित्रांच्या खोड्या काढून दंगामस्ती करत असे. एकदा खेळतांना त्याने चि. नितीन मोने नावाच्या एका मुलाला जोरात मारले; म्हणून नितीनच्या आईने, सौ. मोने यांनी निखीलच्या आईकडे, सौ. साने यांच्याकडे निखीलची तक्रार केली. त्यामुळे सौ. साने यांना वाईट वाटले.

उपचारपद्धती : आ १. इतरांचे स्वभावदोष दूर करून आपल्या मनावरील ताण कमी करणे व अ २. योग्य प्रतिक्रिया

स्वयंसूचना : निखीलने नितीनला खेळतांना मारल्यामुळे सौ. मोने जेव्हा माझ्याकडे निखीलची तक्रार करतील, तेव्हा निखीलचे वर्तन अयोग्य असून त्यात सुधारणा व्हावी, यासाठी सौ. मोने तसे सांगत आहेत, हे माझ्या लक्षात येईल व निखीलला त्याच्या अयोग्य वर्तनाची जाणीव करून देण्यासाठी समजावणे किंवा शिक्षा करणे या पर्यायांचा मी विचार करीन.

आ २. इतरांचे स्वभावदोष दूर करणे किंवा वाईट परिस्थिती बदलणे अशक्य असणे

काही वेळेस इतरांचे (उदा. वरिष्ठांचे) स्वभावदोष दूर करणे अशक्य असते. तसेच भयानक दारिद्य्र, अतीवेदनादायक किंवा असाध्य आजार, अपघात, भूकबळी वगैरेंसारख्या संकटांमध्ये किंवा ताण निर्माण करणार्‍या प्रसंगांमध्ये जेव्हा आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून त्या प्रश्‍नांकडे पहाणे, हा एकच उपाय शक्य असतो. हे साध्य होण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.

अ. दुसर्‍याकडून कोणतीही अपेक्षा करू नये, तसेच स्वतःच्या प्रयत्नांना फळ मिळावे याचीही अपेक्षा करू नये.

आ. कर्मफलन्यायानुसार व्यक्तीच्या कर्मानुसार तिला सुख किंवा दुःख मिळते. हा मुद्दा लक्षात राहिला की, दारिद्य्र, अपघात, दुष्काळ वगैरे प्रसंगांमध्ये दुःखी व्यक्तीकडे पाहूून आपल्याला दुःख होत नाही.

तत्त्वज्ञाची भूमिका निर्माण करणार्‍या सूचना ताण निर्माण करणार्‍या प्रसंगाच्या अवधीनुसार पद्धत अ २ किंवा अ ३ याप्रमाणे देण्यात येतात.

१. वरील माहिती ही सर्वसाधारणपणे एखाद्या विशिष्ट तणावाच्या वेळी कुठली पद्धत वापरायची, याची मार्गदर्शक आहे. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर कसा करायचा याबद्दल ताठरता नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्र वापर करून आपण आपली सूचना तयार करू शकतो. या उपचारपद्धतीचा वापर करून स्वयंसूचना तयार करण्याचे उदाहरण पुढे दिले आहे.

स्वभावदोष : भावनाधानता

प्रसंग : श्रीमती शहा यांच्या घरी मोती नावाचा कुत्रा होता. श्रीमती शहा यांचे मोतीवर खूप प्रेम होते. वय झाल्यामुळे मोती मेला. तेव्हा श्रीमती शहा यांना रडू आवरले नाही.

उपचारपद्धती : आ २. तत्त्वज्ञाची भूमिका घेणे व अ २. योग्य प्रतिक्रिया

स्वयंसूचना : वय झाल्यामुळे मोती मेल्याचे जेव्हा मला समजेल, तेव्हा जन्माला येणार्‍या प्रत्येक जिवाचा मृत्यू अटळ असतो; परंतु ईश्‍वर मात्र जन्मोजन्मी सोबत असतो, हे माझ्या लक्षात येईल व मी नामजप करण्यास सुरुवात करीन.

वेगवेगळ्या स्वभावदोषांचा एकत्रित परिणाम म्हणून जेव्हा एखादी चुकीची क्रिया किंवा प्रतिक्रिया घडते, अशा वेळीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्र वापर करून स्वयंसूचना तयार करू शकतो.

२. एखाद्या व्यक्तीच्या अयोग्य कृतीमुळे तिच्यावर जर कुणी ओरडले आणि त्यामुळे तिला जर राग आला, तर असा राग येऊ नये; म्हणून ती स्वतःला पुढील सूचना योग्य प्रतिक्रिया (अ २) ही पद्धत वापरून देऊ शकतो – बरे झाले तो माझ्यावर रागावला. त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली. परंतु फक्त ही सूचना देऊन न थांबता, अयोग्य कृती पुन्हा होऊ नये, यासाठी तिने अयोग्य कृतीची जाणीव व तीवर ताबा (अ १) ही पद्धत वापरून स्वयंसूचना देणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे पुनःपुन्हा अयोग्य कृती होण्यापासून व अयोग्य प्रतिक्रिया उमटण्यापासून ती स्वतःला परावृत्त करू शकते.

 

उपचाराच्या इतर काही महत्त्वाच्या पद्धती

१. नामजप

नामजप सतत सुरू असला की नकारात्मक विचार किंवा भावना मनात येत नाहीत. नामजप सतत होण्यासाठी स्वतःला पुढीलमाणे सूचना द्यावी –

जेव्हा मी कोणाशी संभाषण करत नसेन किंवा माझ्या मनात निरर्थक विचार येतील, तेव्हा माझा नामजप सुरू होईल.

१ अ. नामजपाचे महत्त्व

‘मनुष्याच्या पापांचा नाश करून त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवतो, तो नामजप होय. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘नामसंकीर्तनयोग व मंत्रयोग) ‘नामजप हे खरे तप आहे. ते प्रारब्धभोगावरही मात करते’, असे म्हटले जाते. अष्टांग साधनेतही नामजप महत्त्वपूर्ण असून तो साधनेचा पाया आहे.

१ आ. नामजपाने होणारे लाभ

नामजप चालू असतांना चित्तावर इतर गोष्टींचे नवीन संस्कार होत नाहीत. नामजपाने मन शांत झाल्याने मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक विकार होत नाहीत. अखंड नामजप चालू असेल, तर मनात निरर्थक विचार येत नाहीत.

१ इ. साधकांनो, नामजपाची स्वयंसूचना द्या !

सतत नामजप चालू रहाण्यासाठी साधक पुढीलप्रमाणे स्वयंसूचना देऊ शकतात, ‘जेव्हा मी कुणाशी संभाषण करत नसेन किंवा माझ्या मनात उपयुक्त विचार नसतील, तेव्हा मला ही जाणीव होईल की, अंतर्मनातील अयोग्य संस्कारांना पुसून टाकण्यासाठी, तसेच योग्य संस्कारांचा उगम होण्यासाठी वा त्यांना दृढ करण्यासाठी नामजप सूक्ष्म स्तरावर परिणामकारक आहे; म्हणून मी ………….. हा नामजप करीन.’ (येथे नामजपाचा उल्लेख करावा, उदा. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’)

१  ई. ही स्वयंसूचना कुणी द्यावी ?

नव्याने सनातन संस्थेच्या संपर्कात आलेले जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी, तसेच पूर्णवेळ साधनेला नुकताच आरंभ केलेले साधक यांनी आरंभी ३ मास (महिने) प्रतिदिन ही स्वयंसूचना द्यावी. प्रसारातील आणि आश्रमातील अन्य साधकांनीही प्रत्येक ३ मासांनी ८ – १५ दिवस प्रतिदिन ही स्वयंसूचना द्यावी. साधकांनी प्रक्रियेसाठी निवडलेले स्वभावदोष अथवा अहं यांचे पैलू यांवरील एक स्वयंसूचना देण्याचे अल्प करून ही स्वयंसूचना द्यावी.

पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांच्या मनावर नामजपाच्या व्यतिरिक्त साधनेच्या एखाद्या घटकाचा (प्रार्थना, कृतज्ञता, स्वयंसूचना सत्र आदींचा) संस्कार करायचा असेल, तर वरील स्वयंसूचनेत त्याच्या महत्त्वाचा उल्लेख करून स्वयंसूचना घेण्यास उत्तरदायी साधक संबंधित साधकांना सांगू शकतात.

२. शिक्षा

उपचाराच्या वरील पद्धतींचा दोन-तीन आठवडे वापर करूनही अयोग्य क्रिया किंवा कृती होत असल्यास किंवा अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त होत असल्यास या पद्धतीचा वापर करावा व स्वतःला जोराने चिमटा घ्यावा. स्वतःला चिमटा घेणे शक्य व्हावे, यासाठी कशा प्रकारे सूचना द्यावी, हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल – जेव्हा मी मनोराज्यात रमलेलो असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल व मी स्वतःला जोरात चिमटा घेईन.

चिमटा घेणे परिणामकारक न ठरल्यास पँटचा पट्टा घट्ट आवळणे किंवा पायाला घट्ट दोरी बांधणे या पद्धतीने वेदना निर्माण करून जास्त वेळ शिक्षा द्यावी. वरील उदाहरणात ज्या विचारामुळे किंवा प्रतिक्रियेमुळे व्यक्ती वस्तूस्थितीपासून दूर जाते, त्या विचाराचा किंवा प्रतिक्रियेचा उल्लेख स्वयंसूचनेत केल्यास स्वभावदोष लवकर दूर होण्यास मदत होते.

 स्वभावदोष आणि अहं यांमध्ये लवकर पालट दिसून येण्यासाठी योग्य सूचनापद्धतींचा वापर करण्याचे लाभ !

‘उपरोल्लिखित विविध स्वयंसूचना पद्धतींनी स्वयंसूचना द्यायची असते’, हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. चुकांच्या प्रकारानुसार विविध स्वयंसूचना पद्धतींप्रमाणे स्वयंसूचना बनवल्यास अपेक्षित पालट लवकर दिसून येतो. त्यामुळे साधकांनी विविध स्वयंसूचना पद्धतींचा वापर करून स्वयंसूचना बनवाव्यात आणि नियमितपणे अन् मनापासून स्वयंसूचना देऊन स्वभावदोष आणि अहं यांमध्ये पालट होत असल्याचे अनुभवावे.

‘अंतर्मनाला देत असलेली स्वयंसूचना योग्य आहे का ?’, हे कसे ओळखावे ?

आपण देत असलेली स्वयंसूचना योग्य असेल, तर काही काळाने मनाला शांत वाटते आणि हलकेपणा जाणवू लागतो, तसेच स्वयंसूचना दिल्यानुसार विचार आणि कृती यांमध्ये पालट जाणवू लागतो.

वर दिलेल्या स्वयंसूचना पद्धतींना (‘अ १’, ‘अ २’, ‘अ ३’, ‘आ १’, ‘आ २’, ‘इ १’ आणि ‘इ २’ यांना) इंग्रजीत ‘ए.बी.सी टेक्निक’ (ABC Technique) असे म्हटले जाते.

 

बहुतांश साधक ‘अ १’ या स्वयंसूचना पद्धतीचा वापर करत असतात. विचार, कृती आणि भावना यांच्या स्तरांवरील चुकांवर स्वयंसूचना घेण्यासाठी या स्वयंसूचना पद्धतीचा वापर केला जातो.

१. स्वयंसूचनेचे स्वरूप

अयोग्य विचार, कृती आणि भावना यांची जाणीव  योग्य कृतीसाठी दृष्टीकोन किंवा परिणाम  उपाययोजना (प्रसंगानुरूप योग्य कृती किंवा विचार)

‘अ १’ या स्वयंसूचना पद्धतीत वरील क्रमाने स्वयंसूचना बनवल्या जातात. अशा वाक्यरचनेमुळे अयोग्य विचार, भावना आणि अयोग्य कृती यांची व्यक्तीला जाणीव होते अन् त्यावर नियंत्रण मिळवून योग्य कृती करण्याचा संस्कार होतो.

२. या स्वयंसूचना पद्धतीचा वापर करून पुढील स्वभावदोष आणि अयोग्य कृती दूर करता येतात !

एकाग्रता नसणे, मनोराज्यात रमणे, उतावळेपणा, धांदरटपणा, आळस, अव्यवस्थितपणा, वक्तशीरपणाचा अभाव, अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, स्वार्थीपणा, विश्‍वासार्ह नसणे, संशयीपणा, गर्विष्ठपणा, घमेंडखोरपणा, अतीमहत्त्वाकांक्षी असणे, अतीव्यवस्थितपणा, निर्णयक्षमतेचा अभाव, रुढीप्रियता, भ्रष्ट असणे, नीतीने न वागणे, आदी स्वभावदोष; धूम्रपान करणे (सिगारेट ओढणे), दारू पिणे इत्यादी व्यसने; नखे कुरतडण्याची सवय, तोतरे बोलणे, ८ वर्षे वयानंतरही अंथरुणात लघवी करणे इत्यादी अयोग्य कृती होत.

३. ‘अ १’ या स्वयंसूचना पद्धतीनुसार बनवलेल्या योग्य स्वयंसूचनांची उदाहरणे

३ अ. कृतीच्या स्तरावरील स्वयंसूचना

‘जेव्हा प्रथमेशकडून सनातन प्रभातच्या पडताळणीचा आढावा मासाच्या (महिन्याच्या) २५ दिनांकानंतरही येण्यास उशीर होत असतांना मी पाठपुरावा करण्यास टाळाटाळ करत असेन, तेव्हा ‘सहसाधकांकडून पडताळणी पूर्ण करवून घेणे, ही माझी सेवा आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी २६ दिनांकापासून पाठपुरावा करायला आरंभ करून पडताळणी समयमर्यादेत पूर्ण करीन.’

(या स्वयंसूचनेत प्रथमेश हे नाव नमूद केले आहे. साधकांनी स्वयंसूचना बनवतांना आपल्या संबंधित साधकाच्या नावाचा उल्लेख करावा. स्वयंसूचनेत समयमर्यादेत लिहितांना विशिष्ट दिनांकचा उल्लेख करू शकतो.)

३ आ. विचारांच्या स्तरावरील स्वयंसूचना

‘जेव्हा व्यष्टी साधनेचे प्रयत्न झाले नाहीत; म्हणून मला आढावा देण्याचा ताण येत असेल, तेव्हा ‘सकारात्मक राहून आढावा दिल्याने होत नसलेले प्रयत्न करण्यासाठी मला दिशा मिळणार आहे आणि माझे प्रयत्न नियमित होणार आहेत’, याची मला जाणीव होईल अन् मी मोकळेपणाने आढावा देईन.’

४. चार टप्प्यांप्रमाणे स्वयंसूचना देणे

या स्वयंसूचना पद्धतीत अ. चूक घडल्यानंतर, आ. चूक घडतांना, इ. चूक घडण्यापूर्वी आणि ई. योग्य कृती होण्यासाठी स्वयंसूचना अशा ४ टप्प्यांप्रमाणे स्वयंसूचना द्यायची असते. अयोग्य कृती झाल्याची जाणीव ज्या टप्प्याला होते, त्याच्या पुढील टप्प्याची स्वयंसूचना देणे आवश्यक असते.

५. भावाच्या स्तरावर स्वयंसूचना देण्याचे महत्त्व आणि उदाहरण

स्वयंसूचनेत मानसिक स्तरावरील दृष्टीकोनासह भावाच्या प्रयत्नांची जोड दिल्यास स्वयंसूचना अधिक परिणामकारक होते, असे अनेक साधकांनी अनुभवले आहे. स्वयंसूचनेत केवळ मानसिक स्तरावरील दृष्टीकोन घ्यायचा कि भावाच्या स्तरावरील प्रयत्नही अंतर्भूत करायचा, ते स्वतःच्या स्थितीनुसार उत्तरदायी साधकांना विचारून घेऊन ठरवावे. दोन्ही प्रकारच्या स्वयंसूचनांची उदाहरणे येथे दिली आहेत.

५ अ. मानसिक स्तराची स्वयंसूचना

‘जेव्हा अंजली मला श्रुतीला हस्तपत्रक देण्यास सांगेल, तेव्हा ‘विसराळूपणामुळे या सेवेची नोंद करणे माझ्याकडून राहू शकते’, याची जाणीव होऊन मी ते त्वरित सेवेच्या वहीत लिहून ठेवीन आणि श्रुतीला वेळेत हस्तपत्रक देईन.’

(‘श्रुतीला वेळेत हस्तपत्रक देईन’, या वाक्यात विशिष्ट वेळ लिहावी, उदा. दुपारी २ पूर्वी, सायंकाळी ७ पूर्वी)

५ आ. भावाच्या स्तराची स्वयंसूचना

‘जेव्हा अंजली मला श्रुतीला हस्तपत्रक देण्यास सांगेल, तेव्हा ‘विसराळूपणामुळे ते माझ्याकडून राहू शकते’, याची जाणीव होऊन मी त्यासंदर्भात त्वरित सेवेच्या वहीत लिहून ठेवीन आणि ‘देवा, ही सेवा तू माझ्याकडून वेळेत पूर्ण करून घे’, अशी प्रार्थना करीन.’

 

‘काही वेळा अन्य व्यक्तींच्या चुकांमुळे मनावर ताण निर्माण होणे किंवा काळजी वाटणे आदी प्रकारच्या अयोग्य प्रतिक्रिया मनात उमटतात. या अयोग्य प्रतिक्रियांवर मात करण्यासाठी स्वतः योग्य दृष्टीकोन घेण्यासह समोरच्या व्यक्तीमध्येही सुधारणा होणे आवश्यक ठरते. अशा वेळी अधिकारी व्यक्ती (म्हणजेच पालक, शिक्षक, प्राध्यापक, कार्यालयाचे प्रमुख (मालक), उत्तरदायी साधक) त्यांच्या अधिकारक्षेत्रातील व्यक्तींच्या संदर्भात ‘आ १’ या स्वयंसूचना पद्धतीचा वापर करून स्वयंसूचना बनवू शकतात. आई-वडिलांनी पाल्यांच्या संदर्भात, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात, कार्यालयाच्या प्रमुखांनी कर्मचार्‍यांच्या संदर्भात, तसेच उत्तरदायी साधकांनी त्यांच्याशी संबंधित साधकांच्या संदर्भात या स्वयंसूचना पद्धतीने स्वयंसूचना घेतल्यास त्यांच्या तणाव-निर्मूलनासाठी साहाय्य होते.

१. अधिकारी व्यक्ती साम, दाम, दंड आणि भेद या टप्प्यांनुसार पाल्य,
विद्यार्थी, कर्मचारी, तसेच साधक यांना जाणीव करून देऊन स्वतःच्या मनावरील तणाव नाहीसा करू शकणे

पाल्य, विद्यार्थी, कर्मचारी यांच्याकडून अयोग्य वर्तन होत असल्यास अधिकारी व्यक्ती त्यांना साम, दाम, दंड आणि भेद या टप्प्यांनुसार जाणीव करून देऊ शकतात. व्यक्ती आणि परिस्थिती यांनुरूप विविध उपाययोजना काढून, म्हणजेच पहिल्या टप्प्याला समजावून सांगून, चुकीसाठी आर्थिक भरपाई घेऊन, तसे होऊनही सुधारणा होत नसल्यास कठोर शब्दांत रागावून अन् त्यानंतरही अपेक्षित पालट न झाल्यास शिक्षेचा अवलंब करून अधिकारक्षेत्रातील व्यक्तींना जाणीव करून देता येईल.

‘या स्वयंसूचना पद्धतीने स्वयंसूचना कशा बनवाव्यात ?’, याविषयी पुढे दिले आहे.

२. साधक-पालकांनी घ्यावयाची स्वयंसूचना

२ अ. प्रसंग : सागर शालेय विद्यार्थी असून तो प्रतिदिन संपूर्ण वेळ खेळण्यात घालवतो आणि काहीच अभ्यास करत नाही.

२ आ. स्वयंसूचना : ‘जेव्हा सागर शाळेचा अभ्यास न करता दिवसभर खेळण्यात वेळ वाया घालवेल, तेव्हा त्याच्यावर अभ्यासाचे महत्त्व बिंबवण्यासाठी मी त्याला स्वयंसूचना बनवून देईन आणि ती स्वयंसूचना नियमितपणे घेण्यास साहाय्य करीन.’

अशा प्रसंगी स्वयंसूचनेत ‘अभ्यास केला नाही, तर तो अनुत्तीर्ण होईल आणि त्याचे सर्व वर्गमित्र पुढच्या वर्गात जातील’, असा दृष्टीकोन असलेली स्वयंसूचना सागरला बनवून देईन’, असेही घेऊ शकतो. (येथे ‘अभ्यास केला नाही, तर तो अनुत्तीर्ण होईल आणि त्याचे सर्व वर्गमित्र पुढच्या वर्गात जातील’, हा दृष्टीकोन पाल्यामध्ये अभ्यासाविषयी भीती निर्माण होण्यासाठी दिलेला नसून त्याच्यात अभ्यासाचे महत्त्व बिंबवण्यासाठी दिला आहे.)

२ इ. पालकांनी द्यावयाच्या स्वयंसूचनेत अंतर्भूत करावयाचा दृष्टीकोन पाल्याला पटणारा असावा !

पालकांनी वरील प्रकारे स्वयंसूचना बनवतांना पाल्याच्या अयोग्य वागण्याच्या संदर्भात ‘कोणता दृष्टीकोन दिला, तर त्याला पटतो ?’, हे त्याच्याशी संवाद साधून जाणून घ्यावे आणि स्वयंसूचनेत तो दृष्टीकोन अंतर्भूत करावा. पाल्याचे वय संवाद साधण्याइतके मोठे असल्यास हा पर्याय उपयुक्त आहे; परंतु वयाने लहान असलेल्या पाल्याच्या संदर्भात ‘योग्य दृष्टीकोन काय असावा ?’, याविषयी पालक स्वतः ठरवू शकतात.

३. उत्तरदायी साधकांनी घ्यावयाची स्वयंसूचना

अनेकदा जाणीव करून देऊनही साधनेच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न न करणार्‍या अथवा सेवेत त्याच त्याच चुका करणार्‍या साधकांच्या उत्तरदायी साधकांनी (प्रसारसेवक, जिल्हासेवक, समितीसेवक, आश्रमसेवक, व्यष्टी आढावासेवक आदींनी) पुढीलप्रमाणे स्वयंसूचना द्यावी. यामुळे साधकांना योग्य प्रकारे हाताळता येऊन कार्य आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढेल.

३ अ. पहिले उदाहरण

३ अ १. प्रसंग : अमोल सेवा विलंबाने करतो. त्यामुळे कार्यात अनेक अडचणी येतात. याची जाणीव करून देऊनही त्याच्याकडून वारंवार तीच चूक घडते.

३ अ २. स्वयंसूचना : ‘जेव्हा अमोलकडून सेवा वेळेत पूर्ण होण्यास विलंब होत असेल, तेव्हा ‘त्याच्याकडून सेवा विलंबाने का होत आहे ?’, हे मी जाणून घेईन आणि त्यानुसार साहाय्यक उपाययोजना करीन.’ (येथे ‘सेवेच्या समयमर्यादेपूर्वी मी अमोलचा पाठपुरावा घेईन आणि त्याला वेळोवेळी आढावा देण्यास सांगेन’ अथवा ‘सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी त्याला सहसाधकाचे साहाय्य घेण्यास सांगून सेवा समयमर्यादेत पूर्ण करायला सांगेन’, अशा प्रकारचे विशिष्ट उपाययोजना असलेले दृष्टीकोनही घेता येतील.)

३ आ. दुसरे उदाहरण

३ आ १. प्रसंग : संध्याला आध्यात्मिक त्रासामुळे ५ घंटे नामजप करण्यास संतांनी सांगितले आहे, तरीही ती नियमितपणे नामजप करत नाही.

३ आ २. स्वयंसूचना (‘एकाच प्रसंगात २ वेगवेगळ्या पद्धतींनी कशा स्वयंसूचना देऊ शकतो ?’, याविषयीची माहिती पुढे दिली आहे.)

अ. ‘जेव्हा संध्या प्रतिदिन ५ घंटे नामजप करण्याऐवजी सेवेला प्राधान्य देईल, तेव्हा मी तिच्या मनावर नामजपाचे महत्त्व बिंबवण्यासाठी तिला स्वयंसूचना सत्र करायला सांगीन.’

आ. ‘जेव्हा संध्याने ५ घंटे नामजप अपूर्ण ठेवून सेवेला प्राधान्य दिल्याचे समजेल, तेव्हा नामजप पूर्ण करण्यासाठी मी मधे-मधे तिचा आढावा घेईन.’

३ इ. उत्तरदायी साधकांनी करावयाची प्रार्थना

उत्तरदायी साधकांचा वेगवेगळ्या प्रकृतीच्या साधकांशी संपर्क येत असतो. ‘त्या सर्वांना हाताळता येणे सुलभ जावे’, यासाठी ते पुढील प्रकारे प्रार्थना करू शकतात, ‘हे भगवंता, सर्व साधकांची प्रकृती तूच जाणतोस. ‘या साधकांकडून साधना आणि सेवा कशी करवून घ्यायची ? ‘त्यांच्यासाठी उपयुक्त उपाययोजना कशा शोधायच्या ?’, ते तूच मला शिकव’, अशी प्रार्थना आहे.’

४. अधिकारी व्यक्तींचे गुणसंवर्धन होण्यासाठीही ‘आ १’ ही पद्धत साहाय्यकारक !

अधिकारी व्यक्तींनी अधिकारक्षेत्रातील व्यक्तींसाठी ‘प्रत्येक वेळी शिक्षापद्धतीचा अवलंब करायलाच हवा’, असे नाही. कधी प्रेमाने समजावून सांगून, तर कधी कठोर शब्दांत जाणीव करून देऊन त्यांना योग्य कृतीची जाणीव करून देणे आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याच्यात पालट होण्यासाठी जे आवश्यक आहे, ते करणे अपेक्षित आहे. यामुळे अधिकारी व्यक्तींचे गुणसंवर्धन होण्यासही साहाय्य होईल.

‘आ १’ या स्वयंसूचना पद्धतीने स्वयंसूचना दिल्यास पालक, उत्तरदायी साधक, मालक इत्यादींचे शीघ्रतेने तणाव निर्मूलन होतेच; पण त्यासह पाल्य, साधक, तसेच कर्मचारी यांच्याकडूनही योग्य कृती होण्यास आरंभ होतो.

काही वेळा अधिकारी व्यक्तींच्या पाल्य, कर्मचारी आणि अन्य साधक यांच्याकडून अवास्तव अपेक्षा असतात. अशा वेळी अपेक्षा न्यून होण्यासाठी पालक, मालक, उत्तरदायी साधक यांनी ‘अ १’ अथवा ‘अ २’ या स्वयंसूचना पद्धतींचा वापर करून स्वयंसूचना द्यावी.

 

‘मनातील विचार आणि प्रतिक्रिया यांमधील भेद बर्‍याच साधकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे स्वयंसूचना बनवण्यासाठी ते योग्य स्वयंसूचनापद्धतीचा वापर करू शकत नाहीत. ‘साधकांना हा भेद लक्षात यावा’, यासाठी मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. विचार

१ अ. विचार म्हणजे काय ?

व्यक्तीच्या मनात दिवसभरात विविध विचार येत असतात. अयोग्य विचाराच्या उगमाचे कारण बहुतांशी ‘व्यक्तीच्या चित्तावरील अयोग्य संस्कार’, हे असते.

१ आ. अयोग्य विचाराचे उदाहरण

१ आ १. अयोग्य विचार

विनय आणि विवेक एकमेकांशी बोलत असल्याचे पाहून ‘ते माझ्याविषयीच बोलत असतील’, असा विचार आला.

१ आ २. स्वयंसूचना 

‘जेव्हा विनय आणि विवेक एकमेकांशी बोलत असल्याचे पाहून ‘ते माझ्याविषयी बोलत असतील’, असा मला संशय येईल, तेव्हा मला जाणीव होईल की, अकारण संशय घेतल्याने माझ्या मनातील नकारात्मकता वाढत आहे. ते टाळण्यासाठी मी माझ्या साधनेकडे लक्ष देईन.’

येथे प्रसादने विनय आणि विवेक यांना आपापसांत बोलतांना पाहिले. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आला नसतांनाही प्रसादच्या मनात नकारात्मक विचार आला. त्यामुळे ‘हा प्रसंग अयोग्य विचाराचे उदाहरण आहे’, असे म्हणता येईल.

 

२. प्रतिक्रिया

२ अ. प्रतिक्रिया म्हणजे काय ?

एखाद्या प्रसंगात परिस्थिती किंवा व्यक्ती यांना दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. जेव्हा हा प्रतिसाद अयोग्य पद्धतीने व्यक्त होतो वा मनात उमटतो, तेव्हा त्याला ‘अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त करणे किंवा मनात उमटणे’, असे म्हटले जाते. प्रतिक्रिया व्यक्त होणे किंवा मनात येणे, हे प्रसंग, स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती, व्यक्ती आणि त्यांचे वर्तन यांनुरूप पालटू शकते.

एखाद्या प्रसंगात मनाविरुद्ध झाल्यामुळे अस्वस्थ होणे, राग येऊन वस्तूंची आदळ-आपट करणे, एखाद्यावर चिडून त्याच्याशी अबोला धरणे किंवा त्याला मारणे, हीसुद्धा अयोग्य प्रतिक्रियेचीच उदाहरणे आहेत.

२ आ. अयोग्य प्रतिक्रियेचे उदाहरण

२ आ १. प्रतिक्रिया

अक्षताने चूक लक्षात आणून दिल्यावर माझे मन अस्वस्थ झाले.

२ आ २. स्वयंसूचना

‘जेव्हा अक्षताने चूक लक्षात आणून दिल्यावर माझे मन अस्वस्थ होईल, तेव्हा ‘चूक पूर्णपणे स्वीकारता येण्यासाठीच्या चिंतनासाठी मला थोडा वेळ लागणार आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी अगोदर चूक व्यवस्थित ऐकून घेऊन नंतर त्याचे चिंतन करीन.’

‘अयोग्य प्रतिक्रिया’ हा परिणाम आहे. अयोग्य प्रतिक्रिया उमटण्यामागे वा व्यक्त होण्यामागे स्वभावदोष अथवा अहं यांचा पैलू कार्यरत असतो. ‘अयोग्य प्रतिक्रिया येण्यामागील कारण शोधल्यावर जो स्वभावदोष अथवा अहं याचा पैलू लक्षात येतो, तो मूळ स्वभावदोष वा अहं यांचा पैलू आहे’, असे म्हणता येईल.

 

३. विचार आणि प्रतिक्रिया यांतील भेद

‘प्रसंग एकच असला, तरी त्यात मनात आलेला अयोग्य विचार आणि अयोग्य प्रतिक्रिया कशी ओळखावी ?’, ते पुढील सारणीतून लक्षात येईल.

प्रसंग : ‘सहसाधिकेने सेवेत साहाय्य करावे’, अशी अपेक्षा करणे

 

४. मनात अयोग्य प्रतिक्रिया उमटल्यास त्यामागील मूळ स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू, तसेच परिणामस्वरूप निर्माण झालेला स्वभावदोष अन् अहं यांचे पैलू यांवर एकाच वेळी स्वयंसूचना घेण्यासाठी वापरायची पद्धत

४ अ. प्रसंग : मी सांगितलेले सहसाधकाने ऐकले नाही; म्हणून त्याचा राग आला.

४ आ. विश्‍लेषण : यातील ‘राग येणे’, ही अयोग्य प्रतिक्रिया आहे; परंतु राग येण्यामागील कारण शोधल्यास ‘मी सांगितलेले सहसाधकाने ऐकावे’, ही अपेक्षा असल्याने ‘अपेक्षा करणे’, हा मूळ अहंचा पैलू कार्यरत असल्याचे ध्यानात येईल. ‘राग येणे’, हा अपेक्षा पूर्ण न झाल्याचा परिणाम आहे.

काही वेळा ‘राग येणे’, या पैलूवर पुरेशा कालावधीसाठी सूचना दिल्यावरसुद्धा राग न्यून होत नाही. त्यामागील कारणाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, त्याच्या मुळाशी विशिष्ट अहंचा पैलू (म्हणजेच येथे ‘अपेक्षा करणे’) कार्यरत असतो. अशा वेळी राग येण्यामुळे निर्माण झालेली मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी ‘अ २’ या स्वयंसूचना पद्धतीचा वापर करून स्वयंसूचना बनवावी आणि ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूच्या निर्मूलनासाठी ‘अ १’ प्रमाणे स्वयंसूचना द्यावी. या प्रसंगात ‘अपेक्षा करणे’ आणि ‘राग येणे’ यांसाठी एकाच सूचनासत्रामध्ये स्वयंसूचना घेऊन प्रयत्न करावेत. यामुळे त्यांमध्ये लवकर सुधारणा होईल.

साधकांनी वरीलप्रमाणे अयोग्य विचार आणि अयोग्य प्रतिक्रिया यांतील भेद लक्षात घेऊन स्वयंसूचना द्यावी. अयोग्य विचार, कृती आणि भावना यांच्या स्तरावर झालेल्या चुकीसाठी ‘अ १’, तर अयोग्य प्रतिक्रियेच्या संदर्भात झालेल्या चुकीसाठी ‘अ २’ या स्वयंसूचना पद्धतीचा वापर करून स्वयंसूचना बनवणे अपेक्षित आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `स्वभावदोष-निर्मूलन : खंड २’

Leave a Comment