स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.

 

 

तक्ता लिहिण्याची पद्धत

स्तंभ १ : दिनांक

या रकान्यात दिनांक लिहिल्यामुळे प्रक्रियेचा कालावधी तपासण्यास व प्रगतीचा आढावा घेण्यास मदत होते.

स्तंभ २ : अयोग्य कृती किंवा अयोग्य प्रतिक्रिया

दिवसभरात स्वतःकडून झालेली प्रत्येक अयोग्य कृती व मनात उमटलेली किंवा व्यक्त झालेली अयोग्य प्रतिक्रिया नोंद येथे करावी. त्यामध्ये ‘स्वतःला कळलेली’ व ‘इतरांना कळलेली’, असे वर्गीकरण करावे. ज्या व्यक्तीने चूक दाखवली, तिच्या नावाचाही उल्लेख करावा. या स्तंभामुळे प्रक्रियेसाठी तीन स्वभावदोषांची प्राधान्याने निवड करतांना स्वभावदोषांची तीव्रता ठरवणे व व्यक्तीनिष्ठ प्रतिक्रियांचा अभ्यास करणे सुलभ होते. अयोग्य कृती, अयोग्य विचार व अयोग्य काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अयोग्य कृतींची उदाहरणे

१. सकाळी चहा पिऊन झाल्यानंतर मी पेला धुतला नाही.

२. स्नानगृहातून बाहेर आल्यानंतर मी दिवा बंद करण्यास विसरलो.

३. मी वेळेवर गॅस बंद केला नाही. त्यामुळे गॅसवर तापत ठेवलेले दूध उतू गेले.

४. महाविद्यालयातून घरी आल्यानंतर कपडे व्यवस्थितपणे ठेवले नाही.

५. रात्री झोपण्यापूर्वी संगणक बंद केला नाही. त्यामुळे तो रात्रभर सुरू राहिला.

अयोग्य विचारांची उदाहरणे

१. आज सायंकाळी १० मिनिटांसाठी काही कामानिमित्त मला आश्रमातून बाहेर जायचे होते. माझ्या चपला आश्रमाच्या मागील बाजूस ठेवल्या होत्या. त्या वेळी मी तर १० मिनिटांतच परत येणार आहे, मग दुसर्‍याच्या चपला त्याला न सांगता घातल्या, तरी चालतील, असा विचार माझ्या मनात आला.

२. सकाळी ६ वाजता नामजप करतांना उद्या मला खरेदी करण्यासाठी जायचे आहे. कार्यालयातून घरी येण्यापूर्वी बँकेत गेले, तर बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; म्हणून कार्यालयात जाण्यापूर्वीच मला बँकेत जावे लागेल. त्यासाठी उद्या सकाळी घरातून लवकर निघावे लागेल…, असे निरर्थक विचार माझ्या मनात आले.

३. श्रीरामाच्या देवळात प्रथमच सत्संग घेण्यास जातांना पूर्वी मी कधी सत्संग घेतला नाही. त्यामुळे आज मी सत्संगात विषय नीट मांडू शकणार नाही, असा नकारात्मक विचार माझ्या मनात आला.

अयोग्य प्रतिक्रियांची उदाहरणे

१. कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने माझ्या सहकार्‍याचे कौतुक केल्यानंतर मला राग आला. त्या वेळी आम्ही कितीही राबलो, तरी साहेबांना त्याचेच कौतुक जास्त, अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली.

२. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर बाबांनी मोठ्याने ओरडून अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे मला राग आला. त्यानंतर मी अभ्यासिकेत गेलो व रागाने पुस्तके टेबलावर भिरकावली.

३. गणिताचा अभ्यास करतांना या वेळेस गणितात मला कमी गुण मिळतील. कदाचित मी नापासच होईन, अशी भीती मला सातत्याने वाटत होती.

स्तंभ ३ : अयोग्य कृतीचा किंवा अयोग्य प्रतिक्रियेचा कालावधी

अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांच्या कालावधीची नोंद या स्तंभात करावी. प्रक्रियेकरता तीन स्वभावदोष प्राधान्याने निवडण्यासाठी स्वभावदोषांची तीव्रता निश्‍चित करतांना, तसेच प्रक्रियेतील प्रगतीचा आढावा घेतांना या स्तंभातील माहितीचा उपयोग होतो.

अयोग्य कृतीचा कालावधी

स्वतःकडून अयोग्य कृती होणे व ती केल्याची स्वतःला जाणीव होणे यांमधील कालावधीची नोंद या स्तंभात करावी. या कालावधीवरून स्वभावदोषांची तीव्रता ठरवणे व प्रगतीचा आढावा घेणे सुलभ होते. यात पुढील टप्प्यांचा विचार करावा.

१. अयोग्य कृती झाल्यानंतर इतरांनी जाणीव करून देणे

२. अयोग्य कृती झाल्यानंतर स्वतःलाच जाणीव होणे

३. अयोग्य कृती होत असतांना स्वतःला जाणीव होणे

४. अयोग्य कृती घडण्यापूर्वीच स्वतःला जाणीव होणे

५. अयोग्य विचार मनात येताच स्वतःला जाणीव होऊनही अयोग्य कृती होणे

६. अयोग्य विचार मनात येताच स्वतःला जाणीव होऊन योग्य कृती होणे

वरील मुद्दे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तो कालावधी या स्तंभामध्ये लिहावा.

अयोग्य प्रतिक्रियेचा कालावधी

एखादी घटना घडत असतांना अयोग्य विचार किंवा अयोग्य प्रतिक्रिया मनात आल्यानंतर तो किंवा ती आल्याची जाणीव मनाला होईपर्यंतचा, तसेच त्या विचाराचा किंवा प्रतिक्रियेचा परिणाम मनातून नाहीसा होईपर्यंतचा कालावधी या स्तंभात लिहावा, उदा. चिडचिडेपणा, वाईट वाटणे, निराश होणे वगैरे स्वभावदोषांमुळे अयोग्य प्रतिक्रिया मनात येऊन ती नाहीशी होईपर्यंतचा कालावधी.

स्तंभ ४ : स्वभावदोष

प्रत्येक अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांचा अभ्यास करतांना स्वतःच्या मनाला स्वतःच प्रश्‍न विचारल्यानंतर मिळणार्‍या उत्तरांच्या निष्कर्षातून स्वभावदोष शोधून त्याची किंवा त्यांची नोंद या स्तंभात करावी.

स्तंभ ५ : योग्य कृती किंवा योग्य प्रतिक्रिया यांबद्दल सूचना

अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांना कारणीभूत असलेला स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रसंगानुरूप योग्य किंवा आदर्श कृती व योग्य किंवा आदर्श प्रतिक्रिया यांचा विचार करून स्वयंसूचना तयार करणे

स्तंभ ६ : दिवसभरात केलेल्या अभ्याससत्रांची संख्या

दिवसभरात केलेल्या अभ्याससत्रांची संख्या या रकान्यात वेळेनुसार लिहावी.

स्तंभ ७ : प्रगती

प्रक्रियेला सुरुवात केल्यापासून प्रक्रियेतील सर्व टप्पे नियमितपणे व प्रामाणिकपणे अमलात आणल्यामुळे स्वभावदोष कमी होतात. प्रक्रियेतील प्रगतीचा आढावा घेतांना  स्वतः, तसेच इतरांकडून प्रगतीचा आढावा घेऊन प्रगतीविषयी सूचना देणे. या स्तंभात एखाद्या स्वभावदोषात झालेल्या प्रगतीचा उल्लेख दिनांक व स्वभावदोष यांनुसार करावा, उदा. १०.४.२००६ रोजी एखादी व्यक्ती चहा पिऊन झाल्यानंतर पेला धुण्यास विसरल्यामुळे दुसर्‍या व्यक्तीने तिला आठवण करून दिली असेल, तर विसराळूपणा हा स्वभावदोष दूर करण्यासाठी स्वयंसूचना देण्यास सुरुवात केल्यानंतर १८.४.२००६ रोजी त्या व्यक्तीला चहा पिऊन झाल्यानंतर पेला धुवून न ठेवताच जात असतांना स्वतःची चूक लक्षात आल्यास तिने स्तंभ १ मध्ये १८.४.२००६, स्तंभ ४मध्ये विसराळूपणा, तर प्रगतीच्या स्तंभात चहा पिऊन झाल्यानंतर पेला धुण्यास विसरून जात असतांनाच मी पेला धुण्यास विसरलो आहे, याची मला स्वतःलाच जाणीव झाली, असे लिहावे.

मात्र हाच प्रसंग पुन्हा घडल्यास ही कृती प्रगतीच्या स्तंभात न लिहिता अयोग्य कृतीच्या स्तंभातील स्वतःला कळलेली या रकान्यात लिहावी. त्यासोबत तक्त्यातील अन्य रकान्यांमध्ये दिनांक, स्वभावदोष, कालावधी व सूचना हा तपशीलही लिहावा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `स्वभावदोष-निर्मूलन : खंड २’

Leave a Comment