जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमनच झाले. स्वतः भगवंत त्यांना नेण्याकरिता वैकुंठाहून आले आणि त्यांना सदेह वैकुंठात घेऊन गेले. हे त्रिवार सत्य आहे; पण काही पुरोगामी लोक, हिंदु धर्म विध्वंसक संघटना, हे ‘तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसून त्यांचा खून करण्यात आला’, असा अपप्रचार करत आहेत. त्यांचा हेतू ब्राह्मण आणि मराठा या दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करणे, हाच आहे. या धर्मद्रोह्यांच्या अपप्रचाराचा आणि खोटारडेपणाचा भांडाफोड धर्मग्रंथांतील काही दाखले देऊन या लेखाद्वारे केला आहे.
१. तुकाराम महाराजांचा छळ करणारे रामेश्वर भट झाले तुकोबांचे शिष्य !
नाब्रह्म क्षत्रमृध्नोति ना क्षत्रं ब्रह्म वर्धते ।
ब्रह्म क्षत्रं च सम्पृक्तम् इह चामुत्र वर्धते ॥ – मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३२२
अर्थ : ब्राह्मतेजाविना क्षात्रतेज वाढू शकत नाही आणि क्षात्रतेजाविना ब्राह्मतेज वाढू शकत नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले, तर त्यांचा या लोकी, तसेच परलोकीही उत्कर्ष होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय जर एकत्र आले, तर ते दोघे मिळून वनेच्या वने जाळणार्या अग्नीप्रमाणे शत्रूंना जाळून टाकतील.
महाभारतात असे सांगितलेे आहे की,
ब्रह्म क्षत्रेण संसृष्टं क्षत्रं च ब्रह्मणा सह ।
उदीर्णौ दहतः शत्रून् वनानीवाग्निमारुतौ ॥ – महाभारत, पर्व ३, अध्याय २७, श्लोक १०
अर्थ : वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील.
याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत; म्हणजे ब्राह्मण आणि मराठे यांत द्वेष निर्माण करत आहेत. त्या नास्तिक लोकांनी हेही समजून घ्यायला हवे की, जे रामेश्वर भट यांनी तुकाराम महाराजांचा छळ केला, तेच रामेश्वर पुढे संत तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. ते म्हणतात की, ‘संत तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेव यांची तुलना केली असता –
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणी मस्तक ठेविलें ॥ आरती तुकारामा ॥
म्हणजे ‘तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेव तुलनेमध्ये सारखे आहेत’, अशी स्तुती रामेश्वर भट यांनी केली; पण त्यांनी तुकाराम महाराजांचा ‘खून केला’, असा अपप्रचार केला जात आहे.
१ अ. संत तुकाराम महाराजांच्या शिष्यापैकी नऊ शिष्य ब्राह्मण असणे
एका धर्मविरोधकाने ‘तुकाराम महाराजांचा खून रामदासी ब्राह्मणांनी केला’, असे पुस्तकच लिहिले. संत तुकाराम महाराजांच्या शिष्यांपैकी ९ शिष्य ब्राह्मण होते.
१. महादजीपंत देहूकर (टाळकरी)
२. गंगाराम मवाळ कडूरकर (टाळकरी)
यांचे आडनाव ‘महाजन’ होते; पण त्यांचा स्वभाव मवाळ होता; म्हणून तुकाराम महाराजांनी उपनाव ‘मवाळ’ ठेवले होते.
३. कोंडोपंत लोहकरे पुणेकर (टाळकरी)
हे तुकोबांच्या अभंगात ध्रुपदाची साथ करत. यांनी तुकाराम महाराजांना काशीस जाण्यासाठी साहाय्य मागितले. तेव्हा तुकोबांनी साहाय्य केले. आपले तीन अभंग भागीरथी, विश्वेश्वर आणि विष्णुपद यांना अर्पण करण्यास सांगितले.
४. अंबाजीपंत लोहगावकर (टाळकरी)
हे लोहगावचे जोशी-कुलकर्णी होते. हे एकदा मध्यरात्री कीर्तन ऐकत असता त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या पत्नीने पोराचे प्रेत तुकोबांच्या समोर आणून टाकले, त्या वेळी तुकोबांनी देवाची विनवणी केली आणि मुलाला जिवंत केले.
५. संत बहिणाबाई
यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या स्वत: ब्राह्मण असूनही यांनी अधर्मी ब्राह्मणांवर प्रखर टीका केली आहे. ‘खरा ब्राह्मण कोण ?’ ‘ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण !’, अशी सडेतोड टीका ब्राह्मणांवर केली. त्यामुळे ज्याने तुकोबांना त्रास दिला, त्या मंबाजीने बहिणाबाईंनादेखील त्रास दिला होता. त्यांची गायदेखील घरात कोंडून ठेवली. याचा अर्थ असा आहे की, मंबाजी हा कपटी आणि वर्चस्ववादी होता, ज्याने तुकोबांसमवेतच ब्राह्मणांनाही छळले.
६. रामेश्वर भट
मंबाजी भट यांच्या बोलण्यात येऊन तुकोबांचा कट्टर वैरी झाला होता. इतके कट्टर की, त्यांनी तुकोबांची गाथा नदीत बुडवण्याची आज्ञा केली; पण पुढे तुकोबांचे थोरपण समजल्यावर त्याला पश्चात्ताप झाला. त्याला दृष्टांत झाला की, संत तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांचे अवतार आहेत. त्यामुळे रामेश्वर भट हे पुढे संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य झाले.
७. कचेश्वर ब्रह्मे
८. मल्हारपंत कुलकर्णी-चिखलीकर
९. निळोबाराय पिंपळनेरकर
यांनी तुकोबांची स्तुती करणारे जवळपास ७३३ अभंग लिहिले.
याप्रमाणे तुकोबारायांचे हे ९ शिष्य ब्राह्मण होते. ब्राह्मण तुकोबारायांचा खून कसे करतील ? यावरून लक्षात येते की, तुकोबांना मूठभर ब्राह्मणांकडून विरोध झाला; परंतु नंतर ब्राह्मण त्यांचे शिष्य झाले होते. तुकोबारायांचा खून झाला नसून त्यांचे सदेह वैकुंठगमनच झाले.
२. विमानाद्वारे सदेह वैकुंठगमनाचे पौराणिक संदर्भ
काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने तुकाराम महाराजांचा खून झाला, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले.
२ अ. वैकुंठगमनाचे तत्कालीन संतांनी लिहिलेले अभंग
१. सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥
– संत तुकाराम
२. माझ्या भावे केली जोडी । नजरेशी कल्प कोडी ॥
आणियेले धाडी । आणिले अवघे वैैकुंठ॥ – संत कान्होबा
३. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनि । गेला तो विमानी बैसोनिया ॥ – रामेश्वर भट्ट
४. सांगोनिया गेले वैकुंठासी लोला । धन्य भाग्य तुका देखियेला ॥
प्रयाण काळी देवे विमान पाठविले ।
कलीच्या कालामाजी अद्भुत वर्तविले ।
मानव देह घेऊनी निजधामी गेले। निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥
– संत निळोबाराय
असे वैकुंठगमनाचे सहस्रो अभंग असतांना तुम्ही खून कशावरून ठरवता ?
२ आ. श्रीमद्भागवतात आलेले वैकुंठाचे वर्णन
‘संत तुकाराम महाराज वैकुंठगमन कि खून’ या पुस्तकात सुदाम सावरकर म्हणतात, ‘‘या जगात वैकुंठच नाही.’’ वैकुंठाचे वर्णन हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांत आलेले आहे. श्रीमद्भागवतातील तिसर्या स्कंदात १५ व्या अध्यायात १३ ते ५० या श्लोकांमध्ये वैकुंठाचे वर्णन आहे. त्यामुळे सुदाम सावरकरांचे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण आहे.
१. त एकदा भगवतो वैकुण्ठस्यामलात्मनः ।
ययुर्वैकुण्ठनिलयं सर्वलोकनमस्कृतम् ॥ – श्रीमद्भागवत, स्कंध ३, अध्याय १५, श्लोक १३
अर्थ : एकदा ते (सनकादी ऋषि) भगवान श्रीविष्णूच्या पवित्र अशा वैकुंठलोकाला गेले. हा वैकुंठलोक सर्वांना वंदनीय आहे.
काही नास्तिक म्हणतात की, त्या वेळी विमान होते का ? विमानाचे वर्णनसुद्धा भागवतात आहे. ते असे की,
२. वैमानिकाः सललनाश्चरितानि शश्वद् । – श्रीमद्भागवत, स्कंध ३, अध्याय १५, श्लोक १७
अर्थ : श्रीविष्णूच्या वैकुंठ लोकातील पार्षद त्यांच्या स्त्रियांसह विमानाने भ्रमण करत होते.
३. तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनाचे साक्षीदार
संत कान्होबा, रामेश्वर भट, वाघोलीकर, दासनामा शिंपी, गंगाधर मवाळ कडूसकर, संताजी जगनाडे तेली सुदुंबरे, नावजी माळी देहूकर, गवरशेठ वाणी सुंदुकारेकर, शिवाजी कासार लोहगावकर, कोंड पाटील लोहगावकर, मालजी गाडे, येलवाडीकर, मल्हारपंत चिखलीकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, महंत कचेश्वर ब्रह्मे, नारायणबुवा देहूकर, बाळाजी जगनाडे, एवढे सारे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाच्या वेळी उपस्थित होते.
तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥ १ ॥
धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ॥ २ ॥
जळी दगडासहित वह्या । तारियेल्या जैश्या लाह्या ॥ ३ ॥
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा । तुका विष्णु नाही दुजा ॥ ४ ॥
– ह.भ.प. शुभम महाराज वक्ते (ह.भ.प. वक्ते महाराज यांचे सुपुत्र), पंढरपूर.