कुशीनगर (उत्तरप्रदेश) – आज भारतीय संविधानातील ‘सेक्युलर’ या शब्दाद्वारे राज्यव्यवस्थेतील मंडळी हिंदूंची गळचेपी करतात किंवा माध्यमांतील स्वयंघोषित बुद्धीजिवी हिंदूंवर वैचारिक अन्याय करतात. प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘लौकिकवाद’ असे विविध प्रकारचे अर्थ आज अनेकांनी काढले आहेत. भारतीय संविधानातून ‘सेक्युलर’ हा अर्थहीन शब्द हटवून त्या स्थानी ‘सनातन धर्माधिष्ठित’ हा शब्द घालण्यात यावा, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे. ‘सध्याचे केंद्र सरकार पुरुषार्थी आणि बहुमतात आहे’, असे म्हटले जात आहे, तर त्याने घटनेतीलच ‘अनुच्छेद ३६८’चा उपयोग करून हे धाडस दाखवावे, म्हणजे भारतात हिंदु राष्ट्र स्थापनेचा संविधानिक मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. कुशीनगर येथे ‘सेक्युलरवाद आणि त्यामुळे झालेली हानी’, या विषयावर आयोजित मार्गदर्शनामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी.एन्. श्रीवास्तव होते, तसेच समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचलन कुशीनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामजीलाल मिश्र यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सेक्युलर’ ही ख्रिस्ती संकल्पना आहे. युरोपमध्ये ख्रिस्ती कॅथोलिक, प्रोटेस्टंट, प्रिस्बेरिअन, ऑर्थोडॉक्स आदी नाना उपपंथांमध्ये विभागले आहेत. त्यांचा एकमेकांमधील धार्मिक आणि नागरी संघर्ष संपवण्यासाठी युरोपीय देशांनी लौकिक म्हणजे नागरी कायदे ‘सेक्युलर’ असतील, तर पारलौकिक म्हणजे धार्मिक कायदे देशाने राजमान्यता दिलेल्या विशिष्ट उपपंथाचे असतील, अशी व्यवस्था निर्माण केली. ही युरोपीय संकल्पना भारतात अनावश्यक असतांना भारतीय अशिक्षित राज्यकर्त्यांनी वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात आणि विरोधी पक्ष कारावासात असतांना पाशवी बहुमताच्या जोरावर ४२ वी घटनादुरुस्ती करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ‘सेक्युलर’ शब्द घातला. जर हा शब्द घालता येतो, तर संसदीय अधिकारांचा उपयोग करून काढताही येतो. ही सारी वस्तूस्थिती भारतातील तथाकथित सेक्युलरवाद्यांना सांगण्याची आज आवश्यकता आहे.’’