‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते अन् चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला, तर ‘खग्रास चंद्रग्रहण’ होते. माघ पौर्णिमा म्हणजे ३१.१.२०१८ या दिवशी चंद्रग्रहण होते. हे ग्रहण भारतात सर्वत्र ‘खग्रास’ दिसणारे ग्रहण होते. ग्रहणकालात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. ‘ग्रहणाचा सर्वसामान्य व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतो’, हे आपल्याला ज्ञात आहे. ‘ग्रहणाचा ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या पदांवरील (विविध आध्यात्मिक पातळीच्या) संतांवर (टीप) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा वापर करण्यात आला. ३१.१.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
टीप – संतांची आध्यात्मिक पातळी : ‘निर्जीव वस्तू म्हणजे शून्य टक्का आणि ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी’, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्चित करता येते. कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्यांना ‘संत’ म्हणतात. आध्यात्मिक पातळी ७० ते ७९ टक्के असणार्यांना ‘गुरु’, ८० ते ८९ टक्के असणार्यांना ‘सद्गुरु’ आणि ९० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्यांना ‘परात्पर गुरु’ म्हणतात.’
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ग्रहणारंभापूर्वी, ग्रहणारंभानंतर, ग्रहणमध्यानंतर, ग्रहणमोक्षानंतर आणि ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान केल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
(वाचकांच्या माहितीसाठी : ३१.१.२०१८ या दिवशी झालेल्या चंद्रग्रहणाच्या संदर्भातील सूत्रे २९.१.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.)
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’, ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन
२ अ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासंदर्भात केलेली निरीक्षणे अन् त्यांचे विवेचन
२ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये पूर्ण प्रयोगात नकारात्मक ऊर्जा मुळीच न आढळणे
पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ग्रहणापूर्वी, ग्रहणारंभानंतर, ग्रहणमध्यानंतर, ग्रहणमोक्षानंतर आणि ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान केल्यानंतर ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत.
२ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
२ अ २ अ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणारंभानंतर थोडी वाढणे, ग्रहणमध्यानंतर थोडी घटणे आणि ग्रहणमोक्षानंतर पुन्हा थोडी वाढणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले या तिघांमध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. (‘यू.टी.एस्’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला.) त्यामुळे त्या प्रत्येकातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली. ग्रहणापूर्वी, ग्रहण कालावधीत आणि ग्रहणानंतर प्रत्येक संतांमधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीची स्थिती पुढीलप्रमाणे होती.
१. ‘ग्रहणारंभानंतर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढणे, ग्रहणमध्य झाल्यावर प्रभावळ घटणे आणि ग्रहणमोक्ष झाल्यावर प्रभावळ पुन्हा वाढणे’, अशी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यामधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमधील पालटाची प्रक्रिया ग्रहणामुळे दिसून आली. ऊर्जेच्या प्रभावळीमधील पालटाची अशीच प्रक्रिया सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्येही दिसून आली; पण पालट होण्याचे प्रमाण प्रत्येकामध्ये वेगवेगळे होते.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांचीही सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणमध्य झाल्यावर ग्रहणापूर्वी होती त्याच्यापेक्षाही न्यून झाली. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यासंदर्भातही तसेच दिसून आले; पण सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणमोक्ष झाल्यावर पुष्कळ प्रमाणात वाढली. तेवढी वाढ ग्रहणमोक्षानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या संदर्भात दिसून आली नाही. ग्रहणमोक्षानंतर केलेल्या सचैल स्नानानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम या दोघांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ थोड्या प्रमाणात न्यून झाली.
३. ग्रहणमध्य झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमधील घट अगदी थोडी होती. या तुलनेत त्या वेळी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमधील घट पुष्कळ प्रमाणात होती.
२ अ ३. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
२ अ ३ अ. ग्रहणारंभानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची प्रभावळ थोडी न्यून होणे, तर सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रभावळ थोडी वाढणे, ग्रहणमध्यानंतर तिन्ही संतांची प्रभावळ न्यून होणे अन् ग्रहणमोक्षानंतर तिन्ही संतांची प्रभावळ पुन्हा वाढणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. ग्रहणाचा प्रत्येक संतांवर कसा परिणाम झाला, ते आता आपण पाहू.
१. ग्रहणामुळे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची प्रभावळ न्यून होत गेली आणि ग्रहणमोक्ष झाल्यानंतर ती वाढली.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांची प्रभावळ ग्रहण आरंभ झाल्यावर वाढली आणि ग्रहणमध्य झाल्यावर ग्रहणाच्या अधिकतम प्रभावामुळे न्यून झाली.
३. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रभावळ ग्रहणारंभानंतर थोडी वाढली आणि ग्रहणमध्य झाल्यावर थोडी न्यून झाली.
४. ग्रहणमोक्ष झाल्यावर सर्वच संतांची प्रभावळ वाढली.
३. निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. ग्रहणकाळात अनिष्ट शक्तींकडून प्रक्षेपित होणार्या नकारात्मक स्पंदनांशी लढण्यासाठी संतांमधील सकारात्मक ऊर्जा कार्यरत झाल्यामुळे संतांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ग्रहणारंभानंतर थोडी वाढ होणे
ग्रहणारंभ झाल्यावर निर्माण झालेले वातावरण अनिष्ट शक्तींना पोषक बनते. त्यामुळे त्या वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार पुष्कळ वाढतो. त्यांच्याकडून त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होत असल्याने वातावरण दूषित बनते. त्यामुळे ग्रहणकाळात वनस्पती, पशू-पक्षी, मानव, अन्न यांवर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होतो. अशा वेळी सृष्टीतील जिवांचे रक्षण होण्यासाठी ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांमधील सकारात्मक ऊर्जेचा वातावरणातील अनिष्ट शक्तींशी लढण्यासाठी आवश्यकतेनुसार उपयोग होतो. हे कार्य संत प्रत्यक्षपणे करत नसून त्यांच्याकडून ते अप्रत्यक्षपणे आपोआपच होते. ईश्वरच त्यांच्या माध्यमातून ते घडवून आणतो. त्या वेळी संतांमधील सकारात्मक ऊर्जा आवश्यकतेनुसार अधिक प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळे ग्रहणारंभानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत थोडी वाढ झालेली दिसून आली.
३ आ. ग्रहणमध्यापर्यंत अनिष्ट शक्तींचा जोर सर्वाधिक झाल्याने त्यांच्याशी लढण्यात संतांमधील सकारात्मक ऊर्जा, तसेच त्यांच्या स्वतःच्या प्रभावळीमधील ऊर्जा आवश्यक त्या प्रमाणात उपयोगात आणली जाणे
चंद्रग्रहणाची खग्रास स्थिती होईपर्यंत, म्हणजेच ग्रहणमध्यापर्यंत अनिष्ट शक्तींना वातावरण अधिकाधिक अनुकूल होत गेल्याने त्यांचा जोर वाढत जातो. ग्रहणमध्य असतो, तेव्हा वातावरणातील अनिष्ट शक्तींचा त्रास सर्वाधिक झाल्यामुळे संतांमधील सकारात्मक ऊर्जा अनिष्ट शक्तींशी लढण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात उपयोगात आणली गेली. तसेच त्यांच्या प्रभावळीमधील शक्तीही अनिष्ट शक्तींशी लढण्यासाठी उपयोगात आणली गेली. त्या वेळचा लढा सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्तरांवर असल्याने अनुक्रमे सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळीमधील ऊर्जा दोन्ही उपयोगात आणल्या गेल्या. त्यामुळे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच त्यांची स्वतःची प्रभावळ या दोन्ही ग्रहणमध्यानंतर न्यून झालेल्या दिसून आल्या.
३ इ. ग्रहणमोक्षानंतर अनिष्ट शक्तींचा जोर अल्प होऊन सूक्ष्मातील युद्ध न्यून झाल्याने पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढणे; पण अनिष्ट शक्तींमुळे दूषित झालेल्या वातावरणाची शुद्धी होण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या प्रभावळीमधील ऊर्जा वापरली गेल्याने ती ग्रहणापूर्वीपेक्षा न्यून असणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सकारात्मक ऊर्जा वातावरण शुद्धीसाठी वापरली गेल्याने ती ग्रहणमध्यानंतर असलेल्या ऊर्जेपेक्षा थोडी न्यून असणे
जसे ग्रहण सुटत गेले, तसा अनिष्ट शक्तींचा जोर न्यून होत गेला; कारण त्यांना असलेली वातावरणातील अनुकूलता न्यून होत गेली. त्यामुळे ग्रहणमोक्षानंतर सूक्ष्मातील युद्धाचा प्रभावही न्यून झाला. त्यामुळे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली (पू. गाडगीळ – ग्रहणमध्यानंतर १.८८ मीटर, ग्रहणमोक्षानंतर २.१२ मीटर आणि सद्गुरु सत्यवान कदम – ग्रहणमध्यानंतर २.०८ मीटर, ग्रहणमोक्षानंतर २.९० मीटर), तसेच त्या दोघांची स्वतःची प्रभावळही वाढली. (पू. गाडगीळ – ग्रहणमध्यानंतर २.६२ मीटर, ग्रहणमोक्षानंतर ३.२० मीटर आणि सद्गुरु सत्यवान कदम – ग्रहणमध्यानंतर ३.४६ मीटर, ग्रहणमोक्षानंतर ३.५० मीटर) त्या दोघांची ग्रहणमोक्षानंतर असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणाच्या पूर्वी जेवढी होती, त्याच्यापेक्षा थोडी अधिक होती. (पू. गाडगीळ – ग्रहणापूर्वी २.०३ मीटर, ग्रहणमोक्षानंतर २.१२ मीटर आणि सद्गुरु सत्यवान कदम – ग्रहणापूर्वी २.५७, ग्रहणमोक्षानंतर २.९० मीटर) असे असले, तरीही ग्रहणमोक्षानंतर त्या दोघांची स्वतःची प्रभावळ ग्रहणाच्या पूर्वी जेवढी होती, तेवढी वाढली नाही. (पू. गाडगीळ – ग्रहणापूर्वी ३.६७ मीटर, ग्रहणमोक्षानंतर ३.२० मीटर आणि सद्गुरु सत्यवान कदम – ग्रहणापूर्वी ३.७०, ग्रहणमोक्षानंतर ३.५० मीटर) यावरून लक्षात येते की, ग्रहण संपले, तरी अनिष्ट शक्तींमुळे दूषित झालेल्या वातावरणाची शुद्धी होण्यासाठी त्या दोन्ही संतांच्या प्रभावळीमधील ऊर्जा उपयोगात आणली जात होती. ग्रहणमोक्षानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ थोडी घटली होती (ग्रहणमध्यानंतर ९.४० मीटर आणि ग्रहणमोक्षानंतर ९.२० मीटर); पण त्यांची स्वतःची प्रभावळ वाढली होती. (ग्रहणमध्यानंतर १७.९० मीटर आणि ग्रहणमोक्षानंतर १८.११ मीटर) यावरून लक्षात येते की, त्या वेळी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वातावरणाची शुद्धी होण्यासाठी उपयोगात आणली जात होती.
३ ई. सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळ यांचा अर्थ अन् त्यांचे कार्य
३ ई १. सकारात्मक ऊर्जा
‘एखाद्या सजीव (व्यक्ती, पशू-पक्षी, वनस्पती इत्यादी) किंवा निर्जीव घटकातील सकारात्मक ऊर्जा ही त्याच्यातील आध्यात्मिक कार्य करणारी सगुण स्तरावरील ऊर्जा असते. ही ऊर्जा त्या घटकाची सात्त्विकता किंवा आध्यात्मिक पातळी यांवर अवलंबून असल्याने ती प्रत्येक घटकामध्ये असतेच असे नाही. निर्जीव घटकामध्ये सकारात्मक ऊर्जा ‘तो घटक कशापासून बनला आहे ?’, त्याचा आकार आणि त्याच्या भोवतीचे सात्त्विक वातावरण यांवर अवलंबून असते. सजीव घटकामध्ये त्या घटकातील सात्त्विकता आणि त्याच्या भोवतीचे सात्त्विक वातावरण यांवर अवलंबून असते. एखाद्या घटकावर त्रासदायक शक्तीचे आक्रमण झाल्यास प्रथम त्या घटकातील सकारात्मक ऊर्जा उपयोगात आणली जाते. त्या वेळी घटक सजीव असल्यास त्रासदायक शक्तीशी लढण्यासाठी तो कार्यरत झाल्याने त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकते; पण घटक निर्जीव असल्यास तो प्रत्यक्ष कार्यरत होत नसल्याने त्रासदायक शक्तीशी लढण्यासाठी त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकत नाही. एखादा घटक सात्त्विक वातावरणामध्ये असल्यास तो त्या वातावरणाने भारित झाल्याने त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. थोडक्यात वर्तमान स्थितीशी देवाण-घेवाण करते, ती सकारात्मक ऊर्जा. ही चल ऊर्जा आहे.
३ ई २. प्रभावळ
प्रत्येक घटकाला प्रभावळ ही असतेच. प्रभावळ ही त्या घटकाचे कवच असते. सर्वसाधारण घटकाची (सजिवाची किंवा निर्जिवाची) प्रभावळ साधारण १ मीटर असते. एखाद्या सजीव किंवा निर्जीव घटकाची प्रभावळ ही त्याच्यातील कार्यरत ऊर्जा आणि अकार्यरत ऊर्जा यांचे एकूण मोजमाप असते. ही अधिकतर निर्गुण स्तराची ऊर्जा असते. जसा आध्यात्मिक स्तर किंवा सात्त्विकता वाढत जाते, तशी प्रभावळ वाढत जाते. एखाद्या व्यक्तीची साधनेमुळे अधिकाधिक होत गेलेली प्रभावळ ही त्या व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांना साधनेमुळे आलेली स्थिरता, म्हणजेच अधिकाधिक मनोलय आणि बुद्धीलय झाल्याचे दर्शवते. जसा एखाद्या सात्त्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये सकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो, तसा असात्त्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो. एखाद्या घटकावर त्रासदायक शक्तीचे आक्रमण झाल्यास लढण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे त्याच्या प्रभावळीतून, म्हणजे ऊर्जेच्या मूळ साठ्यातून ऊर्जा पुरवली जाते, म्हणजेच अकार्यरत ऊर्जेचे कार्यरत ऊर्जेत रूपांतर होते.’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
३ उ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रभावळ पाचपटींनी अधिक असण्याचे कारण
पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यापेक्षा सद्गुरु सत्यवान कदम यांची प्रभावळ थोडी अधिक आहे. या दोन्ही संतांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रभावळ अनुमाने पाच पटींनी अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘तिन्ही संतांच्या आध्यात्मिक पातळीमध्ये असलेला भेद’ हे होय. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘गुरु’पदावरील, सद्गुरु सत्यवान कदम हे ‘सद्गुरु’पदावरील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील चैतन्य आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचे प्रमाण उत्तरोत्तर अधिक आहे.
गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यातील भेद पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येईल
टीप १ – शक्तीच्या स्पंदनांपेक्षा आनंदाची स्पंदने १० लक्षपटींनी सूक्ष्म आहेत आणि आनंदाच्या स्पंदनांपेक्षा शांतीची अनुभूती अनंतपटींनी सूक्ष्मतम आहे; म्हणून सूक्ष्मातील कळायला लागल्यावर साधकाला प्रथम शक्तीच्या, पुढे आनंदाच्या आणि सर्वांत शेवटी शांतीच्या पातळीच्या गुरूंची ओळख पटते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)
३ ऊ. सचैल स्नानानंतर केलेल्या निरीक्षणातून ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या तिन्ही संतांमधील भेद लक्षात येणे
१. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सचैल स्नान केल्यावर त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणमोक्षानंतर असलेल्या त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीपेक्षा थोडी न्यून झाली आणि ती ग्रहणापूर्वी होती, तेवढी झाली. तसेच तेव्हा त्यांची स्वतःची प्रभावळ ग्रहणमोक्षानंतर जेवढी होती, तेवढीच राहिली.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीवर सचैल स्नानाचा तसाच परिणाम झाला; पण तेव्हा त्यांची स्वतःची प्रभावळ आधीपेक्षा वाढली होती.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सचैल स्नान केल्यावर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली होती आणि त्यांची स्वतःची प्रभावळही वाढली होती.
असा वेगवेगळा परिणाम तिन्ही संतांवर दिसून आला. याचे कारण पुढीलप्रमाणे आहे.
ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान करण्याचे कारण म्हणजे ग्रहणाचा अनिष्ट परिणाम व्यक्तीने घातलेल्या कपड्यांवर, तसेच व्यक्तीवर टिकून राहिला असेल, तर तो निघून जावा; पण सामान्य व्यक्तीप्रमाणे संतांच्या कपड्यांवर, तसेच त्यांच्या स्वतःवर ग्रहणाचा त्रासदायक परिणाम टिकून रहात नाही, हे वरील निरीक्षणांवरून लक्षात येते. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘गुरु’ पदावरील संत असल्याने ते ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ यांच्या तुलनेत सूक्ष्मातील युद्धात अधिकतम सगुण स्तरावर लढत असल्याने ग्रहणमोक्षानंतर त्यांचे कार्य संपल्यामुळे सचैल स्नानानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ग्रहणापूर्वी जेवढी होती, तेवढी पुन्हा झाली. पाणी हे वाईट आणि चांगली स्पंदने वाहून नेण्याच्या संदर्भात सर्वसमावेशक असल्याने पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील ज्यादा असलेली सकारात्मक ऊर्जा वाहून गेली. तसाच परिणाम सद्गुरु सत्यवान कदम यांच्यावर झाला; पण ते ‘सद्गुरु’ पदावर असल्याने आणि थोडेफार निर्गुण स्तरावर लढा देत असल्याने त्यांची स्वतःची प्रभावळ सचैल स्नानानंतर ग्रहणाचा अनिष्ट परिणाम दूर करण्यासाठी वाढली. या दोन्ही संतांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावर असल्याने आणि ते अधिकतम निर्गुण स्तरावर सूक्ष्मातील लढा देत असल्याने ग्रहणाचा अनिष्ट परिणाम दूर करण्यासाठी सचैल स्नानानंतर त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच त्यांची स्वतःची प्रभावळ या दोन्ही वाढल्या.
थोडक्यात सांगायचे तर, ग्रहणाचा सामान्य व्यक्ती, वनस्पती, पशू-पक्षी इत्यादींवर अनिष्ट परिणाम होतो, तसा संतांवर होत नाही. संत त्यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे जीवसृष्टीचे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि हेच या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.२.२०१८)
ई-मेल : [email protected]
(‘ग्रहणाचा वाईट शक्तींचा त्रास असलेला साधक आणि त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम’, या संदर्भातील संशोधनात्मक लेख वाचा पुढील रविवारच्या अंकात !)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.