सनातन संस्था या प्रकरणी अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करण्याविषयी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत एका कथित संघ स्वयंसेवकाने सनातन संस्थेवर जात्यंध टीका केली. ‘रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य अशी टीका करणार नाहीत’, असा सनातन संस्थेला विश्वास आहे. त्यामुळे संस्थेने त्यांनाही याविषयी खुलासा पाठवण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे. संस्थेविषयीची ही जात्यंध आणि सनातनची अपकीर्ती करणारी टीका सामाजिक प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत आहे. त्यामुळे या टिकेचे खंडण वाचकांसाठी येथे देत आहोत.
एका तथाकथित स्वयंसेवकाने केलेली टीका !
एका तथाकथित स्वयंसेवकाने श्री. मनमोहन वैद्य यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत श्री. वैद्य यांनी सनातनवर पुढील टीका केल्याचे व्हॉट्सअॅप द्वारे कळवले आहे.
‘एक गोष्ट माझ्याकडून स्टँप पेपरवर लिहून घ्या. सनातन संस्थेचे वेडे चाळे, मूर्खांचा बाजार हा एक दिवस ब्राह्मणांच्या मुळावर उठणार आहे. इतर जातीच्या लोकांना बोट दाखवायला जागा राहील की, ‘हे बघा ! ब्राह्मण लोक !’ खरं तर सुशिक्षित ब्राह्मण हा या मूर्खपणावर विश्वास ठेवतच नाही. याकरिता रा.स्व. संघ सनातनला भीक घालत नाही.’
खंडण
१. सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला ‘वेडे चाळे, मूर्खांचा बाजार’, असे संबोधणे हा सनातनद्वेषच !
२. सनातन संस्थेचे कार्य अध्यात्मप्रसाराचे असून ते सर्व जाती, पंथ यांच्यासाठी आहे. ‘ते ब्राह्मणांच्या मुळावर उठणार, इतर जातीच्या लोकांना बोट दाखवायला जागा रहाणार’, असे म्हणणे ही जात्यंधता झाली. सनातन संस्थेचे कार्य म्हणजे ‘ब्राह्मणांचे कार्य’, असे म्हणणे हे सनातन संस्थेविषयीचे घोर अज्ञानच ! सनातन संस्थेमध्ये अनेक सुशिक्षित त्यांची नोकरी, व्यवसाय बंद करून पूर्णवेळ झोकून देऊन सेवा करत आहेत. त्यामुळे ‘सुशिक्षित विश्वास ठेवतच नाहीत’, असे म्हणणे द्वेषमूलकच आहे.
३. सनातन प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी कार्य करत नाही. समाजाला आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सनातन संस्था करते. आताची पिढी बुद्धीने सर्व गोष्टी समजून घेऊन त्यानुसार कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. ‘त्यांनाही अध्यात्माचे महत्त्व कळावे आणि तेही साधनेकडे वळून त्यांनाही ईश्वरप्राप्ती व्हावी’, या निरपेक्ष आणि उदात्त हेतूने आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक घटनांचे संशोधन करून ते समाजासमोर मांडत आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे ‘कोणी भीक घालावी, महत्त्व द्यावे, प्रसिद्धी मिळावी’, हा सनातन संस्थेचा उद्देशच नाही.