मूर्तीपूजेवरून हिंदूंची हेटाळणी करणारे आणि हिंदु धर्माला बुरसटलेले म्हणून हिणवणारे तथाकथित बुद्धीवादी, विज्ञानवादी आणि नास्तिकवादी यांच्यासाठी हा लेख ही चपराकच आहे ! युरोपातील शास्त्रज्ञांना हिंदूंच्या मूर्तींमागचे वैज्ञानिक रहस्य उलगडते; मात्र जन्महिंदूंना तशी जिज्ञासा नाही, ही शोकांतिका !
‘जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथील ‘दी युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’च्या (‘सर्न’च्या) मुख्य इमारतीबाहेर एक भलीमोठी ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती आहे. भारत सरकारने ती भेट म्हणून या संस्थेला दिली आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढणारे वैज्ञानिक संशोधन ज्या ठिकाणी होत आहे, अशा जागी नटराजाच्या मूर्तीचे काय काम, असा प्रश्न स्वाभाविकपणे कुणालाही पडेल. त्यामागचे कारण विशद करणारा लेख…
१. ‘सबअॅटॉमिक’ कणांच्या वैश्विक नृत्यासाठी शिवशंकराच्या नृत्याचा
रूपक म्हणून वापर केल्यामुळे भारत सरकारकडून नटराजाची मूर्ती ‘सर्न’ला भेट !
‘दी युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’ (सर्न) बाहेरील ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती ताम्रयुगातील कुणा कारागिराने घडवलेली नसून आधुनिक काळातील शिल्पकारांनी कलात्मक रितीने बनवलेली आहे. ही मूर्ती भारत सरकारकडून ‘सर्न’ला देणगी म्हणून देण्यात आली आहे. १८ जून २००४ या दिवशी या दोन मीटर उंचीच्या नटराजाच्या मूर्तीचे अनावरण जिनिव्हातील भारताचे राजदूत के.एम्. चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी भारताचे विख्यात अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि ‘सर्न’चे संचालक डॉ. रॉबर्ट आयमार हे उपस्थित होते. याशिवाय सर्नमध्ये कार्यरत असलेले अनेक शास्त्रज्ञही तेथे उपस्थित होते. भारताचे सर्नशी असलेले घनिष्ठ संबंध साजरे करण्यासाठी भारताकडून ही मूर्ती देण्यात आली. ही नटराजाचीच मूर्ती देणगी म्हणून देण्यामागे भारताची विशिष्ट भूमिका आहे. नटराज म्हणजे शिवशंकराची नृत्यमुद्रा आहे. भगवान शिवशंकराला नृत्य आणि कलेची देवता म्हणूनच आपण जाणतो. ‘सबअॅटॉमिक’ कणांच्या वैश्विक नृत्यासाठी शिवशंकराच्या नृत्याचा रूपक म्हणून जो वापर केला जातो, त्याचा सखोल अर्थ लक्षात घेऊन अत्यंत विचारपूर्वक ही देणगी भारत सरकारने दिली आहे.
२. शिवशंकराचे वैश्विक नृत्य ही ‘द टाओ ऑफ फिजिक्स’
या आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना !
सर्नमधील पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ या कणांविषयीच संशोधन करत आहेत. शिवशंकराचे नृत्य आणि सबअॅटॉमिक कणांचे नर्तन यांची तुलना प्रथम केली, ती फिट्झॉफ काप्रा या लेखकाने त्याच्या ‘द डान्स ऑफ शिवा : द हिंदू व्ह्यू ऑफ मॅटर इन द लाइट ऑफ मॉडर्न फिजिक्स’ या लेखात. हा लेख १९७२ या वर्षी ‘मेन करंट्स इन मॉडर्न थॉट’मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘शिवशंकराचे वैश्विक नृत्य’ हा विषय नंतर काप्रा यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या ‘द टाओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना झाला. हे पुस्तक वर्ष १९७५ मध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर आजतागायत त्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. आतापर्यंत या पुस्तकाच्या ४० आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘सर्न’ प्रयोगशाळेबाहेर बसवण्यात आलेल्या नटराजाच्या मूर्तीशेजारी एक विशेष फलक लावण्यात आला आहे. त्यावर ‘द टाओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकातील शिवशंकराच्या वैश्विक नृत्याविषयीची अवतरणे दिली आहेत. आनंद के. कुमारस्वामी यांनी त्यांच्या पुस्तकात असे म्हटले आहे, ‘‘नटराजाच्या तालबद्ध मूर्तीचे अद्वितीय लावण्य, आकर्षकता आणि शक्ती यांच्या पलीकडे जाऊन बघितल्यास देवाच्या अस्तित्वाची स्वच्छ कल्पना यातून येते, ज्याचा कुठलाही धर्म अथवा कला यांनी अभिमान बाळगावा.’’
३. निर्मिती आणि संहार हे चक्र निर्जिवांमध्येही कार्यरत !
अलीकडेच फिट्झॉफ काप्रा यांनी असे मत व्यक्त केले आहे, ‘‘आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्राने हे दाखवून दिले आहे की, निर्मिती आणि संहार यांचे चक्र केवळ ऋतूंच्या पालटातून अथवा जन्म-मरणाच्या चक्रातूनच व्यक्त होते असे नाही, तर निर्जिवांमध्येही तेच तत्त्व आहे. त्यामुळे आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांसाठी आता शिवशंकराचे नृत्य म्हणजे सबअॅटॉमिक कणांचे नृत्य आहे. सहस्रो वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी नृत्य करणार्या शिवाच्या सुंदर मूर्ती ब्रॉन्झमध्ये घडवल्या. आपल्या काळात पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांनी त्या वैश्विक नृत्याची तसबीर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्यासमोर उभी केली आहे. अशा तर्हेने वैश्विक नृत्याच्या रूपकामुळे प्राचीन पुराणकथा, धर्म, कला आणि आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्र यांचे एकीकरण झाले आहे.’’
४. नटराजाची मूर्ती म्हणजे उत्पत्ती-स्थिती-लय यांचा स्रोत एकच असल्याचे सूचक
सर्न येथील प्रयोगशाळेत ‘देवकणां’चे (गॉड्स पार्टिकल) अस्तित्व सिद्ध झाले आहे. या देवकणांच्या अस्तित्वामधूनच निर्मिती, स्थिती आणि लय यांचा स्रोत एकच आहे, असे संकेत मिळत आहेत. हेच सूत्र मोठ्या कलात्मक रितीने या नटराजाच्या मूर्तीतून प्रकट होते. त्यामुळे सर्नच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या नटराजाच्या मूर्तीचे अस्तित्व अर्थपूर्ण ठरले आहे.
५. फिट्झॉफ काप्रा यांच्याकडून कणांची निर्मिती आणि लय यांच्या प्रक्रियेला नृत्याची उपमा !
नटराजाच्या या तांडवनृत्याचा संबंध फिट्झॉफ काप्रांनी मूलकणांशी कसा लावला आहे, ते बघूया. आपल्याभोवतीचे सर्व पदार्थ आणि पर्यायाने त्यातले अणू केवळ तीन मोठ्या कणांनी बनलेले असतात- प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. याशिवाय चौथाही कण आहे, तो म्हणजे फोटॉन. तो वजनरहित असून विद्युतचुंबकीय प्रारणाचे एकक आहे. यापैकी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हे स्थिर कण आहेत. जोपर्यंत त्यांची इतर कणांशी टक्कर होऊन त्यांचा नाश होत नाही, तोपर्यंत अमर्याद काळ ते तसेच रहातील. याउलट, कथा न्यूट्रॉन कणांची आहे. त्यांचे स्वयंप्रेरणेने कोणाशी टक्कर न होताही तुकडे तुकडे होतात. म्हणजे ते ‘डिसइंटिग्रेट’ होतात. या ‘डिसइंटिग्रेशन’ला ‘बिटा डीके’ असे म्हणतात. ही विशिष्ट प्रकारच्या अणूकिरणोत्सर्गाची (रेडिओअॅक्टिव्हिटी) एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये न्यूट्रॉनचे रूपांतर प्रोटॉनमध्ये होते. जोडीला त्यातून एका इलेक्ट्रॉनची आणि एका वजनरहित कणाची निर्मिती होते. त्याला ‘न्युट्रिनो’ म्हणतात. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनप्रमाणेच न्युट्रिनोसुद्धा एक स्थिर कण आहे.
सगळे मूलकण अस्थिर असून अगदी थोड्याच काळात त्यांचा र्हास होतो. अशा अस्थिर कणांचा अभ्यास करणे अत्यंत खर्चिक आहे. ‘पार्टिकल अॅक्सिलरेटर’सारख्या उपकरणामध्ये कणांच्या मुद्दाम टक्करी घडवून आणून त्यांचा माग ‘बबल चेंबर’सारख्या उपकरणात घेतला जातो. कणांच्या या निर्मिती आणि लयाच्या खेळाला अनेकांनी नृत्याची उपमा दिली आहे.
६. हालचाल, लय आणि ताल हे लपदार्थाचे
महत्त्वाचे गुणधर्म असल्याचे आधुनिक भौतिकशास्त्राकडून स्वीकृत
केनेथ फोर्ड नावाच्या लेखकाने त्याच्या ‘द वर्ल्ड ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स’ या पुस्तकात एका अशाच गुंतागुंतीच्या, पण खर्या रेखाचित्राविषयी म्हटले आहे की, प्रत्येक प्रोटॉन कधी ना कधी हा अशी निर्मिती आणि संहाराचा नृत्याविष्कार दाखवतोच. ऊर्जेचे नृत्य किंवा निर्मिती आणि संहाराचे नृत्य असे शब्द वापरणारा फोर्ड हा एकटाच भौतिकशास्त्रज्ञ नाही. फिट्झॉॅफ काप्राच्या म्हणण्याप्रमाणे कणांच्या विश्वातून ऊर्जेचा प्रवाह वाहतांनाचे चित्र डोळ्यासमोर आल्यास कोणाच्याही मनात लय-तालयुक्त नृत्यच डोळ्यासमोर येईल. आधुनिक भौतिकशास्त्राने आपल्याला हेच शिकवले आहे की, हालचाल, लय आणि ताल हे पदार्थाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. पृथ्वीवर असो किंवा अवकाशात – पदार्थ सतत वैश्विक नृत्यात मग्न असतात.
७. वैश्विक नृत्याचे रूपक, हे विज्ञान आणि धर्म यांचे एकत्रीकरण
भूगर्भशास्त्रातही याचे उदाहरण मिळते. पृथ्वीच्या इतिहासात २५ लाख वर्षांमध्ये १७ वेळा हिमयुगे येऊन गेली आहेत. त्या प्रत्येक वेळेला पृथ्वीवर निर्मिती आणि लयाची तितकीच आवर्तने होऊन गेली आहेत. हिंदू समजानुसार, सर्वच जीवन हे एका मोठ्या वैश्विक प्रक्रियेचा म्हणजे निर्मिती आणि संहाराच्या तालबद्ध प्रक्रियेचा भाग असते. शिवाचे तांडव नृत्य हेच दर्शवते. ते केवळ वैश्विक निर्मिती आणि संहाराचेच नव्हे, तर जन्म-मरणाचेही चक्र दर्शवते. या विश्वातील असंख्य सजीव आणि निर्जीव गोष्टी सतत पालटत असतात. म्हणजेच त्या भ्रामक आहेत.
‘‘बबल चेंबर’मध्ये दिसणारे पॅटर्न जे अखंड चाललेल्या वैश्विक नृत्याचे साक्षीदार आहेत, ते म्हणजे आपल्या डोळ्याला दिसू शकणारे शिवाच्या नृत्याचे आधुनिक तंत्राने दाखवलेले रूप ! वैश्विक नृत्याचे रूपक हे प्राचीन पुराणकथा आणि धर्म यांच्या आधारावर तरलेली कला आणि आधुनिक विज्ञान यांचे एकीकरण आहे.’