
भाग्यनगर (हैद्राबाद) – येथे १८ ते २८ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील सनातनच्या ग्रंथांचा समावेश होता. सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनास प्रतिदिन सहस्रो ग्रंथप्रेमींनी भेट दिली. यासह सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात आलेले धर्मशिक्षणाचे फलकही लक्षवेधी ठरले. या ‘बूक फेअर’मध्ये एकूण ३३१ संस्थांचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. ग्रंथप्रदर्शनस्थळी सनातनचे ग्रंथ पाहून जिज्ञासूंनी ‘तुमचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. असे ग्रंथ इतर ‘स्टॉल’वर पहायला मिळत नाहीत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
२. एका जिज्ञासूने ‘तुमचे ग्रंथ इतके सुंदर आहेत की, खरेतर तुम्हाला पहिल्या रांगेत स्थान द्यायला हवे होते’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
३. गेल्या वर्षी ‘बूक फेअर’मध्ये ज्या जिज्ञासूंनी सनातनचे ग्रंथ खरेदी केले होते, त्या जिज्ञासूंनी या वेळी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.
४. ग्रंथ पाहिल्यानंतर अनेकांनी जिज्ञासेने सनातनच्या कार्याविषयी जाणून घेतले.