अखंड भारताची दुर्दैवी फाळणी म्हणजे हिंदु संस्कृतीवरील राजकीय आक्रमणच !

वर्ष १९४६ मधील कॅबिनेट मिशन आराखडा जर स्वीकारला गेला असता, तर भारत आणखीच दुबळा आणि विभागला गेला असता. फाळणी म्हणजे त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ, असा प्रकार होता. काँग्रेस आणि मुस्लिम लीगकडून विसंगत मागण्या येत असतांना मागे फिरण्यात तरी काही अर्थ होता का ? काही लेखकांच्या मते, गांधीजींनी वर्ष १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातून लक्ष काढून ते फाळणीच्या विषयावर केंद्रित केले होते. या आंदोलनामुळे इंग्रज कॉँग्रेसवर नाराज होते आणि म्हणून त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना कारागृहात पाठवले होते. त्याच दरम्यान जिनांना पुरेसा वेळ मिळाला आणि त्यांनी मुस्लिम लीगची संघटनात्मक बांधणी केली. शिवाय ते सत्ताधार्‍यांच्या जवळसुद्धा गेले होते.

१. काँग्रेसने मुंबईचे नेतृत्व पारशीऐवजी हिंदु नेत्याच्या हाती
दिले आणि त्याचा परिणाम पुढे धार्मिक विभागणीच्या रूपाने पुढे आला !

फाळणीस कारणीभूत असलेले जिना आणि गांधी

वर्ष १९४० मध्ये मुस्लिम लीगने संमत केलेला पाकिस्तानचा ठराव अनेक लेखकांच्या स्मरणात असेल. इतिहास संशोधक डेव्हिड गिलमार्टिन आणि वेंकट धुलिपाला यांच्या मते त्या वेळी देशभरातील मुसलमान स्वतंत्र राष्ट्राच्या संकल्पनेकडे ओढले गेले होते.

वर्ष १९४६ पर्यंत पाकिस्तानच्या मागणीचा जोर आणि त्याला असलेले समर्थन वाढतच गेले. त्या वेळी जिना मुसलमानांचे एकमेव प्रवक्ते आणि या मागणीचे प्रभावी प्रचारक झाले होते. आता थोडे मागे म्हणजे वर्ष १९३७ मध्ये जाऊ. त्या वेळी कॉँग्रेसने मुस्लिम लीगसमवेत प्रांतीय स्तरावर युती करण्यास नकार दिला होता. मुंबईसारख्या महत्त्वाच्या प्रांतात काँग्रेसने तेथील नेतृत्व पारशीऐवजी हिंदु नेत्याच्या हाती दिले आणि त्यामुळे कॉँग्रेसवर बहुसंख्यंकत्वाचे आरोप झाले, ज्याचा परिणाम पुढे धार्मिक विभागणीच्या रूपाने पुढे आला.

२. कवी इक्बाल यांनी केले होते फाळणीसंबंधीचे पहिले स्पष्ट वक्तव्य !

फाळणीचे मूळ शोधतांना ते आणखी मागे म्हणजे वर्ष १९३० मध्ये जाते. त्या वेळी कवी महंमद इक्बाल मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले होते की, भक्कम अशा उत्तर-पश्‍चिम भारतीय मुसलमान राज्याची निर्मिती हे मुसलमानांचे उद्दिष्ट असले पाहिजे, किमान उत्तर-पश्‍चिम मुसलमानांचे तरी ! एका प्रतिष्ठित मुसलमान नेत्याकडून आलेले फाळणीसंबंधीचे हे पहिले स्पष्ट वक्तव्य होते. नेमकी त्याच वेळी तर पाकिस्तानची अपरिहार्यता नक्की झाली नसेल ? किंवा त्यातच पुढे बंगाल ते पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि उत्तर-पश्‍चिम प्रांत अशा मुसलमानबहुल भागाचा विचार करून आणखी भर पडली नसेल ?

३. पाकिस्तानचे बीज कवी इक्बाल यांनी नाही, तर गांधींनीच अधिक रोवलेले दिसते !

हे सगळे इथेच संपत नाही. थोडे आणखी मागे गेले, तर पाकिस्तानचे बीज आदरणीय इक्बाल यांनी नाही, तर आदरणीय गांधींनी अधिक रोवलेले दिसते. वर्ष १९२० ते १९२२ च्या काळात गांधींनी खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीच्या निमित्ताने त्यांचा पहिल्यांदाच संबंध उलेमांशी आला आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर असणारे मुसलमान दुरावले गेले. दुसर्‍यांंदा त्यांचा उलेमांशी संबंध आला तो इंग्रज सरकारच्या विरोधात रस्त्यावरच्या निदर्शनांच्या निमित्ताने. (जरी तो अहिंसक होता) त्यामुळे नेमस्त लोक दुरावले गेले. त्या वेळी जिना हे मुसलमानांचे नेते म्हणून उदयास येत होते. त्यांच्याकडे दोन्ही प्रकारच्या मुसलमानांचे नेतृत्व होते. त्यांनी दोन्ही आघाड्यांवर गांधीजींना विरोध केला होता. म्हणूनच गांधी समर्थकांनी डिसेंबर १९२० च्या महत्त्वपूर्ण अशा नागपूर काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. गांधी आणि जिना यांच्यात वर्ष १९२० पर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यानंतर त्यांच्यातील संबंध ताणले गेले. त्यामुळे कदाचित् नागपूर काँग्रेसमध्येच फाळणीच्या मुळाचा शोध संपतो.

– श्री. रामचन्द्र गुहा (इतिहासकार आणि स्तंभलेखक) (दैनिक लोकमत १३.५.२०१५)

Leave a Comment