पाकिस्तानच्या निर्मितीतील बटरफ्लाय इफेक्ट !

काही वेळा अगदी लहान आणि क्षुल्लक वाटणार्‍या प्रसंगांचा प्रभाव कालांतराने पुष्कळ मोठा होऊ शकतो. यालाच इंग्रजीमध्ये बटरफ्लाय इफेक्ट असे म्हणतात. याच बटरफ्लाय इफेक्टमुळे एका नवीन देशाची निर्मिती झाली. त्यातून १ कोटी २० लक्ष लोक विस्थापित झाले, अनुमाने २० लक्ष लोकांचा मृत्यू झाला आणि एकेकाळी भाकरी वाटून खाणार्‍या लोकांमध्ये कायमस्वरूपी वैरभाव निर्माण झाला. पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास त्यांच्या आयुष्यातील ३ प्रसंग या बटरफ्लाय इफेक्टसाठी कारणीभूत ठरले. परिणामस्वरूप जगाच्या इतिहासातील अत्यंत लक्षणीय आणि रक्तरंजित अशा मध्यरात्रीचा जन्म झाला.

१. जातीतून बहिष्कृत झाल्यानंतर पुन्हा जातीत घेण्यास
कर्मठांनी नकार दिल्यावर जिना यांच्या वडिलांकडून इस्लामचा स्वीकार !

आयुष्यातील ते ३ लहान प्रसंग जाणून घेण्यासाठी आपल्याला जिना यांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर यांच्यापासून आरंभ करावा लागेल. प्रेमजीभाई हे गुजरात राज्यातील काठियावाड येथील श्रीमंत हिंदु व्यापारी होते. त्यांनी मत्स्य व्यवसायातून संपत्ती मिळवली होती; पण त्यामुळे त्यांना त्यांच्या शाकाहारी आणि धार्मिकदृष्ट्या कर्मठ अशा लोहाना जातीने बहिष्कृत केले होते. त्यांनी त्यांचा मत्स्य व्यवसाय बंद करून स्वतःच्या जातीत परत येण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्कालीन कर्मठ व्यवस्थेने त्यांना त्याची अनुमती दिली नाही. त्यामुळे उद्विग्न झालेले त्यांचे पुत्र श्री. पुंजालाल ठक्कर (जिना यांचे वडील) यांनी या अपमानाने संतप्त होऊन स्वतःचे आणि स्वतःच्या ४ मुलांचे धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केला.

२. धर्मभ्रष्ट घोषित झालेल्यांनी ब्राह्मणांना अद्दल घडवणे आणि
आजही भारतातील असंख्य मुसलमान त्यांचे पूर्वज हिंदू होते, हे स्वीकारण्यास सिद्ध न होणे !

एखाद्या हिंदूने स्वतःच्या धर्मात पुनःर्प्रवेश करायचा केलेला प्रयत्न आणि त्याला या धर्मातील ब्राह्मणवर्गाने केलेला विरोध हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. १२ व्या शतकापासून भारतावर मुसलमानांच्या आक्रमणांना आरंभ झाला. या कालावधीत अनेक हिंदूंना क्षुल्लक कारणांवरून, उदा. मुसलमानांच्या हातून पाणी प्यायल्याने, बळजोरीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडल्याने किंवा विदेश प्रवास केल्यामुळे त्यांचा धर्म गमवावा लागला होता. त्या लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा येथील कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना तसे करू दिले नाही. उलट त्यांना कायमस्वरूपी धर्मभ्रष्ट घोषित केले. परिणामस्वरूपी त्या लोकांमध्ये हिंदूंविषयी शत्रुत्व निर्माण झाले आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार केला, तसेच ब्राह्मणांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या (ब्राह्मणांच्या) निर्घृण हत्या केल्या. कित्येक शतकांपूर्वी झालेल्या पूर्वजांच्या अपमानामुळे आजही भारतातील असंख्य मुसलमान त्यांचे पूर्वज हिंदू होते, हे स्वीकारण्यास सिद्ध होत नाहीत.

हा पहिला बटरफ्लाय इफेक्ट होता. जर जिनांच्या आजोबांना त्यांच्या जातीत पुनर्प्रवेश मिळाला असता, तर जिना हिंदू राहिले असते आणि त्यांनी त्यांची अलौकिक बुद्धीमत्ता मुसलमानांसाठी एक वेगळा देश निर्माण करण्यात खर्ची घातली नसती.

३. नेहरूंनी अहंकार दुखावल्यावर त्यांना धडा शिकवण्यासाठी जिना यांचा मुस्लिम लीगमध्ये पुनर्प्रवेश !

वर्ष १९२९ मध्ये जिनांच्या पत्नी रतनबाई पेतीत यांचे पचनसंस्थेच्या आजारामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने जिना इतके वैफल्यग्रस्त झाले होते की, ते लंडनला स्थलांतरित झाले. तिथे ते अत्यंत खाजगी आयुष्य जगत असत. ते एका मोठ्या घरात एकटेच रहात होते आणि बिलियडर्स खेळ खेळून अन् नाटके पाहून दिवस घालवत होते. लंडन येथे एका खासगी भोजनाच्या प्रसंगी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी जवाहरलाल नेहरू यांनी जिना संपले आहेत, हे केलेले विधान त्यांच्या कानावर आले. त्या विधानाने जिनांमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणला. जिना पुष्कळ संतापले आणि नेहरूंना धडा शिकवण्यासाठी ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी मनमानी करणार्‍या आणि विक्षिप्त लोकांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुस्लिम लीगमध्ये पुनर्प्रवेश केला. त्यांनी पक्षामध्ये नवचेतना आणून त्याला भारतातला दुसरा सामर्थ्यवान राजकीय पक्ष बनवले.

हा दुसरा बटरफ्लाय इफेक्ट होता. नेहरूंनी ते विधान केले नसते, तर जिना लंडनमध्येच राहिले असते. त्यामुळे मुस्लिम लीग सामर्थ्यवान झाली नसती आणि भारत एकसंध राहिला असता.

४. फाळणीच्या पूर्वीच जिना यांना त्यांच्या मृत्यूचे गुपित लक्षात आल्याने पाकच्या निर्मितीची घाई करणे !

भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य यांच्या एका वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. जिना यांचे आधुनिक वैद्य (डॉ.) जे.ए.एल्. पटेल यांना त्यांच्या क्ष किरण तपासणीत २ काळे डाग दिसून आले. हे समजल्यावर कदाचित् त्यामुळे भारतीय राजकारण ढवळून निघाले असते, इतिहास पालटला असता आणि पाकिस्तान निर्मितीच्या प्रचंड प्रयत्नांचा फज्जा उडाला असता. जिना यांना क्षयरोग झाल्याने त्यांचे आयुष्य केवळ २-३ वर्षे असल्याचे डॉ. पटेल यांनी त्यांना सांगितले. हे समजल्यावर जिना यांनी व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांचा सतत पाठपुरावा करून स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी हे दोन्ही निर्णय त्यांना लवकरात लवकर घेण्यास भाग पाडले; कारण स्वतःच्या मृत्यूपूर्वी त्यांना इतिहासात आपले नाव कोरायचे होते. जिनांच्या आजाराचे आणि येऊन ठेपलेल्या मृत्यूचे गुपित ते अन् डॉ. पटेल यांच्यातच राहिले. त्यामुळे इतिहासात भारताच्या फाळणीचा रक्तरंजित अध्याय नोंदवला गेला.

हा तिसरा बटरफ्लाय इफेक्ट होता. त्या क्ष किरण अहवालात फाळणीला थोपवण्याचे रहस्य होते; पण एका हिंदू आधुनिक वैद्याला लक्षावधी जिवांपेक्षा स्वतःची व्यावसायिक नैतिकता अधिक महत्त्वाची वाटली. जिनांच्या रोगनिदानाचा हा अहवाल जर सार्वजनिक झाला असता, तर कदाचित् गांधी आणि माऊंटबॅटन यांनी जिनांचा मृत्यू होईपर्यंत भारताचे स्वातंत्र्य लांबवले असते अन् फाळणी टळली असती.

 

आयुष्यात जे काही करतो, त्याचे पडसाद अनंत काळापर्यंत उमटतात !

ग्लॅडिऐटर या इंग्रजी चित्रपटातील मुख्य पात्र मॅक्सीमसचे एक वाक्य आहे, आपण आयुष्यात जे काही करतो, त्याचे पडसाद अनंत काळापर्यंत उमटतात. आज आपण करत असलेल्या क्षुल्लक कृतीचा परिणाम पुढे काय होणार आहे, याची कल्पना स्वतःला नसते. त्याचप्रमाणे जिनांच्या आजोबांच्या मत्स्य व्यवसाय करण्याच्या निर्णयाचा परिणाम एका शतकानंतर लक्षावधी लोकांवर होणार, याची सुतराम कल्पना त्यांना नसावी.

(संदर्भ : फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट, लेखक : डॉमनिक लापेरे आणि लॅरी कोलिन्स; इंडियन समर, लेखक : अलेक्स व्हान टूनझेलमान; संस्कृती के चार अध्याय, लेखक : रामधरी सिंह दिनकर.)

Leave a Comment