परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण
जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात. त्यांचा सुपरिणाम व्यक्तीच्या सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल, या उद्देेशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्या संदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास केला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना किंवा वातावरणातील असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधन चालू आहे.

२९.४.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैशिष्ट्यपूर्ण घटना

रात्रीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या खोलीतील दंडदीपाचा (ट्यूबलाईटचा) तेजस्वीपणा वाढून खोलीतील प्रकाशात वाढ झाल्याचे लक्षात येणे : २९.४.२०१७ या दिवशी रात्रीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या खोलीतील प्रकाशात अचानक वाढ झाल्याचे आणि खोलीतील पूर्वेकडील भिंतीवरील दंडदीपाचा (ट्यूबलाईटचा) तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी आश्रमातील काही साधकांना त्यांच्या खोलीत बोलावले आणि ही वैशिष्ट्यपूर्ण घटना दाखवली.

२. चाचणीचे स्वरूप

या घटनेचा अभ्यास करण्यासाठी २९.४.२०१७ या दिवशी रात्री ८.३० वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील पूर्वेकडील भिंतीवरील दंडदीप पेटवल्यानंतर आणि त्यानंतर तो काढून त्याच्या जागी तसाच नवीन दंडदीप लावून तो पेटवल्यानंतर पडणार्‍या प्रकाशाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यासाठी दंडदीपापासून १ मीटर अंतरावर पडणारा त्याचा प्रकाश, तसेच खोलीतील पटल आणि लादी यांवर दंडदीपाचा प्रकाश पडून त्यांवरून परावर्तित होणारा प्रकाश लाईट मीटर हे उपकरण वापरून मोजण्यात आला. तसेच चाचणीत परीक्षणासाठी थर्मल छायाचित्रकाचाही (थर्मल कॅमेर्‍याचाही) उपयोग करण्यात आला.

३. चाचणीतील घटक आणि उपकरणे

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दंडदीप

हा विप्रो आस्थापनाचा ३६ वॅटचा फ्लोरोसंट दंडदीप आहे.

३ आ. लाईट मीटर

याद्वारे एखाद्या वस्तूवर पडणारा प्रकाश मोजता येतो. या चाचणीसाठी सिकोनिक एल्-३०८ डीसी (Sekonic L-३०८ DC) हा लाईट मीटर वापरण्यात आला. प्रकाश मोजण्यासाठी लक्स (Lux) हे परिमाण वापरतात.

३ इ. थर्मल इमेजिंग (Thermal Imaging) तंत्रज्ञानाची ओळख

चाचणीतील घटकाकडून (वस्तू, व्यक्ती आदींकडून) प्रक्षेपित होणारी ऊर्जा थर्मोग्राफी कॅमेर्‍याद्वारे चित्रित केली जाते. या कॅमेर्‍यात घटकाकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेतील सूक्ष्म-पालट टिपण्याची क्षमता असते. घटकाकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेच्या प्रमाणात होणारा पालट हा त्या घटकाच्या तापमानातील पालटानुसार होत असतो. थर्मोग्राफी कॅमेर्‍याला जोडलेल्या संगणकीय प्रणालीमुळे घटकाकडून प्रक्षेपित होणारी ऊर्जा तिच्या प्रमाणानुसार छायाचित्रात विविध रंगांमध्ये दिसते, तसेच तिचे विश्‍लेषण करता येते. अशा प्रकारे थर्मोग्राफी कॅमेर्‍याद्वारे मिळालेल्या छायाचित्रांना थर्मल इमेजेस किंवा थर्मोग्राम असे म्हणतात. थर्मल इमेजिंग (Thermal Imaging) या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण, संशोधन, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रांत केला जातो.

या चाचणीसाठी फ्लर-इ८ (Flir-E८) हा थर्मल छायाचित्रक वापरण्यात आला. त्याविषयी माहिती www.flir.com/instruments/ex-series या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

४. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

४ अ. लाईट मीटरद्वारे केलेली निरीक्षणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील पूर्वेकडील भिंतीवरील दंडदीपातून झालेल्या प्रकाशाचे प्रक्षेपण तो दंडदीप काढून त्या ठिकाणी नवीन दंडदीप लावल्यावर झालेल्या प्रकाशाच्या प्रक्षेपणाच्या तुलनेत अधिक प्रमाणात होत असल्याचे वरील सारणीवरून लक्षात येते. असेच निरीक्षण खोलीतील विविध अंतरांवर असणार्‍या पृष्ठभागांवरून होणार्‍या दंडदीपाच्या प्रकाशाच्या परावर्तनाच्या संदर्भातही मिळाले आहे.

४ आ. थर्मोग्राफी कॅमेर्‍याद्वारे काढलेल्या छायाचित्रांच्या (थर्मल इमेजेसच्या) आधारे केलेली निरीक्षणे

पुढे दिलेली थर्मोग्राफी कॅमेर्‍याद्वारे काढलेल्या छायाचित्रांतील (थर्मल इमेजेसमधील) तापमानाची मिळालेली आकडेवारी थर्मोग्राफी कॅमेर्‍याला जोडलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे मिळाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतीवरील दंडदीपाच्या प्रकाशात नोंद केलेल्या तापमानापेक्षा त्या दंडदीपाच्या ठिकाणी नवीन दंडदीप लावल्यावर त्याच्या प्रकाशात नोंद केलेले तापमान अल्प होते, हे वरील सारणीवरून स्पष्ट होते. या निरीक्षणांच्या वेळी खोलीचे तापमान एकसारखेच होते.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दंडदीप आणि त्या दंडदीपाच्या
ठिकाणी नवीन लावलेला दंडदीप यांच्या प्रकाशाच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

६. प्रकाशाच्या संदर्भातील वैज्ञानिक माहिती

६ अ. प्रकाशाचे कण, तरंग आणि पुंज स्वरूप

प्रकाशाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे तो कधी कणांच्या स्वरूपात आढळतो, तर कधी तरंगांच्या स्वरूपात आढळतो. १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत बहुसंख्य शास्त्रज्ञ प्रकाश तरंगरूप असल्याचे मानत होते. जेम्स मॅक्सवेलचा विद्युत्चुंबकीय सिद्धांत सांगतो, प्रकाश हा विद्युत्चुंबकीय तरंगांचा एक छोटासा भाग आहे. पुढे वर्ष १९०५ मध्ये आईन्स्टाईनने आपल्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट या प्रयोगाद्वारे प्रकाशाचे पुंजस्वरूप सिद्ध केले. या प्रकाशपुंजालाच फोटॉन्स, असे म्हणतात. (संदर्भ : मनःशक्ती मासिक)

७. निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विवरण

उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या अस्तित्वाचा त्यांच्या खोलीतील वस्तू आणि वातावरण यांवर झालेल्या परिणामामुळे खोलीतील दंडदीपाचा प्रकाश आणि तेजस्वीपणा त्याच खोलीत लावलेल्या नवीन दंडदीपाच्या प्रकाशापेक्षा अधिक असणे

उच्च आध्यात्मिक स्तर असणार्‍या व्यक्तीच्या देहातून सूक्ष्मतम कणांच्या रूपात ऊर्जा (चैतन्य) प्रक्षेपित होत असते. ऊर्जेचे हे सूक्ष्मतम कण स्वयंप्रकाशी असतात, एवढेच नव्हे, तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार या सूक्ष्म कणांना सूक्ष्म गंध, सूक्ष्म नाद इत्यादी असतो. उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या देहातून वातावरणात प्रक्षेपित झालेल्या सूक्ष्म कणांवर प्रकाश पडल्यास ते अधिक तेजस्वी दिसतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या खोलीत असे पुष्कळ सूक्ष्म कण आहेत. त्या सूक्ष्म कणांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे खोलीतील प्रकाशात वाढ झाली. हे सूक्ष्म कण खोलीतील दंडदीपाभोवती पुष्कळ प्रमाणात जमलेले असल्याने नेहमीचा दंडदीप, तशाच प्रकारच्या नवीन दंडदीपाच्या तुलनेत अधिक तेजस्वी दिसत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील केवळ वातावरण चैतन्यमय झाले असते, तर कोणताही दंडदीप लावला, तरी सारखाच प्रकाश लाईट मीटरद्वारे निरीक्षणात नोंद झाला असता; पण लाईट मीटरने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दंडदीपाचा प्रकाश नवीन दंडदीपाच्या प्रकाशापेक्षा अधिक दर्शवला आहे. तसेच निरीक्षण थर्मोग्राफी कॅमेर्‍याद्वारे नोंदवलेल्या तापमानाचे मिळाले आहे.

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन-विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२७.११.२०१७)

ई-मेल : [email protected]

 

तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी
आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या अस्तित्वाचा त्यांच्या खोलीतील प्रकाश आणि त्यांच्याशी संबंधित घटक (उदा. दंडदीप) यांवर होणार्‍या परिणामाविषयी अधिक संशोधन करून त्यामागचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे आणि दंडदीप तेजस्वी दिसणे यांमागील वैज्ञानिक कारण काय ?

२. संतांच्या अस्तित्वामुळे निर्माण होणार्‍या वातावरणातील सूक्ष्मतम कणांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करता येईल ?

यासंदर्भात तज्ञ, अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे, यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])

Leave a Comment