व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात. याचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल. या उद्देेशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्या संदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास केला आहे. वातावरणातील हे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधन चालू आहे.
३१.१२.२०१५ या रात्री रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. रात्रीच्या वेळी आकाश, झाडे आणि डोंगर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगात थोडा पालट झाल्याचे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेे. हे पालट का आणि कसे होतात ?, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेरात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. पार्श्वभूमी
रात्रीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले अभ्यासिकेच्या आगाशीतून बाहेरील परिसराकडे पहात असतांना त्यांना तेथील रंगात पालट होऊन तेजस्वीपणा वाढल्याचे जाणवणे
३०.१२.२०१५ च्या रात्री आश्रमाबाहेरील परिसरात विजेचे दिवे नसल्याने अंधार होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून आकाशाकडे पहात असतांना एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यांच्या लक्षात आली. अंधारात आकाश आणि बाहेरील परिसर यांकडे पहातांना ते जेथे दृष्टीकटाक्ष टाकत, तेथील रंगांत थोडा पालट झाल्याचे आणि तेजस्वीपणा वाढल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी आश्रमातील काही साधकांना तेथे बोलावले. परात्पर गुरु डॉक्टर ज्या दिशेला पहात, त्या दिशेने साधकही आकाश, परिसरातील डोंगर आणि झाडे यांकडे पाहू लागले. त्या वेळी साधकांनाही आकाश आणि परिसर यांच्या रंगांत पालट होत आहे अन् त्यांचा तेजस्वीपणा वाढला आहे, असे लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टर ज्या दिशेने पहात होते, तो आश्रमासमोरील काही अंतरावरील लहान डोंगरांपर्यंतचा परिसर साधकांना उजळ दिसत होता. तेथील झाडे अधिक स्पष्टपणे दिसत होती. त्या वेळी आकाशही अधिक तेजस्वी दिसत होते.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत रात्रीच्या वेळी आकाश आणि झाडे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याकडे पहाण्यापूर्वी, ते पहात असतांना आणि त्यांनी पाहून झाल्यानंतर छायाचित्रे घेण्यात आली. प्रत्येक छायाचित्रातील रंग आणि तेजस्वीपणा यांतील पालट जाणण्यासाठी अॅडोब फोटोशॉप या संगणकीय प्रणालीच्या आधारे छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाहिल्यानंतर आकाश आणि झाडे यांमध्ये झालेला पालट जाणता आला.
३. चाचणीतील घटक आणि चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता
३ अ. छायाचित्रक (कॅमेरा)
या चाचणीत कॅनन EOS7D हा छायाचित्रक वापरला.
३ आ. चाचणीचे स्थळ
परात्पर गुरु डॉ. आठवले चाचणीसाठी त्यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीत उभे होते. तेथून ते आश्रमाच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडाकडे पहात होते. या चाचणीत त्या झाडाची छायाचित्रे घेण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापासून ते झाड ३६ मीटर अंतरावर होते.
३ इ. संपूर्ण चाचणीत छायाचित्रकाची संयोजना (सेटिंग्ज्) एकसारखीच ठेवली असणे
छायाचित्रकाद्वारे घेण्यात आलेल्या विविध छायाचित्रांची तुलना करणे आणि त्या आधारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दृष्टीक्षेपाने वातावरणावर होणार्या परिणामांचा अभ्यास करणे यांत अचूकता यावी, यासाठी संपूर्ण चाचणीत छायाचित्रकाची संयोजना (सेटिंग्ज्) एकसारखीच ठेवण्यात आली होती. ती पुढे दिली आहे.
३ ई. संपूर्ण चाचणीच्या वेळी छायाचित्रक एकाच स्थितीत आणि स्थिर ठेवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोली शेजारील आगाशीत एका तिपाईवर (स्टँडवर) छायाचित्रक ठेवण्यात आला. तो एका भ्रमणसंगणकाला जोडण्यात आला. त्यामुळे छायाचित्र घेणार्या साधकाला छायाचित्रकाला हात न लावता छायाचित्रे घेणे शक्य झाले. त्यामुळे संपूर्ण चाचणीच्या वेळी छायाचित्रक एकाच स्थितीत आणि स्थिर ठेवता आला. छायाचित्रात आकाश, पार्श्वभूमीला असलेले लहान डोंगर आणि समोरील बाजूस असलेले एक उंच झाड येईल, अशा पद्धतीने छायाचित्रकाची मांडणी करण्यात आली होती.
४. प्रत्यक्ष चाचणी
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चाचणीसाठी आगाशीतून जेथे आपली दृष्टी टाकली ते दृश्य
चाचणीमध्ये रात्री छायाचित्रे घेतली असली, तरी चाचणीचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी दिवसाच्या प्रकाशात घेतलेले चाचणीशी संबंधित छायाचित्र वर दिले आहे. त्यामध्ये आगाशीतून दिसणार्या बाहेरील दृश्यापैकी चाचणीच्या वेळी छायाचित्रे घेण्यासाठी निश्चित केलेला झाडांचा भाग दाखवण्यात आला आहे.
४ आ. छायाचित्रे काढणे
ही चाचणी रात्री १०:०१ ते १०:५६ या कालावधीत करण्यात आली. चाचणीच्या एकूण कालावधीपैकी रात्री १०:१६ ते १०:४५ हा अर्धा घंटा परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत उभे नव्हते, तरीही छायाचित्रे काढणे चालू ठेवले होते. (चाचणीच्या कालावधीतील उर्वरित वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत उभे राहून समोर पहात होते.) चाचणीच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४६ छायाचित्रे काढण्यात आली.
४ इ. संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने छायाचित्रांचे विश्लेषण
करून त्याद्वारे रंग अन् तेजस्वीपणा यांतील पालट अचूकपणे जाणता येणे
छायाचित्रण तंत्रज्ञानानुसार लाल, हिरवा आणि निळा या ३ रंगांच्या मिश्रणातून इतर सर्व रंग बनतात. म्हणजे छायाचित्रातील या ३ रंगांचे प्रमाण आणि छायाचित्रात दिसणार्या रंगांच्या छटा यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे छायाचित्रातील एखाद्या बिंदूतील या ३ रंगांपैकी एखाद्या रंगाचे प्रमाण थोडेसे जरी पालटले, तरी त्या बिंदूच्या रंगात पालट होतो. या माहितीचा उपयोग छायाचित्रांंचे विश्लेषण करतांना झाला. चाचणीतील प्रत्येक छायाचित्रातील रंग आणि तेजस्वीपणा यांतील पालट ओळखण्यासाठी अॅडोब फोटोशॉप ही संगणकीय प्रणाली वापरण्यात आली. तिच्या साहाय्याने केलेल्या छायाचित्राच्या विश्लेषणातील टप्पे पुढे दिले आहेत.
१. चाचणीतील सर्व छायाचित्रांतील आकाशातील एक बिंदू, उजवीकडे झाड असलेल्या भागातील एक बिंदू आणि छायाचित्राचा मध्यबिंदू, हे ३ बिंदू निश्चित केलेे.
२. प्रत्येक छायाचित्रातील या ३ बिंदूंतील लाल, हिरवा आणि निळा या रंगांचे प्रमाण अन् तेजस्वीपणा यांचे प्रमाण मोजले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दृष्टीक्षेपामुळे छायाचित्रांतील तीनही बिंदूंच्या रंगातील लाल, हिरवा आणि निळा या रंगांच्या प्रमाणात पालट झालेला आढळला. तीन बिंदूंपैकी उजवीकडे झाड असलेल्या भागातील बिंदूचा रंग आणि तेजस्वीपणा यांत झालेला पालट सर्वाधिक होता; म्हणून येथे छायाचित्रांतील केवळ त्या बिंदूची रंग आणि तेजस्वीपणा यांसंदर्भातील निरीक्षणे येथे दिली आहेत.
सर्वाधिक पालट असलेल्या या बिंदूतील लाल, हिरवा आणि निळा या रंगांचे प्रमाण दर्शवणारा आलेख क्र. १ आणि तेजस्वीपणाचे प्रमाण दर्शवणारा आलेख क्र. २, हे वर दिले आहेत. या आलेखांवरून काढण्यात आलेली निरीक्षणे अनुक्रमे ५ अ आणि ५ आ, या सूत्रांमध्ये दिली आहेत. या आलेखांवरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दृष्टी टाकल्यानंतर झाडाच्या रंगात झालेला पालट आणि त्याच्या तेजस्वीपणात झालेली वाढ स्पष्टपणे लक्षात येते.
४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाहिल्यानंतर झाडाच्या रंगात झालेला पालट
आणि तेजस्वीपणात झालेली वाढ दर्शवणारी चाचणीतील काही निवडक छायाचित्रे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाहिल्यानंतर झाडाच्या रंगात झालेला पालट आणि तेजस्वीपणा दर्शवणारी छायाचित्रे
४ ई १. वरील मार्गिकेवरील छायाचित्रे पहातांना उपयुक्त असलेल्या सूचना
अ. सूचना १. छायाचित्रात रंग आणि तेजस्वीपणा यांविषयीचे पालट मुख्यत्वे उजव्या बाजूला असलेल्या झाडाच्या आसपासच्या भागात दिसत आहेत, हे छायाचित्र पहातांना सहजपणे लक्षात येते.
आ. सूचना २. प्रत्येक छायाचित्राच्या डाव्या कोपर्यात छायाचित्र कधी घेतले, त्या वेळेची नोंद आहे.
इ. सूचना ३. या छायाचित्रांचे अंधार्या खोलीत निरीक्षण केल्यावर त्यांतील पालट अधिक स्पष्टपणे जाणवतात.
५. निरीक्षणे
वर दिलेले आलेख समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या सूचना प्रथम वाचाव्यात.
सूचना १ – रात्री १०.०१ ते १०.१५ या वेळेत आणि १०.४५ ते १०.५६ या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत उभे राहून बाहेर पहात होते. आलेखातील या वेळेतील नोंदी पट्टा १ आणि पट्टा २ ने दर्शवली आहे.
सूचना २ – रात्री १०.१५ ते १०.४५ या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत नव्हते. आलेखातील या वेळेतील नोंदींची पार्श्वभूमी पांढर्या रंगात दाखवली आहे.
सूचना ३ – चाचणीसाठी घेतलेल्या ४६ छायाचित्रांची अनुक्रमे वेळ पुढील दोन्ही आलेखांतील आडव्या एक्स (X) अक्षावर दिली आहे.
५ अ. निरीक्षण १ – लाल, हिरवा आणि निळा या रंगांच्या प्रमाणात झालेले पालट दर्शवणारा आलेख
प्रत्येक छायाचित्रातील झाड असलेल्या भागातील निवडलेल्या बिंदूतील लाल, हिरवा आणि निळा या रंगांचे प्रमाण आलेख क्र. १ मधील उभ्या वाय (Y) अक्षावर दिले आहे.
चाचणीच्या पूर्ण कालावधीत छायाचित्रांतील लाल, हिरवा आणि निळा या रंगांच्या प्रमाणात होत झालेली वाढ किंवा घट वरील आलेखातून स्पष्ट होते. आलेखातील रंगांच्या प्रमाणातील तीव्र वाढ किंवा घट यांचा आणि त्यांच्याशी संबंधित छायाचित्रातील झाडाच्या रंगातील पालट यांचा असलेला थेट संबंध या आलेखातून स्पष्ट होतो. आलेखात रंगांमध्ये झालेली सर्वाधिक वाढ रात्री १० वाजून २६ मिनिटे आणि १५ सेकंद या वेळी काढलेल्या छायाचित्रामध्ये दिसून आली.
५ आ. निरीक्षण २ – तेजस्वीपणात झालेले पालट दर्शवणारा आलेख
प्रत्येक छायाचित्रातील झाड असलेल्या भागातील निवडलेल्या बिंदूतील तेजस्वीपणाचे प्रमाण आलेख क्र. २ मधील उभ्या वाय (Y) अक्षावर दिले आहे.
चाचणीच्या कालावधीत प्रत्येक छायाचित्रानुसार तेजस्वीपणाच्या प्रमाणात झालेले पालट या आलेखात दाखवण्यात आले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत उभे राहून समोर पहात असतांना आणि ते आगाशीत नसतांनाही तेजस्वीपणात झालेली तीव्र वाढ (स्पाइक्स) या आलेखात दिसून येते. परात्पर गुरु डॉ. आठवले रात्री १०.१५ वाजता आगाशीतून गेल्यानंतर १० वाजून २६ मिनिटे आणि १५ सेकंद या वेळी काढलेल्या छायाचित्रात झाडाच्या तेजस्वीपणात सर्वाधिक वाढ झाल्याचे या आलेखात दिसत आहे. बरोबर त्याच वेळी रंगांच्या प्रमाणातही सर्वाधिक वाढ झाल्याचे याआधीच्या आलेखात आपण पाहिले. ही दोन्ही निरीक्षणे एकमेकांशी जुळतात. तसेच तेजस्वीपणात सर्वाधिक वाढ झालेल्या वेळी काढलेल्या छायाचित्रातही प्रत्यक्षात ते झाड इतर छायाचित्रांतील झाडापेक्षा रात्रीच्या अंधारात सर्वाधिक स्पष्ट आणि तेजस्वी दिसते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही वेळ आपली दृष्टी टाकल्यावर झाडामध्ये झालेल्या या पालटांचे आध्यात्मिक कारण काय ?, याचे विश्लेषण साधकाला मिळालेल्या त्यासंदर्भातील ज्ञानाद्वारे आपल्याल्या स्पष्ट होईल. हे ज्ञान पुढे दिले आहे.
६. उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत केवळ दृष्टी टाकून
वातावरणात पालट घडवून आणू शकत असण्यामागील अध्यात्मशास्त्र
६ अ. दृष्टीचे प्रकार आणि कार्य
६ अ १. सामान्य व्यक्तीची दृष्टी
जग पहात त्याचा अनुभव घेतला जातो. व्यावहारिक जीवनात दृष्टीचा उपयोग केला जातो. बाह्यसृष्टीतून सुख उपभोगले जाते.
६ अ २. दुर्जनांची दृष्टी
स्वार्थ आणि दुसर्याला अधिकाधिक त्रास देणे यांसाठी दृष्टीचा उपयोग केला जातो.
६ अ ३. साधकाची दृष्टी
संतांना अथवा देवतेच्या मूर्तीला पाहून, म्हणजे ते रूप पाहून साधक अध्यात्माशी जोडला जातो.
६ अ ४. संतांची दृष्टी
साधकांकडे चैतन्य प्रक्षेपित करण्यासाठी आणि त्यांच्यावर कृपा करण्यासाठी, तसेच त्यांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी डोळ्यांतून तेजतत्त्वाचे प्रक्षेपण केले जाते. भक्तांविषयीचे निरपेक्ष प्रेमही संतांच्या दृष्टीतून व्यक्त होते.
६ आ. उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांच्या दृष्टीतून होणारे आध्यात्मिक कार्य
६ आ १. दृष्टी टाकून वातावरणात पालट घडवून आणण्या- संबंधीची प्रक्रिया
उच्च पातळीच्या संतांच्या डोळ्यांतून रंगकिरण आणि प्रकाशकिरण यांद्वारे ईश्वरी शक्तीचे प्रक्षेपण होते.
६ आ १ अ. डोळ्यांतून प्रक्षेपित होणारे आध्यात्मिक घटक आणि त्यांचे कार्य
६ आ १ अ १. रंगकिरण
फूल उमलणे, वृक्षाला बहर येणे, पाऊस पडणे, वातावरणात हलकेपणा जाणवणे, साधकांना अनुभूती येणे इत्यादी कार्य घडते.
६ आ १ अ २. प्रकाशकिरण
प्रकाशकिरण निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहेत. उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांच्या दृष्टीतून प्रकाशकिरणांचे प्रक्षेपण होते, तेव्हा वातावरणातील रज-तम कण क्षणात नष्ट होतात. परिणामी वातावरणात लगेच पालट जाणवतो.
उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांमधील आध्यात्मिक सामर्थ्यामुळे वातावरणातील पालट सहज शक्य आहे. ज्याप्रमाणे देश चालवणार्या राजाला एखाद्या गावासंबंधीची समस्या सोडवणे सुलभ असते, त्याप्रमाणे उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांना वातावरणात पालट घडवणे सहज शक्य आहे. त्यामुळेच या चाचणीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दृष्टी टाकल्यावर झाडामधील रंगांच्या प्रमाणात आणि झाडाच्या तेजस्वीपणात वाढ झालेली स्पष्टपणे दिसून आली.
६ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही वेळ समोर दृष्टी टाकून ते आगाशीतून निघून गेल्यावर झाडातील रंगाच्या प्रमाणात आणि तेजस्वीपणात सर्वाधिक वाढ झाली, यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अवस्था सगुण-निर्गुण आहे. जेव्हा ते काही वेळ समोर दृष्टी टाकून आगाशीतून निघून गेले, तेव्हा त्यांची देहाशी संबंधित सगुण-निर्गुण अवस्था संपली.
२. जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांची सगुण-निर्गुण अवस्था संपली, तेव्हा त्यांच्या केवळ निर्गुण तत्त्वाच्या कार्याला आरंभ झाला. हा कार्यारंभ वातावरणातील तेजस्वीपणात वाढ झाल्याच्या स्वरूपात व्यक्त झाला.
३. सूर्य मावळला, तरी पृथ्वीवर काही वेळ प्रकाश टिकून असतो, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीतून निघून गेले, तरी त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम वातावरणावर दिसून आला.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०१७)
७. चाचणीतून संतांचे महत्त्व अधोरेखित होणे
जी व्यक्ती तळमळीने आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करत असते, ती त्याच जन्मात संत बनू शकते. जेव्हा संतांची आध्यात्मिक पातळी ८० ते ९० टक्के होते, तेव्हा त्यांचा वातावरणावर सकारात्मक परिणाम होण्यास आरंभ होतो. या चाचणीवरून साधनेचे आणि संतांच्या अस्तित्वामुळे वातावरणावर होणार्या परिणामांचे महत्त्व अधोरेखित होते.
– कु. प्रियांका विजय लोटलीकर आणि श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, संशोधन-विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या केवळ दृष्टीने वातावरणात होणारे वैशिष्ट्यपूर्ण पालट महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला सदर चाचणीद्वारे लक्षात आले आहेत. यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक आणि यासंदर्भात शिक्षण घेणार्या विद्यार्थी यांनी साहाय्य करावे, ही विनंती !
– श्री. राम होनप