जयपूर येथील पखवाज वादक आणि जवाहर कला केंद्रातील कार्यक्रम अधिकारी श्री. छवी जोशी यांनी १७.१२.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. या वेळी श्री. छवी जोशी यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांसमोर पखवाज वादन सादर केले.
१. श्री. छवी जोशी यांचा परिचय
श्री. छवी जोशी हे १५ वर्षांपासून पखवाजवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. त्यांनी पखवाजाचे प्रारंभिक शिक्षण पं. बद्रीनारायण मृदंगाचार्य यांच्याकडून घेतले. सध्या ते डॉ. प्रवीणकुमार आर्य यांच्याकडे पखवाजवादनाचे धडे घेत आहेत. सध्या ते जयपूर (राजस्थान) येथील ‘जवाहर कला केंद्रा’त ‘कार्यक्रम अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवाहर कला केंद्राच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले असून अनेक कलाकारांना पखवाजाची साथही केली आहे.
(पखवाज : हे प्राचीन चर्मवाद्य असून त्याला ‘पुष्करवाद्य’ असेही म्हणतात. पूर्वी हे वाद्य मातीपासून बनवत असत. त्यामुळे त्याला ‘मृदंग’ असे नाव पडले. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या हे रज-सत्त्वप्रधान वाद्य आहे.)
२. श्री. छवी जोशी यांचा पखवाज आणि पखवाजवादन यांविषयीचा भाव
अ. ‘पखवाजाकडे पहात असतांना ‘तो सजीव असून श्वास घेत आहे’, असे मला जाणवले. श्री. जोशी पखवाजाची हाताळणी अतिशय प्रेमाने करतात, तसेच त्याचा उल्लेख त्यांनी ‘पखवाज’ असा केला नाही. ते म्हणाले, ‘‘मेरे साज (वाद्य) को प्रणाम कर आरंभ करता हूँ ।’’ त्यातून त्यांनी वाद्याला दिलेले दैवी स्थान आणि पखवाजाप्रतीचा त्यांचा भाव मला जाणवला.
आ. वादनापूर्वी ते पखवाजाच्या डाव्या भागावर अतिशय प्रेमाने कणीक लावत होते. त्या वेळी ‘ते प्रत्यक्ष देवालाच स्पर्श करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘तेथे पखवाज नव्हे, तर देवताच बालरूपात आहे’, असे मला जाणवले.
इ. त्यांच्या या भावामुळेच ‘पखवाजवादनाला आरंभ करण्यापूर्वीच देव पखवाजाच्या माध्यमातून तेथे अवतरण्यासाठी आतुर झाला आहे’, असे मला जाणवले.
ई. वादनापूर्वीच तो लावत असतांना (‘सेटिंग’ करत असतांना) मला त्यातून ‘ॐ’कार ऐकू आला.’ – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
उ. ‘श्री. छवी जोशी यांना प्रथम पाहिल्यावरच ‘त्यांच्यात भाव आहे’, असे मला जाणवले. वादन चालू होण्यापूर्वी मध्ये थोडा वेळ होता. त्या वेळी ते ‘डोळे मिटून ईश्वराचे स्मरण करत आहेत’, असे मला वाटले.’ – कु. शिवांजली काळे (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. पखवाजावर वाजवले जाणारे विविध प्रकार
‘श्री. जोशी यांनी ‘गणेशपरणा’ने पखवाजवादनाला आरंभ केला. त्यानंतर त्यांनी आदितालातील ‘परण’, ‘फर्माईशी चक्करदार परण’, ‘झाला’, ‘रामराज्याभिषेक परण’, ‘कृष्ण तांडव परण’, ‘कीर्तन पद्धती’ इत्यादींचे सादरीकरण केले. यांतून त्यांनी उपस्थितांना वीर, शृंगार, रौद्र इत्यादी विविध रसांची अनुभूती दिली.
३ अ. गणेशपरण
या प्रकारात श्री गणेशाचे स्तुतीपर शब्द आणि पखवाजाचे बोल असतात.
३ आ. परण
खुल्या वजनात (वादनाच्या एका शैलीत) पखवाजाच्या बोलांचा तुकडा कुठल्याही मात्रेपासून चालू होतो; पण समेवर चटकन येतो. त्यास ‘परण’ असे म्हटले जाते. परण नेहमी एकाहून अधिक आवर्तनांचा असतो. यात ‘ग’, ‘ध’, असे वर्ण (अक्षरे) अधिक येतात.
३ इ. चक्करदार परण
पखवाजाचा एक खुला आणि वजनदार बोलसमूह जो एकसारखा एकापाठोपाठ तीन वेळा नाचून (वाजवून) तालाच्या एकापेक्षा अधिक आवर्तनानंतरच समेवर येतो, त्याला ‘चक्करदार परण’ असे म्हणतात.
३ ई. फर्माईशी चक्करदार परण
चक्करदार परणात पहिल्यांदा त्यातील शेवटच्या तिहाईचे पहिले आवर्तन समेवर येते, दुसर्यांदा दुसरे आवर्तन समेवर येते आणि तिसर्यांदा तिसरे आवर्तन समेवर येते. त्यास ‘फर्माईशी चक्करदार परण’ असे म्हणतात.
३ उ. झाला
यात पखवाजाचे बोल द्रुत लयीत वाजवले जातात.
३ ऊ. रामराज्याभिषेक परण
हे त्यांना त्यांच्या गुरूंनी शिकवलेले परण आहे. यात श्रीरामाच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
३ ए. श्रीकृष्ण तांडव
कालियामर्दनाच्या वेळी श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर जे नृत्य केले, त्याला ‘श्रीकृष्ण तांडव’ म्हणतात. त्यातून आनंद व्यक्त होतो.
३ ऐ. नवरस
साहित्यशास्त्रात शृंगार, करुण, हास्य, भयानक, वीर, रौद्र, अद्भुत, बीभत्स आणि शांत, असे नऊ रस मानलेले आहेत.
४. पखवाजवादनाच्या वेळी श्री. छवी जोशी यांना आलेली अनुभूती
‘आतील सकारात्मकता बाहेर येत आहे’, असे जाणवणे आणि ‘१५० हून अधिक पखवाजवादनाचे कार्यक्रम करूनही अन् एरवी २ घंटे वादन करूनही न मिळालेले २० ते ३० मिनिटांच्या वादनातून मिळाले’, असे वाटणे : ‘रामनाथी आश्रमात पखवाजवादन करतांना ‘माझ्या आतमध्ये जे काही सकारात्मक आहे, ते बाहेर येत आहे’, असे मला जाणवले. आतापर्यंत १५० ते १६० पखवाजवादनाचे कार्यक्रम केल्यानंतरही मला असा अनुभव आला नाही. एरवी २ घंटे पखवाजवादन करूनही जे मिळत नाही, ते आज मला मिळाले. आज येथे पखवाज वाजवण्यास आरंभ करण्याआधी बर्याच गोष्टी वाजवण्याचे माझ्या लक्षात होते; परंतु पखवाज वाजवायला बसल्यावर मी एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेमध्ये गेलो. त्यामुळे मला आतून वेगळे अनुभवायला येत होते. त्यामुळे मी अधिक वादन करूच शकलो नाही. मी येथे केवळ २० ते ३० मिनिटे वादन केले, तरीही अशी अनुभूती येणे, हे अद्भुत आहे.’
५. पखवाजवादन ऐकतांना साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
पखवाजवादनाच्या वेळी, तसेच त्यानंतर उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली, तसेच सर्वांना अनुभूती आल्या.
५ अ. गणेशपरण
५ अ १. गणेशपरण वाजवण्यापूर्वी त्यांनी गणेशपरणाची पढंत केली (गणेशपरणाचे बोल म्हणून दाखवले). त्या वेळी त्यांचे उच्चार भावपूर्ण होते. – कु. शिवांजली काळे
५ अ २. श्री. छवी जोशी पखवाजावर गणेशपरण वाजवत असतांना पखवाजावर नृत्य करणार्या श्री गणेशाचे दर्शन होणे
या पूर्वी प्रसिद्ध तबलावादकांनी वाजवलेले गणेशपरण मी ऐकले होते. त्यांपैकी एका तबलावादकाने गणेशपरणातून अनुभूती येते का, ते पहा, असे श्रोत्यांना आवाहन केले आणि नंतर गणेशपरण वाजवून दाखवले; मात्र त्या वेळी श्री गणेशाची अनुभूती आली नव्हती. गणेशपरण काही सेकंदामध्ये वाजवून संपते. एवढ्या अल्प कालावधीत श्री गणेशाची अनुभूती कशी येणार ?, असा प्रश्न त्या वेळी मला पडला होता; मात्र श्री. छवी जोशी यांनी पखवाजावर गणेशपरण वाजवण्यास प्रारंभ करताच तिसर्याच मात्रेला मला त्यांच्या उजव्या हाताजवळ पखवाजावर नृत्य करणारा श्री गणेश दिसला. – कु. सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ ३. श्री. जोशी यांच्या बोलाच्या उच्चारणातून एक दैवी शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले.
५ अ ४. ते गणेशपरण वाजवत असतांना काही वेळाने त्यांच्या जागी श्री गणेशच वादन करत असल्याचे मला जाणवले.
५ अ ५. श्री. जोशी अंतरंगात दैवी आनंद अनुभवत आहेत, असे मला जाणवले. (नंतर त्यांनीही तसे सांगितले.)
५ अ ६. काही क्षण श्री गणेश पखवाज हातात घेऊन नृत्य करत आहे, असे मला दिसले आणि तांडव नृत्य करी गजानन.. या गाण्याचे स्मरण होऊन मला आनंद झाला.– आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
५ अ ७. गणेशपरण वाजवायला आरंभ होताच थकवा नाहीसा होणे आणि उत्साही वाटणे
आरंभी श्री. जोशी यांनी गणेशपरण वाजवले. याचा आरंभ होताच मला आलेला थकवा नाहीसा झाला आणि मला पुष्कळ उत्साही वाटू लागले.– सौ. अंजली कणगलेकर
५ आ. परण
या वादनाच्या वेळी माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
५ इ. फर्माईशी चक्करदार परण
५ इ १. याचे बोल ऐकतांना मला नटराज शिवाचे आनंद तांडव अनुभवता आले. – कु. शिवांजली काळे
(आनंद तांडव : हा नृत्य प्रकार म्हणजे हृदयालाच आपला शिवस्वरूप ईश्वर (चिदंबरम्) मानून माया-मोहापासून मुक्ती मिळवून मोक्षप्राप्तीसाठी निमग्न असणार्या जिवाचे प्रतीक आहे.)
५ ई. वातावरणात उत्साह आणि आनंद यांची स्पंदने पसरत असल्याचे जाणवणे
परणाचे प्रकार ऐकतांना मला वातावरणात पुष्कळ गती जाणवली. उत्साह आणि आनंद यांची स्पंदने वातावरणात पसरत असल्याचे मला जाणवले. माझ्याकडून ताल धरला गेला. – सौ. अंजली कणगलेकर
६. झाला (वादनाचा एक प्रकार)
६ अ. शृंगाररसाची अनुभूती येणे
‘श्री. जोशी यांनी ‘झाला’ या प्रकाराच्या वादनाद्वारे आम्हाला शृंगाररसाची अनुभूती दिली. तेव्हा मी मंदिरात असल्याचे मला जाणवले.’ – कु. सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची आध्यात्मिक पार्श्वभूमी : ‘भारतीय शास्त्रीय नृत्याच्या पदांतून चित्रित केल्या गेलेल्या नायक-नायिकेच्या संयोग किंवा वियोग पर शृंगारामधून ‘नायिकारूपी जीवात्मा गुरुरूपी सखीच्या साहाय्याने नायकरूपी परमात्म्याशी तादात्म्य पावण्याचा (एकरूप होण्याचा) प्रयत्न करत आहे’, हा गूढार्थ असतो आणि म्हणूनच शृंगारात्मक वर्णने पराकोटीची असली, तरीही सात्त्विक असतात. हीच नृत्यकलेची आध्यात्मिक पार्श्वभूमी होय.)
(वरील लिखाणानुसार साधिकेने पखवाजवादनातील शृंगाररसाच्या अनुभूतीद्वारे आध्यात्मिक अनुभूती घेतली.’ – संकलक)
६ आ. ‘वीररसातून भावजागृती कशी होणार ?’, असे वाटणे आणि ‘झाला’ ऐकल्यावर भावजागृती होणे
‘मी अभिनय करतो. नेहमी वीररसाचा अभिनय करतांना माझ्यात क्षात्रवृत्ती निर्माण होऊन मला चीड येत असे. त्या वेळी मला त्या अभिनयातून आनंद मिळत नसे, तसेच माझी भावजागृतीही होत नसे. त्यामुळे ‘वीररसातून भावजागृती कशी होणार ?’, असे मला वाटत असे. आज श्री. जोशी यांच्या वादनातील वीररसाची अनुभूती देणारा ‘झाला’ ऐकतांना मी मनातून वीररसाचा अभिनय करत होतो आणि त्यातून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मी मनातून करत असलेल्या अभिनयातून मला आनंदही घेता आला. पूर्वी वीररसाचा अभिनय करतांना त्या संदर्भातील पार्श्वसंगीत नसे. श्री. जोशी यांच्या पखवाजवादनाच्या वेळी मी मनातून करत असलेल्या अभिनयाला वीररसाचे पार्श्वसंगीत मिळाल्याने माझी भावजागृती झाल्याचे माझ्या लक्षात आले.’ – श्री. तुषार काकड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ इ. ध्यान लागणे
‘झाला’ ऐकतांना माझे ध्यान लागले. त्या वेळी मूलाधारचक्रातून संवेदना निघून त्या वेगाने आज्ञाचक्रापर्यंत जात असल्याचे मला जाणवले.’ – सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ ई. ‘वादनाचा हा प्रकार ऐकतांना ‘तेथे बसलेले सर्व साधक, म्हणजे देवताच आहेत आणि ते वेगाने गंधर्वलोकात जात आहेत’, असे मला दिसले.
६ उ. ‘हे वादन ऐकत असतांना साधकांची कुंडलिनीशक्ती जागृत झाली असून सोनेरी प्रकाशाच्या साहाय्याने ती वेगाने ऊर्ध्व दिशेने सरकत आहे’, असे मला दिसले.
६ ऊ. आनंद अनुभवता येणे
या वादनप्रकारात वाईट शक्तीविषयी त्रास झाला; परंतु माझे अस्तित्व अधिक असल्याने मला आनंदही अनुभवता आला. याविषयी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’ – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ ए. ‘झाला’ या प्रकारातील दोन नादांपैकी एक नाद अखंड ऐकू येत असल्याने त्याच्याशी
स्वतः जोडला गेलो असल्याचे जाणवणे आणि हा नाद निराळा असल्याचे अंतर्मनातून अनुभवता येणे
‘श्री. जोशी यांनी वाजवलेल्या ‘झाला’ या प्रकारात दोन नाद होते. त्यांपैकी एक ‘दूं..दूं..दूं..’ हा घुमणारा नाद अखंड येत होता. नाद अखंड ऐकू येत असल्याने मी त्याच्याशी जोडला गेलो. तो नाद निराळा असल्याचे मला अंतर्मनातून अनुभवायला आले. शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसतांनाही देवाच्या कृपेने मला ही अनुभूती आली.’ – श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७. रामराज्याभिषेक परण
७ अ. ‘श्री. जोशी रामराज्याभिषेक परण वाजवत असतांना ‘ते मंदिरात असून स्वतः दास्यभावातील हनुमान झाले आहेत’, असे मला जाणवले.’ – कु. मयुरी आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ आ. पखवाजवादन आध्यात्मिक स्तरावर असल्याचे जाणवून भावजागृती होणे
‘श्री. जोशी यांनी रामराज्याभिषेक परण वाजवल्यावर ते पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर असल्याचे मला जाणवले. ते ऐकत असतांना माझी भावजागृती झाली. आज त्रासापेक्षा आनंद जास्त अनुभवायला आल्याने माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. गुरुप्रसाद बापट
७ इ. ‘श्री. जोशी यांनी पखवाजावर राम सिंहासनावर विराजमान झाल्याचे बोल वाजवल्यावर माझी भावजागृती झाली.’ – सौ. श्रेया साने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ ई. डोळ्यांसमोर रामराज्याभिषेकाचे दृश्य आपोआप उभे रहाणे आणि श्रीराम वेशातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन रामराज्याची अनुभूती येणे
‘श्री. जोशी हे परण म्हणत आणि वाजवत असतांना माझ्या डोळ्यांसमोर रामराज्याभिषेकाचे दृश्य आपोआप उभे राहिले. ते वर्णन करत असलेल्या सर्व कृती प्रत्यक्षातही दृश्य स्वरूपात मला अनुभवता आल्या. त्या वेळी श्रीराम वेशातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन मला रामराज्याची अनुभूती आली.’ – कु. शिवांजली काळे (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
८. श्रीकृष्ण तांडव परण
८ अ. शरिरातून भाव अन् आनंद यांची स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवणे आणि
‘लय’ हा श्रीकृष्णाच्या लीलेचा एक भाग असल्याने तो आनंददायी असल्याचे भगवंताने सूक्ष्मातून सांगणे
‘श्रीकृष्ण तांडव ऐकतांना मला करुणामयी, कृपाळू आणि दयासिंधु भगवंताचे स्मरण झाले. मला आनंद जाणवला, तसेच माझी भावजागृती झाली. माझ्या शरिरातून भाव आणि आनंद यांची स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवले. तांडव असूनही आनंद जाणवण्यामागचे कारण भगवंताने सांगितले, ‘कृष्णाने लय करणे, हे जिवाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी असते. ते प्रसंगानुरूप लीलेचा भाग म्हणून असल्याने ते आनंददायी असते.’ – सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
८ आ. ‘श्रीकृष्ण तांडवाचे वादन चालू असतांना मला माझ्या मनात ऊर्जात्मक उत्साह जाणवला. त्यांच्या वादनात मला क्षात्रवृत्ती जाणवली.’ – कु. शिवांजली काळे
९. श्रीकृष्णाचे कीर्तन (नाथ संप्रदायानुसार) करत असतांना केले जाणारे पखवाजवादन
९ अ. डोळे आपोआप मिटले जाणे आणि भावावस्था अनुभवायला मिळणे
‘वादन ऐकत असतांना ते हळुवार ‘हरे रामा, हरे कृष्णा’ या जपाला साथ देणारे पखवाजवादन करत होते. तेव्हा आमचे डोळे आपोआप मिटले गेले आणि आमची भावजागृती होऊन त्या संपूर्ण प्रकारात आम्हाला भावावस्था अनुभवायला मिळाली.
९ आ. वादनाचा हा प्रकार थांबल्यावर श्री. जोशी यांचीही भावजागृती झाली. त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले; परंतु त्यांनी ते रोखून धरले.’ – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी आणि सौ. श्रेया साने
९ इ. ‘कीर्तनीय वादन केल्यावर माझा भाव जागृत झाला आणि मला आनंद जाणवला.’ – श्री. गिरिजय प्रभुदेसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
९ ई. ‘हे वादन चालू असतांना मला सर्वाधिक निर्गुण ईश्वरी तत्त्व जाणवले, तसेच ‘आम्ही सर्व जण वेगळ्या लोकात जात आहोत’, असे जाणवले.
९ उ. ‘वादन करत असतांना श्री. जोशीसुद्धा अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला वातावरणात दैवी पालट जाणवले.’ – कु. शिवांजली काळे
९ ऊ. ‘कीर्तनीय वादनाच्या वेळी ‘श्रीकृष्ण फेर धरून नाचत आहे’, असे मला वाटले.’ – सौ. सीमंतिनी बोर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१०. श्री. जोशी यांनी नवरसांपैकी शृंगार, करुण, वीर आणि
अद्भुत हे रस निर्माण करणारे पखवाजवादन केल्यावर आलेल्या अनुभूती
‘गे गे गे गे &’ या प्रकारच्या वादनातून श्री. जोशी यांनी ‘४ रसांची निर्मिती कशी होते ?’, ते सप्रयोग दाखवले. पखवाजावर त्यांची बोटे अत्यंत हळुवारपणे; पण आवश्यक त्या जोराने सहजपणे पडत होती. प्रत्येक रसानुसार त्यांच्या बोटांतून आणि वाद्यातून संबंधित रसाची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले.
१० अ. शृंगाररस
हे वादन ऐकतांना शृंगाररसातील भक्तीची हळुवारता अनुभवायला आली. माझ्याकडून गोविंदाला आळवणे होऊ लागले. त्या वेळी माझी भावजागृती झाली.
१० आ. अद्भुत रस
हा ऐकतांना ‘भगवंताची किमया’ असे शब्द माझ्या डोळ्यांसमोर आले आणि माझी भावजागृती झाली.
१० इ. वीररस
१. मला वीररसातील गंभीरता अनुवायला मिळाली. या वेळी आधी माझ्या कानांच्या पाळ्या, नंतर तोंडवळा आणि त्यानंतर पूर्ण शरीर तप्त झाले. माझ्या शरिरातून तेजाची वलये वातावरणात पसरत असल्याचे मला जाणवले.’ – सौ. अंजली कणगलेकर
२. ‘वीररसाचे वादन ऐकल्यावर माझ्या शरिरावर रोमांच उभे राहिले.’ – सौ. सीमंतिनी बोर्डे
१० ई. करुणरस
‘कृतज्ञता’ आणि ‘समर्पणभाव’ या शब्दांचे स्मरण होऊन देह विश्वव्यापक बनल्याची अनुभूती येणे : ‘करुणरस ऐकतांना माझा भाव जागृत झाला. ‘कृतज्ञता’ आणि ‘समर्पणभाव’ या शब्दांचे मला स्मरण झाले. माझा देह विश्वव्यापक बनल्याची अनुभूती येऊन सर्वांप्रतीची प्रीती आणि करुणा माझ्या देहभर पसरली. या करुणेची वलये हळुवारपणे देहातून बाहेर पडून ती सर्वत्र पसरत असल्याचे जाणवले.’ – सौ. अंजली कणगलेकर
११. इतर अनुभूती
११ अ. मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होणे
११. अ १. वादनापूर्वी मानसिक त्रास होणे, वादन आरंभ झाल्यावर पुष्कळ आनंद होऊन आनंदाच्या उकळ्या फुटणे आणि अंगावर रोमांच येणे
‘वादनापूर्वी मला पुष्कळ मानसिक त्रास होत होता. त्या वेळी मी प्रार्थना केली, ‘या वादनातून माझ्यावर आध्यात्मिक उपाय होऊ देत.’ वादन आरंभ झाल्यावर मला आपोआप आनंद होऊ लागला आणि तो आनंद इतका अधिक होता की, मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याचा परिणाम म्हणून माझ्या तोंडवळ्यावर निखळ हास्य उमलले, तसेच माझ्या अंगावर रोमांच आले.’ – श्री. गुरुप्रसाद बापट
११ आ. पखवाजवादन ऐकतांना डोकेदुखी थांबणे आणि मनातील नकारात्मक विचार न्यून होणे
वादनापूर्वी माझे डोके दुखत होते. पखवाजवादन ऐकतांना माझी डोकेदुखी थांबली, तसेच माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले. – सौ. श्रेया साने
११ इ. आरंभी मला ग्लानी आली. त्यानंतर मला माझ्या आज्ञाचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या. – सौ. सीमंतिनी बोर्डे
११ ई. वादनाला आरंभ होताच थकवा उणावणेे
या कार्यक्रमाला येण्याचा निरोप मिळाला. त्या वेळी रात्रीच्या जागरणामुळे मला पुष्कळ झोप येत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर मला चांगले वाटू लागले. पखवाजवादनाला आरंभ होताच मला आलेला थकवा उणावला. – सौ. अंजली कणगलेकर
१२. श्री. जोशी यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१२ अ. वादन चालू असतांना मला २ – ३ वेळा श्री. जोशी हे एका नर्तकाप्रमाणे जाणवले.
१२ आ. श्री. जोशी यांच्या जागी वरच्या दिशेने पिवळा प्रकाश आल्याचे दिसणे आणि एक
दैवी ऊर्जा वेगाने श्री. जोशी यांच्याभोवती गतीमान होऊन त्यात त्यांचे अस्तित्व विरून गेल्याचे जाणवणे
श्री. जोशी यांच्या जागी वरच्या दिशेने वेगाने पिवळा प्रकाश आल्याचे मला दिसले. भोवरा जसा वेगाने फिरतो, त्याहीपेक्षा वेगाने एक दैवी ऊर्जा प्रथम श्री. जोशी यांच्याभोवती गतीमान झाली आणि त्यात त्यांचे स्वतःचे अस्तित्व विरून गेले, असे मला दिसले. त्यामुळे ते वादन करत असतांना त्यांच्या जागी काहीच नाही. केवळ रिकामी जागा आहे, असे मला दिसत होते. – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
१२ इ. पखवाजाभोवती प्रभावळ दिसणे आणि श्री. जोशी यांच्याभोवती पांढरे कवच दिसणे
पखवाजाच्या सभोवताली आम्हाला प्रभावळ दिसत होती. त्यातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे आम्हाला दिसले. श्री. जोशी यांच्याभोवती आम्हाला पांढरे कवच दिसत होते. – कु. सिद्धी सारंगधर आणि आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१२ ई. मी वादनातून अनुभवलेला आनंद २ दिवस टिकून होता. – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
१२ उ. हे वादन चालू कधी झाले आणि कधी संपले ?, हे मला कळलेच नाही. मला काळाच्याही पलीकडे गेल्यासारखे जाणवले. – सौ. अंजली कणगलेकर
१२ ऊ. तबलावादनातून शक्ती जाणवते, तर पखवाजवादनातून आम्हाला आनंद आणि शक्ती जाणवली. – कु. तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१२ ए. पखवाजवादनातून आम्हाला ॐकार ऐकू आला. – कु. शिवांजली काळे, कु. मयुरी आगावणे, आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर
१३. श्री. छवी जोशी यांच्या वादनाची आध्यात्मिक स्तरावर लक्षात आलेली सूत्रे
१३ अ. पखवाजातून उत्पन्न होणार्या नादातून विविध दैवी ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवल्या. तसेच त्या दैवी ऊर्जेचा रंग पांढरा असून त्यातील काही लहरींचा गोल आकार, तर काही लहरींचा आकार एकमेकांत गुंतलेल्या गोल आकारांप्रमाणे होता.
१३ आ. पखवाजातून येणारा नाद ऐकून माझे मन एकाग्र झाले आणि माझी कुंडलिनीशक्ती ऊर्ध्वगामी प्रवास करत असल्याचे जाणवले.
१३ इ. नादातून प्रामुख्याने शिवलहरींचे प्रक्षेपण होत आहे, असे जाणवले. तसेच नादाचा परिणाम श्रोत्यांच्या कुंडलिनी चक्रांवर होत होता.
१३ ई. पखवाजाच्या नादात आध्यात्मिक गोडवा जाणवत होता.
१३ उ. या नादात आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता २० टक्के होती.
१३ ऊ. पखवाजाच्या नादात आध्यात्मिक गोडवा निर्माण होण्याची सूक्ष्म प्रक्रिया
पखवाज वादकाचे मन आणि भाव शुद्ध होता. त्यामुळे पखवाजावर होणार्या आघातातून निर्माण होणार्या नादात ही शुद्धता उतरली. त्याचा परिणाम नादावर झाला आणि नाद शुद्ध बनला. या नादाची ध्वनीतीव्रता अल्प-अधिक असली, तरी त्या नादातून ईश्वरीय गोडव्याची अनुभूती श्रोत्यांना येत होती. – श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०१७)
१४. वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्र
१४ अ. श्री. छवी जोशी यांनी पखवाज वाजवल्यानंतर त्यांच्या पखवाजाच्या डाव्या भागावर ॐ आणि त्रिशुळाचा आकार निर्माण झालेला दिसला.
१४ आ. आश्रम पहात असतांना त्यांचा पुष्कळ वेळा भाव जागृत झाला. – आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
श्री. छवि जोशी यांनी सनातन आश्रमाविषयी काढलेले उद्गार !
आश्रम पुष्कळ मनोहर असून येथे शांती अनुभवता आली !
अद्भूत ! माझ्या मनात गोव्याविषयी निराळीच प्रतिमा होती. त्याप्रमाणे जर विचार केला, तर गोव्यासारख्या ठिकाणी असे पवित्र आणि सुंदर स्थान आहे, याविषयी आश्चर्य वाटते. बर्याच ठिकाणी गेल्यानंतर कपट जाणवते, येथे मात्र निर्मळता जाणवते. आश्रम पुष्कळ मनोहर असून येथे शांती अनुभवता आली. येथे येऊन मन प्रसन्न झाले. मी भारतातील जवळजवळ ३५ ते ४० आश्रमांना भेटी दिल्या आहेत; परंतु मला कुठेही असा अनुभव आला नाही. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी मी माझ्या परिचितांना अवश्य सांगीन.
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील ईश्वरप्राप्तीसाठी संगीत (गायन), वादन आणि नृत्य या कलांचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !
हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्यस्थितीत ईश्वरप्राप्ती हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयांतर्गत या विविध कलांचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधनाचे कार्य चालू आहे.
संगीत (गायन), वादन आणि नृत्य या कलांचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणार्या अन् या कलांचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.
भ्र.क्र. ९५६१५७४८२४, ७९७२४४८९०२
ई-मेल : [email protected]