रामनाथी (गोवा) – १७ जानेवारी या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील विशाखा नृत्यालयाच्या संचालिका सौ. ज्योती शिधये या त्यांच्या १४ विद्यार्थिनींसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या आहेत. सौ. ज्योती शिधये या कथ्थक नृत्य करणार्या नामांकित नृत्यांगना आहेत. सनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्य सादर करण्याची संधी मिळणे, हेे आमचे अहोभाग्य आहे, असे भावपूर्ण उद्गार सौ. ज्योती शिधये यांनी आश्रमदर्शनाच्या वेळी व्यक्त केले. सौ. ज्योती शिधये आणि त्यांच्यासमवेत आलेल्या विद्यार्थिनींना डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कलांचा विविध उपकरणांच्या साहाय्याने संशोधनपर अभ्यास केला जातो, याविषयी सौ. ज्योतीताई यांना सांगितल्यावर त्यांनी कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संशोधनासाठी सर्वतोपरी पूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले. संशोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्या पूर्णपणे या संशोधन कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत होत्या.
आश्रमदर्शनाच्या वेळी सौ. ज्योती शिधये आणि त्यांच्या समवेत आलेल्या विद्यार्थिनींना आलेल्या विविध अनुभूती आणि अन्य सूत्रे
१. आश्रमात एक विशिष्ट ऊर्जा आहे, त्यामुळे आम्हाला एवढा प्रवास करूनही पहाटे लवकर उठलो किंवा विश्रांती झाली नाही, असे काही वाटले नाही. आश्रमातील या ऊर्जेमुळे प्रसन्न वाटत आहे.
२. आश्रमाच्या विविध आगाशीतून आश्रमाबाहेरील वातावरणाचा आनंदही त्यांनी अनुभवला. त्यांना हे वातावरण वेगळे जाणवत होते.
३. आश्रमातील स्वयंशिस्त पाहून सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आम्हीही यासाठी आमच्या घरी प्रयत्न करू, असे सांगितले.
४. चुका आणि अहंनिर्मूलनाचा फलक सर्वांनी आवर्जून पाहिला आणि तो समजूनही घेतला. चुका लिहिण्याचा हा भाग आवडल्याचे त्यांनी सांगितले. एका विद्यार्थिनींने मी घरातदेखील चुकांचा फलक करून लिहिणार, असे या वेळी सांगितले.
५. कलेची सेवा करणार्या साधकांनी साधना म्हणून कला कशी देवाचरणी अर्पण करायची ? कलेत सात्त्विकता आणि चैतन्य येण्यासाठी प्रार्थना अन् कृतज्ञता कशी करावी, हे सांगितले. ते ऐकल्यावर त्यांच्या प्रकाशित होणार्या नृत्यासंदर्भातील मासिकात अशीच सात्त्विकता आणण्यासाठी आम्हीही अभ्यास करू या, असे त्यांनी सांगितले.
६. या वेळी सूक्ष्मातून आश्रम जीवन अनुभवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात