सनातनचा आश्रम ‘अद्भुत’ असल्याचा उत्स्फूर्त अभिप्राय !
रामनाथी (गोवा) – ‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुशील पंडित यांनी १५ जानेवारीला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. सनातनचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे यांनी श्री. पंडित यांना आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांच्या व्यापक कार्याविषयीची माहिती दिली. या वेळी श्री. पंडित यांनी सनातनचा आश्रम ‘अद्भुत’ असल्याविषयीचा उत्स्फूर्त अभिप्राय दिला.
या वेळी त्यांनी ‘अदृश्य सूक्ष्म-जगताचा इष्ट आणि अनिष्ट परिणाम स्थूलरूपाने दर्शवणार्या अद्वितीय संग्रहालया’सही भेट दिली. हे संग्रहालय पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
पर्वरी, गोवा येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत भारत विकास परिषद आणि पर्वरी जनहित मंडळ यांद्वारे आयोजित, तर गोवा शासनाच्या कला आणि सांस्कृतिक खात्याद्वारे पुरस्कृत ‘शारदा व्याख्यानमाले’ला श्री. पंडित उपस्थित होते. या व्याख्यानमालेत श्री. पंडित यांनी ‘प्राचीन कश्मीर – धारणा एवं परंपरा’ यावर प्रथम दिनी (पुष्प पहिले) मार्गदर्शन केले. दुसर्या दिवशी (पुष्प दुसरे) ‘मध्ययुगीन कश्मीर और दमन’, तर तिसर्या दिवशी (तृतीय पुष्प) ‘आधुनिक कश्मीर और उसकी चुनौतियां’ या विषयांवर श्री. पंडित यांनी त्यांचे बहुमोल विचार मांडले.
सनातन आश्रमदर्शनाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेणारे श्री. सुशील पंडित !
‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक ठिकाणचे साधक, जिज्ञासू, तसेच हिंदुत्वनिष्ठ येत असतात. अनेक जण येथील व्यवस्थापन, स्वच्छता, नियोजनकुशलता, साधकांची नम्रता इत्यादी गोष्टींची वाखाणणीही करतात. आश्रमदर्शनाची सेवा करतांना दर्शनार्थींना या सर्व गोष्टींसमवेतच आध्यात्मिक स्तरावर काय जाणवते, हे अनुभवण्यास सांगावे लागते किंवा विविध प्रयोग केल्यानंतर त्यांना तसे जाणवते आणि दर्शनार्थी तशा अनुभूती सांगतात.
१५ जानेवारी २०१८ या दिवशी मात्र निराळाच अनुभव आला. देहली येथील हिंदुत्वनिष्ठ आणि काश्मिरी हिंदू श्री. सुशील पंडित आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. आश्रमदर्शनाच्या आरंभी मी (अधिवक्ता योगेश जलतारे यांनी) त्यांना काही सांगितले नाही, तरीही त्यांनी आश्रमदर्शन करतांना प्रत्येक टप्प्यावर आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला. त्यांचे मध्ये मध्ये ध्यान लागत होते. आश्रमातील प्रत्येक गोष्ट केवळ जाणून न घेता अनुभवण्याचा ते प्रयत्न करत होते. आश्रमात दर्शनार्थींना पंचतत्त्वांपैकी एखाद-दुसरी अनुभूती येते, उदा. सुगंध जाणवणे किंवा प्रकाश दिसणे इत्यादी. श्री. सुशील पंडित यांना मात्र आश्रमाच्या भिंतीला स्पर्श करून हलकेपणाची अनुभूतीही आली, म्हणजे वायुतत्त्वाची अनुभूतीही घेता आली. ध्यानमंदिरात गेल्यावर आपोआप ध्यान लागत असल्याने त्यांचे डोळे उभ्या उभ्याच मिटायला लागले. त्यामुळे ते लगेचच खुर्चीत बसले आणि त्यांनी ध्यानाचा आनंद घेतला. ‘ध्यानमंदिरातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते’, हे त्यांनी अनुभवल्याचे सांगितले. आश्रमात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या तोंडून केवळ एकच वाक्य बाहेर पडत होते, ‘अद्भुत, सर्वकाही अद्भुत !’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात