प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

प.पू. आबा उपाध्ये

पुणे – येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर २२ डिसेंबर २०१७ ला सकाळी ९ च्या सुमारास आपोआप भस्म प्रकट झाले. प.पू. आबांनी सकाळी देवघरात देवाला नमस्कार करून नंतर खोलीत असणार्‍या बाबाजींच्या प्रतिमेला नमस्कार केला. तेव्हा देवघरात भस्म नव्हते; मात्र त्यांचे नातू श्री. अमरेंद्र उपाध्ये थोड्या वेळाने देवघरात दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांना शिवपिंडीवर भस्म आल्याचे आढळून आले. आपोआप आलेल्या या भस्मामुळे संपूर्ण पिंडी झाकली गेली होती, तसेच काही भस्म शिवपिंडीसमोर असणार्‍या गंगाजलाच्या पात्रावर (कमंडलूवर), तसेच नंदीवर पडले होते. या भस्माचा सुगंध पुष्कळ वेळ संपूर्ण घरभर दरवळत होता, असे कुटुंबियांनी सांगितले. प.पू. आबा उपाध्ये यांनी याविषयी त्यांच्या गुरुजींकडे चौकशी केली असता, त्यांनी आज उत्तम योग असल्याचे सांगितले.

शिवपिंडीचे माहात्म्य

प.पू. आबांच्या देवघरातील चांदीची शिवपिंडी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. प.पू. आबा यांच्या मातोश्रींची ती पिंडी आहे. त्यांनी ती पुढे प.पू. आबांना दिली. रायगड जिल्ह्यातील उरण-केगाव येथील माणकेश्‍वर शिवमंदिरात एकदा प.पू. आबा यांच्या मातोश्री आणि बहीण गेल्या होत्या. त्या वेळी रौद्र रूपातील शंकराने मातोश्रींना प्रत्यक्ष दर्शन दिले. शिवाचे ते रौद्र रूप पाहून प.पू. आबा यांच्या मातोश्री घाबरल्या आणि लगेच घरी परत आल्या. घरी आल्यावर त्यांनी पाहिले, तर धाकटे दीर ओव्याचा अर्क बनवतांना त्याची वाफ अंगावर येऊन भाजले होते. (प.पू. आबा यांच्या घरी वैद्यकीय व्यवसाय होता. त्यासाठी ओव्याचा अर्क बनवत असतांना प.पू. आबा यांचे काका भाजले होते.) शंकराने आईला रौद्ररूप दाखवून घरी लवकर जा, असे सांगण्याचाच हेतू नसेल कशावरून ? या घटनेनंतर आईने ती चांदीची शिवपिंडी घेतली, असे प.पू. आबा उपाध्ये यांनी सांगितले.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर भस्म आपोआप प्रकट होते. या भस्मामुळे संपूर्ण शिवपिंडी झाकली जाते. या भस्माची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. ७.१२.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. तसेच चाचणीमध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात स्नानासाठी पाणी गरम करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या बंबाची राख तुलनेसाठी वापरण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यामुळे चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात आली.

 

२. प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माच्या संदर्भातील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

सनातन आश्रमाच्या बंबाची राख आणि प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेले भस्म या दोन्ही घटकांमध्ये इन्फ्रारेड अन् अल्ट्राव्हायोलेट या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्मामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. या चाचणीतील रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या बंबाच्या राखेमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती; पण प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्मामध्ये सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होती. भस्मासाठी यू.टी.एस्. स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला. त्यामुळे त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. त्याची प्रभावळ ३.२ मीटर होती.

२ इ. भस्माच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची प्रभावळ रामनाथीच्या आश्रमाच्या बंबाच्या राखेच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. सनातन आश्रमाच्या बंबाच्या राखेची प्रभावळ १.२२ मीटर होती. प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची प्रभावळ ४.३६ मीटर होती, म्हणजे बंबाच्या राखेच्या प्रभावळीच्या तुलनेत ती सुमारे तिपटीपेक्षाही अधिक होती.

वरील सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ३ मध्ये दिले आहे.

 

३. अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात
असलेल्या बंबाच्या राखेत नकारात्मक ऊर्जा नसणे

बंबाची राख ही सनातनच्या आश्रमातील साधकांच्या अंघोळीसाठी प्रतिदिन पेटवण्यात येणार्‍या बंबातील आहे. आश्रमात संत आणि साधक यांचे असलेले वास्तव्य अन् त्यांची दैनंदिन साधना, तसेच आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांसाठीचे कार्य यांमुळे निर्माण झालेल्या सात्त्विकतेमुळे आश्रमातील निर्जीव वस्तूंमध्येही सकारात्मक स्पंदने निर्माण झाली आहेत. त्याचा परिणाम बंबातील राखेवरही झाला आहे.

३ आ. प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडील चांदीच्या
शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेले भस्म हे दैवी भस्म असणे

प.पू. आबा उपाध्ये यांचा आध्यात्मिक अधिकार पुष्कळ मोठा आहे. त्यांच्याकडील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रगट झालेले भस्म हे अद्भूत ईश्‍वरी साक्षात्कारांपैकी एक आहे. त्यांच्या निवासस्थानी आणि देवघरात असे अद्भूत ईश्‍वरी साक्षात्कार नेहमीच प्रत्ययास येतात. प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीची शिवपिंडी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. या शिवपिंडीवर महाशिवरात्रीला अभिषेक केला जातो. या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्मामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे, हे ते भस्म दैवी असल्याची साक्ष देते. आजच्या या घोर कलियुगात ईश्‍वराचे अस्तित्व प्रत्ययास आणून देणार्‍या अशा थोर संतविभूतींच्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी ती अल्पच आहे.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.१.२०१८)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment