वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा काही साधकांना प.पू. गगनगिरी महाराज यांची भेट आणि आशीर्वाद घेण्यास सांगितले. आम्ही तेथे जाण्याआधी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या समोर कोल्हापूर येथील राजकारणी खाली मान घालून उभे होते. प.पू. महाराज त्यांना काही कारणांवरून रागावत होते. आम्ही तेथे पोहोचताच प.पू. गगनगिरी महाराज यांनी त्यांच्याकडे आलेल्या राजकारण्यांना जायला सांगितले आणि ते आमच्याशी बोलू लागले.
१. प.पू. गगनगिरी महाराज यांनी त्यांच्या भक्तांना साधकांसाठी साजूक तुपातील शिरा करायला सांगणे
प.पू. गगनगिरी महाराज यांनी आम्हाला महाप्रसाद घेण्यास सांगितले. दुपार झालेली असल्याने आम्ही आमच्या समवेत आणलेला महाप्रसाद आश्रमात पोहोचण्यापूर्वी ग्रहण केला होता. आम्ही तसे प.पू. महाराजांना सांगितले, तरीही त्यांनी त्यांच्या भक्तांना आमच्यासाठी साजूक तुपातील शिरा करायला सांगितला.
२. प.पू. गगनगिरी महाराज यांनी त्यांच्या भक्तांना
आश्रमातील नियम सनातनच्या साधकांसाठी लागू न करण्यास सांगणे
आश्रमात एकदा महाप्रसाद सिद्ध झाल्यानंतर शांत केलेला अग्नी पुढील महाप्रसाद करण्याच्या वेळेपर्यंत प्रज्वलित न करण्याचा नियम होता. प.पू. गगनगिरी महाराज यांनी सनातनच्या साधकांसाठी हा नियम मोडून साजूक तुपातील शिरा करायला सांगितल्याचे ऐकून त्यांच्या भक्तांना (आश्रम व्यवस्थापकांना) पुष्कळ आश्चर्य वाटले. एका भक्ताने आम्हाला विचारले, तुम्ही सर्वजण कोण आहात ? आजपर्यंत येथे महाप्रसादानंतर शांत केलेला अग्नी दुसर्या महाप्रसादाच्या वेळेपर्यंत कधीच पुन्हा प्रज्वलित केला गेला नाही. आज प्रथमच असे होत आहे.
३. प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाचे ध्वनीमुद्रण न होणे
प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाचे ध्वनीमुद्रण करण्यासाठी मी ध्वनीमुद्रक जवळ ठेवला होता. प.पू. महाराजांनी सांगितले, ध्वनीमुद्रण करू नका; परंतु ते मला ऐकू आले नाही. त्यांनी ध्वनीमुद्रकावर २ वेळा बोटाने मारले. प.पू. गगनगिरी महाराज यांच्या आश्रमातून परत आल्यावर ध्वनीमुद्रण ऐकतांना लक्षात आले, त्यांनी ध्वनीमुद्रण करू नका, असे म्हणेपर्यंतचे ध्वनीमुद्रण आहे; मात्र त्यापुढील काहीही ध्वनीमुद्रित झाले नव्हते.
४. लक्षात आलेली सूत्रे
या प्रसंगातून मला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या…
अ. प.पू. गगनगिरी महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अधिकार ओळखला आणि त्यांनी आम्हाला जवळ केले. इतकेच नव्हे, तर प.पू. गगनगिरी महाराज यांनी साधकांवरील प्रेमामुळे त्यांच्या भक्तांना पुन्हा अग्नी प्रज्वलित करून प्रसाद देण्यास सांगितले.
आ. उच्च कोटीच्या संतांच्या इच्छेविना त्यांचे बोलणे ध्वनीमुद्रित करू शकत नाही.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, देहली (२०.९.२०१७)