‘गीता’ हा शब्द भगवद्गीता या शब्दाचा संक्षेप आहे. भगवद्गीता म्हणजे भगवंताने गायिलेली ! गीता ही महाभारताच्या भीष्मपर्वात ग्रंथित आहे. भारताच्या इतिहासात जे जे नवनवे विचारप्रवाह वाहिले, जे जे धार्मिक किंवा तात्त्विक संप्रदाय निर्माण झाले, त्या सर्वांना गीतेतूनच पोषण मिळाले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीचा एक प्रातिनिधिक ग्रंथ म्हणून विचारवंत गीतेलाच मान्यता देतात.
भगवद्गीतेला एवढी मोठी मान्यता मिळाल्यावर रामगीता, शिवगीता, गुरुगीता, हंसगीता, इत्यादी अनुमाने २०० अनुकरणात्मक गीता लिहिल्या गेल्या; पण त्यांपैकी एकीलाही भगवद्गीतेचाच बोध होतो.
गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.
इंग्रजीत आणि इतर पाश्चात्त्य भाषांतही गीतेची अनेक भाषांतरे झाली आहेत. पाश्चात्त्यांच्या संपर्कानंतर भारतातही नवीन दृष्टीकोनातून गीतेचा अभ्यास होऊ लागला आणि तद्विषयक अनेक ग्रंथही निर्माण झाले. या सर्वांत प्रथम उल्लेख करायचा, तो लोकमान्य टिळक यांच्या गीतारहस्याचा ! ‘निष्काम कर्माच्या सिद्धांताला महत्त्व देऊन तशा प्रकारचे कर्म करणार्याला साक्षात् मोक्षसाधक म्हणणे’, हे त्यांनी गीतेच्या आधारेच प्रतिपादिले. गांधींनीही गीतेवर बरेच लिहिले आहे आणि त्यातून त्यांनी अनासक्तियोग प्रतिपादिला आहे. योगी अरविंद घोष, डॉ. बेलवलकर, आचार्य विनोबा, श्री. ज.स. करंदीकर, पंडित सातवळेकर इत्यादी अनेक भारतीय तत्त्वज्ञांनी ग्रंथलेखन करून गीतार्थाचे नवे नवे पैलू अभ्यासकांना दाखवून दिले आहेत. गीतेमधील ब्रह्मविद्या ही उपनिषदांच्या आधारेच प्रतिपादिलेली आहे. उपनिषदांतील कित्येक श्लोक जसेच्या तसे किंवा थोड्याफार अंतराने गीतेत घेतलेले आहेत. गीतेमध्ये सर्व विषय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून प्रतिपादिले आहेत. निरनिराळ्या अध्यायांत तसे विवेचन आले आहे.
गीतेतील अध्यायांमध्ये आलेल्या विषयांचे परीक्षण केले असता गीता म्हणजे कर्म, भक्ति आणि ज्ञान या तीन निष्ठा सांगणारा सुसूत्र असा अलौकिक ग्रंथ आहे, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होते.
संदर्भ : भारतीय संस्कृती कोश