बनखेडी (हौशंगाबाद, मध्यप्रदेश) – येथील पलिया पिपरिया येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. यामध्ये भाविकांना मार्गदर्शन करतांना ऋषिकेश येथील कैलाश आश्रमाचे प.पू. नित्यानंद गिरीजी महाराज यांनी ‘लोकांनी स्वत:च्या जीवनात कोणते पालट केले पाहिजेत’, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच ‘लोकांनी येथून जातांना दक्षिणेच्या रूपात स्वत:तील एक तरी दुर्गुण येथेच सोडून जावे’, असे आवाहन केले. कथेच्या शेवटच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी उपस्थित भाविकांना ‘धर्माचरणाचे महत्त्व, तर समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, या विषयावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प.पू. नित्यानंद गिरीजी महाराज यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्ट्रकी स्थापनाकी दिशा’, हा ग्रंथ भेट देण्यात आला, तसेच समितीच्या कार्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. याशिवाय कार्यासाठी त्यांचे आशीर्वादही घेतले. महाराजांनी समितीच्या कार्याची स्तुती केली, तसेच भाविकांना ‘कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी लावलेले धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पहावे’, असे आवाहनही केले. येथील धर्मप्रेमी श्री. मनीष सहारिया यांनी या कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अन्य एका ठिकाणीही प्रदर्शनाद्वारे जनजागृती
पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावून जनजागृती करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात