‘सद्गुरूंची आज्ञा ही केवळ शिष्याच्या कल्याणासाठीच असते. सद्गुरु शिष्याला आज्ञा करतात, तेव्हा शिष्याकडून आज्ञेचे पालन होईल, अशी व्यवस्थाही करून ठेवतात. त्याद्वारे शिष्याच्या अज्ञानाचा नाश करून त्याचे सूक्ष्म ज्ञानचक्षू जागृत करतात. याची अनुभूती प.पू. गुरुदेवांनी मला प्रदान केली. ही अनुभूती प.पू. गुरुदेवांच्या चरणी शब्दसुमनांच्या माध्यमातून कृतज्ञतापूर्वक समर्पित करत आहे. ‘हे दयाघन गुरुदेवा, शब्दसामर्थ्य प्रदान करा. लिखाण पूर्ण करवून घ्या. हीच कळकळीची प्रार्थना !’
१. वर्षभर बुद्धीने स्वभावदोष आणि अहं दूर करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा एकही स्वभावदोष अथवा अहंचा एकही पैलू न उणावणे अन् प.पू. गुरुदेवांना शरण जाण्याविना पर्याय न उरणे
हे प.पू. गुरुदेव, एकदा माझ्या मनाची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. माझ्यातील स्वभावदोष आणि अहंकार यांची तीव्रता वाढली होती. मी स्वभावदोष आणि अहंकार यांच्याशी बुद्धीने लढा देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे माझ्या मनावरील ताण वाढला होता. मनातील संघर्षामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढले होते. या काळात मी एकेक स्वभावदोष निवडायचो. सकाळी उठल्यावर ‘अमुक स्वभावदोष कुठेच उफाळून येणार नाही, यासाठी दिवसभर दक्ष राहूया’, असा विचार करून मी दिवसभर त्या स्वभावदोषावर लक्ष ठेवून रहायचो. त्या वर्षभरात माझा तसाच प्रयत्न चालू होता. त्यामुळे माझ्या मनावरील दडपण उणावण्याऐवजी आणखीनच वाढले होते. माझा एकही स्वभावदोष किंवा अहंचा पैलू उणावला नाही. उलट माझ्या चुका वाढल्या. शेवटी तुम्हाला शरण जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. तुमची पुनःपुन्हा आठवण येऊ लागली.
२. प.पू. गुरुदेवांनी भावजागृतीचे प्रयत्न करण्यास शिकवणे
२ अ. स्वभावदोष आणि अहंकार यांचे बुद्धीने निर्मूलन होऊ शकत नसल्याने भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी सनातनच्या ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथमालेचा अभ्यास करण्यास प.पू. गुरुदेवांनी सांगणे
हे प.पू. गुरुदेव, आपण दयेचे सागर आहात. मुंगीच्या पायांतील घुंगराचा ध्वनीही आपल्याला ऐकू येतो. आपण सर्वांच्या अंतर्यामी निरंतर वास करता. माझ्या दु:खी मनाची अवस्था आपण जाणली. एकदा आपले दर्शन झाले. या दर्शनानेच माझे मन हलके झाले. या वेळी माझ्या मनातील व्यथा मी आपणासमोर कथन केल्या. आपण मला उपाय सुचवला. आपण म्हणालात, ‘‘स्वभावदोष आणि अहंकार यांचे बुद्धीने निर्मूलन होऊ शकत नाही. ‘मी स्वभावदोष आणि अहंकार यांच्याशी लढीन’, हाही अहंकार झाला. त्यामुळे चुका वाढल्या. भावाच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत. ‘भावाच्या स्तरावर प्रयत्न कसे करायचे ?’, हे आपल्या भावजागृती ग्रंथमालिकेत विस्तृत दिले आहे. भाव वाढला की, आपोआप स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होते. चुका सुधारतात. त्या ग्रंथातील सूत्रांचा अभ्यास कर.’’
२ आ. ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्यातील प्रत्येक सूत्र कृतीत आणून आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकण्यास प.पू. गुरुदेवांनी सांगणे
हे कृपाळू गुरुदेव, ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथाचा अभ्यास कसा करावा ?’, याचेही ज्ञान आपण मला प्रदान केले. आपण मला म्हणालात, ‘‘अभ्यास करतांना निवळ तात्त्विक माहिती समजून घेतली’, असे नको. एका वर्गात साधकांना ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथाचा अभ्यास करण्यास सांगितले होते. एक मासाने (महिन्याने) पुन्हा अभ्यासवर्ग घेतला. त्या वेळी ‘भावजागृतीसाठी साधना’ हा ग्रंथ किती जणांनी अभ्यासला ?’, असे विचारल्यावर एक साधिका सोडून सर्वांनी हात वर केले. त्या साधिकेला एखादी कृती सांगितली की, सर्वांत आधी ती कृतीत आणत असे. त्यामुळे त्या साधिकेने हात वर न केलेला पाहून मला आश्चर्य वाटले आणि ‘या वेळी ती साधिका मागे का राहिली ?’, असा प्रश्न उपस्थित झाला. त्या साधिकेला विचारले असता ती म्हणाली, ‘‘एक मासात हा ग्रंथ अभ्यासणे मला शक्य झाले नाही. प्रत्येक सूत्रावर कृती करून अनुभव घेण्यास वेळ लागत आहे.’’ म्हणजे खर्या अर्थाने ग्रंथाचा अभ्यास तीच करत होती.’’ ‘याला म्हणतात अभ्यास ! असा अभ्यास कर’, अशी आज्ञा आपण मला दिली होती.
३. बुद्धीने चुका सुधारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरणे, भावाच्या स्तरावर चुका आपोआप
सुधारल्या जाणे आणि संतांच्या सत्संगाचे महत्त्व प.पू. गुरुदेवांनी लक्षात आणून देणे
३ अ. प.पू. गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे ‘भावजागृतीसाठी साधना’ हा ग्रंथ वाचून अभ्यास चालू करणे आणि तो न जमल्याने शरण जाऊन त्यांनाच विनवणी करणे
हे गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे प्रथम ‘भावजागृतीसाठी साधना’ हा ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यातील महत्त्वाच्या सूत्रांवर अभ्यास चालू केला; पण त्यातही अडथळे येऊ लागले. ‘ही सूत्रे नक्की कशा प्रकारे जीवनात उतरवावीत ?’, हे मला व्यवस्थित समजत नव्हते. त्यामुळे ‘माझ्याकडून आज्ञेचे पालन होईल कि नाही ?’, असे विचार माझ्या मनात यायला लागले; पण आपण लगेच माझ्या मनाला सावरले. ‘मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।’ म्हणजे ‘(भगवंताची कृपा) मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत चढून जाण्यास समर्थ बनवते.’ या वचनाचे आपणच मला स्मरण करून दिले; म्हणून मी पुन्हा आपल्याला शरण आलो. ‘माझ्यासारख्या मतीमंदाला आपणच भावजागृतीची सूत्रे शिकवावीत. ती सूत्रे आत्मसात करून द्यावीत’, अशी विनवणी माझ्याकडून होऊ लागली.
३ आ. प.पू. गुरुदेवांनी संतांचा सत्संग उपलब्ध करून देणे आणि चुकांची जाणीव होऊन त्या सुधारण्यासाठी प्रयत्न होऊ लागणे
‘मी आज्ञापालन करण्यास असमर्थ आहे’, हे आपण जाणले आणि उदार अंतःकरणाने माझ्यावर दया केलीत. वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेच्या आधी साधारण दोन मास प.पू. दास महाराज आणि पू. माई यांचा सत्संग आपण मला प्रदान केला. हा सत्संग म्हणजे चालता-बोलता भावसत्संगच असतो. या भावसत्संगातून ६ वर्षे पूर्णवेळ साधना करतांना आणि १२ वर्षे नैमित्तिक साधना करतांना होत असलेल्या चुकांची जाणीव आपणच मला करून दिलीत. मी ज्या चुका सुधारण्यासाठी बुद्धीने प्रयत्न करत होतो, त्या या भावसत्संगातून आपोआप सुधारू लागल्या. ‘संतांचे संगती मनोमार्ग गती’ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीचा प्रत्यय आपण करून दिलात.
४. प.पू. दास महाराजांच्या सत्संगामुळे ‘जाणीव’ या शब्दाचा गूढार्थ उकलून साधनेविषयीची अंतर्मुखता वाढणे
प.पू. दास महाराज यांनी माझ्यामध्ये साधनेविषयीची अंतर्मुखता वाढवली. माझ्यात खर्या अर्थाने जाणीव निर्माण केली. ‘जाणीव’ या शब्दाच्या आतील गूढार्थ उकलून दिला. ‘संपूर्ण सृष्टीमध्ये एकच जाणीव निवास करते. तीच जिवांमध्ये राहून इंद्रियांद्वारे सुख किंवा दुःख भोगत असते’, हे प.पू. दास महाराजांच्या सत्संगामुळे प्रथम उमगले. हा अर्थ समजावण्यासाठी त्यांनी दासबोधातील उदाहरण दिले. सर्प जेव्हा फुत्कारतो, तेव्हा समोरचा प्राणी पळून जातो. सापाला वाटते की, समोरचा प्राणी आपला जीव घेईल; म्हणून तो फुत्कारतो आणि समोरच्या प्राण्याला वाटते की, हा सर्प आपला जीव घेईल; म्हणून तो पळून जातो. या दोघांमध्ये जाणीव एकच आहे. ती म्हणजे स्वसंरक्षणाची !
५. प.पू. दास महाराजांच्या सत्संगामुळे समष्टीचा विचार करण्यास शिकणे
ज्या गोष्टीतून मला दु:ख होते, त्याच गोष्टीतून विश्वातील सर्व जीवमात्रांना दुःखच होते. समजा, मला कुणी सुई टोचली, तर ज्या वेदना होतील, त्याच वेदना कीडा-मुंगीपासून सर्व जिवांना होतात. ‘मला ज्या गोष्टींचा राग येतो, त्याच गोष्टींचा राग अन्य सर्वांना येणार’, याची मला जाणीव झाली. प.पू. दास महाराज आणि पू. माई यांच्या भावसत्संगातून प.पू. गुरुदेवांनी माझ्यामध्ये हा मोठा पालट घडवून आणला. पूर्वी मला ‘दुसर्याचा आणि पर्यायाने समष्टीचा विचार कसा करायचा ?’, हे नेमकेपणाने समजत नव्हते.
६. सर्वांमध्ये एकच जाणीव असल्याचे लक्षात आल्याने स्वतःत झालेल्या पालटाची उदाहरणे
६ अ. घडत असलेल्या प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाता येणे
दासबोधातील वरील सूत्राचा अभ्यास केल्यानंतर बाह्य जगाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन पालटला. बिकट प्रसंगात होणारी माझ्या मनाची अस्वस्थता आणि तगमग उणावली. एकदा पणजीहून बेतीच्या दिशेने फेरी बोटीमधून निघालो होतो. फेरी बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, दुचाकी आणि चारचाकी वाहने भरली गेली. यामुळे धक्क्यावरून बोट हलेना. त्या वेळी बोटचालकाने दरवाज्याजवळील काही जणांना खाली उतरण्याची सूचना केली; पण कुणीच सिद्ध होईना. प्रत्येक जण एकमेकांकडे बोटे दाखवून खाली उतरण्यासाठी ओरडत होता; पण स्वतः उतरण्यास सिद्ध नव्हता. यामुळे बोट सुटण्यासाठी अर्धा घंटा विलंब झाला. त्यामध्ये वादही झाले. मी दुचाकीवर एकदम आत होतो. त्यामुळे मला खाली उतरता येत नव्हते. मी आतून शांत होतो; कारण सर्वांमध्ये एकच जाणीव असल्याचे मला दिसत होते. प्रत्येकाला वाटत होते, ‘मला लवकर जायला हवे. बोटीतून दुसरा खाली उतरला, तर बरे होईल.’ या प्रसंगात अर्धा घंटा विलंब झाला, तरी मी अस्वस्थ झालो नाही अथवा मला दु:ख झाले नाही. या प्रसंगाकडे मला साक्षीभावाने बघता आले. हेच सूत्र अन्यत्रही लागू केले.
६ आ. कृतीच्या स्तरावर पालट होऊन पतीव्रता स्त्रीचे वर्तन आणि शिष्याचे वर्तन, यांत काहीही अंतर नसल्याचे लक्षात येणे
१. पूर्वी आम्ही नेसाई येथे सेवेला होतो. तेव्हा तेथे एखादा चांगला पदार्थ बनवला की, ‘तो आधी मला खायला कसा मिळेल ?’, असे माझे विचार असायचे.
२. रात्री किंवा सकाळी उरलेला पदार्थ ‘घेणेच’ अशी सूचना असल्यास माझा ती टाळण्याचा प्रयत्न असायचा. आता कृतीच्या स्तरावर पालट झाला. रामनाथी आश्रमात गेल्यावर दुपारच्या महाप्रसादाच्या वेळी शिल्लक उरलेल्या पदार्थावर ‘घेणेच’ अशी सूचना लावलेला पदार्थ मी मुद्दाम अधिक घेण्यास आरंभ केला.
३. ‘प्रत्येकी एकच चमचा घेणे’ अशी सूचना लावलेला पदार्थ घेण्याचे मी बंद केले. तो पदार्थ मला जसा आवडतो, तसाच तो इतरांनाही आवडतो. तो पदार्थ खाऊन त्यांचा आत्मा तृप्त होतो. ‘हा आत्मा म्हणजे प.पू. गुरुदेवांचाच अंश आहे’, हे मला उमजले.
या कृतींमधून एखाद्या पतीव्रता स्त्रीचे वर्तन आणि शिष्याचे वर्तन, यांत काहीही अंतर नाही’, हे माझ्या लक्षात आले.
७. प्रेमभाव नसला की, नियम आणि कार्यपद्धती
लावाव्या लागतात, या प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूत्राचा गर्भितार्थ उमगणे
७ अ. आश्रम गुरूंचा असल्याने नियमात तारतम्य असावेसे वाटणे
पूर्वी महाप्रसादानंतर वयस्कर साधकांना थरथरत्या हातांनी भांडी घासतांना पाहिले, तरी माझ्या मनात काही विचार नसायचा. आश्रमात सर्व जण सारखे असतात. स्वतःची ताट-वाटी स्वतः धुवायचा नियम आहे, असे मला वाटायचे; पण आताच्या स्थितीत आश्रम माझ्या गुरूंचा आहे, हा विचार प्रबळ झालेला असल्याने या नियमात तारतम्य असावे, असे मला वाटते.
७ आ. वयोवृद्ध साधकांची सेवा करणे, हा आपल्या साधनेचाच भाग आहे, असे वाटणे
वयोवृद्ध साधकांच्या अंतःकरणात प.पू. गुरुदेवांचाच निवास असतो. आता साधकांचे शरीर थकले आहे. त्यांची सेवा करणे, हाही आपल्या साधनेचाच भाग आहे, असे विचार येऊन मला त्यांचे ताट धुवावेसे वाटते.
७ इ. प.पू. दास महाराजांच्या सत्संगामुळे प.पू. गुरुदेवांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतींचा अर्थ उमगू लागणे
प्रेमभाव नसला की, नियम आणि कार्यपद्धती घालाव्या लागतात, या प.पू. गुरुदेवांनी फोंड्यातील सुखसागर येथे असतांना एका सत्संगात सांगितलेल्या सूत्राची आता मला तीव्रतेने आठवण येते. हे सूत्र तारतम्याने कसे अंगी बाणवायचे ?, हे आता मला उमगले. हे गुरुदेव, आपण कार्यपद्धती कशासाठी घालून दिल्या ?, हे प.पू. दास महाराजांच्या सत्संगामुळे उमगू लागले.
७ ई. कार्यपद्धती घालण्यामागचा गर्भितार्थ उमगल्याने आपण कुठेही असलो, तरी हे सूत्र महत्त्वाचे असल्याचे लक्षात येणे
समष्टी कार्य अल्प कालावधीत अचूक पद्धतीने होऊन कार्याची फलनिष्पत्ती वाढावी, यासाठी सर्व कार्यपद्धती आहेत आणि साधकांना सत्-चित्-आनंद यांची प्राप्ती व्हावी, हा त्यामागचा केंद्रबिंदू आहे, या सूत्राचा मी कधी सखोल अभ्यासच केला नव्हता. प.पू. दास महाराज आणि पू. माई यांच्या मार्गदर्शनामुळे मी या सूत्रांचा काही प्रमाणात अभ्यास केला. आपण घरात असू अथवा आश्रमात, नातेवाइकांमध्ये असू अथवा साधकांमध्ये, हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, हे मला उमगले.
७ उ. कार्यपद्धतींचा गर्भितार्थ लक्षात न घेता केलेल्या कृतींच्या परिणामाचे उदाहरण
७ उ १. रक्षाबंधन आणि दिवाळी या सणांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ, पोलीस अधिकारी यांना भेटल्यान कार्य होणे; मात्र त्यांना आपलेेसे करून साधनेकडे वळवणे न झाल्याने त्यातून साधना न होणे
आपण रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ, पोलीस अधिकारी यांना राख्या बांधतो आणि हिंदुत्वनिष्ठांना दिवाळीला शुभेच्छापत्र देतो. यामागचा खरा उद्देश मी पूर्वी विसरायचो. यामध्ये फलनिष्पत्ती काय ?, हे पूर्वी माझ्या लक्षातच यायचे नाही. कुणाकडून तरी शुभेच्छापत्र पोहोचवले की, कार्य झाले, असे मला वाटायचे. या कृतींमधून कार्य झाले; पण साधना झाली का ?, याचे मी चिंतन केले नाही. शुभेच्छापत्र, देणे अथवा राखी बांधणे, यांमागचा हिंदुत्वनिष्ठांना भेटून त्यांना आपलेसे करून घेणे आणि या निमित्ताने त्यांना साधनेकडे वळवणे, हा मुख्य उद्देश मी विसरून जायचो.
८. समाजाला आपलेसे करून घेण्याचे तंत्र प.पू. गुरुदेवांनी लक्षात आणून देणे
८ अ. केशकर्तनालयातील भुकेलेल्या कर्मचार्याला जेवून येण्यास सांगणे आणि जेवून आल्यावर त्याने मनापासून केस कापणे
प.पू. गुरुदेव, आपण माझ्यातील जाणीव विकसित केल्याने साधक आणि साधना न करणारा समाज, यांच्यातील भेदही नाहीसा झाला. मी एके दिवशी केशकर्तनालयात गेलो होतो. त्या वेळी तेथील कर्मचारी भुकेने व्याकुळ झाला होता, तरी ग्राहक आला असल्याने त्याने मन मारून कात्री हातात घेतली. त्याच्या अंतःकरणातील जाणीव मला स्पष्ट दिसू लागली. मी त्याला म्हटले, तुम्हाला भूक लागली आहे. पैसा मिळवण्यासाठी भूक मारू नकोस. वेळेवर जेवले पाहिजे. तू जेवून ये. तोपर्यंत मी येथेच थांबतो. तो आनंदी झाला. तो केवळ १५ मिनिटांत जेवून आला. त्यानंतर त्याने पुष्कळ उत्साहाने माझे केस कापले. त्याच्यातील जाणिवेला ओळखल्याने त्याची त्याने लगेच पोचपावतीही दिली. यातून समाजाला आपलेसे करून घेण्याचे तंत्र प.पू. गुरुदेवांनी माझ्या लक्षात आणून दिले.
८ आ. साधिकेने कडक शब्दांत स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून देणे आणि तिचा हेतू जाणून योग्य ती सुधारणा करण्याचे शांतपणे सांगितल्याने तिला आनंद होणे
एका साधिकेने घरी येऊन मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहंकार तीव्र असल्याचे सांगितले. यावर तिने कडक शब्दांत दृष्टीकोन दिले. मला माझ्या चुका सांगितल्या. त्यांतील काही खरोखर माझ्या चुका होत्या, तर काही निवळ अपसमज होते. असे कुणी केल्यास पूर्वी मी मुळीच ऐकून घेत नसे. मी लगेच त्याला प्रतिवाद करायचो, म्हणजे माझ्यात ऐकण्याची वृत्ती नसणे हा स्वभावदोष तीव्र होता. साधिका कडक शब्दांत मला सांगत असली, तरी मी सुधारावे, हाच त्यामागचा तिचा उदात्त हेतू होता, याची जाणीव प.पू. गुरुदेवांनी आधीच मला करून दिली होती. त्यामुळे त्या वेळी एका शब्दानेही प्रत्युत्तर न देता मी साधिकेचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि योग्य ती सुधारणा करतो, इतकेच उत्तर दिले. माझ्या या कृतीमुळे साधिकेला आनंद झाला.
९. दासबोध वाचण्याची इच्छा होणे, प.पू. दास महाराजांना विचारल्यावर
त्यांनी होकार देणे आणि वाचन पूर्ण झाल्यावर २ दिवसांत सज्जनगडावरील प्रसाद मिळणे
९ अ. आयुष्यात केलेल्या अनेक नियमांपैकी केवळ दासबोध वाचनाचा नियम पाळला जाणे आणि दासनवमीच्या दिवशी ग्रंथवाचन पूर्ण होणे
प.पू. दास महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी एक वर्ष मौनव्रत धारण केले होते. या काळात ग्रंथराज दासबोध वाचण्याची माझी इच्छा झाली; पण सनातनचे एवढे ग्रंथ असतांना हा आणखी वेगळा ग्रंथ कशाला वाचायचा ?, असा दुसरा विचार माझ्या मनात आला. स्वेच्छा नको; म्हणून मी प.पू. दास महाराजांना विचारले. ते म्हणालेे, हा विचार योग्य आहे. ईश्वरानेच तो दिला आहे. त्यानुसार कृती कर. पुढे आपल्याला लिखाणासाठीही साहाय्य होईल आणि तुझ्या साधनेला दिशा मिळेल. आश्चर्य म्हणजे मी आयुष्यात कितीतरी नियम केले; पण कालांतराने ते खंडित झाले; मात्र हा एकमेव नियम माझ्याकडून आपोआप पाळला गेला. प्रतिदिन एक समास, या प्रकारे ग्रंथाचे वाचन केले. ग्रंथवाचनाची समाप्ती आणि प.पू. दास महाराजांच्या मौनाचे उद्यापन एकाच वेळी झाले. यंदाच्या दासनवमीच्या दिवशी ग्रंथवाचनाची समाप्ती झाली.
९ आ. दासबोधाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर प्रवास करतांना एका अनोळखी स्त्रीने पत्नीला सज्जनगडावरील प्रसाद देणे आणि दासबोध वाचन ही ईश्वराची इच्छा असल्याची जाणीव होणे
हे प.पू. गुरुदेव, हा ग्रंथ वाचतांना आपण आणि समर्थ रामदासस्वामी त्या ठिकाणी उपस्थित असल्याच्या संवेदना जाणवून घरात वेगळेच चैतन्य निर्माण व्हायचे. हा ग्रंथ वाचण्यास आणि समजण्यास तसा कठीण असला, तरी साक्षात् समर्थच त्याचा अर्थ उकलून देत आहेत, असे मला वाटायचे. शेवटी काही क्षण बुद्धीने विचार केला आणि हे सगळे अनुभव मानसिक तर नाहीत ना ?, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. याचे उत्तर समर्थांनी अनुभूतीतून दिले. ग्रंथाची समाप्ती झाल्यानंतर साधारण दोन दिवसांनी माझी पत्नी सौ. समृद्धी मुलाला घेऊन बसमधून प्रवास करत होती. कुडाळ बसस्थानकावर एक महिला बसमध्ये चढली आणि ती समृद्धीच्या शेजारी बसली. त्याच वेळी योगेश्वरने आईजवळ चॉकलेट मागितले. तेव्हा त्या महिलेने तिच्या पिशवीतून एक पुडी काढली आणि ती समृद्धीकडे देत म्हणाली, आम्ही दासनवमीला सज्जनगडावर गेलो होतो. तिथला हा प्रसाद आहे. तुम्ही हा प्रसाद घ्या. समृद्धीला आश्चर्य वाटले. ओळख नसतांनाही त्या महिलेने सज्जनगडावरचा प्रसाद दिला. प्रसाद मिळाल्यावर प.पू. दास महाराजांनी सांगिल्याप्रमाणे दासबोध वाचन ही खरोखरच ईश्वराची इच्छा होती, याची जाणीव झाली.
१०. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या परात्पर गुरु पांडे महाराजांच्या
चौकटीतून सृष्टीरचनेचा सिद्धांत उमगणे आणि सूक्ष्म चैतन्यशक्तीला बघण्याची जाणीव विकसित होणे
दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु पांडे महाराजांच्या मार्गदर्शक सूत्राची एक चौकट छापून आली होती. त्या चौकटीतील लिखाणातून मूळ परब्रह्म आणि सूक्ष्म चैतन्यशक्ती यांना कसे बघावे ?, याची जाणीव विकसित झाली. त्या चौकटीतील लिखाण होते, आपण हात पुसून झाल्यानंतर रूमाल कसाही ठेवून देतो. हा रुमाल कापसापासून बनतो. तो कापूस भूमीतून उगवलेल्या झाडाला लागतो. त्या झाडाची उत्पत्ती पंचमहाभूतांपासून होते. ही पंचमहाभूते आदिमायेतून उत्पन्न होतात. ही आदिमाया परब्रह्मातून उत्पन्न होते, म्हणजे त्या रूमालात परब्रह्म वास करत आहे. या चौकटीमुळे प्रत्येक वस्तूकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन पुन्हा पालटला. संपूर्ण सृष्टीरचनेचा सिद्धांतच उमगला, उदा. समोर ताटात अन्न आले की, ते पूर्णब्रह्म असते. मला त्याचे मूळस्वरूपच ताटात दिसते.
११. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कायमचे स्थान मिळण्यासाठी केलेली प्रार्थना !
हे गुरुदेव, आपण मला आज्ञा दिलीत. त्या आज्ञेचे पालन व्हावे, यासाठी आधीच योजनाही सिद्ध केलीत. प.पू. दास महाराज, पू. माई आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या माध्यमातून माझ्यातील अंतर्मुखता वाढवलीत. ही सूत्रे शब्दबद्ध करून आपल्या चरणी निवेदन करून घेतलीत. प.पू. दास महाराज, पू. माई, परात्पर गुरु पांडे महाराज आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हे गुरुदेव, हा आध्यात्मिक प्रवास लवकरात लवकर सफल होऊन आपल्या चरणी कायमचे स्थान मिळावे, हीच आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !
– श्री. संतोष आनंदा गरुड, पर्वरी, गोवा. (२३.६.२०१७)