प्रथमोपचार प्रशिक्षणासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संघटन करावे ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
रामनाथी (गोवा) – येणार्या संकटकाळात आणि युद्धकाळात सज्जन, साधक अन् संत यांचे रक्षण करण्यासाठी आपले आध्यात्मिक बळ वाढले पाहिजे. त्याकरता स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे. यासमवेतच प्रेमभाव, निरीक्षण, निर्णयक्षमता, सतर्कता आणि विचारून कृती करणे आदी गुणांचे संवर्धन करावे. हे करत असतांना प्रथमोपचार प्रशिक्षणासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संघटन करावे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी येथील ‘प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरा’तील शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
येथील सनातनच्या आश्रमात हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच तीन दिवसीय ‘प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ‘दैनंदिन जीवनातील धावपळ, तसेच येणारा संकटकाळ आणि युद्धकाळ या वेळी आपद्ग्रस्त किंवा रुग्ण यांच्यावर योग्य प्रथमोपचार कसे करावेत ? ते करत असतांना साधनेचे कोणते प्रयत्न करावेत ? समाजात प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग घेतांना तात्त्विक विषय मांडून प्रशिक्षणार्थ्यांकडून सराव कसा करून घ्यावा ?’, या विषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात ६१ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये ‘वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तीचे निर्मूलन कसे करावे ?’ याविषयी सनातन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्री. संदीप शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शंकानिरसन डॉ. दुर्गेश सामंत आणि डॉ. प्रकाश घाळी यांनी केले. ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन’ या विषयावर ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी येळेगावकर, तर ‘भावाचे प्रयत्न कसे वाढवावे ?’ या विषयावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर यांनी मार्गदर्शन केले.
‘श्वसनसंस्थेचा परिचय, श्वास कोंडणे आणि प्राथमिक उपचार’ या विषयावर सौ. अनुश्री गावसकर, ‘रक्तसंचाराशी संबंधित विकार’ या विषयावर डॉ. (सौ.) अश्विनी देशपांडे, ‘मज्जासंस्थेशी संबंधित विकार’ या विषयावर श्रीमती मृणालिनी भोसले, ‘अस्थिभंग’ या विषयावर डॉ. अशोक शिंदे, ‘मज्जारज्जुला मार लागणे’ याविषयावर सौ. विदुला देशपांडे, ‘रस्ते अपघातात दुचाकी वाहनावरून पडलेल्या रुग्णाचे शिरस्त्राण (हेल्मेट) कसे काढावे ? आणि प्राथमिक उपचार’ या विषयावर श्रीमती जयश्री भालेराव यांनी मार्गदर्शन केले. ‘रुग्णाला अन्य ठिकाणी घेऊन जाण्याच्या काही पद्धती आणि स्ट्रेचर’ याविषयी सौ. गावसकर यांनी माहिती दिली. शिबिराचा उद्देश प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांनी स्पष्ट केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात