‘उच्च कोटीचे संत ध्यानाच्या माध्यमातून सूक्ष्मातून पुष्कळ कार्य करतात’, हे सर्वश्रूत आहे. दुसर्या महायुद्धाच्या वेळी ‘हिटलरच्या माध्यमातून सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती कार्यरत आहेत’, हे योगी अरविंद यांनी जाणून त्या शक्तींशी ध्यानाच्या माध्यमातून लढून त्यांचा पराजय केला होता. त्यामुळे तोवर अजिंक्य ठरलेल्या बलाढ्य हिटलरलाही पराजयाची नामुष्की पत्करावी लागली होती. या अनुषंगाने ‘उच्च पातळीच्या संतांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमवेत नामजपादी उपाय करण्यासाठी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयानेे एक चाचणी घेतली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. २६.८.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत आरंभी सद्गुरु (टीप १) सत्यवान कदम यांनी ध्यान लावण्यापूर्वी त्यांची आणि चाचणीत सहभागी असलेले तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप २) असलेले ४ साधक यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या या ४ साधकांसमवेत नामजपादी आध्यात्मिक उपाय (टीप ३) करण्यासाठी ध्यान लावले. ३ घंट्यांनंतर त्यांनी डोळे उघडल्यावर, म्हणजे ते ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर त्यांची आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले ४ साधक यांची पुन्हा ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. सद्गुरु सत्यवान कदम यांनी ध्यान लावण्यापूर्वी आणि ध्यान लावून झाल्यानंतर केलेल्या या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
टीप १ – सद्गुरु : ‘निर्जीव वस्तू म्हणजे शून्य टक्का आणि ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी’, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्चित करता येते. कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्यांना ‘संत’ म्हणतात. आध्यात्मिक पातळी ७० ते ७९ टक्के असणार्यांना ‘गुरु’, ८० ते ८९ टक्के असणार्यांना ‘सद्गुरु’ आणि ९० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्यांना ‘परात्पर गुरु’ म्हणतात.’
टीप २ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
टीप ३ – आध्यात्मिक उपाय : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाहीत ?’, हे जाणवू शकते.
२. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे
२ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी ध्यान लावण्यापूर्वी
आणि ध्यान लावून उपाय केल्यानंतरही त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळणे
सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावण्यापूर्वी आणि ध्यान लावून उपाय केल्यानंतर त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा मोजल्या. तेव्हा त्या दोन्ही वेळी त्या दोन्ही नकारात्मक ऊर्जांकरता ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत. याचा अर्थ सद्गुरु सत्यवान कदम यांनी ध्यान लावण्यापूर्वी आणि ध्यान लावून नामजप केल्यानंतरही त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा नव्हती.
२ अ १. सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ११ टक्क्यांनी घटणे
सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावण्यापूर्वी आणि ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणांत दोन्ही वेळी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या दोन्ही वेळी त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी ध्यान लावण्यापूर्वी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.६४ मीटर होती. ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३० सें.मी.ने घटून ती २.३४ मीटर झाली. त्यांच्या भोवतीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ११ टक्क्यांनी न्यून झाली.
२ अ १ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून उपाय केल्यानंतर त्यांची स्वतःची प्रभावळ १०.५ टक्क्यांनी घटणे
सद्गुरु सत्यवान कदम यांच्या प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणात त्यांनी ध्यान लावण्यापूर्वी त्यांची प्रभावळ ३.८ मीटर होती, तर त्यांनी ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर ती ३.४ मीटर झाली. याचा अर्थ उपाय केल्यामुळे त्यांची स्वतःची प्रभावळ ४० सें.मी.ने, म्हणजे १०.५ टक्क्यांनी घटली.
या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३ अ’ मध्ये दिले आहे.
२ आ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
२ आ १. चाचणीत सहभागी असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या ४ साधकांपैकी तिघांमधील नकारात्मक ऊर्जा सद्गुरु सत्यवान कदम यांनी लावलेल्या ध्यानानंतर न्यून होणे, तर एका साधिकेची तेवढीच रहाणे
चाचणीच्या आरंभी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेच्या केलेल्या निरीक्षणात सर्व साधकांमध्ये ती नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात आढळली; परंतु कोणामध्येही ती प्रभावळ मोजण्याएवढी नव्हती. (‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.) सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात पहिली आणि दुसरी साधिका, तसेच साधक यांच्यातील ती नकारात्मक ऊर्जा न्यून झाली; मात्र तिसर्या साधिकेमधील ती नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली. ही साधिका प्रयोगाच्या कालावधीत ध्यानावस्थेत होती. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या या सर्व साधकांमध्ये आरंभी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही थोड्या प्रमाणात होती; परंतु त्या ऊर्जेची प्रभावळ नव्हती. सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून उपाय केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात पहिली साधिका, तसेच साधक यांच्यातील ही नकारात्मक ऊर्जा न्यून झाली, तर दुसर्या साधिकेमधील ही नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट झाली; मात्र तिसर्या साधिकेमधील ही नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली.
२ आ २. उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा न्यून होण्यातील उतरता क्रम
दुसर्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा सर्वांत जास्त न्यून झाली. त्या खालोखाल साधकातील नकारात्मक ऊर्जा आणि त्याही खालोखाल पहिल्या साधिकतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली. तिसर्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली नाही.
२ आ २ अ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या चारही साधकांमध्ये सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यानाद्वारे केलेल्या उपायांनंतर सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. या चाचणीत सहभागी असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या चारही साधकांमध्ये चाचणीच्या आरंभी, तसेच सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून उपाय केल्यानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ ३. साधकांच्या स्वतःच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – चाचणीत सहभागी असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या चारही साधकांची प्रभावळ सद्गुरु सत्यवान कदम यांंनी लावलेल्या ध्यानानंतर वाढणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. चाचणीच्या आरंभी केलेल्या निरीक्षणात पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या साधिकेची प्रभावळ अनुक्रमे १.४ मीटर, १.४८ मीटर आणि १.८४ मीटर होती. साधकाची प्रभावळ १.२४ मीटर होती. सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून उपाय केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात साधिकांची प्रभावळ अनुक्रमे १.९४ मीटर, १.७४ मीटर आणि १.९५ मीटर झाली, म्हणजे ती अनुक्रमे ५४ सें.मी., २६ सें.मी. आणि ११ सें.मी.ने वाढली, तर साधकाची प्रभावळ १३ सें.मी.ने वाढली.
२ आ ४. उपायांमुळे साधकांच्या स्वतःच्या प्रभावळीत झालेल्या वाढीच्या संदर्भातील टक्केवारी आणि तिचा उतरता क्रम
पहिल्या साधिकेच्या प्रभावळीत सर्वांत जास्त, म्हणजे ३८.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्या खालोखाल दुसर्या साधिकेच्या प्रभावळीत (१७.६ टक्क्यांनी) वाढ झाली, त्याही खालोखाल साधकाच्या प्रभावळीत (१०.५ टक्क्यांनी) वाढ झाली आणि सर्वांत अल्प वाढ तिसर्या साधिकेच्या प्रभावळीत (६ टक्क्यांनी) झाली.
या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३ आ’ मध्ये दिले आहे.
३. सद्गुरु सत्यवान कदम यांंनी ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची स्वतःची प्रभावळ न्यून होणे, तर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांची नकारात्मक ऊर्जा न्यून होणे आणि प्रभावळ वाढणे यांमागील अध्यात्मशास्त्र
३ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या ध्यानाच्या माध्यमातून तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर नामजपादी उपाय झाल्यामुळे या उपायांना प्रतिकार करणार्या वाईट शक्तींनी केलेल्या सूक्ष्मातील युद्धामुळे सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ थोड्या प्रमाणात न्यून होणे
सद्गुरु सत्यवान कदम यांंनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर उपाय होण्यासाठी ध्यान लावले होते. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर उपाय होऊन नकारात्मक ऊर्जा न्यून होत होती. अशा वेळी वाईट शक्तीही प्रतिकार करतात. या सूक्ष्मातील युद्धामध्ये सद्गुरु सत्यवान कदम त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात, म्हणजे ११ टक्के व्यय झाली. या कारणामुळेच त्यांची स्वतःची प्रभावळही थोड्या प्रमाणात न्यून झाली.
३ आ. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या ध्यानाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम
३ आ १. साधकांवर उपाय झाल्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे आणि त्यांची प्रभावळ वाढणे
सद्गुरु सत्यवान कदम यांंनी लावलेल्या ध्यानामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली आणि त्यांची प्रभावळ वाढली. हे सद्गुरु सत्यवान कदम यांंच्या ध्यानामुळे त्या साधकांवर उपाय झाल्याचे द्योतक आहे.
३ आ २. साधकांवरील उपायांची परिणामकारकता त्या त्या साधकावर असलेल्या वाईट शक्तीच्या प्रभावानुसार वेगवेगळी असणे
अ. सद्गुरु सत्यवान कदम यांंच्या उपायांचा परिणाम प्रत्येक साधकावर वेगवेगळा होता. उपायांचा परिणाम आध्यात्मिक त्रास असणार्या साधकावर असलेल्या वाईट शक्तीच्या प्रभावावर अवलंबून असतो. प्रयोगामध्ये दुसर्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक प्रमाणात न्यून झाली, तर तिसर्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा अजिबात न्यून झाली नाही. व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाल्यावर तिची स्वतःची प्रभावळ वाढते; कारण वाईट शक्तीचा प्रभाव न्यून होतो. नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक प्रमाणात न्यून झालेल्या दुसर्या साधिकेची स्वतःची प्रभावळही अधिक प्रमाणात वाढली, तर नकारात्मक ऊर्जा न्यून न झालेल्या तिसर्या साधिकेची स्वतःची प्रभावळ सर्वांत अल्प प्रमाणात वाढली.
आ. ‘प्रयोगात सहभागी झालेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा उपायांमुळे अधिक प्रमाणात न्यून झाल्यास त्या साधकाची प्रभावळही अधिक प्रमाणात वाढते’, या निरीक्षणाला अपवाद म्हणजे पहिली साधिका. हिच्यातील नकारात्मक ऊर्जा सर्वांत अल्प प्रमाणात न्यून झाली असूनही तिची प्रभावळ मात्र सर्वाधिक प्रमाणात वाढली. वाईट शक्तीने व्यक्तीभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण केले असल्यास आध्यात्मिक उपायांचा परिणाम प्रथम ते आवरण दूर करण्यासाठी होतो. तसेच या साधिकेच्या संदर्भात झाल्यामुळे तिच्या शरिरातील त्रासदायक शक्ती, म्हणजेच नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात न्यून झाली.
इ. सद्गुरु सत्यवान कदम यांंच्या उपायांमुळे तिसर्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा काहीच न्यून झाली नाही आणि त्या साधिकेची प्रभावळही अगदी अल्प प्रमाणात वाढली. उपायांच्या वेळी त्या साधिकेचे ध्यान लागले होते. खरेतर साधिकेचे ध्यान लागले असते, तर तिला सकारात्मक ऊर्जा मिळाली असती आणि तिची नकारात्मक ऊर्जा न्यून झाली असती; पण तसे झाले नाही. यावरून लक्षात येते की, सद्गुरु सत्यवान कदम यांंच्या उपायांचा परिणाम होऊ नये म्हणून त्या वातावरणातील वाईट शक्तीनेच ध्यान लावले होते आणि आध्यात्मिक उपायांना प्रतिकार केला होता. त्यामुळेच त्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली नाही.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (२.११.२०१७)
ई-मेल : [email protected]
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात