‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या
उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले विश्वकल्याणाकरता सत्त्वगुणी लोकांचे ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष १९८९ पासून त्यांच्या जीवनात बर्याचदा महामृत्यूयोग आले आहेत. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांचे देहधारी अस्तित्व आवश्यक असल्याने योगतज्ञ दादाजी वैशंपायन (कल्याण, जिल्हा ठाणे), प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी (पुणे) यांसारखे काही संत त्यांना स्वतःहून आध्यात्मिक साहाय्य करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांना १३.१०.२०१७ या दिवशी आध्यात्मिक उपायांसाठी (टीप १ आणि २) दत्ताची संस्कारित मूर्ती दिली. ‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता. या मूर्तीची १४.१०.२०१७ या दिवशी उपायांसाठी वापर करण्याआधी आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे उपायांसाठी वापर केल्यानंतर अन् ५ दिवस वापर केल्यानंतर १८.१०.२०१७ या दिवशी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.’
टीप १ – ‘आध्यात्मिक उपाय’ म्हणजे काय ?
एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाही ?’, हे जाणवू शकते.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दत्तमूर्तीच्या माध्यमातून करायला सांगितलेले आध्यात्मिक उपाय
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात पुढीलप्रमाणे सांगितले होते – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी या संस्कारित मूर्तीस ५ दिवस प्रतिदिन हस्तस्पर्श करत निदान ४ वेळा दत्तमाला मंत्र म्हणावा. त्यानंतर ती मूर्ती खोलीतील देवघरात ठेवावी.’
सनातनला आध्यात्मिक बळ पुरवून तिचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा मार्ग सुकर करणारे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञ ! कृतज्ञ !! कृतज्ञ !!!
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सनातनला होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास असो किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातून होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे असो, प्रत्येक वेळी योगतज्ञ दादाजी यात स्वत: लक्ष घालून आध्यात्मिक बळाच्या आधारे सर्व विघ्ने लीलया दूर करतात. सनातनची आजपर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने जी काही वाटचाल झाली आहे, ती योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासाख्या निरपेक्ष प्रीती असणार्या उच्च कोटीच्या संतांमुळेच ! यासाठी योगतज्ञ दादाजींच्या चरणी शब्दांतून कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच !
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श करून दत्तमाला मंत्रजप करण्यापूर्वी ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संस्कारित मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर परत मूर्तीची निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर पुढील ४ दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रतिदिन संस्कारित मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केला. असे एकूण ५ दिवस मंत्रजप पूर्ण झाल्यावर परत मूर्तीची निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग करण्यापूर्वी, तसेच पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दत्ताच्या मूर्तीचा आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) उपयोग करण्यापूर्वी, पहिल्या दिवशी उपायांसाठी उपयोग केल्यानंतर आणि पाचव्या दिवशी उपायांसाठी उपयोग केल्यानंतर तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दत्ताच्या मूर्तीला हस्तस्पर्श करून प्रतिदिन मंत्रजप केल्यानंतर तिच्यामधील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर न्यून होत जाणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीचे चाचणीच्या आरंभी निरीक्षण केले, तेव्हा स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ मूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. त्या वेळी या ऊर्जेची प्रभावळ मूर्तीपासून ०.९४ मीटर दूरपर्यंत जाणवली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पहिल्या दिवशी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात ऊर्जेची प्रभावळ ०.६५ मीटर होती. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २९ सें.मी.ने घटली होती. पुढे ४ दिवस प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर शेवटच्या दिवशी केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १६० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ तेव्हा मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा आणखी घटून ती केवळ काही प्रमाणातच शिल्लक राहिली होती; परंतु त्या ऊर्जेची प्रभावळ नव्हती. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.)
२ इ. मूर्तीच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दत्ताच्या मूर्तीला हस्तस्पर्श करून प्रतिदिन मंत्रजप केल्यानंतर मूर्तीची प्रभावळ उत्तरोत्तर न्यून होत जाणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीची स्वतःची प्रभावळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप करण्यापूर्वी १.०२ मीटर होती. त्यांनी पहिल्या दिवशी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर ती ०.७३ मीटर झाली, म्हणजे हस्तस्पर्श करून मंत्रजप करण्याआधीच्या तुलनेत ती २९ सें.मी. ने घटली. पाचव्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर ती ०.६६ मीटर झाली, म्हणजे ती आणखी ७ सें.मी. ने घटली.
या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ‘३ अ’, ‘३ अ १’ आणि ‘३ आ’ यांमध्ये दिले आहे.
३. ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उपायांसाठी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा असणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर ती घटणे’ यामागील अध्यात्मशास्त्र
३ अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी संकल्पशक्तीद्वारे
दत्ताच्या मूर्तीमध्ये कार्यानुरूप आवश्यक शक्ती (सकारात्मक ऊर्जा) संक्रमित केली असणे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे दूर होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी विधीद्वारे दत्ताच्या मूर्तीमध्ये कार्यानुरूप आवश्यक शक्ती (सकारात्मक ऊर्जा) संक्रमित केली होती.
३ अ १. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ चैतन्य आणि शक्ती जाणवणे
उपायांच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या मूर्तीला हस्तस्पर्श केला. तेव्हा त्यांना आलेल्या अनुभूतीविषयी ते म्हणाले, ‘‘दत्तमूर्तीत एवढे चैतन्य आणि शक्ती आहे की, ती ३ – ४ सेकंदही हातात धरता येत नाही. तसेच तेव्हा पुष्कळ भावही जागृत होतो आणि आनंद वाटतो.’’सूत्र ‘३ अ’ आणि ‘३ अ १’ यांमध्ये दिल्याप्रमाणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित मूर्तीमध्ये पुष्कळ शक्ती आणि चैतन्य असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मूर्तीला हस्तस्पर्श करून मंत्रजप करण्यापूर्वी ‘यू.टी.एस्.’ उपकरणाने केलेल्या चाचणीत या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळता सकारात्मक ऊर्जा आढळली.
३ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर तिच्यामधील सकारात्मक ऊर्जा न्यून होणे आणि त्या मूर्तीची प्रभावळही घटणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पहिल्या दिवशी या संस्कारित मूर्तीवर हात ठेवून मंत्रजप केल्यानंतर, म्हणजे उपाय केल्यानंतर मूर्तीमधील शक्ती आणि चैतन्य त्यांना मिळाले. मूर्तीमधील सकारात्मक स्पंदने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रहण केल्यामुळे ती न्यून झाली, तसेच मूर्तीची स्वतःची प्रभावळही घटली. पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आणखी ४ दिवस मूर्तीला हस्तस्पर्श करून प्रतिदिन मंत्रजप केला, तेव्हा त्या प्रत्येक दिवशी त्यांना त्या मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळही उत्तरोत्तर घटत गेली; परंतु मुळात मूर्तीमध्ये एवढ्या प्रमाणात शक्ती आणि चैतन्य होते की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकूण ५ दिवस हे उपाय केल्यानंतरही त्या मूर्तीमध्ये सकारात्मक स्पंदने थोड्या प्रमाणात शिल्लक होती. ‘या सकारात्मक स्पंदनांचाही लाभ होण्यासाठी योगतज्ञ दादाजींनी ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवायला सांगितले’, असे लक्षात येते.
४. ‘ऑक्टोबर २०१७ मध्ये उपायांसाठी दिलेल्या मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा ५ दिवसांत पुष्कळ न्यून होणार’, हे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना आधीच ज्ञात असल्याने त्यांनी तेवढेच दिवस तिच्या माध्यमातून उपाय करायला सांगणे आणि पुढे ती देवघरात ठेवायला सांगणे, तर जानेवारी २०१४ मध्ये दिलेल्या मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा अधिक काळ टिकणार असल्याने ती अजूनही देवघरात ठेवण्यास सांगणे
१३.१०.२०१७ या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उपायांसाठी दिलेल्या मूर्तीच्या माध्यमातून केवळ ५ दिवस उपाय करायला सांगितले होते. १४.१०.२०१७ या दिवशी या मूर्तीच्या माध्यमातून उपायांना प्रारंभ केल्यावर चौथ्या दिवशी (१७.१०.२०१७ या दिवशी) मूर्तीमध्ये चैतन्य अल्प असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जाणवले होते. त्याच्या दुसर्या दिवशी, म्हणजे १८.१०.२०१७ या दिवशी केलेल्या निरीक्षणात मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मूर्तीची स्वतःची प्रभावळही आरंभीच्या तुलनेत पुष्कळ न्यून झाल्याचे निदर्शनास आले. यावरून योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना ‘ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपायांसाठी वापरल्यावर तिच्यातील चैतन्य ५ दिवसांनी पुष्कळ न्यून होणार आहे’, हे ज्ञात होते, हे लक्षात येते. त्यामुळे त्यांनी या मूर्तीच्या माध्यमातून केवळ पाचच दिवस उपाय करायला सांगितले. हे उपाय झाल्यानंतर योगतज्ञ दादाजींनी ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवायला सांगितले.
योगतज्ञ दादाजींनी ३०.१.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उपायांसाठी दिलेल्या मूर्तीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरात ठेवायला सांगितले होते. तेव्हापासून ही मूर्तीसुद्धा त्यांच्या देवघरात आहे.
‘या दोन्ही मूर्तींच्या स्पंदनांमध्ये भेद आहे का ?’, हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही मूर्तींची १८.१०.२०१७ या दिवशी चाचणी घेण्यात आली.
४ अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी १३.१०.२०१७ आणि ३०.१.२०१४ या दिवशी
दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तींची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे १८.१०.२०१७ या दिवशी केलेली निरीक्षणे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी १३.१०.२०१७ या दिवशी दिलेल्या दत्ताच्या संस्कारित मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा ती मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ५ दिवस उपायांसाठी वापरल्यानंतर पुष्कळ न्यून झाली होती. ‘मूर्तीमध्ये अजूनही थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याने तिचाही लाभ होण्यासाठी योगतज्ञ दादाजींनी ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवायला सांगितले’, असे लक्षात येते. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ३०.१.२०१४ या दिवशी दिलेल्या दत्ताच्या मूर्तीमध्ये पावणेचार वर्षांनंतरही सकारात्मक ऊर्जा होती आणि त्या ऊर्जेची प्रभावळ मूर्तीपासून ६२ सें.मी. दूरपर्यंत होती. ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उपायांसाठी दिली, तेव्हाच योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी तत्कालीन उपाय झाल्यानंतर ती पुढे देव्हार्यात ठेवायला सांगितले होते. या मूर्तीत अजूनही सकारात्मक ऊर्जा असल्याचे या चाचणीतून सिद्ध झाले. ‘योगतज्ञ दादाजींनी अजूनही ती मूर्ती देवघरात ठेवायला का सांगितली आहे ?’, याचे कारण या चाचणीतून समजले. यातूनही त्यांचे द्रष्टेपण स्पष्ट होते !
४ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आधीच्या दत्तमूर्तीमधील सकारात्मक
ऊर्जा अबाधित असूनही तात्कालिक कार्यासाठी तात्पुरती शक्ती असलेली दत्तमूर्ती देणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरातील आधीच्या दत्तमूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा अबाधित असूनही योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी १३.१०.२०१७ या दिवशी उपायांसाठी दत्ताची संस्कारित नवीन मूर्ती का दिली ?’, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे उच्च कोटीचे संत असल्याने त्यांना ईश्वरी राज्य स्थापन होण्याच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहधारी अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणांवर ते स्वतःहून बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी त्यावर आध्यात्मिक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असतात. याच कारणाने त्यांनी १४.१०.२०१७ ते १८.१०.२०१७ या कालावधीत होणार असलेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणांना परतवून लावण्याचे तात्कालिक कार्य करण्यासाठी तेवढी तात्पुरती शक्ती संस्कारित केलेली दत्ताची मूर्ती दिली. यातूनही त्यांचा अध्यात्मातील अधिकार स्पष्ट होतो.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.१०.२०१७)
ई-मेल : [email protected]
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात