भोंदू गुरु किंवा साधना न करणारा लेखक यांच्या अध्यात्माविषयीच्या ग्रंथातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, तर अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींचेच ग्रंथ चैतन्यदायी असतात, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे केलेल्या संशोधनातून स्पष्ट
लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम, या विषयावर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले लिखित शोधनिबंध धर्म, साहित्य आणि संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका डॉ. ज्योती काळे यांनी तो सादर केला. उच्च शिक्षण आणि संशोधन केंद्र, कल्याण, ठाणे यांच्या वतीने १५ आणि १६ सप्टेंबर २०१७ या दिवशी पुणे येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. वाचकांसाठी या शोधनिबंधाचा सारांश येथे देत आहोत.
१. संशोधनाची पार्श्वभूमी
लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती (आध्यात्मिक त्रास (टीप) असणे किंवा नसणे) याचा त्याच्या वाङ्मयावर काय परिणाम होतो ?, याचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, तसेच सूक्ष्म-ज्ञान यांद्वारे ३ प्रकारच्या लेखकांनी लिहिलेल्या ३ सुप्रसिद्ध आध्यात्मिक ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यांतील एक ग्रंथ एका भोंदू गुरूंनी लिहिलेला आहे, दुसरा ग्रंथ साधना न करणार्या एका सर्वसाधारण व्यक्तीनेे, तर तिसरा ग्रंथ परात्पर गुरुपदावर असलेल्या एका गुरूंनी लिहिलेला आहे. पहिल्या दोन्ही ग्रंथांच्या लाखो प्रतींची विक्री झाली आहे, तर परात्पर गुरूंच्या एकूण ग्रंथांच्याही लाखो प्रतींची विक्री झाली आहे.
१ अ. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेल्या प्रयोगात एक भोंदू गुरु आणि साधना नसलेला एक लेखक यांच्या अध्यात्मावरील ग्रंथांत नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात असल्याचे आढळणे, तर एका परात्पर गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथात सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात असल्याचे आढळणे
पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करता येतो. यातून ऊर्जाक्षेत्रातील एकूण स्पंदनांपैकी नकारात्मक स्पंदने किती आणि सकारात्मक स्पंदने किती ?, हे समजते. या प्रयोगात एका भोंदू गुरूंनी लिहिलेल्या अध्यात्मावरील ग्रंथात केवळ ३७ टक्के सकारात्मक स्पंदने आढळली (उर्वरित ६३ टक्के नकारात्मक स्पंदने). साधना नसणार्या एका लेखकाच्या ग्रंथात ५३ टक्के सकारात्मक स्पंदने, तर एका परात्पर गुरूंनी लिहिलेल्या अध्यात्मावरील ग्रंथात ८४ टक्के सकारात्मक स्पंदने आढळली.
१ आ. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर किंवा ऑरा स्कॅनर)द्वारे करण्यात आलेल्या प्रयोगात एक भोंदू गुरु आणि साधना नसलेला एक लेखक यांच्या ग्रंथांच्या वाचनानंतर वाचकांतील नकारात्मक ऊर्जा वाढल्याचे आढळणे, तर एका परात्पर गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथाच्या वाचनानंतर वाचकांत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे आढळणे
यू.टी.एस् हे उपकरण तेलंगण राज्यातील भाग्यनगर येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या अशा २ व्यक्तींना हे तिन्ही अध्यात्माविषयीचे ग्रंथ प्रत्येकी २० मिनिटे वाचायला देण्यात आले. दोन ग्रंथांच्या वाचनामध्ये १५ मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला. प्रत्येक ग्रंथाच्या वाचनापूर्वी आणि वाचनानंतर यु.टी.एस्. उपकरणाद्वारे त्या वाचकांची निरीक्षणे नोंद करण्यात आली. एका भोंदू गुरूंनी आणि साधना नसलेल्या एका लेखकाने लिहिलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यावर दोन्ही व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा वाढली. एका भोंदू गुरूंनी लिहिलेला ग्रंथ वाचल्यावर दोन्ही व्यक्तींची प्रभावळही न्यून (कमी) झाली. साधना नसलेल्या एका लेखकाने लिहिलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यावर दोन्ही वाचकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याचा अर्थ त्या दोन्ही आध्यात्मिक ग्रंथांचे लिखाण वाचून दोन्ही वाचकांना आध्यात्मिक स्तरावर काहीच लाभ झाला नाही, उलट त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी झाली. याउलट एका परात्पर गुरूंनी लिहिलेल्या आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केल्यावर दोन्ही व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांच्या प्रभावळीतही पुष्कळ वृद्धी झाली.
१ इ. सूक्ष्म-चित्राद्वारे केलेल्या संशोधनातून परात्पर गुरूंव्यतिरिक्त अन्य दोन लेखकांच्या लेखनावर अनिष्ट शक्तींचा प्रभाव असल्याचे आणि त्यांच्या ग्रंथांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे समजणे, तर परात्पर गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथातून ज्ञान अन् चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे समजणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सूक्ष्मातील जाणणार्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांना सूक्ष्मातील कळते आणि ते त्या चित्रांद्वारे मांडूही शकतात. त्यांनी या तिन्ही ग्रंथांचे सूक्ष्मातून परीक्षण केल्यावर त्यांना एक भोंदू गुरु आणि साधना न करणारे एक लेखक यांच्या लिखाणात अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ अनिष्ट शक्तींचा प्रभाव जाणवला, तसेच त्या दोघांनी लिहिलेल्या अध्यात्मावरील ग्रंथांतून कमी-अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतांना जाणवली. याउलट चाचणीतील परात्पर गुरूंना गुरुतत्त्वाकडून ज्ञान मिळत असून त्यांनी लिहिलेल्या अध्यात्मावरील ग्रंथातून पुष्कळ प्रमाणात ज्ञान आणि चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवले.
२. निष्कर्ष
आध्यात्मिक ग्रंथाचा लेखक जर संतपदापेक्षा न्यून (कमी) आध्यात्मिक पातळीचा असेल, तर त्याच्या लिखाणामागील हेतू बहुतांशी लोकेषणा किंवा अर्थाजन हा असतो. हेतू व्यावहारिक असला किंवा आध्यात्मिक तत्त्वांच्या विरुद्ध असला, तर लेखकाला ईश्वराचे साहाय्य मिळत नाही. सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती लेखकांच्या अशा व्यावहारिक महत्त्वाकांक्षांचा लाभ घेऊन त्यांना आपल्या रज-तम विचारांनी प्रभावित करून त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात.
– शोधनिबंधकर्ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि डॉ. ज्योती काळे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.(१५.९.२०१७)
ई-मेल : [email protected]
टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात