किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे जातांना, तेथे गेल्यावर आणि त्यांनी तबल्याच्या बोलाचा मंत्र दिल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे

‘जुलै २०१७ मध्ये आम्ही मंगळुरू येथील संत प.पू. देवबाबा यांच्याकडे ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीत, नृत्य आणि वाद्य यांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याकडे जातांना, गेल्यावर आणि त्यांनी मला तबल्याच्या माध्यमातून अंतरंगात जाण्यासाठी (आंतरिक अनुभव येण्यासाठी) त्यांना स्फुरलेला तबल्याच्या बोलाचा एक मंत्र दिल्यावर मला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

प.पू. देवबाबा

१. प.पू. देवबाबांकडे जातांना आलेल्या अनुभूती

अ. प.पू. देवबाबा यांच्याकडे जातांना प्रवासात मन शांत होते आणि नामजप आपोआप होत होता.

आ. प.पू. देवबाबांकडे पोहोचल्यावर आश्रमातील चैतन्यामुळे मन पुष्कळ उत्साही झालेे. तसेच माझा ‘नामजप आतून सतत चालू आहे’, असे जाणवत होते.

इ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर नकारात्मक मन सकारात्मक होणे

प.पू. देवबाबांकडे जायचे ठरल्यावर ‘माझा तबल्याचा सराव पुरेसा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन मला लाभ होणार नाही’, असा नकारात्मक विचार येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर मन सकारात्मक झाले.

 

२. प.पू. देवबाबांकडे गेल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ. प.पू. देवबाबा तबल्याच्या सरावाविषयी सहसाधकांना विचारत असतांना मनात
नकारात्मक विचार येणे; पण ‘जे होईल ते माझ्या प्रगतीसाठीच होईल’, या सकारात्मक विचाराने मात करता येणे

प्रत्यक्ष प.पू. देवबाबांकडे गेल्यावर त्यांनी सहसाधकांंना त्यांना सांगितलेल्या सरावाविषयी विचारले. त्या वेळी माझ्या मनात स्वतःविषयी पुन्हा नकारात्मक विचार आले; पण त्या वेळी ‘जे होईल ते माझ्या प्रगतीसाठीच होईल’, असा सकारात्मक विचार आला.

२ आ. तबल्यातील बोलाचा एक ‘मंत्र’ श्‍वासाला जोडल्यावर आज्ञाचक्रावर
संवेदना जाणवणे आणि ‘प.पू. देवबाबा षट्चक्रांवर प्रक्रिया करत आहेत’, असे जाणवणे

श्री. गिरीजय प्रभुदेसाई

देवाच्या कृपेने प.पू. देवबाबांनी तबल्याविषयी मार्गदर्शन करतांना ‘मला किती घंटे सराव होतो ?’, हे विचारले नाही. मला थेट तबला वाजवायला सांगितले. मी तबला वाजवतांना प.पू. बाबांनी मध्येच थांबवून ‘मी जे तबल्याचे बोल वाजवत होतो, ते मनात ऐका’, असे सांगितले. ते ऐकतांना प्रारंभी माझ्या मनात विचार चालू झाले. नंतर मन एकाग्र झाले. त्यानंतर त्यांनी तबल्यातील बोलाचा एक ‘मंत्र’ देऊन तो मला श्‍वासाला जोडायला सांगितला. मी मंत्र श्‍वासाला जोडायला आरंभ केल्यावर प्रथम काहीच जाणवत नव्हते; पण काही वेळाने ‘आज्ञाचक्रावर संवेदना जाणवायला लागल्या, तसेच आज्ञाचक्रातून काही तरी आत जात आहे’, असे जाणवत होते. प.पू. देवबाबांनी आज्ञाचक्रावर मला संवेदना जाणवायला लागल्यावर थांबवले. तेव्हा प.पू. बाबांनी विचारले, ‘‘डोळे उघडून काय जाणवले ?’’ ‘ते सूक्ष्मातून माझ्या षट्चक्रांवर प्रक्रिया करत आहेत आणि आज्ञाचक्रावर प्रक्रिया झाल्यावर ते थांबले’, असे मला जाणवले.

२ इ. प.पू. देवबाबांनी तबल्याच्या माध्यमातून अंतरंगात जाण्यासाठी मंत्र
देऊन एका विशिष्ट पद्धतीने म्हणायला सांगणे आणि ‘सर्व कला ईश्‍वराकडे नेणार्‍या आहेत’, हे अनुभवता येणे

प.पू. देवबाबांनी तबल्याच्या माध्यमातून अंतरंगात जाण्यासाठी मला श्‍वास आत घेतांना ‘ॐ’ आणि श्‍वास बाहेर सोडतांना ‘धीरन धीरन धीरी तोम’ असे म्हणायला सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ॐ म्हणतांना चैतन्य आत जाते आणि ‘धीरन धीरन धीरी तोम’ म्हणतांना आतील काळी शक्ती बाहेर पडते. हाच तुझा ‘मंत्र’ आहे आणि याच्या माध्यमातून तू आत (अंतरंगात) जाशील.’’ प्रत्यक्षात ‘धीरन धीरन धीरी तोम’ हे तबल्याचे बोल आहेत. यावरून ‘सर्व कला ईश्‍वराकडे नेणार्‍या आहेत’, याचा मला अनुभव आला.

२ ई. ‘मंत्रातील अक्षरांचा नाद श्‍वासासमवेत आत-बाहेर जात आहे’, असे जाणवणे

प.पू. देवबाबा यांनी हाच मंत्र कु. सुप्रिया नवरंगे यांनाही दिला. सुप्रियाताई ‘धीरन धीरन धीरी तोम’ हा मंत्र तबल्यावर वाजवत असतांना माझा मंत्रजप ‘श्‍वासासमवेत एका लयीत होत आहे’, असे जाणवले. तसेच ‘सगळीकडे ॐ भरलेला आहे’, असे दिसले. दुसर्‍या दिवशी मला ‘मंत्रातील बोलांची आस श्‍वासासमवेत आत-बाहेर जात आहे’, असे जाणवले. (तबल्याचे बोल वाजवल्यावर त्या बोलांचा कानाला ऐकू येणारा प्रत्यक्ष नाद संपतो; परंतु काही काळ तो नाद ऐकू येत रहातो. याला ‘बोलांची आस’ असे म्हणतात.) तशीच बोलांची आस मंत्रातील अक्षरांचीही जाणवत होती.

२ उ. मनातील लोकेषणेचे विचार नष्ट होणे

प.पू. देवबाबांकडे जाण्यापूर्वी माझ्या मनामध्ये ‘मला मोठा तबलावादक व्हायला पाहिजे’, असे विचार यायचे; पण आता त्या प्रकारचे काही विचार येत नाहीत. आता मला वाटते, ‘जो काही तबला वाजवणार, तो केवळ ईश्‍वरासाठी वाजवणार.’ प.पू. देवबाबांना हे सांगत असतांना भाव जागृत होऊन देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

२ ऊ. शेवटच्या सत्राच्या दिवशी मी प.पू. देवबाबांना नमस्कार करतांना त्यांनी डोक्यावर हात ठेवला. तेव्हा ‘डोके पुष्कळ गरम झाले आणि डोक्यातून उष्णता बाहेर पडत आहे’, असे वाटले.

 

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. प्रत्येक गोष्टीमधून येणारा नाद अनुभवण्याचा प्रयत्न करावा !

आगगाडीतून जातांना आगगाडीच्या आवाजातही ‘ॐ’ असतो. आगगाडी चालू होते, तेव्हा इंजिनचा आवाज ‘ॐ’ असा येतो. आगगाडीतून ‘ॐ नम: शिवाय ।’ असा नाद येतो. त्यांनी सांगितले, ‘‘अशाच प्रकारे अन्य गोष्टींमधून नाद अनुभवण्याचा प्रयत्न कर.’’

३ आ. प.पू. बाबांचे वासरांवरील लहान बालकांसारखे प्रेम !

प.पू. देवबाबांच्या आश्रमात वासरांंची एक खोली आहे. तेथे २५ – ३० वासरे आहेत. प.पू. देवबाबा त्यांच्या खोलीत गेल्यावर सगळी वासरे त्यांच्या भोवती गोळा झाली. प.पू. देवबाबा सर्व वासरांना प्रेमाने केळे खाऊ घालून त्यांना मिठी मारत होते. ते छोट्या बालकांप्रमाणे त्यांचे लाड करत होते.

३ इ. प.पू. देवबाबांचा गोमातेविषयीचा भाव

प.पू. देवबाबा आम्हाला म्हणाले, ‘‘एकवेळ आम्हाला खायला नाही मिळाले, तरी चालेल; पण गाईंना खायला मिळायला पाहिजे.’’ यातून त्यांचा गोमातेविषयीचा भाव लक्षात येतो आणि ‘ते किती तळमळीने गो-सेवा करतात’, हे शिकायला मिळाले.’

– श्री. गिरीजय प्रभुदेसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०१७) 

Leave a Comment