पनवेल – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव असणारे आणि सनातनच्या साधकांवर भरभरून प्रीती करणारे एकमेवाद्वितीय प.पू. पांडे महाराज ! प.पू. पांडे महाराज यांचा ९० वा वाढदिवस म्हणजेच त्यांचा आत्मगौरव सोहळा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. हा सोहळा म्हणजे साधकांसाठी भाव, चैतन्य आणि आनंद यांची उधळणच होती. सर्वच साधक शेवटपर्यंत भावविभोर अवस्थेत होते.
या वेळी आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सौ. तनुजा गाडगीळ यांनी प.पू. पांडे महाराज यांचे पाद्यपूजन केले. आश्रमातील सुवासिनींनी कणकेच्या ९१ दिव्यांनी प.पू. पांडे महाराज यांचे भावपूर्ण औक्षण केले. सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांनी भेटवस्तू देऊन प.पू. पांडे महाराजांचा सन्मान केला.
भावसोहळ्याच्या शेवटच्या सत्रात प.पू. पांडे महाराज यांचे कुटुंबीय, सनातनचे संत आणि साधक यांनी प.पू. पांडे महाराजांच्या सहवासात अनुभवलेले अनमोल क्षण आणि त्यांच्या मार्गदर्शनातील निवडक सूत्रे सर्वांना सांगितली.
प.पू. पांडे महाराज यांची नात कु. गौरी पांडे (वय २२ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी
या भावसोहळ्यात प.पू. पांडे महाराज यांची नात कु. गौरी अमोल पांडे हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचेही घोषित करण्यात आले. प.पू. पांडे महाराज यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात