
मिरज – आज मिरज या पुण्यनगरीत अनंत जन्मीचे पुण्य लाभले. अनंत जन्मीचे सुकृत लाभले; म्हणून हा ग्रंथ हातात धरायला मिळाला. आजच्या विज्ञानयुगातही परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत. ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनावर आधारित ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ प.पू. ईश्वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांना सनातन संस्थेचे पू. जयराम जोशीआजोबा यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या वेळी त्यांनी हे उद्गार काढले. हा अर्पण सोहळा सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमात पार पडला.
परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येकाला ज्ञान देत आहेत !
या वेळी बोलतांना प.पू. ईश्वरबुवा रामदासी पुढे म्हणाले, ‘‘गंगा नदीला तिच्या पात्राच्या बाहेर पडता येत नाही. तिला मर्यादा आहेत; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य १५२ देशांत पोहोचले आहे. धरतीमाता सर्वांना धारण करते; मात्र सर्वांना ज्ञान देते, असे नाही; परंतु गुरुमाऊली सर्वांना ज्ञान देते. अशा या गुरुमाऊलीला दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’’
कसे होऊ उतराई या संतांचे उपकार । – प.पू. ईश्वरबुवा रामदासी
कसे होऊ उतराई या संतांचे उपकार । धन्य आज दिन । अनंत जन्माचे क्षीण आजी नष्ट करण्या परात्पर गुरु डॉ. आठवले अवतरले ।
क्षणचित्रे
१. ‘आज भगवंतानेच मला ही सेवा उपलब्ध करून दिली आणि त्याची कृपा होती; म्हणूनच मी येथे पोहोचलो’, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार प.पू. ईश्वरबुवा रामदासी यांनी व्यक्त केले.
२. ग्रंथ अर्पण केल्यावर प.पू. ईश्वरबुवा रामदासी यांचा भाव जागृत झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात