देहा रंगी रे मना रंगी रे…
प.पू. बाबा स्वतः कोणत्याही तर्हेच्या बंधनात अडकलेले नसल्याने त्यांची भजनेही काव्य, संगीत इत्यादींच्या नियमांच्या पलीकडे आहेत, हे त्यांच्या भजनांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या बंधनविरहित रचनेमुळेच बहुधा त्यांच्या भजनातील शब्द अन् नाद यांतून आनंदाची अनुभूती येते. आता आपण ऐकूया आनंदाची अनुभूती देणारे भजन .. देहा रंगी रे मना रंगी रे
Download
आनंद-कंद दाता नांदे या हृदयी माझ्या…
महंत 108 श्री ज्ञानगिरी महाराज 30 नोव्हेंबर 1962 रोजी मिरजेहून प.पू. बाबांना पाठविलेल्या पत्रात लिहितात, ’आपली जी भजने, पदे आहेत, ती रसाळ आणि गोड आहेत. त्यांतून आनंदाच्या लहरी येत असून आपण भजन करीत असतांना आपले स्वरूप निराळे अगाध पुरुषासारखे दिसते, असे आम्ही अनुभवून जाणलेले आहे.’ आता आपण ऐकूया बाबांचे एक भजन .. आनंद कंद दाता । नांदे या हृदयी माझ्या .. ..
Download
बाप माझा हो ज्ञानवंत…
जवळपास 140 भजने रचून ती गाणार्या प.पू. बाबांना स्फुरलेले पहिले भजन गुरूंंविषयीच होते. दिनांक 16 फेब्रुवारी 1956 रोजी रेवातटी श्री श्यामसाई यांच्या आश्रमात श्री अनंतानंद साईश यांचा निवास होता. तो वसंत पंचमीचा दिवस होता. त्या दिवशी श्रीगुरूंच्या पुढे, पहाटे 4 वाजता चूल पेटवतांना प.पू. बाबा, अर्थात पूर्वाश्रमीचा दिनकर भजन गाऊ लागला. आपल्या तंद्रीत नाचू लागला. लाकूडफाटा हातात घेऊन प्रदक्षिणा घालू लागला. हे भजन ऐकल्यावर ऐकणारे दिनकरला ’भक्तराज’ म्हणायला लागले; म्हणून दोन दिवसांनी, म्हणजे 18 फेब्रुवारी 1956 रोजी श्रीगुरूंनीही दिनकरचे ’भक्तराज’ असे नामकरण केले. गुरुभेटीनंतर अवघ्या सातव्या दिवशी प.पू. बाबांना स्फुरलेले हे भजन असे भाव व्यक्त करते की, जणु काही प.पू. बाबांनी वर्षानुवर्षे श्रीगुरूंची सेवा करून आलेल्या अनुभूतींवर आधारित असे भजन लिहिले आहे. आपण ऐकूया प.पू. बाबांना स्फुरलेले असे हे भजन .. बाप माझा हो ज्ञानवंत
Download
चला जाऊ नाथ सदनाला, साई सदनाला…
श्रीगुरूंंच्या सत्संगात गेल्यावर प्राप्त होणारे सौख्य ही एक अनुभूती आहे. ‘चला जाऊ नाथ सदनाला …’ या भजनात प.पू. बाबा श्रीगुरूंंकडे येऊन स्वत:चे कल्याण करून घ्यायला सर्वांना सांगतात. या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात हे भजन स्फुरल्याच्या तिथीचा, तसेच ते ज्यांच्या घरी स्फुरले त्या श्री. दादा मुजुमदार यांचा उल्लेख प.पू. बाबांनी केला आहे. श्री. दादा मुजुमदार हे प.पू. रामानंद महाराज यांचे सासरे. ते रतलामला नोकरी करायचे. ते इंदूरला आले असता रामजीदादांबरोबर श्रीगुरूंच्या दर्शनाला गेले. त्यांनी श्रीगुरूंना पहिल्या भेटीतच आपल्या घरी यायचे निमंत्रण दिले. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, ‘‘मला दक्षिणा म्हणून एकशे एक रुपये मिळणार असतील, तर मी येईन.’’ ते उत्तरले, ’’आपल्या कृपेने ते होईल.’’ मात्र हे ऐकून रामजीदादांना आपल्या घरी गुरूंना बोलवायचा विचार मनातून काढून टाकावा लागला; कारण एकशे एक रुपये कोठून आणायचे ? पुढे एक दिवस स्वतःहून श्रीगुरु रामजीदादांच्या घरी आले. तेव्हा त्यांनी फक्त अकरा रुपये दक्षिणा घेतली. खरे तर रामजीदादांकडे तेव्हा अकरा रुपयेही नव्हते. तीन-चार रुपये इतरांकडून उसने घ्यावे लागले होते ! थोडक्यात गुरूंना अपेक्षित असतो तो भाव. तोच घेऊन आपण गुरूंच्या सत्संगात जावे. तसे असेल तर सर्व सौख्य आपल्याला प्राप्त होणार हे निश्चित आहे. आता आपण ऐकूया प.पू. रामानंद महाराज यांच्या आवाजात श्रीगुरूंच्या सत्संगाची थोरवी सांगणारे प.पू. बाबांचे भजन .. ‘ चला जाऊ नाथ सदनाला…’
Download
प्रशांत चंद्र हा…
प.पू. बाबांनी हे भजन अनुभूतीच्या रूपात लिहिलेले आहे. अनुभूतीचे वर्णन करतांना प.पू. बाबा म्हणतात, ‘प्रशांत म्हणजे खूप शांत, चंद्र म्हणजे अनुभूती आणि गगना म्हणजे देह अन् मन यांच्या पलीकडील चैतन्यमय आकाशात त्यांना गुरूंचा चंद्रासारखा आल्हाददायक चेहरा दिसला. त्यांच्या दर्शनाने अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. चंदन ज्याप्रमाणे स्वतःच्या हृदयातील सुवास आनंदाने इतरांना देते, त्याप्रमाणे गुरु त्यांच्या हृदयातील आनंद शिष्यांना देतात.
Download