प्रबळ असलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी साधकांनी आध्यात्मिकतेची जोड देऊन केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

मनुष्य म्हटला की, त्याच्यात स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आलेच ! जोपर्यंत आपण ईश्‍वराशी एकरूप होत नाही, तोपर्यंत दोष आणि अहं यांचे निर्मूलन करत रहाणे आवश्यक आहे.

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सर्वच साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतात. त्यासाठी प्रयत्न केल्यावर बर्‍याच जणांचे दोष आणि अहं यांच्या पैलूंंचे प्रमाण उणावते. त्यातून गुणांची वृद्धी होऊन त्यांना आनंदही मिळतो. साधकांमधील प्रबळ दोष आणि अहं यांचे केवळ अन् केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच निर्मूलन होते. काही साधकांनी दोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न सर्वांनाच शिकता यावे, यासाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

 

पूर्वग्रहदूषितपणा हा दोष जाण्यासाठी कोची, केरळ येथील कु. रश्मि परमेश्‍वरन् यांनी केलेले प्रयत्न

१. पूर्वग्रहदूषितपणा दोषामुळे व्यष्टी आणि समष्टीची हानी होणे

एप्रिल २०१४ मध्ये सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी कोची येथील साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली होती. सद्गुरु बिंदाताईंनी मला माझ्यात पूर्वग्रहदूषित हा दोष प्रबळ असल्याचे सांगितले. मी देवाला प्रार्थना करून हा दोष घालवण्याचे प्रयत्न चालू केले.

२. पूर्वग्रहदूषित असणे याविषयी झालेले चिंतन

मला इतर साधकांनी मागे कधीतरी केलेले अयोग्य वर्तन किंवा व्यक्त केलेली प्रतिक्रिया व्यवस्थित लक्षात रहाते. त्या मानाने त्यांचे गुण किंवा चांगल्या कृती माझ्या लक्षात रहात नाहीत. एखाद्या साधकाकडे बघतांना माझ्या मनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे दोष असतात. असा अभ्यास केल्यानंतर जाणवले की, मी भूतकाळात रहात आहे. सहसाधकांनी स्वतःमधे पालट केले असतील किंवा त्यांना साहाय्य करूया, असा विचार अल्प असतो.

३. दोष घालवण्यासाठी केलेले प्रयत्न

३ अ. साधकात गुरुरूप पहाणे

एकदा पूर्वग्रहदूषित विचारांमुळे एका साधिकेविषयी माझ्या मनात अनेक प्रतिक्रिया आणि नकारात्मक विचार येत होते. तेव्हा त्या साधिकेचे रूप मनात आणून मी तिच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे रूप पहाण्याचा प्रयत्न केला. त्या साधिकेविषयी माझ्या मनात असलेले नकारात्मक विचार त्वरित थांबले. त्यानंतर असा प्रयोग मी पुष्कळ वेळा केला. त्यामुळे मला इतर साधकांमधे गुरुरूप पहाणे जमू लागले. पूर्वग्रहदूषितपणा अल्प करण्यासाठी प्रयत्न करू लागल्यावर मनाला हलके वाटू लागले.

३ आ. मला भूतकाळात नाही तर पूर्णतः वर्तमान काळातच रहायचे आहे, हे मनावर बिंबवणे

पूर्वग्रहदूषित विचार म्हणजे भूतकाळातील घटनांच्या अनुषंगाने वर्तमानकाळात घडणार्‍या घटनांविषयी निष्कर्ष काढणे आणि त्यानुसार कृती करणे. हा निष्कर्ष नेहमी योग्य असतोच, असे नसते. अयोग्य विचार केल्याने मी ईश्‍वरापर्यंत पोहोचू शकणार नाही; कारण ईश्‍वर तर परम सत्य आहे. यासाठी मला नेहमी जे सत्य आहे, योग्य आहे, त्याचीच कास पकडायला हवी आणि त्यासाठी मला भूतकाळाच्या पंज्यातून बाहेर येऊन सतत वर्तमानकाळात रहायला हवे. मला भूतकाळात नाही तर पूर्णतः वर्तमान काळातच रहायचे आहे, हे मनावर बिंबवून मी नकारात्मक विचार दूर करण्याचे प्रयत्न केले.

३ इ. प.पू. डॉक्टरांप्रमाणे साधकांचे गुण पहाण्याचा प्रयत्न करणे

मी मनाला सतत सांगायचे, मी इथे प.पू. गुरुदेवांच्या सेवेसाठीच आले आहे. माझे हे सहसाधकही त्याचसाठी आले आहेत. माझ्या गुरुदेवांसाठी तेही तन – मन – धन यांचा त्याग करून आले आहेत. गुरुदेव साधकांनी केलेल्या त्यागाविषयी नेहमी कृतज्ञताभावाने बोलतात. मीही त्यांच्यासारखाच विचार केला पाहिजे. मलाही साधकांचे गुण पहाता आले पाहिजेत.

 

नेतृत्वगुण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या व्हॅन्कुवर, कॅनडा येथील सौ. राधा मल्लिक !

१. एका सेवेचे दायित्व मिळाल्यावर ताण येणे आणि स्वभावदोष अन् अहं
यांच्यावर मात करून आवश्यक गुणांचे संवर्धन करण्यासाठी प.पू. डॉक्टरच साहाय्य करतील, अशी श्रद्धा वाटणे

एका मला सौ. श्‍वेता क्लार्क यांच्यासमवेत एका सेवेचे दायित्व देण्यात आले. माझ्यातील नेतृत्वगुण वाढवण्यासाठी एका संतांनी निरोप दिला होता. आरंभी सेवेचे दायित्व स्वीकारतांना भावनाप्रधानता, असुरक्षितता आणि चुका होण्याची भीती यांमुळे मला पुष्कळ ताण आला होता; परंतु या सेवेच्या माध्यमातून माझ्यातील दोष आणि अहं यांच्यावर मात करून आवश्यक गुणांचे संवर्धन करण्यासाठी तेच साहाय्य करतील, ही श्रद्धा होती.

२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी अन् नेतृत्वगुण निर्माण होण्यासाठी केलेले प्रयत्न

अ. नेमके कोणते स्वभावदोष माझ्या नेतृत्वगुणाच्या आड येत आहेत, याविषयी अंतर्मुख होऊन पाहिल्यावर असुरक्षितता, भावनाप्रधानता आणि आत्मकेंद्रितपणा हे प्रमुख दोष लक्षात आले.

आ. पू. (सौ.) योयाताई यांनी नेतृत्वगुण निर्माण होण्यासाठी आत्मविश्‍वास वाढवण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी दोषांची व्याप्ती काढणे, प्रतिदिन दहा चुका लिहिणे आणि स्वयंसूचना देणे, अशा पद्धतीने प्रयत्न केला.

इ. नेतृत्वगुण असणार्‍या साधकांचे निरीक्षण करून त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतीत आणण्याचा प्रयत्न केला.

३. स्वभावदोष-निर्मूलन सत्संगाचा फायदा

स्वभावदोष-निर्मूलन सत्संगाच्या माध्यमातून साधकांना त्यांच्या चुका सांगण्यामागील आध्यात्मिक दृष्टीकोन समजल्यामुळे भावनाप्रधानता हा दोष उणावणे आणि साधकाला साधनेत साहाय्य मिळावे, या प्रामाणिक हेतूने चुका सांगणे शक्य होणे

४. आत्मविश्‍वास वाढवण्यापेक्षा श्रीकृष्णावरील विश्‍वास वाढवण्याकडे लक्ष देणे
आवश्यक आहे, हेे जाणवून प्रयत्न केल्याने निर्णय घेतांना वाटणारी भीती उणावणे

चुका होण्याच्या भीतीमुळे आणि आत्मविश्‍वासाने मार्गदर्शन करू शकत नसल्याने एखादा निर्णय घेण्यास मी कचरत होते. त्या वेळी आत्मविश्‍वास वाढवण्यापेक्षा श्रीकृष्णावरील विश्‍वास वाढवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मात्र मला माझे दायित्व अधिक सहजतेने पार पाडता येऊ लागले. एखादा निर्णय घेण्यापूर्वी मी प्रार्थना करून श्रीकृष्णाला विचारत असे आणि त्या वेळी मनात आलेला विचार साधकांना सांगत असे. अशा प्रकारे श्रीकृष्णावर विसंबून राहिल्यामुळे माझे काळजीयुक्त विचारांनी ग्रस्त रहाणे बंद झाले.

५. मनात सतत इतर साधकांचे विचार असल्याने स्वतःसंदर्भातील विचार उणावून आत्मकेंद्रितपणा न्यून होणे

प्रत्येक परिस्थिती म्हणजे नेतृत्वगुण वाढवण्यासाठी देवाने दिलेली संधी आहे, या विचाराने मी प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करू लागले. मी मनमोकळेपणाने बोलण्यास प्रारंभ केल्यावर मला हलके वाटून माझ्या वागण्यात सहजता आली. सहसाधकांविषयी जवळीक वाटू लागली. मनात येणारी एखादी शंका किंवा नकारात्मक विचार मी त्वरित बोलून घेतल्यामुळे हलके वाटून मनावरील अनावश्यक ताण दूर होऊ लागला.

 

निर्भयता येण्यासाठी रत्नागिरी येथील सौ. अरुणा पोवार यांनी देवाचे घेतलेले साहाय्य

१. लहानपणापासून वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवून भीती वाटणे

मी ४ – ५ वर्षांची असल्यापासून मला वाईट शक्ती दिसणे, त्यांचे अस्तित्व जाणवणे, त्यांचा स्पर्श होणे, त्यांची जाणीव होणे आणि त्यांचा आवाज ऐकू येणे, असे आध्यात्मिक त्रास होत होते. मी जसजशी मोठी होत गेले, तसे हे प्रमाण पुष्कळ वाढले. त्यानंतर भीती वाटणे हा माझा प्रबळ दोष झाला. मी कुठेही एकटी थांबायचे नाही. दिवसा आणि रात्री मला कोणाची तरी सोबत लागत असे.

२. भीती वाटणे या दोषावर विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाययोजना केल्यावर त्यामागील कारण लक्षात येणे

यावर उपाय म्हणून प्रार्थना, अभ्याससत्रे, प्रसंगाचा सराव, त्रास लिहून खोक्यात टाकणे, हा दोष जाण्यासाठी देवाला प्रार्थना करणे हे उपाय केले. नंतर लक्षात आले, माझा स्वभाव भित्रा नाही. मला वाईट शक्ती भीती दाखवतात; पण मी लढण्यास न्यून पडते.

३. देवाचे साहाय्य घेऊन मात करण्याचा प्रयत्न केल्यावर देवतांचे साहाय्य मिळत असल्याची अनुभूती येणे

एकदा मला काही कारणाने एकटी रहाण्याची वेळ आली. दोन मजली मोठ्या घरात एकटी रहाण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर, भगवान श्रीकृष्ण, अष्टदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता या सर्वांचे साहाय्य घेऊन त्यांना अधिकाधिक तळमळीने प्रार्थना करू लागले. वाईट शक्तींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण देवाचे साहाय्य असल्याने मला त्याचे काहीच वाटेना. प्रत्येक वेळी देवाचे साहाय्य घेऊन मात करू लागले. अधिकाधिक प्रार्थना केल्यावर देवतांचे साहाय्य मिळू लागले.

४. विविध उपाय केल्यामुळे भीती हा दोष अल्प होत जाणे

रात्री-अपरात्री त्रास होऊ लागल्यावर जयघोष करणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, उदबत्ती लावणे, भजने ऐकणे, नामजप करणे, असे आध्यात्मिक उपाय करू लागले. केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी एकटी राहू शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment